Monday, May 28, 2018

थर्ड क्लास !

सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची मजाच काही और होती. मल्टिस्क्रिनमधला प्रेक्षक वर्ग हा हातचं राखून सिनेमा पाहणारा. ना शिट्ट्यांचा आवाज ना टाळ्यांचा. नाही म्हणायला मोठा आवाज होणार नाही, याची काळजी घेत हसणारा प्रेक्षक. तर याच्या उलट चित्र सिंगल स्क्रिनमध्ये असायचं. हिरोच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांचा आवाज असायचा. पण वाढत्या मल्टिस्क्रिनमुळे दर्दी प्रेक्षक कमी होत चालला आहे. सिंगल स्क्रिनमध्ये तिकीटांचे दर जास्त नसायचे. बाल्कनी, फर्स्ट क्लास आणि थर्ड क्लास अशी तिकीटांची उतरंड होती. पण प्रत्येकाला परवडेल त्या प्रमाणे तिकीट काढता येत होतं. मल्टिस्क्रिनमधला माजोरडेपणा तिथं नव्हता. इंटर्व्हलमध्ये खाल्लेल्या दोन रुपयाच्या समोस्याची चव अजूनही आठवते. मुंबईत तर असं म्हणतात की, एका फेमस समोस्यावाल्याकडून २० रूपयात दोन समोसे खरेदी करतात. आणि तेच मल्टिप्लेक्समध्ये ६० रुपयाला विकतात. १२० रुपयात पॉपकॉर्न विकत घेऊन खरेदी करणा-याच्या जीवाची 'लाहीलाही' सिंगल स्क्रिनमध्ये होत नव्हती.
ते जाऊ द्या. कारण आपल्या ब्लॉगचा आजचा विषय हा काही अर्थकारणाचा नाही. तर थर्ड क्लासचा आहे. मैने प्यार किया हा सिनेमा मी आठवीत असताना थर्ड क्लासमध्ये पाहिला होता. संभाजीनगरला अंजली थिएटरमध्ये हा सिनेमा पाहिला होता. त्या काळी संभाजीनगरमधलं सर्वात भारी थिएटर म्हणजे अंजली थिएटर होते. ते मला खूप आवडायचं. त्यामुळे मला पत्नीही अंजली नावाचीच मिळाली.
सिनेमा तर बघायचा होता पण जवळ पैसे नव्हते. नेमकी तेव्हा दिवाळी होती. लक्ष्मीपूजन झालेलं होतं. नेमके तीन रुपये घेतले. (ढापले म्हणा किंवा चोरी केली म्हणा.) बसचा पास असल्यानं जाण्या-येण्याची पैशाची चिंता नव्हती. तडक अंजली थिएटर गाठलं. थर्ड क्लासच्या लाईनमध्ये उभा राहिलो. बुकींगवाल्याकडे पैसे दिले. पण चोरी पकडली गेलीच. पैशांना कुंकू लागलेलं होतं. बुकींगवाला हसत म्हणाला, लक्ष्मीपूजनाचे पैसे आणले का ?. पण त्यानं तिकीट दिलं. बहुतेक माझ्या आधी काही मुलं लक्ष्मीपूजनाचे पैसे घेऊन आले असतील. लाल रंगाचं तिकीट मिळालं. डिग्री मिळाल्यावर एखाद्याला जसा आनंद व्हावा तसा मला झाला. ते लाल तिकीट घेऊन सर्वात पुढे बसलो. मेरे रंग में रंगने वाली, या गाण्याचे रंग जवळून अनुभवता आले.
मी आणि माझा मित्र रिंकू त्रिवेदी कोळसे सर कडे ट्युशनला जायचो. कोळसे सर वाल्मीमध्ये (water and land management institute) नोकरीला होते. त्यांच्या ऑफिसकडून आम्हाला ते अजिंठ्याला नेणार होते. ऐनवेळी हा प्रोग्राम कॅन्सल झाला. पण अजिंठ्याला जायचं असल्यानं घरून पैसे घेतलेले होते. लगेच प्लॅन शिजला आमचा अवली मित्र राजू शिंदे याला बरोबर घेतलं. अंबा किंवा अप्सरा थिएटरला मिथूनचा प्रेम प्रतिज्ञा सिनेमा चित्रपट बघितला. दिवसभर खाण्यासाठी पैसे लागणार होते. त्यामुळे हा सिनेमाही थर्ड क्लासमध्ये पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
