Monday, November 1, 2010

कल्याणची सत्ता, मनसेचा हुकुमी पत्ता

कल्याण - डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल आता हाती आला आहे. मात्र निवडणुकीच्या प्रचारापासून चर्चा झाली ती फक्त कल्याण - डोंबिवली महापालिकेची. कारण या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकमेकांना आव्हान देत निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे सगळा प्रचार हा फक्त शिवसेना आणि मनसे याच दोन पक्षांभोवती केंद्रीत झाला होता. वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्स यावर बातम्या आणि चर्चा होती ती फक्त शिवसेना आणि मनसेचीच. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सभा न्यूज चॅनेल्सवर लाईव्ह सुरू असायच्या. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हे भाग्य लाभले नाही. कारण टीआरपी असल्याशिवाय नेत्यांच्या सभा लाईव्ह केल्या जात नाहीत. अर्थात यामुळे कोणत्या नेत्यांना टीआरपी आहे, आणि कोणत्या नेत्यांना टीआरपी नाही हे सुद्धा नागरिकांच्या पुन्हा एकदा लक्षात आले.
आता निवडणूक संपून निकाल हाती आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या पूर्ण सत्तेच्या आवाहनाला पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. पण पहिल्याच फटक्यात मनसेचे 26 उमेदवार निवडून आले. मनसेशिवाय कोणत्याच पक्षाचा महापौर होऊ शकत नाही. शिवसेनेचेही 31 उमेदवार निवडून आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची या ठिकाणी पुनरावृत्ती झाली नाही. शिवसेना आणि मनसेच्या लढाईत विधानसभेत सत्तेचे लोणी काँग्रेस आघाडीने ( या ठिकाणी आघाडीच्या बोक्यांनी लोणी पळवलं, असा शब्द वापरायचा नव्हता. गैरसमज होऊ नये म्हणून लगेचच खुलासा.) पळवले होते. लोकसभा निवडणुकीतही शिवसेना आणि मनसेच्या लढाईत आघाडीच्या अनेक उमेदवारांना खासदारकीची अक्षरश: लॉटरी लागली. नाही तर समीर भुजबळ, संजीव नाईक या सारख्या आघाडीच्या उमेदवारांना दिल्लीत नव्हे तर गल्लीतच फिरावे लागले असते.
शिवसेना आणि मनसेत लढाईत होऊन आघाडीला त्याचा फायदा झाला नाही. शिवसेना नंबर वन, तर मनसे नंबर टू ठरली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पालापोचाळा झाला. मनसेचा फटका शिवसेनेला नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपला बसला. भाजपचे तर फक्त नऊच उमेदवार निवडून आले. राज ठाकरेंना अपेक्षीत असलेले नवनिर्माण झाले नाही. पण भाजपचे अनायसे का होईना पण 'नऊ'निर्माण झाले.
आता कल्याणचा सुभेदार कोण होणार ? निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांवर टीका करणारे शिवसेना आणि मनसे आता सत्तेसाठी एकत्र येतील का ? हे प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.
1999 मध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. निवडणूक लढवली, आणि निकालानंतर काँग्रेसबरोबर सत्ताही स्थापन केली. त्याआधीही काँग्रेस एस चा प्रयोग त्यांनी केली होता. 'काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी अंगाला राख लावून हिमालयात जाईन' असंही ते म्हणाले होते. पण तसं काही झालं नाही. सह्याद्री हिमालयात गेला नाही, पण काँग्रेस बरोबर सत्ता स्थापण करून मुंबई ते दिल्ली पर्यंतची सत्तापदं ताब्यात घेतली.
हे सर्व करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही कटूता निर्माण झाली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा सत्ता पॅटर्न शिवसेना आणि मनसेनं राबवण्यास काय हरकत आहे ? कारण मतदारांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको आहेत. तर त्यांना शिवसेना आणि मनसे हवी आहे, हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे. काँग्रेसचा भ्रष्टाचाराचा 'आदर्श' सगळ्या जगासमोर आला आहे. असले 'आदर्श' कल्याण - डोंबिवलीत बसवण्यापेक्षा त्यांना सत्तेतून हटवायलाच हवं. जी चूक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत झाली, पून्हा तिची पुनरावृत्ती नकोच. निवडणुकी आधी जरी युती झाली नसली तरी शिवसेना आणि मनसेने आता निकालानंतर एकत्र येऊन ही सुभेदारी कायम राखली पाहीजे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे शिवसेनेचे नुकसान झाले होते. त्यावेळी गालातल्या गालात हसणा-या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गालावर मतदारांनी चांगलाच 'पंजा' उमटवला आहे.

2 comments:

  1. राज ठाकरेंना वगळून आपले 'कल्याण'होऊ शकत नाही. याची जाणीव आता शिवसैनिकांना होऊ लागली आहे. हे या ब्लॉगमध्ये दिसतंय. आता कार्याध्यक्षांनाही याची जाणीव कधी होणार ? हा प्रश्न आहे.

    ReplyDelete
  2. सेना मनसेने एकत्र येणे हि अपरिहार्यता कल्याण डोंबिवली महापालिकांच्या निकालाने पुन्हा एकदा समोर आली ....कल्याणडोंबिवलीकरांनी या निवडणु़कीत आपल्या बुद्धीमत्तेची चुणुक दाखवून दिली असे म्हंटल्यास वावगे ठरु नये.....सेनामनसेला एकत्र आणण्याचा योग्य पर्याय या निमित्ताने समस्त मराठी माणसांना शोधुन दिला......आता हा जनतेचा कौल मनःपुर्वक स्विकारुन त्यानुसार आचरण सेनामनसेने केले तर ठिक नाहितर इतिहासाची पुनरावृत्ती होत राहिल महाराष्ट्रात दुसरे काय?
    जय हिंद!
    जय महाराष्ट्र!

    ReplyDelete