Friday, October 25, 2013

वारसा आणि वाटचाल

एक व्यंगचित्रकार म्हणून जागतिक पातळीवर ख्याती असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वृत्तपत्रातल्या नोकरीत रमले नाही. मुंबईचा भूमीपुत्र मराठी माणूसच या शहरातून हद्दपार होत होता. परप्रांतीय शिरजोर होत चालले होते. नोकरी, व्यापार या सगळ्याच क्षेत्रात मराठी माणसांची पिछेहाट होत होती. अटकेपार झेंडा फडकावणारा हा मराठी गडी त्याच्याच राज्याच्या राजधानीत नोकरीसाठी वणवण फिरत होता. मात्र मोठ्या पदांवर बसलेले परप्रांतीय भूमीपुत्रांवर अन्याय करून परप्रांतीयांची भरती करत होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडून मार्मिक हे साप्ताहिक काढलं. मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकात त्यांनी "वाचा आणि थंड बसा" असं शिर्षक देऊन मुंबईतल्या विविध आस्थापणांमध्ये नोकरीला लागणा-या परप्रांतीयांची यादीच छापायला सुरूवात केली. यातून मराठी माणसांमध्ये योग्य संदेश जाऊ लागला. मराठी मनं यातून चेतायला लागली. नंतर, "वाचा आणि पेटून उठा" असा थेट आदेशच देण्यात आला. मात्र हे सर्व कार्य करण्यासाठी एक संघटना असणं गरजेचं होतं, ही बाब शिवसेनाप्रमुखांचे वडील असलेल्या प्रबोधनकारांनी हेरली. त्यांनीच संघटनेला शिवसेना हे नाव सुचवलं. आणि 19 जून 1966 रोजी शिवसेनेचा जन्म झाला. बजाव पूंगी हटाव लूंगी ही घोषणा देऊन दाक्षिणात्यांच्या विरोधातला रोष रस्त्यांवर दिसू लागला. दाक्षिणात्यांच्या हॉटेल्सवर हल्ले झाले. स्थानिय लोकाधिकार समिती सक्रीय झाली आणि मोठमोठ्या कार्यालयांमध्ये मराठी युवकांना नोकरी मिळू लागली. मुंबईत मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना आक्रमकपणे लढत होती. मराठी माणसांना न्याय मिळावा यासाठी शिवसेनेनं स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना केली होती. शिवसेना आणि स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक कंपन्यां, सरकारी आस्थापनांसमोर आंदोलनं करण्यात येऊ लागली. चर्चा - वाटाघाटी करून मराठी माणसांना नोक-या मिळायला लागल्या. ज्यांना ही भाषा कळत नव्हती त्यांना शिवसेना स्टाईलने प्रसाद मिळू लागला होता. मात्र आता हेच चित्र मुंबईत दिसतंय का ? मराठी तरूणांना नोक-यांमध्ये प्राधान्य दिलं जातंय का ? मराठी अस्मिता टिकवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरतील का ? हे प्रश्न आता उपस्थित होताहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. मराठी माणसाला हिंमत दिली. त्यामुळे महानगरांमध्ये मराठी टक्का टिकायला मदत झाली. आता जागतिकीकरणात हाच टक्का टिकवून ठेवण्याचं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.
1995 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनाप्रमुखांचं वादळ राज्यभर फिरत होतं. या निवडणुकांच्या आधी म्हणजेच 1994 साली नाशिकमध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं. ते अधिवेशन शिवसेनेसाठी ऐतिहासिक असंच ठरलं. त्या अधिवेशनात देवीला घातलेलं 'दार उघड बये दार उघड' हे साकडं शिवसेनेला सत्तेकडे नेणारं ठरलं. नाशकातल्या गोल्फ क्लब मैदानावर विराट जाहीर सभेनं अधिवेशनाची सांगता झाली होती. संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच शहरातले सारे रस्ते राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांच्या भगव्या वादळानं ओसंडून वाहत होते. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला 'विधानसभेवर भगवा फडकवण्याचा' आदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवसैनिकांचं वादळ त्या मैदानावरून राज्यात वेगानं पसरलं. शिवसेनाप्रमुखांनी मोठ्या शहरांबरोबरच राज्याचा ग्रामीण भागही पिंजून काढला. अनेक तालुक्यांच्या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांच्या सभा झाल्या. त्या सभांना लाखोंची गर्दी होत होती. तत्कालीन काँग्रेसच्या विरोधात असलेला रोष नागरिक शिवसेनाप्रमुखांच्या सभेला उपस्थित राहून व्यक्त करत होते. शिवसेनाप्रमुखांच्या मेहनतीला अखेर यश आलं. राज्यातील जनतेनं शिवसेनेचे 75 आमदार निवडून दिले. विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार झालं.
