Thursday, April 22, 2010

पैशांसाठी झटेल तोच पवारांना 'पटेल'

आयपीएलची फायनल आता अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातली मॅच पाहण्यासाठी क्रिकेट रसिक आतुर झाले आहेत. मात्र या मॅचेसपेक्षाही थरारक अशा लढती मैदानाबाहेर सुरू आहेत. शशी थरूर यांची विकेट केव्हाच गेली आहे. त्यामुळे आता दुसरी विकेट कुणाची जाणार याची चर्चाही आता सुरू झाली आहे. दुसरी विकेट कुणाची जाणार याची चर्चा सुरू व्हावी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आयपीएलशी आमचा संबंध नाही, असं सांगायला सुरूवात करावी याचा अर्थ सुज्ञांना केव्हाच कळला. राष्ट्रवादीची ही भूमिका म्हणजे 'आम्ही नाही त्यातले आणि कडी लावा...' अशीच आहे.
खरं तर आयपीएलच्या विरोधात इतकी आदळआपट करण्याची मुळात गरजच नाही. कारण आयपीएलमुळे देशातल्या राजकारण्यांचा ब्लॅक मनी बिनबोभाट व्हाईट होतोय. पाणीटंचाईची धग कुणाला जाणवत नाही. अनेक दु:खांवरचं उत्तर म्हणजे आयपीएल म्हणता येईल. शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दाही आता केव्हाच मागे पडलाय. केंद्रीय कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांनी शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दा, या माध्यमातून निकाली काढला आहे. कारण शेतकरी नावाची काही चीज या देशात आहे, याचाच आता सगळ्यांना विसर पडला आहे. आयपीएलसाठी पैसा लावणे, आणि पैसा कमावणे हाच आता राजकारण्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यांच्या बरोबरीने माफियाही आलेच.
विदर्भात आतापर्यंत हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मात्र शरद पवार त्यांचे अश्रू पुसण्यासाठी तिथं गेले नाहीत. मात्र आयपीएलसाठी त्यांनी छातीचा कोट केला. ललित मोदी यांचीही जीवापाड पाठराखण केली. मात्र हे प्रकरण अंगलट येणार याची जाणीव झाल्यानंतर नेहमीप्रमाणे हात झटकले. आता त्यांच्या पक्षाचे नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची कन्या पूर्णा पटेल हिची चौकशी करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर पूर्णा पटेल हिन प्रफुल्ल पटेल यांच्या सचिवांकडे एक ई-मेलही पाठवला होता. पूर्णा पटेल आयपीएलसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहे . तिनेच पटेल यांच्या सचिव चंपा भारद्वाजकडे मेल पाठवला होता . हाच मेल भारद्वाज यांनी १९ मार्च रोजी तत्कालिन परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरुर यांना फॉरवर्ड केला होता. या मेलमध्ये आयपीएलच्या दोन नव्या टीमसाठी होणा- या लिलावात कोणत्या कंपन्या सहभागी होणार आहेत आणि साधारण किती मोठ्या बोली लागणार अशी माहिती होती. पटेल यांची सचिव त्यांच्या परवानगीशिवाय एवढी हिंमत करणं शक्य नाही.
आता सुप्रिया सुळे यांनी पूर्णा पटेल या निर्दोष असल्याचं पक्क राष्ट्रवादी प्रमाणपत्र दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एवढी तत्परता शेत-यांविषयी किंवा सामान्य जनतेविषयी कधी दाखवल्याचं आठवत नाही. मात्र आता प्रश्न सामान्यांशी नव्हे तर पैशाशी निगडीत आहे. आणि हाच पैसा राष्ट्रवादी काँग्रेसला हवा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या त्या भागातले सरंजामदार, बडे नेते, गुंड यांच्या पाठिंब्यानेच सुरू आहे. आणि या सर्वांना पोसण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. तो पैसा कुणाला 'पटेल' अथवा न 'पटेल' मात्र तो अशाच नेत्यांच्या मार्फत उभारावा लागतो. कोटीच्या कोटी उड्डाणे यशस्वी करायची असतील तर त्याला पर्याय नाही. पटेल यांनी एअर इंडियाचा 'महाराजा' भिकेला लावण्याची वेळ आणली आहे. मात्र पक्षासाठी हवी असणारी मनी पॉवरही तेच उभारू शकतात. 'जो जो करील मनोरंजन मुलांचे, जडेल प्रभुशी नाते तयांचे' याच पार्श्वभूमीवर 'जो जो जोडेल पैसा पक्षासाठी, जडेल त्यांच्याशा नाते राष्ट्रवादीचे' अशी सध्या स्थिती आहे.