१९९१ मध्ये मी, माझा भाऊ रवींद्र, मित्र संभाजी शिरसाट, त्याचा भाऊ मंगेश असे सर्व २६ जानेवारी रोजी सिनेमा बघायला बाहेर पडलो. पण त्या दिवशी सर्व थिएटरवाल्यांनी बंद पुकारला होता. परिणामी सिनेमा तर काही बघायला मिळाला नाही. पण जाण्यायेण्यात आणि हॉटेलमध्ये पैसे खर्च झाले. थोडे पैसे उरले. दुस-या दिवशी मी आणि संभाजीनं प्लॅन केला. रवींद्र आणि मंगेशला काहीही न सांगता गुपचूप सिनेमा बघायला गेलो. पैसे कमी असल्यानं पुन्हा थर्ड क्लासचं तिकीट काढलं. मिथूनचा प्यार का देवता हा सिनेमा बघितला. मिथूनला गरिबांचा अमिताभ, का म्हणतात हे त्यामुळे लक्षात आलं.
पण मी आणि संभाजी सिनेमा बघायला गेलो, ही बातमी फुटलीच. आपल्याला सोडून भाऊ सिनेमा बघायला गेले याचा रवींद्र आणि मंगेशच्या बालमनावर मोठा परिणाम झाला. बरेच दिवस त्यांना अन्नपाणी गोड लागलं नाही.
काही महिन्यांनी संभाजी, मंगेश जालन्याला राहायला गेले. जालन्यातले थिएटर त्या काळी तरी काही धड नव्हते. १९९२ मध्ये माधुरी दीक्षितचा बेटा सिनेमा लागला होता. संभाजी माधुरीचा जबरदस्त फॅन. सिनेमा तो बघण्यासाठी संभाजी जालन्याहून आला. आम्ही दोघे सादिया थिएटरला पोहोचलो. संभाजीने येताना जास्त पैसे आणले होते. पण सिनेमा हाऊसफुल्ल झालेला होता. तिकीटं संपली होती. पण ब्लॅक वाल्यांकडे तिकीट होती. फर्स्ट क्लासचं तिकीट होतं १५ रुपयाला. दोघांचे मिळून ३० रुपये होत होते. पण संभाजीकडे ४०च रुपये होते. ब्लॅक वाल्याला परिस्थिती समजावून सांगितली. मित्र जालन्याहून आलेला आहे, पैसे कमी आहेत. आणि आश्चर्य घडलं. ब्लॅकवाल्यानं ३०ची दोन तिकीटं ४० रुपयात दिली. ब्लॅकवाला असला तरी त्याच्या मनात काळंबेरं नव्हतं.
पण कोणताच क्लास नसलेल्या अशा टुरिंग टॉकिज म्हणजेच तंबूतही सिनेमा पाहण्याचं भाग्य मला लाभलं. साधारणपणे चौथी किंवा पाचवीत असताना टुरिंग टॉकिजमध्ये सिनेमा पाहिलेले आहेत. गंगापूर तालुक्यातलं आमचं गाव सोलेगाव. तिथून जवळ असलेल्या रांजणगावमध्ये उन्हाळ्यात उर्स भरायचा. उर्सासाठी टूरिंग टॉकिज आलेल्या असायच्या. रात्री बैलगाडीतून काकासोबत आम्ही रांजणगावला निघायचो. माझे अंकुश काका हे ही सिनेरसिक होते. गावातून अनेक गाड्या रांजणगावला जायच्या. दर्शन ऊरकून कधी एकदा तंबूत घुसतो याची घाई असायची. बरेच सिनेमे पाहिले. पण सध्या फक्त लोहा हाच सिनेमा आठवतोय. तिकीट काढा आणि कुठेही जागा धरून बसा. सगळ्यांचा एकच क्लास. ना बाल्कनी, ना फर्स्ट क्लास, ना थर्ड क्लास. अशी समानता तिथं होती. पण या मल्टिप्लेक्स आणि मल्टिस्क्रिनमध्ये समानताच नाही. सगळा पैशांचा खेळ. त्यामुळे पांढरपेशा वर्गच तिथं पाहायला मिळतो. कमी पैसे असलेला थर्ड क्लासच त्यांनी बाद केला आहे.