विधानसभा निवडणुकांना आता एका वर्षापेक्षाही कमी अवधी उरलेला आहे. आदर्शमधला बेनामी फ्लॅट्सचा घोटाळा, 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा, 2जी स्कॅम, कॉमनवेल्थ, महागाई, दंगली, बॉम्बस्फोट यांमुळे सरकारच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. मात्र हा असंतोष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महायुतीच्या पथ्यावर टाकण्यात यशस्वी ठरतील का ? असा सवाल सध्या नागरिकांमध्ये निर्माण झालाय. कारण मतदारांवर अमोघ वक्तृत्वाची मोहिनी घालणारे शिवसेनाप्रमुख हयात नाहीत. लाखांच्या सभांना मार्गदर्शन करणारे शिवसेनाप्रमुख हीच शिवसेनेची खरी दौलत होती. तसंच शिवसेनाप्रमुखांबरोबरचे बिनीचे शिलेदारही आता मैदानात उतरू शकत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांच्या नव्या टीमसह राज्य पालथं घालावं लागणार आहे. उद्धव ठाकरे कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जाणार आहेत ? त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात ? या प्रश्नाच्या उत्तरातच सत्तांतर होईल की नाही ? याचं उत्तर दडलेलं आहे.
1995 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंच्या समोर निर्माण झालं आहे. शिवसेनाप्रमुखांचं विधानसभेवर भगवा फडकवण्याचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी ही उद्धव ठाकरेंवर आलेली आहे. राज्यातल्या सत्ताधा-यांच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. अशाच असंतोषाला शिवसेनाप्रमुखांनी बळ दिलं होतं. त्याला वाचा फोडली होती. आणि त्यातूनच युतीकडे मतदारांनी सत्ता सोपवली होती. आताही परिस्थिती तशीच आहे. फक्त गरज आहे ती त्या असंतोषाला बळ देण्याची.
महाबळेश्वरमध्ये 2003ला शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं. ही शिवसेनेची पक्षांतर्गत बाब होती. मात्र जवळून राजकारण पाहणा-यांसाठी हा एक धक्काच होता. कारण राज ठाकरे 1990 पासूनच विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेत सक्रीय होते. 1995च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनीही शिवसेनाप्रमुखांच्या सोबत राज्यभर झंझावाती प्रचार केला होता. ज्या शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांची सभा घेणं शक्य नसायचं तिथं राज ठाकरे सभा घ्यायचे.
राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी असायची. त्यांच्या भाषणावर असलेली शिवसेनाप्रमुखांची छाप शिवसैनिकांना सुखावणारी होती. त्यामुळे शिवसेनेतलं मोठं पद हे राज ठाकरेंनाच मिळणार अशी  खुणगाठ शिवसैनिकच नव्हे तर इतर पक्षातल्या नेत्यांनीही बांधली होती. मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाल्यानं सगळी समीकरणच बदलून गेली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपात उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम होता. त्यात राज ठाकरेंच्या समर्थकांना डावलण्यात आलं. सहाजिकच राज ठाकरे नाराज झाले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी स्वत:ला नेहमीच्या शैलीत झोकून दिलं नाही. परिणामी त्या निवडणुकीत युतीला यश मिळालं नाही.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतले दिग्गज नेते नारायण राणेंचंही उद्धव ठाकरेंसोबत सख्य नव्हतं. शिवसेनेत पदांचा बाजार मांडल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर राणेंची शिवसेनेतून गच्छंती झाली. राणेंच्या गच्छंतीमुळे शिवसेनेचं कोकणातलं वर्चस्व संपूष्टात आलं. 2005 मध्ये नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेची स्थापना केली.