खमंग फोडणी - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधला हनीमून कधीच संपला आहे. मुळात त्यांच्यात तसं नातं कधी नव्हतंच. होतो तो फक्त सत्तेचा व्यवहार. आणि या व्यवहारातूनच दोन्ही पक्षांमध्ये आता गँगवॉर सुरू झालंय. काँग्रेसच्या शशी थरूर यांची विकेट गेली आहे. आता काँग्रेस गँगही राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्याचा गेम केल्याशिवाय आता शांत बसणार नाही. आता कुणाला 'पटेल' अथवा न 'पटेल' मात्र जो पर्यंत एखाद्याचा गेम होणार नाही तोपर्यंत काँग्रेसचे नेते 'प्रफुल्ली'त होणार नाहीत.

Monday, April 12, 2010

भगवा झेंडा फडकला, काँग्रेसी दर्डा दडपला

संभाजीनगरवरील भगव्या झेंड्याची शान कायम राखण्यात शिवसेनेला पुन्हा एकदा यश आलं आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची पाशवी मसल आणि मनी पॉवर, त्याला मिळालेली आमदार प्रदीप जैस्वाल यांची रसद याच्या जोरावर भगवा उतरवण्याचे मनसूबे रचले जात होते. मात्र शहरातला मतदार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा पाईक आहे. या शहराला दंगेखोर मुस्लिमांच्या भीतीतून दूर सारण्याचं काम शिवसेनेनं केलेलं आहे. अडीनडीला इथला शिवसैनिक मदतीला धावून जातो, या बाबी मतदारांच्या लक्षात आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मनपाची केलेली कोंडीही मतदारांच्या लक्षात आली. मनपाला शहरात पुरेसा पाणीपुरवठा करता येवू नये यासाठी सहकार्य करण्यात आलं नाही. आणि जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी आघाडी निवडून आली तर 24 तास पाणीपुरवठा करू असं आश्वासन दिलं. काँग्रेस आघाडीचा असं हे जीवघेणं राजकारण. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणा-यांचीच ही अवलाद असावी की काय ? असा संशय येतो. मत देणार असाल तर पाणी. नाही तर खुशाल मरा असा यांचा डाव. मात्र हा डाव मतदारांनी ओळखला आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - जैस्वाल गटालाच पाणी पाजलं.
शिवसेनेने उपस्थित केलेल्या संभाजीनगर की औरंगाबाद ? या मुद्यावर अनेक बोरू बहाद्दरांनी टीका केली. शिवसेना भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र संभाजीनगर हा भावनिक राजकारणाचा मुद्दा नाहीच. कारण तो अस्मितेचा प्रश्न आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्याचा मुद्दा आता पुढे आला आहे. परभणी कृषी विद्यापीठालाही वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं, अशी जूनी मागणी आहे. बॉम्बेचे मुंबई, मद्रासचं चेन्नई, कलकत्ताचं कोलकाता असं नव नामकरण झालंच आहे. देशात अनेक ठिकाणी विद्यापीठं आणि शहरांना नवी नावं देताना तो अस्मितेचा मुद्दा असल्याचं म्हटलं गेलं. अर्थात ते योग्यही होतं. वरील नाव बदलताना किंवा मागणी करताना ते भावनिक राजकारण असल्याचा आरोप केला जात नाही. मात्र संभाजीनगरचा मुद्दा उपस्थित झाल्यावरच अनेकांच्या पोटात कळ उठते. संभाजीनगर हा आमच्याही अस्मितेचा प्रश्न आहे. कृपया करून भगवी, हिरवी, निळी, पिवळी आणि इतर रंगांची अस्मिता अशी मिसळ करू नका. आमची तीच अस्मिता आणि शिवसेनेचे भावनिक राजकारण हा बेगडीपणा आता टाकून द्यायला हवा.
