Sunday, May 24, 2009

चल मेरे भाई !

राज्याच्या राजकारणात दोन भावांमधील वाद आता चांगलाच रंगलाय. त्याला ठाकरे विरूद्ध ठाकरे असं शिर्षकही देण्यात आलंय. काही वर्षांपूर्वी ठाकरे विरूद्ध सगळेच असा वाद असायचा. काँग्रेस, कम्युनिस्ट, पाकिस्तान, दहशतवादी, पाकिस्तानधार्जिणे मुस्लीम या सगळ्यांना शिंगावर घेवून वाद ओढवून घेण्यात बाळासाहेब ठाकरेंची हातोटी होती. ठाकरेंच्या पुढिल पिढीनेही वादांची परंपरा कायम राखलीय. मात्र यात फरक आहे तो असा कि, यावेळी दोन्ही बाजूंनी लढताहेत ते ठाकरेच.
मुंबईतले शिवसेनेचे एकमेव खासदार मोहन रावळे आणि युतीच्या सगळ्या उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला. येथूनच शिवसेना आणि मनसेतला संघर्ष ख-या अर्थाने पेटला. मनसेच्या उमेदवारांनी लाखांनी मते घेत शिवसेनेच्या मतांची माती केली. आणि काँग्रेस - राष्ट्रवादीची लॉटरी लागली. जिंकल्यानंतर कृपाशंकरसिंग यांनी काँग्रेसचे उमेदवार उत्तर भारतीयांच्या मतावर निवडून आल्याचं सांगितलं. आणि अर्थात इतकं बोलूनही त्यांचा कुणी साधा निषेधही केला नाही.
तर दुसरीकडे मनसेला मतदारांनी दिलेल्या भरभरून मतांमुळे भारावलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी 'दो मारा लेकिन सॉलिड मारा' असा सॉलिड डायलॉगही मारला. आणि तो जेथे लागावा अशी राज यांना अपेक्षा होती, त्यानुसार तेथे तो लागलाही. आणि उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. आणि राज ठाकरे यांना बकवास बंद करण्याचा दम भरला. यावेळी त्यांनी किणी प्रकरणाचाही उहापोह केला. त्यामुळे ठाकरे बंधुमधील वाद हा आता शमणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
मागील नऊ वर्षात राज्याला पिछाडीवर नेणा-या आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण झालंय. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्येच्या मुद्यावर मोठी आंदोलने केली. दिवाकर रावते यांनी काढलेल्या शेतकरी दिंडीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. देशाचे कृषीमंत्री शरद पवार यांनी आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबांची भेट घेतली नाही. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शेतीमधील काही कळत नसल्याची टीका केली. अर्थात विदर्भात शिवसेनेला मिळालेलं यश पवार यांच्या विधानातील फोलपणा दाखवून देण्यास पुरेसं आहे. या प्रकारे राज्यात युतीला पोषक वातावरण निर्माण झालेलं असतानाच मनसेचा फायदा हा काँग्रेस - राष्ट्रवादीला होणार असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झालंय.
त्यामुळे संघर्ष करत सत्तेच्या समीप पोचलेली शिवसेना आणि मराठीच्या मुद्यावर आक्रमक आंदोलनं करत प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करत असलेली मनसे यांच्यातील वाद आता वाढणार हे स्पष्टच. तसंच हा वाद काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणारा असल्याने, मराठी जणांसाठी कार्य करणा-या या दोन्ही पक्षांनी विचार करण्याची गरज निर्माण झालीय. शेतक-यांच्या प्रश्नावर ग्रामीण भागात रान उठवणारी शिवसेना आणि नोकरीच्या मुद्यांवर परप्रांतियांच्या विरोधात हिंसक आंदोलने करणारी मनसे ही दोघेही महाराष्ट्राची गरज आहे. यांच्यात होणारा शक्तीपात हा परप्रांतियांच्या पथ्यावर पडणारा असाच आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये यायला सुमारे आठ वर्षांपूर्वी सुरूवात झाली होती. उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोचला. यावेळी सामनातून बाळासाहेब ठाकरे यांनी आम्ही राजकारण सोडू पण नाती जपू असं सांगितलं होतं. ई टीव्हीवरील संवाद या कार्यक्रमात उद्धव आणि राज यांनीही नात्यांना महत्व देत असल्याचं सांगितलं होतं. मात्र घडलं ते वेगळेच. नाती आता तोडली गेली आहेत. एका सेनेच्या दोन सेना झाल्या आहेत. दोन्ही भावांमधली डायलॉगबाजी आता हेडलाईन ठरतेय. त्यामुळे आता दोघांपैकी कुणीही 'चल मेरे भाई' म्हणत पुन्हा एकत्रित येतील अशी अपेक्षा नजिकच्या काळात तरी दिसत नाही.