शिवसेना सोडणा-या कोणत्याही नेत्याने शिवसेनाप्रमुखांवर टीका केली नव्हती. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि मिलिंद नार्वेकरांवर शिवसेना सोडणा-यांनी टीकेची झोड उठवली होती. उद्धव ठाकरे हे स्वत: निर्णय घेत नाहीत. मिलिंद नार्वेकरांना भेटल्याशिवाय उद्धव ठाकरेंची भेट होत नाही. कार्यकर्ते आणि नेते उद्धव ठाकरेंना भेटू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका वारंवार होत होती. यातूनच शिवसेनेत अनेकांनी बंडखोरी केली.
शिवसेनाप्रमुख सक्रीय असताना छगन भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. मात्र त्या नंतरही शिवसेनाप्रमुखांनी राज्यात युतीची सत्ता आणली होती. नारायण राणे आणि राज ठाकरेंच्या बंडानंतर शिवसेनेला 2009 मध्ये पराभव पत्करावा लागला. 
1988 मध्ये औरंगाबादेतल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मराठवाड्यातली पहिली विराट सभा झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने भारलेल्या शहरवासीयांनी 1988 मध्ये शिवसेनेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून दिले. औरंगाबाद हे मराठवाड्याचं 'पॉवर हाऊस' समजलं जातं. त्यामुळेच 1988 च्या महापालिका यशानंतर मराठवाड्यात विधानसभा, लोकसभा या मोठ्या निवडणुकांसह इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा वरचष्मा दिसून येऊ लागला. 1990 मध्ये शिवसेनेनं दिलेले नवखे चेहरे थेट विधानसभेत गेले. चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर, प्रकाश खेडकर, सुरेश नवले, कैलास पाटील, हरिभाऊ लहाने असे कोणतीही राजकीय घराण्याची पार्श्वभूमी नसलेले, आर्थिक पाठबळ नसलेले शिवसेनेचे तरूण उमेदवार मराठवाड्यातल्या जनतेनं निवडून दिले. 1995 मध्येही हेच चित्र होतं. शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्यात शिवसेनेची व्होट बँक तयार केली होती.
शिवसेनाप्रमुखांचं मराठवाड्याकडे वैयक्तीक लक्ष होतं. नेते आणि शिवसैनिकांबरोबर त्यांचा थेट संपर्क होता. मात्र उद्धव ठाकरे मराठवाडयाकडे दुर्लक्ष करताहेत. संपर्कप्रमुख जे सांगेल त्यावर विश्वास ठेऊन भूमिका घेतली जाते. परिणामी मराठवाड्यात शिवसेनेला नुकसान सोसावं लागतंय.
पश्चिम महाराष्ट्रात कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकाराच्या माध्यमातून शक्ती निर्माण केली आहे. काही अपवाद वगळता शिवसेनेला तिथं शिरकाव करायलाही संधी मिळत नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच तिथं लढत होते. विदर्भातही शिवसेनेची संघटनात्मक बांधणी क्षीण झाली आहे. ज्या ठिकाणी शिवसेना प्रबळ होती, तिथंही गटबाजी उफाळून आलीय. वरिष्ठ नेते स्थानिक नेत्यांशी संपर्क ठेवत नसल्यानं शिवसेनेत विस्कळीतपणा आला आहे.
राज्यातल्या जनतेला परिवर्तन हवं आहे. उद्धव ठाकरेंनाही शिवसेनाप्रमुखांचं विधानसभेवर भगवा फडकवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. मात्र त्यासाठी त्यांना मराठवाड्यात कामगिरी सुधारावी लागणार आहे. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात तोडीस तोड लढत द्यावी लागणार आहे. पश्चिम विदर्भातला बालेकिल्ला सांभाळून पूर्व विदर्भात जागा कशा वाढतील याची रणनिती आखून उद्धव ठाकरेंना यश मिळवावं लागेल.