Sunday, February 11, 2018

दाळ-बट्टी रोजगार योजना !

दाळ-बट्टी माझा आवडता पदार्थ, मला करताही येतो. दाळ-बट्टीला गंगापूर तालुक्यात बट्ट्या, बाफळ्या म्हटलं जातं. तर राजस्थानी लोक त्याला दाल-बाटी म्हणतात. मराठवाड्यात अनेक ठिकाणी नवरदेवाकडून जेव्हा गाव पंगत असते त्यावेळी दाळ-बट्टी केली जाते. तसंच आता हुरड्याच्या कार्यक्रमातही दाळ-बट्टी करण्याकडे कल वाढला आहे.
दाळ-बट्टी ही दोन प्रकारे करता येते. त्यातला पहिला प्रकार म्हणजे गव्हाचं जाड पीठ, मक्याचं पीठ आणि थोडासा रवा एकत्र करून ते पीठ मिसळून घ्यावं. त्यात ओवा, चवी प्रमाणे मीठ टाकावं. थोडासा सोडा टाकावा म्हणजे बट्टी खुसखुशीत होते. पीठ मळून झाल्यावर त्याचे लाडू सारखे गोळे करून घ्यावे. नंतर हे गोळे उकळत्या पाण्यात उकडून काढावे. उकडून काढलेल्या गोळ्यांचे थंड झाल्यावर, चार तुकडे करावे. ते तुम्ही तेलात किंवा गावरान तुपात तळून काढू शकतात. ज्या पाण्यात हे गोळे उकळून काढले तेच पाणी दाळ (वरण) करण्यासाठी वापरावं. त्यामुळे दाळही चवदार होते. 
गावाकडे दाळ-बट्टी करताना वेगळी पद्धत वापरली जाते. गव्हाचं जाडसर पीठ ओवा टाकून मळलं जातं. त्याचे गोळे केले जातात. एक छोटासा खड्डा खणून त्यात गोव-या जाळल्या जातात. चांगला विस्तव झाल्यावर त्यात गोळे चांगले भाजले जातात. ही झाली विस्तवावर तयार केलेली बट्टी. गावजेवणासाठी ही दाळ-बट्टी  चांगलीच लोकप्रिय आहे.
सध्या पकोडा रोजगार योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावरून सुरू असलेल्या गरम राजकारणात अनेक जण पकोडे तळत आहेत. तर मग मी माझी बट्टी का का तळू नये ? मागे पुढे दाळ-बट्टीचा व्यवसाय सुरू करण्याचाही एक सुप्त विचार आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत माझ्या हातची बट्टी चाखली आहे, त्या सर्वांनीच मला व्यवसायात उडी मारण्याचा सल्ला दिला आहे. बघू यात...

Saturday, January 6, 2018

ढिम्म सरकार, ३ दिवस हिंसाचार

भीमा कोरेगावसह सणसवाडी, वढू बुद्रूक, शिरुर परिसरात १ जानेवारी रोजी भयानक हिंसाचार झाला. भीमा कोरेगावमधल्या विजयस्तंभावर येणा-या अनुयायांवर हल्ले करण्यात आले. त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. हा हल्ला जरी एक तारखेला झाला असला तरी त्याची तयारी ब-याच महिन्यांपासून सुरू होती. या भागात पद्धतशीरपणे मराठा युवकांचं ब्रेन वॉश करण्यात आलं होतं, याची माहिती आता उघड झाली आहे. या ब्रेन वॉशमधूनच गोविंद गायकवाड यांच्या समाधीची मोडतोड करण्यात आली. संभाजी महाराजांच्या मृतदेहाचे तुकडे एकत्र करून गोविंद गायकवाड यांनी अंत्यसंस्कार केले होते. नंतर या गोविंद गायकवाड यांनाही मोघलांनी मारून टाकलं होतं. हा बहुजनांच्या एकतेचा इतिहास बदलून टाकण्याचा विडाच जातियवादी संघटनांनी घेतलेला आहे. गोविंद गायकवाड यांचं कर्तृत्व नाकारण्यात आलं. मराठा तरूणांना भडकवण्यात आलं. भडकवणा-या संघटना बाजूला राहिल्या. १ तारखेला हिंसाचार घडवण्याचं पातक घडलं. या हिंसाचारासाठी दगड साठवण्यात आले होते. याची खबरही गृहखात्याला नव्हती. ब-याच महिन्यांपासून खोटा इतिहास पसरवला जात आहे, हे ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित नव्हतं. १ जानेवारीला हिंसाचार घडत होता, गाड्या फोडल्या जात होत्या, अनुयायांवर हल्ले होत होते तरीही पोलिसांनी काहीच केलं नाही. त्या दिवशीच जर पोलिसांनी लाठीमार केला असता किंवा गोळीबार केला असता तर हिंसाचार लगेचच थांबला असता. १ जानेवारीला पोलिसांनी काहीच केलं नाही. त्यामुळे २ आणि ३ जानेवारीलाही पोलीस, सरकार ढिम्म राहिलं.
