Thursday, April 25, 2019

ये 'मुलाकात' एक बहाना हैं...

सबसे बडा खिलाडी अक्षय कुमारनं खिलाडीयों का खिलाडी नरेंद्र मोदींची 'गैरराजकीय' मुलाखत घेतली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अशी 'गैरराजकीय' मुलाखत होऊ शकते, याचा देशवासीयांना पहिल्यांदाच प्रत्यय आला. पण मोदी है तो मुमकीन है, या उक्तीचा या निमित्तानं प्रत्यय आला. 'सबसे बडा खिलाडी' आणि 'खिलाडीयों का खिलाडी' यांनी एकत्र येऊन 'मैं खिलाडी तू अनाडी' या सिनेमाच्या नावाप्रमाणे देशवासीयांना 'अनाडी' समलजं की काय ? असा प्रश्न निर्माण होतो.
पण 'गैरराजकीय' मुलाखतीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. या मुलाखतीवरुन अनेक मिम्स व्हायरल झाले. ओव्हर अॅक्टींगसाठी पैसे कापण्याचा मिम्स तर सर्वात लोकप्रिय ठरला. अक्षय कुमारपेक्षा चांगली अॅक्टींग नरेंद्र मोदींनी केल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. 'गैरराजकीय' मुलाखतीच्या नावाखाली देशातल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचाच हा प्रयत्न होता, यात शंका नाही. निवडणुक जिंकायची असेल तर राजकीय आणि गैरराजकीय अशा दोन्ही आयुधांचा वापर करायला मागेपुढे पाहायचं नसतं, हे नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं.
एनडीटीव्हीवर रवीश कुमार यांनी, आंब्याची इमेज दाखवत 'गैर राजनीतिक प्राइम टाइम' सादर केला. रवीश कुमार यांचा हा प्राइम टाइम सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. त्यांच्या नेहमीच्या अंदाजात त्यांनी 'दोन खिलाडींच्या' 'गैरराजकीय' मुलाखतीची साल काढली, असं म्हणावं लागेल. अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीत ज्या आंब्याचा उल्लेख झाला होता त्या आंब्याच्या सालीप्रमाणे 'खिलाडीं'ची रवीश कुमार यांनी साल काढली.
राजकीय नेत्याची अभिनेत्यानं मुलाखत घेतली. यामुळे अक्षय कुमारवर राजकीय टीका होणारच होती. तसंही पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमांमुळे अक्षय कुमारवर  भाजपचा शिक्का बसलाच होता. पण खरंच अभिनेत्यांचं काम अवघड असतं. 
2008 मध्ये अक्षय कुमारचा सिंग इज किंग हा सिनेमा आला होता. हा सिनेमा गाजला होता. त्याच्या दुसऱ्याच वर्षी अक्षय कुमारला पद्मश्रीनं सन्मानीत करण्यात आलं होतं. सिंग इज किंग सिनेमा आणि तेव्हा मनमोहनसिंग पंतप्रधान होते. याच कारणामुळे अक्षय कुमारला पद्मश्रीनं सन्मानीत करण्यात आलं, अशी टीका झाली होती. म्हणजेच काँग्रेस असो किंवा भाजप कोणाच्याही निकट गेलं तरी शेकलं ते, अक्षय कुमारवरच. 
सैफ अली खानलाही पद्मश्री मिळाला होता. सैफची आई शर्मिला टागोर त्यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा होत्या. शर्मिला टागोर यांच्यामुळे सैफला पद्मश्रीनं सन्मानीत करण्यात आल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. एकंदरीतच अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, सेलिब्रिटी यांनी कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर किंवा पक्षाबरोबर जवळीक साधल्यावर त्यांच्यावर टीका केली जाते. अर्थात तसं पाहिलं तर अभिनेते हे सॉफ्ट टार्गेटही आहेत. या मंडळींनी कोणत्या एका विषयावर भूमिका घेतली तरी त्यांना ते सोयीचं नसतं. कारण त्यांनी घेतलेली भूमिका न आवडलेले त्यांच्यावर टीका करतात. भूमिका घेतली नाही, म्हणूनही अभिनेत्यांवर टीका केली जाते. म्हणजे काही केलं तरी, अभिनेतेच टीकेचे धनी होणार. सिनेमात एकाच वेळी अनेक गुंडांना लोळवून हिरो होणारे अभिनेते सोशल मीडियात नाहकच व्हिलन ठरवले जातात. #संगो

Friday, April 19, 2019

शिवसेनेचा 'भार' मतदार हलका करणार?