 
2009च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात युती मोठं यश मिळवणार असं वातावरण होतं. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये सरकारच्या विरोधात वातावरण होतं. मुंबईसह राज्यातून युतीचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून येतील अशी खात्री युतीच्या नेत्यांना होती. मात्र मुंबई, नाशिक, पुण्यात मनसेच्या उमेदवारांनी लाख-लाख मतं घेतली आणि युतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. अर्थात त्या पराभवातही शिवसेनेची ग्रामीण भागावरील पकड कायम होती. विधानसभा निवडणुकीतही मनसे फॅक्टरमुळे युतीला जवळपास पन्नास जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता. शहरी पट्ट्यात युती पराभूत झाली. मात्र ग्रामीण भागात शिवसेनेच्या तरूण चेह-यांना मतदारांनी पसंती दिली होती. या अपयशाच्या पार्श्वभूमीवर 2012च्या पालिका निवडणुकीत शिवसेना कशी कामगिरी बजावते ? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. कारण शिवसेनाप्रमुख प्रकृतीमुळे सक्रीय नसल्यानं उद्धव ठाकरेंकडेच निवडणुकीची सर्व सूत्रं होती. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. तसंच मनसेही मैदानात होती. असं दुहेरी आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. मात्र या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुंबई महापालिका राखण्यात महायुतीला यश मिळालं. मुंबई महापालिका राखल्यानं उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार. आता तोच आत्मविश्वास त्यांना 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी महत्वाचा ठरणारा आहे.

Saturday, October 12, 2013

शिवसेनाप्रमुख, शिवतीर्थ आणि दसरा मेळावा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवतीर्थ आणि दसरा मेळावा हे समीकरण मागील चार दशकांपेक्षा जास्त काळ सर्व देशाच्या परिचयाचं झालं आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाची व्हिडिओ चित्रफीत शिवतीर्थावर दाखवण्यात आली. शिवसेनाप्रमुख प्रत्यक्षात शिवतीर्थावर नव्हते, मात्र त्यांच्या भाषणातला अंगार उपस्थितांना तितकाच रोमांचित करणारा होता. मात्र शिवसेनाप्रमुखांचे हे अखेरचं भाषण ठरलं. ज्या शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली, ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांनी लाखोंच्या सभा गाजवल्या त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुखांनी शेवटचं भाषण केलं.
शिवसेनाप्रमुखांशिवायचा हा पहिला दसरा मेळावा. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणी मनात उचंबळून येत आहेत. त्याच इथं मांडण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

23 जानेवारी 1926 या दिवशी जन्माला आलेले बाळ केशव ठाकरे यांनी जगाच्या इतिहासात स्वत:ची ओळख निर्माण केली. फ्री प्रेस जर्नलमधून व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरूवात केली. त्यांचे वडील केशव ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांचा प्रबोधनाचा वारसा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लाभला.  फ्री प्रेस जर्नलमध्ये नोकरी करत असतानाच त्यांना मुंबईत भूमीपुत्रांवर होणारा अन्यायही दिसत होता. एक व्यंगचित्रकार म्हणून जागतिक पातळीवर ख्याती असतानाही बाळासाहेब ठाकरे वृत्तपत्रातल्या नोकरीत रमले नाही. मुंबईचा भूमीपुत्र मराठी माणूसच या शहरातून हद्दपार होत होता. परप्रांतीय शिरजोर होत चालले होते. नोकरी, व्यापार या सगळ्याच क्षेत्रात मराठी माणसांची पिछेहाट होत होती. अटकेपार झेंडा फडकावणारा हा मराठी गडी त्याच्याच राज्याच्या राजधानीत नोकरीसाठी वणवण फिरत होता. मात्र मोठ्या पदांवर बसलेले परप्रांतीय भूमीपुत्रांवर अन्याय करून परप्रांतीयांची भरती करत होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडून मार्मिक हे साप्ताहिक काढलं.  मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकात त्यांनी "वाचा आणि थंड बसा" असं शिर्षक देऊन मुंबईतल्या विविध आस्थापणांमध्ये नोकरीला लागणा-या परप्रांतीयांची यादीच छापायला सुरूवात केली. यातून मराठी माणसांमध्ये योग्य संदेश जाऊ लागला. मराठी मनं यातून चेतायला लागली. नंतर, "वाचा आणि पेटून उठा" असा थेट आदेशच देण्यात आला. मात्र हे सर्व कार्य करण्यासाठी एक संघटना असणं गरजेचं होतं, ही बाब शिवसेनाप्रमुखांचे वडील असलेल्या प्रबोधनकारांनी हेरली. त्यांनीच संघटनेला शिवसेना हे नाव सुचवलं. आणि 19 जून 1966 रोजी शिवसेनेचा जन्म झाला.