१ जानेवारीचे पडसाद २ जानेवारीला उमटले. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारला. १ जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा उद्रेक ३ तारखेला पहायला मिळाला. बहुतांश ठिकाणी बंद शांततेत पार पडलाही. मात्र मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. बेस्ट बसेस, अनेक कार, दुचाकींचं नुकसान झालं. काही ठिकाणी लोकलवर दगडफेक झाली. बाईकवरून जाणारेही आंदोलकांच्या रोषाला बळी पडले. अर्थात पोलीस १ तारखेच्या निष्क्रीयतेमुळे आधीच बॅकफूटवर गेलेले होते. त्यामुळे मुंबई परिसर हा जणू काही काश्मीर किंवा सीरिया झाला होता. अर्थात हा काही पहिलाच बंद नव्हता की, ज्यात हिंसाचार झाला. अर्थात हा काही शेवटचाही बंद नसेल. या राज्यानं आणि मुंबईनं अनेक बंद पाहिले आहेत. अगदी दंगली, बॉम्बस्फोटही पाहिले आहेत. आझाद मैदानात धर्मांध मुस्लीमांनी केलेला जिहादही पाहिलेला आहे.
बंद घडवणारे जॉर्ज फर्नांडिस यांना बंदसम्राट म्हटलं जायचं. डाव्या पक्षांनीही अनेकदा बंद करून उद्योगांची वाट लावलेली आहे. विरोधी पक्षात असताना भाजपनंही बंद केलेच आहेत. धाक, दहशत, दरारा या पद्धतीनं बंद करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व राज्यभरात मोठं झालं. बंद यशस्वी करणं ही नेतृत्व प्रस्थापित करण्याची एक पायरी आहे. या पायरीवरून आता पर्यंत अनेक नेते पुढे गेले आहेत. तीच पायरी पार करून प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्वही मोठं व्हायला मदत झाली आहे. बंद हे असंवैधानिक आहेत. तरीही ते पुकारले जातातच. दुष्काळ आवडे सर्वांना याप्रमाणे बंद आवडे राजकीय पक्षांना अशी स्थिती आहे.
पण या ३ दिवसाच्या हिंसाचारामुळे राज्यात पुन्हा जातीयवाद फोफावणार हे स्पष्ट झालं आहे. मराठा आणि दलित समाजात फूट पाडण्याचा डाव यशस्वी झाला आहे. गुजरातला संघाची प्रयोगशाळा म्हटलं जातं. गुजरात मॉडेल म्हणजे विकासाचं मॉडेल नाही. तर मुस्लीमांची भीती दाखवून मतं मिळवायची, हे गुजरात मॉडेल आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातल्या काही हताश पुरोगामी शक्ती कार्य करत आहेत, असं वाटतंय. जिग्नेश मेवानी, उमर खालिद, कन्हैया कुमार यासारखी मंडळी राज्यात फिरवून तणाव निर्माण करायचा. भाजप जशी मुस्लीमांची भीती दाखवतं, त्याचप्रमाणे ही मंडळी हिंदूत्ववाद्यांची भीती दाखवून मतांची मशागत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जशी संघाची गुजरातची प्रयोगशाळा धोकादायक आहे तशीच ही काही हताश पुरोगाम्यांची महाराष्ट्रातली प्रयोगशाळाही धोकादायक आहे.
पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे दोन्ही प्रयोगशाळेतून जातीयवादाची रसायनं मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील. अजून मोठे हिंसात्मक बंद, मोठे मोर्चे पुकारले जातील. अर्थात त्यावेळीही सरकार ढिम्मच राहील. कारण यातूनच मतांचं पीक बहरणार आहे. शेतक-यांच्या पिकाला जरी भाव नसला तरी हे मतांचं पिक सत्ता मिळवण्यासाठी मदतीचं ठरणार आहे.