Wednesday, May 20, 2009

चौथी आघाडी फोर्थ सीटवर

लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचे अंदाज चुकवत काँग्रेसने दोनशेचा टप्पा ओलांडला. आणि दर निवडणूक निकालानंतर होणारा सावळा गोंधळ थांबला. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली विविध आघाड्यांचे खेळ करणारे नेहमीचे यशस्वी कलाकार लालू प्रसाद यादव, अमरसिंह, रामविलास पासवान यांचा भाव कोसळला. 25 ते 30 खासदार असणा-यांचे नेते राष्ट्रीय पक्षांना ब्लॅकमेल करून महत्वाची मंत्रीपदे स्वत:कडे राखायचे. मात्र सत्तेसाठी युपीए आणि त्या आधी एनडीए यांना या छोट्या पक्षांसमोर मान झुकवावी लागायची. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत काम करताना बिहारमध्ये अनेक ठिकाणी पथनाट्ये सादर केली जायची. त्यात महिला पात्रांचे काम हे पुरूष करायचे. त्याला लौंडा असं संबोधल्या जायचं. लालूप्रसाद यादव यांनी त्यावेळी लौंडाची भूमिका पार पाडली आहे. मात्र राजकारणात आल्यावरही त्यांच्यातील नौटंकी का सुरू होती? याचे उत्तर वरील संदर्भातून मिळायला हरकत नाही. असो. (खरं तर नकोच.)
मात्र 15 व्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला स्पष्ट बहुमत देवून ब्लॅकमेल करणा-या राजकारण्यांचा खेळ संपवला. निवडणुका घोषित झाल्यानंतर लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आणि मुलायमसिंह यांनी चौथी आघाडी स्थापन केली. बिहार आणि उत्तरप्रदेशचे दोन मोठे नेते एकत्र आल्याने या राज्यांमध्ये ते चांगले यश मिळवतील अशी शक्यताही होती. मात्र या राज्यांध्ये आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली अविश्वसनीय कामगिरी बजावत या नेत्यांचे नौटंकी राजकारण बंद केले.
चौथ्या आघाडीच्या माध्यमातून किंगमेकर बघण्याचे स्वप्न बघणा-या या नेत्यांचे डोळे 16 मे रोजी झालेल्या मतमोजणीनंतर उघडले. लोकलमध्ये प्रवास करणा-यांना विंडो सीट आणि फोर्थ सीट चांगलीच परिचयाची आहे. काँग्रेसने दोनशेपेक्षा जास्त जागा मिळवत विंडो सीट (पंतप्रधानपद) पटकावली. तेथे मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी विराजमान झाल्या. तर डाव्यांच्या किल्ल्याला सुरूंग लावणा-या ममता बॅनर्जी सोनियांच्या शेजारी बसल्या. तर विंडो सीटची स्वप्न बघणा-या लालू आणि मुलायमसिंह यांच्या नशिबी आली ती फोर्थ सीट. अर्थीत तीही सोनिया गांधींनी दिली तर. त्यामुळे त्यांना मिळणारी ही सीट सोनियांच्या मेहेरबानीवर अवलंबून असणार आहे.
या विंडो सीटकडे शरद पवार यांचंही लक्ष होतं. निवडणुका घोषित झाल्यानंतर त्यांनीही आपणच ही विंडो सीट मिळवणार असं घोषित केलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही यासाठी जीव तोडून काम केलं. या सीटसाठी पवारांनी मराठी माणसाच्या मुद्यावर शिवसेनेलाही बरोबर घेतलं. निकालानंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, या अपेक्षेनुसार पवारांनी त्यांचे राजकीय नेटवर्क फीट केले. राज्यातून किमान 16 जागा जिंकू असे वातावरण तयार करण्यात आले. देशभरातून इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा गृहित धरून यावेळी विंडो सीट मिळणारच होती. मात्र राज्यातच राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या. त्यामुळे तिकीट असूनही पवारांचा चेहरा हा बिनतिकटी प्रवाश्यासारखा झाला.
मायावती यांचा पक्षही देशभरात साठ जागा मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यांचं सोशल इंजिनिअरींग काही कुणाला सोसलं नाही. डाव्यांनीही मायावतींना पंतप्रधान करू अशी घोषणी केली होती. मात्र तिचाही परिणाम झाला नाही. शेवटी मायावतींनीही युपीएला बिनशर्त पाठिंबा घोषित केला.
विंडो सीट न मिळाल्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांनी तर डब्यातून उतरत असल्याची घोषणा केली. मात्र त्यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी तसं करू देण्यास मज्जाव केला. परिणामी त्यांना आता पाच वर्ष पुन्हा उभ्यानं प्रवास करावा लागणार आहे. परिणामी मनमोहनसिंग यांचा प्रवास आता सुखाचा होणार अशी चिन्हे आहेत. त्यांच्या बरोबर पक्षाचे तरूण खासदारही आहेत. आता पुढिल पाच वर्षात त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी विकासाभिमूख सरकार चालवावे अशी मतदारांची अपेक्षा आहे.