मुंबईत मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना आक्रमकपणे लढत होती. मराठी माणसांना न्याय मिळावा यासाठी शिवसेनेनं स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना केली. शिवसेना आणि स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक कंपन्यां, सरकारी आस्थापनांसमोर आंदोलनं करण्यात येऊ लागली. चर्चा - वाटाघाटी करून मराठी माणसांना नोक-या मिळायला लागल्या. ज्यांना ही भाषा कळत नव्हती त्यांना शिवसेना स्टाईलने प्रसाद मिळू लागला. सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार या बिनीच्या शिलेदारांनी यात मोलाची भूमिका बजावली. रस्त्यावर शिवसैनिकांच्या मोर्चाचं नेतृत्व करणारे दत्ताजी नलावडे आणि आत कंपन्यांच्या व्यवस्थापना बरोबर चर्चा करणारे मधुकर सरपोतदार ही दुकली तेव्हा चांगलीच लोकप्रिय होती. प्रत्येक वॉर्डातल्या शाखेतून शिवसेना मुंबईकरांबरोबर घट्ट जोडली जात होती. शिवसेनेची शाखा सामान्यांचा आधार होती. कोणत्याही अडलेल्या कामासाठी सामान्य नागरिक शाखेत यायचे. त्यांची कामंही तत्परतेनं पूर्ण केली जायची. अनेकदा इथं न्यायनिवाडाही केला जायचा. या माध्यमातून शिवसेने मराठी माणूस जोडून घेतला. मात्र फक्त मराठी मतांच्या जोरावर सत्ता मिळणार नव्हती. त्यामुळे शिवसेनेनं हिंदूत्वाचाही मुद्दा हाती घेतला. रामजन्मभूमीच्या आंदोलनात हिंदूत्वाचा मुद्दा घेणारा संघ परिवार, विश्व हिंदू परिषद यांच्यापेक्षा सामान्यांना बाळासाहेब ठाकरेंची आक्रमक भूमिका भावली. देशात एक प्रखर हिंदूत्ववादी नेता अशी बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा तयार झाली. संघ परिवाराचा हिंदूत्वाचा मुद्दा शिवसेनेचा अजेंडा बनला.
1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले. त्यानंतर 1992 साली उसळलेल्या दंगली 1993 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर शिवसेनेनंही त्यांचं हिंदूत्व आक्रमक केलं. 1994 साली झालेल्या नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात "दार उघड बये दार उघड" असं साकडं घालण्यात आलं. देवीनंही शिवसेनेला उजवा कौल दिला. 1995 च्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या झंझावाती प्रचाराला यश आलं. विधानसभेवर भगवा फडकावण्याचं शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न साकार झालं. कोणताही आर्थिक पाठिंबा नसताना त्यांनी राज्यात काँग्रेसचा पराभव केला. देशातल्या राजकीय इतिहासातली ही महत्वाची घटना घडली. सामान्य शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी खासदार आमदार केलं. रस्त्यावर लढणारे सामान्य शिवसैनिक नगरसेवक - आमदार झाले. उमेदवार निवडताना शिवसेनाप्रमुखांनी कोणत्याही उमेदवाराची जात पाहिली नाही. निकष फक्त एकच, निष्ठावंत शिवसैनिक. शिवसेनाप्रमुखांच्या या दिलदारीचं त्यांच्या विरोधकांनीही कौतुकच केलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विस्तारत होता. मुंबई - ठाण्यातल्या शिवसेनेविषयी राज्यात उत्सुकता निर्माण होऊ लागली. 1984 नंतर शिवसेना राज्यात विस्तारण्यासाठी मुंबई-ठाण्याच्या बाहेर पडली. तेव्हा शिवसेनेत असलेल्या छगन भुजबळांनी मेहनत घेऊन शिवसेना राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचवली. 