Tuesday, July 27, 2021

कार्याध्यक्ष ते मुख्यमंत्री!

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 62व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत 28 नोव्हेंबर 2019 ही तारिख अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण याच दिवशी उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं शक्तीस्थान असलेल्या ठाकरे घराण्यातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मंत्री किंवा मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता. तसं त्यांनी जाहीरपणेही सांगितलं होतं. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. अर्थात त्या युती सरकारचा रिमोट कंट्रोल हा बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता. मात्र यावेळी उद्धव ठाकरेंनी रिमोट कंट्रोल हाती घेण्याऐवजी थेट राज्याचीच सूत्रं हाती घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं शिवसेना सत्तेत आली.  संजय राऊत, शरद पवार, सोनिया गांधी आणि इतर महत्त्वाचे नेते यांच्यात मोठी चर्चा होऊन राज्याच्या राजकारणात नवं समीकरण उदयाला आलं. उद्धव ठाकरेंनी सत्तेची सूत्र हाती घेतली.

मात्र इथून पुढचा प्रवास मोठा खडतर होता. कारण त्याचवेळी राज्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यांना दिलासा आणि नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर होती. हे संकट संपत नाही तोच २०२० वर्ष उजाडलं ते कोरोनाचं संकट घेऊन. कोरोनानं सर्व जगाला जसा तडाखा दिला तसाच भारतालाही दिला. महाराष्ट्रात तर कोरोनामुळे बिकट स्थिती निर्माण झाली. पहिल्या लाटेत रूग्णांना बेड मिळत नव्हते. औषधींचा तुटवडा होता. लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती खडतर झाली. अनेकांचे रोजगार गेले. सरकारवर मोठी टिका सुरू झाली. हळूहळू लाट ओसरली अनलॉक सुरू झाला. थोडासा दिलासा मिळतोय असं वाटत असतानाच दुसरी लाट प्रचंड वेगानं पसरली. ऑक्सिजनच्या अभावी शेकडो जणांना जीव गमवावे लागले. पुन्हा बेड्सचा तुटवडा निर्माण झाला. रेमेडिसिव्हर सारख्या औषधीसाठी नागरिकांना रांगेत उभं राहावं लागलं. कित्येकांनी त्यांचे नातलग गमावले. दुसरी लाट आता आटोक्यात येऊ लागलीय. सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेल्या उपाययोजना यशस्वी झाल्या. कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं. महाराष्ट्रानं देशात लसीकरणात आघाडी घेतली. राज्याच्या आरोग्य खात्याचंच हे यश आहे. अशा अनेक यश-अपयशांचा सामना उद्धव ठाकरेंनी केलाय.

महाबळेश्वरमध्ये शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं होतं. त्यानंतर 2007 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढवण्यात आली. त्यात शिवसेनेला यश मिळालं.  2009च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात युती मोठं यश मिळवणार असं वातावरण होतं. मात्र मुंबई, नाशिक, पुण्यात मनसेच्या उमेदवारांनी लाख-लाख मतं घेतली आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. 2012च्या पालिका निवडणुकीत बीएमसीवर पुन्हा शिवसेनेनं झेंडा फडकवला. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेनं स्वबळावर 63 जागा मिळवल्या. 2017च्या पालिका निडणुकीतही बीएमसीत शिवसेना अव्वल ठरली. 

हे सर्व यश उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं मिळवलं. रिमोट कंट्रोलनं सरकारवर नियंत्रण ठेवण्याऐवजी फ्रंट सीटवर येऊन थेट राज्य चालवण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय शिवसेनेसाठी महत्वाचा ठरताना दिसतोय. कारण शिवसेना पुन्हा लोकप्रिय होऊ लागलीय. कोरोनाच्या कठिण काळात संयमानं कारभार करून उद्धव ठाकरेंनी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला. नागरिकांचा हा विश्वासच त्यांच्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट असेल.