Thursday, October 5, 2017

राज back in action

#bulletraj
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा संताप मोर्चा यशस्वी झाला असंच म्हणावा लागेल. एलफिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर सामान्य नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला होता. त्या संतापाला राज ठाकरेंनी वाट करून दिली. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले. मुंबईकरांना बुलेटट्रेन नको, तर आहे त्या लोकलच्या सुविधा चांगल्या प्रकारे देण्याची गरज आहे. हा संदेश देण्यात राज ठाकरे यशस्वी ठरले.
लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर पालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मनसे बॅकफुटवर गेली होती. अगदी देश पातळीवर जरी पाहिलं तरी कोणताही पक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवत नाही. अर्थात त्याला अपवाद होता, तो फक्त उद्धव ठाकरेंचा. पण आता राज ठाकरेंनीही थेट नरेंद्र मोदींना विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. अच्छे दिन, मोदींनी दिलेली आश्वासनं,बुलेटट्रेन या मुद्यांवरून राज ठाकरे जेव्हा टीका करत होते, त्यावेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नेते दाद देत होते. त्यावरून आता भाजपला विरोध सुरू झाल्याचं दिसून येतं. भाजपला विरोध करून पर्याय देता येऊ शकतो, हा विश्वास मनसे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
टोलच्या मुद्यावर राज ठाकरेंनी आंदोलन सुरू केल्यानंतर, आघाडी सरकारने अनेक टोल बंद केले होते. पण राज ठाकरेंना हा मुद्दा तडीस नेता आला नाही. आता बुलेटट्रेनला राज ठाकरेंनी विरोध सुरू केला आहे. या वेळी हा मुद्दा तडीस नेण्यावर मनसेला भर द्यावा लागेल. अर्थात हे झालं मुंबईपुरतं. राज्यातही अनेक प्रश्न आहेत. कर्जमाफी अजून झालेली नाही, शेतक-यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे या प्रश्नांकडेही मनसेनं लक्ष देण्याची गरज आहे. राज ठाकरेंनी जर या विषयातही लक्ष घातलं तर, राज्यातली जनताही त्यांना सााथ देईल. राज ठाकरे पुन्हा जोरकसपणे मैदानात उतरल्यानं काही भाजप नेत्यांनी त्यांचा धसका घेतला आहे. तर काही भाजप नेत्यांना आनंदही झाला आहे. कारण आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मनसेचा जनाधार पुन्हा निर्माण झाला, तर त्याचा फायदा भाजपलाच होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण मनसे शिवसेनेची मतं खेचेल, असा भाजपचा कयास आहे. त्यामुळे या मुद्यावर आता शिवसेना आणि मनसे यांनी विचार करण्याची गरज आहे. कारण या दोन्ही पक्षांचा समान शत्रू हा भाजप आहे.