औरंगजेबाचं राज्य हे शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा मोठं होतं. मात्र शिवाजी महाराजांच्या राज्यात असलेली लोकशाही औरंगजेबाकडे होती का ? शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थीतीत केलेला संघर्ष, सर्व धर्मियांना दिलेली समान वागणूक यांची तूलना होवू शकत नाही. जिझीया कर बसवणारा औरंगजेब आम्हाला नको आहे. शिखांच्या धर्मगुरूंची दिल्लीत भर चौकात हत्या करवणा-या औरंगजेबाचं नाव आमच्या शहराला नकोच आहे.
संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारायला नकार दिल्याने त्यांना हालाहाल करून मारण्यात आलं. हा इतिहास औरंगाबाद या नावामुळे आठवतो. या नावाने ही जूनी जखम भळाभळा वाहते. औरंगजेबाला खुलताबादमध्ये जागा दिली आहे. त्यानं तिथंच रहावं. त्याचा पुळका येत असणा-यांनी हवं तर तिथं जावून सुंता करून घ्यावी. त्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र संभाजीनगरला विरोध कराल तर आता खबरदार....
महापालिका निवडणुकीत उद्योगमंत्री राजेंद्र दर्डांचा पैशाचा महापूर, राष्ट्रवादीची रसद, जैस्वाल गटाचे रेडिमेड कार्यकर्ते असा फौजफाटा आघाडीला तारू शकला नाही. काँग्रेसचा 'पैसेवाला हाथ' आणि अब्दूल सत्तारांची 'लाथ ' ही मनी आणि मसल पॉवर मतदारांनी लाथाडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही मधल्यामध्ये 'विखेट' गेली. माजी नगरसेवक गणेश तांबे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली.
शिवसेनेने महापालिका जिंकली असली तर त्यांनाही आता रस्त्यावर उतरावेच लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शुक्राचार्यांनी अडवलेलं पाणी संघर्ष करून सोडावंच लागेल. त्यासाठी जायकवाडीवर धडक मारावी लागली तरी बेहत्तर. महापालिकेसाठीच्या योजना आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी युतीच्या आमदारांनी वैधानिक आयुधांचा वापर करून सरकारला जेरीस आणायला हवं.
शिवसेनेला मिळालेला हा कौल काँग्रेस आघाडीची पैशाची मस्ती उतरवणारा आहे. संभाजीनगर हे मराठवाड्याचं 'पॉवर हाऊस' आहे. इथं डौलाने फडकणारा भगवा मराठवाड्याचे प्रेरणा स्त्रोत आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मनसेमुळे काँग्रेस आघाडीला फायदा झाला होता. यावेळी मतदारांनी ही चूक टाळून मनसेला खड्याप्रमाणे बाजूला सारलं. आता शिवसेनेने या विजयाचा बोध घेऊन पुन्हा मैदानात उतरावं. मतदारांचा शिवसेनेवर विश्वास आहे. याची वारंवार प्रचिती येतच राहिल. शिवसेनेनं फक्त लढत रहावं.