1988 हे वर्ष शिवसेनेच्या इतिहासात महत्वाचं ठरलं. औरंगाबादची पहिली महापालिका निवडणूक जाहीर झाली होती. शिवसेनेनंही त्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबादेतल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विराट सभा झाली. या सभेनं मराठवाडा जिंकला. औरंगाबादच्या महापालिकेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून गेले. औरंगाबादेतलं शिवसेनेचं हे घवघवीत यश पक्षाला मराठवाड्याच्या गावागावात घेऊन गेलं. मराठवाडा, खान्देश भागात शिवसेनेची ताकद वाढू लागली होती. 1991 साली शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले. मात्र त्याच्या दुस-याच वर्षी म्हणजे छगन भुजबळांनी केलेलं बंड गाजलं. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. मात्र त्यावरही मात करत 1995 मध्ये शिवसेनेनं सत्ता मिळवली. मात्र 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांवर शिवसेना विरूद्ध राणे असा संघर्ष पेटला होता. शिवसेनेतला मुंबई आणि कोकणातला मोठा नेता पक्षातून बाहेर पडला होता. मात्र हा धक्काही छोटा वाटावा अशी घटना अजून घडायची होती. ती घटना राणेंच्या बंडानंतर दुस-या वर्षी घडली. हे बंड बाहेरच्या नेत्याने नव्हे तर खुद्द घरातला पुतण्या राज ठाकरे यांनी केलं होतं. 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून नवा पक्ष स्थापण केला. त्यामुळे शिवसेनेची मोठी शक्ती कमी झाली. याचा परिणाम 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाला. कोकणात शिवसेनेच्या जागा घटल्या. तर मनसेमुळे झालेल्या मतविभागणीनं मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या पट्ट्यात युतीच्या पन्नास उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. राज ठाकरेंचं बंड हा शिवसेनेच्या इतिहासातला सर्वात धक्कादायक कालखंड होता. एक काका या नात्यानं शिवसेनाप्रमुखांनाही हा धक्का पचवणं जड गेलं होतं.
वाढतं वय हे कुणाच्याही हातात नसतं. शिवसेनाप्रमुखांनीही वाढत्या वयासमोर नाईलाज असल्याचं म्हटलं होतं. वाढत्या वयामुळे शिवसेनाप्रमुखांना राज्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना 2009 च्या निवडणुकीत सभा घेता आल्या नव्हत्या. मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ते दरवर्षी संबोधित करायचे. अर्थात प्रकृतीमुळे त्यांना सभेच्या ठिकाणी येता यायचं नाही. मात्र त्यांचं रेकॉर्डेड भाषण सभेच्या ठिकाणी दाखवलं जायचं. 2012 च्या दसरा मेळाव्यात त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे अखेरचं मार्गदर्शन ठरलं. या मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांचं रेकॉर्डेड भाषण दाखवण्यात आलं होतं. या भाषणाने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांचं डोळे पाणावले. "मला सांभाळलत, उद्धव आणि आदित्यलाही सांभाळा" शिवसेनाप्रमुखांचे हे शब्द ऐकून सगळी सभा निस्तब्ध झाली. अंगार चेतवणा-या शिवसेनाप्रमुखांचे हे शब्द नेहमीचे नव्हते. शिवसेनाप्रमुखांना ओळखणा-या शिवसैनिकांना त्यांची ठाकरी भाषा माहित होती. आणि हे शब्द त्यांच्या ठाकरी भाषेतले नव्हते. ही वेगळी भाषा ऐकून शिवसैनिकांच्या काळजाच्या ठिक-या उडाल्या होत्या.
यंदाही दस-याच्या दिवशी मुंबई भगव्या ध्वजांनी सजेल. मात्र मुंबईतल्या कलानगरमध्ये असणारा शिवसैनिकांचा विठ्ठल शिवसैनिकांना दिसणार नाही. कारण तिथल्या देव्हा-यातला देव इहलोकीच्या यात्रेला गेला आहे. या जगात शाश्वत असं काहीच नाही. त्याला कुणीच अपवादही नाही. मात्र सगळ्यांच्याच मनात एकाच नेत्याच्या आठवणीचा स्मृतीगंध दरवळत रहावा असा एक अपवाद आहे, आणि तो अपवाद म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.