Sunday, October 1, 2017

अगर तुम न होते...

राजकीय नेते आणि पत्रकार, म्हणजे एक दुजे के लिये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (असून अडचण नसून खोळंबा ही म्हण इथे लागू होत नाही, याची कृपया टीकाकारांनी नोंद घ्यावी.) वृत्तपत्रांना बातम्यांसाठी नेते मंडळी हवी असते. पण त्यांचं कसं आहे की, नेते किेंवा प्रवक्त्यांना कॉल केला, बातमी केली. ती वेब एडिशनला किंवा दुस-या दिवशी वृत्तपत्रात छापून आली विषय संपला.
पण न्यूज चॅनेलचं तसं नाही. न्यूज चॅनेल सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अखंड सुरू असतात. (नशीब रात्री १२ नंतर रेकॉर्डेड कार्यक्रम असतात. नाही तर आम्ही नेते आणि प्रवक्त्यांना झोपूही दिलं नसतं.) दिवसभर (काही ना काही) बातम्या दाखवायच्या असतात. आमचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. सगळ्यात आधी सामनात काय छापून आलं ते बघायचं. अग्रलेखात सरकारवर टीका. लगेच सात वाजता ब्रेकींग करायची. तिकडे असाईनमेंट डेस्कही कामाला लागतो. आठच्या बुलेटिनला संजय राऊत यांचा फोनो. नेहमीचे प्रश्न, वेगवेगळे प्रश्न. आम्ही काहीही विचारलं तर उत्तरं मात्र राऊत यांना जी हवी आहेत तीच मिळतात. मग लगेच भाजपच्या प्रवक्त्याला फोन. आम्ही सांगतो बघा, बघा तुमच्या सरकारविषयी सामनात काय छापून आलं. लगेच माधव भंडार, मधू चव्हाण गरम आवाजात बोलायला लागतात. आमचा प्रयत्न असतो, राऊत आणि भाजपच्या प्रवक्त्याला भिडवून द्यायचं. पण तोपर्यंत संजय राऊत फोन कट करतात. मग पुढची पाच मिनीटं भाजपचे प्रवक्ते त्यांची खदखद बाहेर काढतात, सरकारला धोका नाही असं ते शेवटी निक्षूण सांगतात. मला तर असं वाटतं, आशिष शेलार, माधव भंडारी सकाळीच सामनावाचून काढत असतील. न्यूज चॅनेलमधून कॉल येण्याच्या आधीच कोणते मुद्दे मांडायचे याची तयारी ते आधीच करत असतील. या विषयावर काँग्रेसच्या नेते मंडळींचा फोनो घ्यायचा असतो. पण काँग्रेसमध्ये या विषयावर बोलणार कोण ? या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. लगेच राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचं नाव समोर येते. चांगले सदगृहस्थ. कधीही फोन करा, फक्त विषय सांगा. धन्यवाद, म्हणेपर्यंत बोलत राहतात. त्यांचं बोलणं होतं, आणि इकडं बुलेटिनही संपतं.
फोनो घेताना काही विषयांमध्ये तज्ज्ञ असे नेते आहेत. दहशतवाद, पाकिस्तान आणि काश्मीर म्हटलं तर संजय राऊत यांच्या शिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित घोटाळे असल्यावर डॉ. नीलम गो-हे (माझं आडनाव गोरे आहे. आमचं आडनाव थोडं सारखं असल्यानं, मी अनेकदा नीलम ताईंच्या फोनोला प्राधान्य देतो. आता म्हणा आडनावात काय आहे ?) दुर्दैवानं महिला अत्याचाराची बातमी आल्यावर डॉ. नीलम गो-हे, चित्रा वाघ, विजया रहाटकर यांची नावं प्राधान्यानं समोर येतात. सनातन, इशरत जहाँ, डेव्हिड हेडलीचा विषय आल्यावर जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय बोलणारा हुकुमी एक्का दुसरा कोणीच नसतो. छगन भुजबळांच्या विषयी फोनो घ्यायचा म्हटलं तर किरीट सोमय्यांशिवाय पानही हलत नाही. आता तर अशी परिस्थिती आहे की, आधी सोमय्यांचा फोनो होतो आणि नंतर ईडीची कारवाई होते.
एकनाथ खडसे यांच्याविषयी थोडंही खट्ट झालं की, अंजली दमानिया, प्रिती मेनन-शर्मा, नवाब मलिक दणक्यात फोनो देतात. चिक्की घोटाळ्याच्या वेळी तर किती फोनो घेतले असतील याची गणती नाही. भाजपचेच नेते असाईनमेंटला फोन करून सांगायचे, आमचे फोनो घ्या. त्यांना पंकजा मुंडेंना वाचवायचं होतं की गोत्यात आणायचं होतं, हे त्यांनाच ठाऊक.
पण फोनो देण्यात सर्वात अव्वल दर्जाचे नेते आणि प्रवक्ते भाजपचेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं ही मंडळी आता सत्तेत आहे म्हणून. त्यांनी दिलेले फोनो आजही सर्वच चॅनेलमध्ये काम करणा-यांच्या लक्षात आहेत. मला तर असं वाटतं फोनो, लाईव्ह, मुलाखती, 121, बाईट्स देऊन ही मंडळी सत्तेत बसली. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमय्या, माधव भंडारी, मधू चव्हाण, अवधूत वाघ या मंडळींना कधीही फोन केला आणि ते फोनोला नाही म्हटले हे आठवत नाही. आघाडी सरकारच्या विरोधात रान पेटवण्यात या मंडळींनी दिलेले फोनो आणि लाईव्ह महत्त्वाचे होते. लाईव्हसाठी तर ही मंडळी कुठूनही धावतपळत ऑफिसला पळत यायची. आता मात्र ओबीशिवाय ही मंडळी लाईव्हला बसत नाहीत.
हे असं आमचं नातं आहे. अगर तुम न होते, खरंच नेते मंडळी आणि प्रवक्ते मंडळी अगर तुम न होते तो हमारे बुलेटिन न निकलते. आणि हो एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, स्टुडिओत ऑनएअर एकमेकांवर जोरजोरात आरोप-प्रत्यारोप करणारे, ओरडणारे हे नेते आणि प्रवक्ते टॉक शो संपल्यावर हसत-हसत एकमेकांच्या गळ्यात हात घालून बाहेर पडतात. कधीकधी तर एकाच गाडीतूनही जातात. त्या दिवसाचा टॉक शो संपतो. रात्रीनंतर पुन्हा सकाळ होते. काही तरी घडतं, आणि पुन्हा सुरू होतात...फोनो...फोनो...फोनो...लाईव्ह...लाईव्ह...लाईव्ह.