खमंग फोडणी - संभाजीनगरची जनताही पैश्यांवर नव्हे तर विचारांवर प्रेम करणारी आहे. पैशाच्या 'लोकमता'मागे धावण्यापेक्षा संकटांचा 'सामना' करणा-यांना इथल्या मतदाराच्या मनात स्थान आहे. 'हॅलो औरंगाबाद' करणा-यांना आता मतदारांनी चांगलेच 'दर्डा'वले आहे. त्यामुळे आता 'गुडमॉर्निंग संभाजीनगर'.

Friday, April 9, 2010

तुम हमे वोट दो, हम तुम्हे पानी देंगे

महापालिका निवडणुकीचा प्रचार आज थंडावला. नवी मुंबई आणि संभाजीनगरसाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दोन्ही शहरात सभा घेतल्या. जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी तर संभाजीनगरात धक्कादायक विधान केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जैस्वाल गटाला सत्ता दिली तर शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, शहराला पुरवठा करण्यासाठी पुरेसं पाणी आहे. मात्र युतीची सत्ता असल्याने ते पाणी द्यायचं नाही, अशी भूमिका आघीडीने घेतली आहे. चला या निमीत्ताने झारीतले शुक्राचार्य जनतेला दिसले. तसंच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचं पाणीही जोखता आलं.
मुख्यमंत्र्यांनीही नवी मुंबईत वाढिव एसएफआयचं आश्वासन देताना आपण वाढपी असल्याचं सांगत मतदारांना एक प्रकारे काँग्रेसकडेच सत्ता सोपविण्याचे निर्देशच दिले. निवडणुकीत आश्वासनं काही नवी नाही. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपण सत्ता कशा प्रकारे वाकवू शकतो याचीच प्रचिती दिली. नाही तरी काँग्रेस आघाडीच्या या राज्यात काही दिल्याशिवाय काही मिळत नाहीच. त्याला ही निवडणूक तरी कशी अपवाद ठरेल. अर्थात काँग्रेसच्या रक्तातच हा गुण आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशाला जे काही स्वातंत्र्य मिळाले ते काँग्रेस मुळेच मिळाले असा दावा काँग्रेसवाले अगदी देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीपासून करताहेत. बरं हे स्वातंत्र्य कसं मिळालं तर पाकिस्तान देवून. या न्यायाने काही दिल्याशिवाय काही मिळत नाही, हे खरंच.
काँग्रेसचे हे वाढपी मुख्यमंत्री सांगतात की ओळखीचा वाढपी असल्यावर शेवटच्या पंगतीत शेवटच्या रांगेत असला तरी बुंदी मिळते. आता ही बुंदी पात्रात पाडायची म्हणजे काँग्रेसला मत द्यावं लागणार असाच हा इशारा आहे. मात्र वाढप्याचाही हा काय नादानपणा म्हणायचा, राज्य चालवता आणि महापालिकेसाठीही तुमची औकात काय आहे ती दाखवून देता. महापालिका विरोधकांच्या ताब्यात असल्यावर विकास कामांना खीळ घालायची, सरकारकडून सहकार्य करायचे नाही. आणि पुन्हा विकास झाली नाही अशी बोंब ठोकायची. ही दुटप्पी नीती आता जगजाहीर झाली आहे. त्यामुळे जनतेनेही काँग्रेसची ही कुल्हेकुई ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे.

खमंग फोडणी - लग्न सराई आता सुरू झालेली आहे. त्यातल्या काही तिथी तर अगदीच दाट आहेत. त्यामुळे लग्नातच्या ठिकाणी पाहुणेमंडळींची मोठी धांदल उडणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लग्नाच्या ठिकाणी पोचण्यासाठी घामाघूम होत आणि धावपळ करत जावं लागणार. लग्न लावल्यानंतर पंगतीला बसल्यावर अशोकरावांचा शोध घ्या. दिसल्यावर त्यांना हात दाखवा. आणि वाढिव बुंदी ताटात पाडून घ्या. कारण राज्याला आता नवा वाढपी मिळालाय. घ्या बुंदी.