लोकसभा निवडणुकीत उमेदवार बदलण्याची हिंमत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दाखवली नाही. काही खासदारांना पाचव्यांदा, चौथ्यांदा, तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. निष्क्रिय खासदारांच्या विरोधात नाराजी असतानाही शिवसेनेनं भाकरी उलथली नाही. परिणामी निकालानंतर शिवसेनेची ही भाकरी करपली तर कोणालाही नवल वाटणार नाही. अगदी उद्धव ठाकरेंनाही.
चंद्रकांत खैरे पाचव्यांदा रिंगणात उतरले आहेत. शिवाजीराव अढळराव पाटील चौथ्यांदा रिंगणात उतरले आहेत. आनंदराव अडसूळ, प्रतापराव जाधव हे ही तिसऱ्यांदा मैदानात उतरत आहेत. रवींद्र गायकवाड वगळता एकाही विद्यमान खासदाराचं तिकीट कापण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेचे 17 खासदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परिणामी रांगडी शिवसेना खासदारांसमोर हतबल झाली का ? हा सवाल उपस्थित होतो.
शिवसेनेचा गड असलेल्या संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंसमोर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी जोरदार आव्हान निर्माण केलं आहे. 'एकच फॅक्टर, शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर' ही घोषणा लोकप्रिय ठरली आहे. वंचित बहुजन आघाडीनं दलित आणि मुस्लीमांच्या भागांमध्ये प्रचारात आघाडी घेतली आहे. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी वैजापूर, कन्नड, गंगापूर, खुल्ताबादमध्ये आघाडी घेतली आहे. अखेरच्या टप्प्यात हर्षवर्धन जाधवांनी संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहरावर जोर दिलाय. मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्याविषयी ग्रामीण मतदारांमध्ये सहानुभूती आहे. मराठा मतांचं ध्रुवीकरण करण्यात हर्षवर्धन जाधव यांना यश आलं आहे. त्यातच महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या भक्त परिवारानं हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले अब्दुल सत्तार यांनीही हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा दिला. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई आहेत. त्यामुळे भाजपचा हर्षवर्धन जाधवांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधातली नाराजी हर्षवर्धन जाधवांसाठी फायद्याची ठरत असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत मतदारांनी खान विरूद्ध बाण अशा निवडणुका पाहिल्या आहेत. पण पहिल्यांदाच खानही नको आणि बाणही नको, पण विकास हवा अशा वळणावर जिल्ह्यातले मतदार आले आहेत. खैरेंनी जिल्ह्यात कोणते मोठे उद्योग आणले ? असा सवाल विचारला जात आहे. शहरातल्या विविध प्रश्नांवरून प्रचार करताना शिवसेनेच्या नेतृत्वाची अडचण होताना दिसत आहे.
अमरावतीमधून आनंदराव अडसूळ यांना स्थानिक नसल्याच्या मुद्यावरून रोषाला सामोरं जावं लागत आहे. खासदार जिल्ह्यात उपलब्ध नसतात अशी टीका विरोधकांकडून सातत्यानं केली जाते. या टीकेला समाधानकारक उत्तर शिवसेनेला देता आलेलं नाही. शिरूर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील तीनदा निवडून गेले. मात्र यावेळी त्यांच्याविरोधात मतदारसंघात मोठी नाराजी आहे. पण शिवाजीरावांचं तिकीट कापण्याची हिंमत दाखवली गेली नाही. त्यामुळे आता मतदारांनी 'संभाजी'चा (डॉ. अमोल कोल्हे) राज्यभिषेक केला तर नवल वाटायला नको.
बुलढाणा मतदारसंघातही प्रतापराव जाधव यांच्या विरोधात नाराजी आहे. पण इथंही शिवसेनेनं कच खाल्ली. यवतमाळ मतदारसंघातून भावना गवळी यांना किती वेळा लोकसभेवर पाठवायचं ? याचाही विचार करण्याची गरज आली आहे. मुंबईतून गजानन कीर्तिकर यांच्याऐवजी तरूण शिवसैनिकाला संधी देण्याची संधी शिवसेनेला होती. पण ही संधी शिवसेनेनं साधली नाही. मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवार या तरूण उमेदवाराला मैदानात उतरवलं. असं असताना ज्यांच्या विरोधात नाराजी आहे, त्या श्रीरंग बारणेंना शिवसेनेनं मैदानात का उतरवलं ? हा प्रश्न निर्माण होतो.
नाराजी असलेल्या उमेदवारांचं तिकीट कापण्याऐवजी मतदारांच्या हातूनच जुन्या खोडांचा 'कार्यक्रम' करण्याचा शिवसेनेचा डाव असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीतच शिवसेनेवरचा हा निष्क्रिय उमेदवारांचा 'भार' मतदार हलका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. #संगो