Saturday, August 12, 2017

मराठा मोर्चाला पाकिस्तानातून कसा मिळाला पाठिंबा ?

8 ऑगस्टला रात्री 12 बारा वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानातल्या मराठा ट्राईबने त्यांच्या फेसबुक पेजवर मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देत असल्याची पोस्ट टाकली. मागील सहा महिन्यांपासून तिथल्या अनेक मराठ्यांच्या मी संपर्कात होतो. फेसबुक, मेसेन्जर आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून मी त्यांच्या संपर्कात होतो. zubair bugti आणि a badshah maratha हे दोघे मराठा ट्राईबचे क्रियाशील कार्यकर्ते संपर्कात होते. त्यातल्या zubair bugtiला मी पाठिंबा देण्यासाठी विनंती केली होती. त्याने विनंतीला मान देत त्यांच्या maratha tribeच्या पेजवर 8 ऑगस्टला पाठिंबा दिल्याची पोस्ट टाकली. पोस्ट टाकल्यावर त्याने मला मेसेज टाकला. लगेच रात्री साडेबाराच्या सुमारास मी आमच्या टीव्ही9च्या ग्रुपवर ही बातमी ब्रेक केली. सकाळी आठच्या बुलेटिनमध्ये ही बातमी घेण्यात आली. त्यानंतर निखिल देशपांडेनं ही हेडलाईन केली. प्रत्येक बुलेटिनमध्ये ही हेडलाईन सुरू होती. दुपारी 4 वाजता आणि रात्री 10 वाजताच्या 24 बातम्या 24 रिपोर्टर या बुलेटिनमध्ये ही बातमी घेण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता प्रत्येक मराठी चॅनेलमधील मित्र आणि पेपरमधील मित्र यांना व्हॉट्सऍपवर ही बातमी कळवली. प्रत्येकाला कॉल करताना आधी सांगायचो, संतोष गोरे बोलतोय टीव्ही 9 मधून. आम्ही पाकिस्तानातली पाठिंब्याची बातमी घेतली आहे. तुम्हीही घ्या. या बातमीचा कर्ताधर्ता मीच आहे, हे ही आवर्जन सांगायचो. (अर्थात माझं नाव कोणीच छापलं नाही. हा भाग वेगळा. इतरांचं काय बोलायचं, जिथं काम करतो तिथंही वेगळी परिस्थिती नव्हती.) एक-दोन अपवाद वगळता सर्वांनीच ही बातमी त्यांच्या ऑनलाईनला घेतली. तसंच वृत्तपत्रामध्येही छापून आली. हिंदी वृत्तपत्र आणि इंग्रजी वृत्तपत्रांनीही ही बातमी त्यांच्याकडे घेतली. माझ्या सहा महिन्यांच्या मेहनतीचं सार्थक झालं.
पत्रकार मित्रांना मोबाईलवर कॉल करून बातमी सांगताना एक गंमत झाली. बातमी सांगत असताना माझ्या बोलण्यात पाकिस्तानातल्या नागरिकांशी मैत्री, पाकिस्तानचा बराच उल्लेख होत होता. हे ऐकून माझी पत्नी घाबरली. ती म्हणाली, हे काय करताय ? पोलीस येऊन पकडून नेतील. मग  सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यावर तीची भीती दूर झाली.
छापून आलेल्या बातम्यांच्या इमेज, टीव्ही 9वरून टेलिकास्ट झालेल्या बातमीचा व्हिडीओ व्हॉट्सऍपवरून पाकिस्तानातल्या मित्रांना पाठवला. त्यांनी दिलेला पाठिंबा, इतकी मोठी बातमी झाली याचं त्यांनाही आश्चर्य वाटलं.
पानिपतच्या युद्धानंतर सुमारे वीस हजार मराठ्यांना अफगानीस्तानात नेलं जात होतं. हे वाचनात आलं होतं. त्यानंतर सहज फेसबुकवर शोध घेतल्यावर बलुचिस्तानातल्या डेरा बुग्टी, क्वेट्टा या शहरांमध्ये मराठे असल्याचं लक्षात आलं. त्यांच्याशी मैत्री केली.  एक मुद्दा अर्धवट राहिला. मराठ्यांना अफगानीस्तानात नेणं शक्य होत नसल्यानं त्यांना बलुचिस्तानात गुलाम म्हणून विकण्यात आलं. अर्थात तिथल्या मुस्लीम राजवटीत धर्मनिरपेक्ष चोचले नसल्यानं या मराठ्यांचं धर्मांतर करून त्यांना मुस्लीम करण्यात आलं. मारूनकुटून मुसलमान ही म्हण तर आपल्या माहित आहेच. त्याप्रमाणे जीव वाचवण्यासाठी त्या मराठ्यांसमोर पर्याय नव्हता. मुस्लीम झाले तरी त्यांनी त्यांच्या नावात मराठा नाव लावलं. मराठ्यांशी नाळ तुटली नाही, हे दाखवण्याचा हा केविलवाणाच प्रयत्न म्हणावा लागेल. कारण त्यांच्या मराठा ट्राईबच्या सगळ्या पोस्ट पाहिल्यावर त्यात भारतविरोधी, रॉविरोधी पोस्ट आहेत. अर्थात पाकिस्तानात राहून ते भारताचा जयजयकार करणंही शक्य नाही. तसं झालं तर सरकारी खर्चाने त्यांची कबर खोदली जाईल.
पाकिस्तानी मराठा मुस्लीमाने एकदा माझी चांगलीच गोची केली होती. मला मेसेन्जरवर ऊर्दूतून मजकूर पाठवला होता. मी त्याला विचारलं हे काय आहे ? त्यावर तो म्हणाला, आज पाक दिन है, इस्लाम कबूल करो. मग मी त्याला मैत्री धर्माचा दाखला दिला. बरं झालं एवढ्यावर त्याचं समाधान झालं. त्याने जर जास्त वटवट केली असती तर, भारी उत्तर तयार ठेवलं होतं. मुझे जिहादी आतंकी बनने का शौक नहीं, असं उत्तर देणार होतो. पण ती वेळ आली नाही, आणि मैत्रीही कायम राहिली.
पाकिस्तानातले हे मुस्लीम फक्त मराठा आहेत, म्हणून त्यांच्याशी आत्मीयता आहे. त्यांच्याशी फेसबुकवरून मैत्री केली. पण तोच न्याय इथंही लागू होतो. भारतात जे मुस्लीम आहेत, ते काही पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराक, इराणमधले नाहीत. ते ही इथलेचं आहेत. मारूनकुटून किंवा जातीयवादाला कंटाळून ते मुस्लीम झाले असतील. पाकिस्तानातल्या मराठा मुस्लीमांशी मैत्री करतानाच आता आपल्या देशातल्या मुस्लीमांशीही मैत्री घट्ट करायची आहे. ती मैत्री करताना ते पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत म्हणून नाही तर भारतीय आहेत, या नात्यानं ही मैत्री करायची आहे.
मनात बातमीचा हेतू ठेवून पाकिस्तानातल्या मराठा मुस्लीमांशी केलेली मैत्री या निमित्तानं बरंच काही शिकवून गेली.

Saturday, July 1, 2017

एक वाटी...शेजारधर्माची !