Tuesday, May 19, 2009

भांडा सौख्य भरे...

निवडणुकांचे निकाल आता लागलेत. निवडणुकीच्या आधी प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप केले. अर्थात यात नवीन असं काहीच नाही. मात्र राज्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना आणि मनसे यांच्यातील लढाई आता पुन्हा तीव्र होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत रांगणारे मनसे बाळ दोन वर्षाच्या आतच धावायला लागल्याने शिवसेनेची चांगलीच धावपळ होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेनं राज्यात अकरा जागा जिंकून घवघवीत यश मिळवलंय. शहरी चेहरा असल्याचा आरोप होणारी शिवसेना आता ग्रामीण भागात बळकट झाल्याचं दिसून येतंय. तर मनसेमुळे शिवसेनेला चार जागांवर पराभव स्वीकारावा लागल्याने शिवसेनेचे संभाव्य मोठे यश आकुंचित झाले. काँग्रेसला 17 जागांची लॉटरी लागली. तर संजीव नाईक, समीर भुजबळ आणि संजय पाटील यांना मनसेमुळे लोकसभेचे दार उघडले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा मिळणार होत्या त्या वाढून आठपर्यंत पोचल्या.
परिणामी शिवसेना जिंकूनही हारली, तर मनसे हारूनही जिंकली. काँग्रेस अनायसे राज्यात पहिल्या क्रमांकावर पोचली. तर राष्ट्रवादी मनसेच्या मेहेरबानीमुळे तीन जागांवर विजयी झाली. आता मुंबई आणि नवी मुंबईत शिवसेना आणि मनसेत पोस्टरबाजी सुरू झालीय. त्यावरून शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये हाणामा-याही सुरू झाल्यात. आता विधानसभा निवडणुका निकट आल्या आहेत. आणि त्यामुळे या पुढिल काळात हा संघर्ष तीव्र होणार यात शंका नाही. मराठी माणसाचे तारणहार कोण? हा प्रश्न आता उपस्थित झालाय.
काँग्रसमध्येही आता मिळालेल्या यशामुळे स्वबळावर लढण्याची उर्मी निर्माण झालीय. विलासराव देशमुख आणि बाळासाहेब विखे पाटील यांनीही स्वबळावर लढण्याची भाषा केलीय. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त आठच जागा मिळाल्याने त्यांना डिवचण्याची संधी हे पवार विरोधक सोडणार नाहीतच. मनसेने लोकसभेत शिवसेनेबरोबर सर्वच पक्षांची मते घेतली. विधानसभा निवडणुकीतही मनसे मोठ्या प्रमाणात मते घेणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आघाडी झाली नाही तर यांच्यात होणारी मताची विभागणी युती आणि अर्थातच मनसेच्याही पथ्यावर पडू शकणारी आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवामुळे रामदास आठवलेही बिथरलेत. रिपाइंच्या मतांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतात याची आठवणही त्यांनी करून दिली. आठलेंच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांची पुतळे जाळले, काँग्रेस भवनवर दगडफेक केली. मात्र काहीही झाले तरी आठवले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून स्वबळावर निवडणूक लढवणार नाहीत, हे ही तितकंच खरं. जो पर्यंत रिपाइं स्वबळावर लढणार नाही तोपर्यंत त्यांचे कार्यकर्ते मोठे होणार तरी कसे, हा प्रश्न आठवले यांना पडत नसेल का? राज ठाकरे यांनी 12 ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले, त्यांना लाखांनी मतदान झालं. भलेही ते निवडून आले नाही, मात्र एक राजकीय पक्ष म्हणून त्यांची दखल घेतली गेली. जर आठवले रिपाइंचे उमेदवारच उभे करणार नसतील तर त्यांचा पक्ष वाढणार कसा? काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून ना त्यांचा पक्ष वाढणार ना कार्यकर्ते मोठे होणार, त्यामुळे आठवले यांनी राज ठाकरे यांच्याकडून हा बोध घ्यायला हरकत नाही.
परिणामी आगामी काळात शिवसेना विरूद्ध मनसे, काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, (पद मिळेपर्यंत) रामदास आठवले हा संघर्ष सुरू राहणार आहे. आता यात सरशी कुणाची होणार हे मात्र अर्थातच ( नेहमीप्रमाणे) निवडणुकांच्या निकाला नंतरच स्पष्ट होईल. तो पर्यंत होवून जाऊ दे ढिश्यूम...ढिश्यूम.