Friday, April 5, 2019

राज...राज ना रहा !


एका पक्षाचा अध्यक्ष इतर दोन पक्षांचा प्रचार करतोय. असं चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या पक्षाचे उमेदवार उभे न करता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेण्याची वेळ आलीय. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठींबा दिला होता. भाजपच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. इतकंच नव्हे तर मनसेचे उमेदवार निवडून आले तर ते मोदींना पाठींबा देतील असंही राज ठाकरेंनी सांगितलं होतं.
अर्थात तेव्हा मनसेचे उमेदवार निवडून आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोदींना पाठींबा देण्याची वेळ आली नाही. पण आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची वेळ राज ठाकरे आणि मनसेवर आली आहे. 2012 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यांची मिमिक्री केली. भुजबळांवर टीका करत नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली. पण आता छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी राज ठाकरेंना सभा घ्यावी लागणार आहे. नाशिकमध्ये मनसेचे कार्यकर्ते समीर भुजबळांचा प्रचार करत आहेत.
असंच चित्र मावळच्याही बाबतीत आहे. अजित पवार यांनी, धरणात मुतू का ? असं वक्तव्य केल्यावर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरच्या एका जाहीर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला आता मत नाही, मूत मिळेल असं म्हटलं होतं. पण झालं उलटंच. आता हेच राज ठाकरे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारसाठी सभा घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी राज ठाकरे नऊ सभा घेण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे मतदारांना साकडं घालणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी मनसेच्या माजी आमदार आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी मार्मिक प्रतिक्रिया दिली होती. भाजपवाल्यांना दुसऱ्यांची पोरं कडेवर घेण्याची हौस आहे. पण काही महिन्यातच ही वेळ आता राज ठाकरेंवर आली आहे. राज ठाकरेंवर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची मुलं कडेवर घेण्याची वेळ आलीय. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही स्टार कॅम्पेनर नाही. त्यामुळे आघाडीलाही राज ठाकरेंवर अवलंबून राहावं लागत आहे.
अर्थात यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं काहीच नुकसान होणार नाही. पण एक पक्ष आणि नेता म्हणून राज ठाकरेंची विश्वसनीयता कमी होणार आहे. काँग्रेस आघाडी राज ठाकरेंच्या मनसेला त्यांच्या आघाडीत घेत नाही. पण राज ठाकरे त्यांना प्रचारासाठी हवे आहेत. तर जे पक्ष मनसेला आघाडीत एक जागाही द्यायला तयार नाही, त्यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत. असं असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार मनसेकडे आकर्षित होतील का ? असा सवाल निर्माण होतो. #संगो