माझ्या सारखे अनेक जण त्यांचं मूळगाव सोडून नोकरी-धंद्यानिमीत्त बाहेर गावी राहत असतात. अनेकांना ते ज्या शहरात नोकरी-धंद्यानिमीत्त वास्तव्यास आहेत, त्या शहराला नाव ठेवण्याची खोड असते. अर्थात ही खोड माझ्यातही आहे, पण कमी प्रमाणात. हैदराबादला तर मुळीच नाव ठेवावं वाटत नाही. रेड्डी हे आमच्या घरमालकाचं आडनाव. दररविवारी त्यांच्याघरून बिर्याणीचं ताट आमच्या घरी यायचं. मग माझी पत्नी अंजली ही, तिनं केलेला जो काही स्पेशल मेनू असेल तो रेड्डी आन्टीकडे द्यायची. खीर, दाळबाटी, चिकन किंवा पालकपनीर यापैकी जे काही केलं असेल त्याची देवाणघेवाण व्हायची. या शेजारधर्मामुळे माझ्या पत्नीलाही हैदराबादी बिर्याणी चांगल्या प्रकारे करता यायला लागली. आपण हॉटेलमध्ये जी चिकन किंवा मटन बिर्याणी खातो, ती निव्वळ खिचडीच म्हणावी लागेल. कारण हैदराबादी बिर्याणी करण्यासाठी लागणारी मेहनत आणि वेळ हॉटेलवाले देणं शक्यच नाही.
हैदराबादनंतर अमरावतीमध्ये वर्षभर वास्तव्य होतं. त्या काळात शेजारच्या राऊत कुटुंबाबरोबरही अशीच देवाणघेवाण सुरू असायची. अमरावतीनंतरचा पुढील पाडाव होता, मुंबई. मागील दहा वर्षापासून याच शहरात वास्तव्य आहे. सुरूवातीला खारघर, त्यानंतर नेरूळ आणि आता साडेसहा वर्षांपासून सायन प्रतीक्षानगरमध्ये वास्तव्य आहे. दाटीवाटीच्या या शहरात कोणालाही शेजारधर्माची वाटी द्यावी वाटत नाही. अर्थात आपण वाटी दिली तर कोणी नाही म्हणणार नाही. खारघर आणि नेरूळच्या सीवूड्स या भागात जवळपास साडेतीन वर्ष वास्तव्य केलं. पण चुकूनही शेजा-यांनी शेजारधर्म म्हणून वाटी पाठवली नाही. बंद दरवाजे पाहण्याची सवय लागली होती. चुकून कोणाचं दार उघडलं तर लगेच आतून आवाज यायचा, दरवाजा बंद कर. घरात कोणी माणूसच काय तर हवाही यायला नको, असं त्यांना वाटत असावं. दरवाजा बंद कर, हे बहुतेक अस्सल मुंबईकरांचं ब्रीदवाक्य असावं.
आता साडेसहा वर्षापासून सायन प्रतीक्षानगरमध्ये वास्तव्य आहे. नाही म्हणायला मी ज्या फ्लोअरवर राहतो त्या फ्लोअरवर वाटी देवाणघेवाण करण्याची लुप्त होत चालली परंपरा सध्या तरी जीवंत आहे. शेजारच्या घावरे काकू, पवार आणि परब वहिनी यांच्याकडून शेजारधर्माची वाटी येते. श्रावण लागण्याच्या आधी खास कोंबडीवडे आणि मालवणी पद्धतीचे मासे  शेजारधर्माची पताका फडकवत आमच्या घरी येतात. मग आम्हीही मराठवाडा किंवा नगर स्टाईलने केलेल्या मटनाची वाटी माझा मुलगा वेदच्या हाती रवाना करतो.
बदलत्या पिढ्यांबरोबर आणि शहरीकरणाबरोबर काही गोष्टी या बदलतच जाणार आहेत. पण संभाजीनगरमध्ये लहानपणी आमच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या गरड काकू, भालेराव काकू, जाधव काकू, बनकर काकू, फ्रान्सीस आंटी, तांगडे काकू, सूर्यवंशी काकू यांचा शेजारधर्म पाहायला मिळाला. तिथं शेजारधर्मासाठी रविवारची अट नव्हती. कोणत्याही दिवशी वाटीची देवाणघेवाण सुरू असायची. शेजारच्या काकूंच्या घरातून भाजीचा खमंग वास दरवळायचा. आणि काही वेळाने तीच भाजी वाटीतून आमच्या घरी यायची. आईने केलेली काळ्या मसाल्याची भाजी सर्वांच्या आवडीची असायची. त्या भाजीची वाटी घरोघरी पोहोचती करण्याचं काम कधी तरी माझ्याकडे असायचं. पण माझी बहीण कविता हिच्याकडेच भाजी पोहोचती करण्याची जबाबदारी असायची.
अजून एक आठवलं. लहानपणी नवे कपड परिधान केल्यावर शेजा-यांकडे जावून ते दाखवयाचे, ही एक प्रथा होती. आमचे शेजारचे मित्रही त्यांनी परिधान केलेले कपडे घरी येऊन दाखवायचे. मग छान छान, असं म्हणत कौतुक सोहळा व्हायचा. आता बंद दवाजांच्या या संस्कृतीत शेजारधर्मही दरवाजांच्या आत बंद झाला आहे. कोंडलेला शेजारधर्म पुन्हा बाहेर काढायला हवा.