Saturday, April 19, 2014

'सिंचन (घोटाळा), मूत आणि पाणी'

वेड लागलंय वेड, राज्यातल्या मीडियाला वेड लागलंय. अजित पवारांसारख्या निर्लेप आणि सालस व्यक्तीमत्वाच्या या संत माणसावर तुटून पडलेत हे मीडियावाले. मात्र मीडिया आणि विरोधी पक्षाला त्यांची, बहिणीवरील माया दिसत नाही. बहिणीवरील मायेपोटी ते मासाळवाडीच्या गावक-यांना म्हणाले, 'बहिणीला मतं दिली नाही तर गावाचं पाणी तोडेन'. मात्र  मी़डिया आणि विरोधकांना हे कळालंच नाही. आणि जो काही पुरावा म्हणून ऑडिओ ऐकवला जातोय, तो दादांचा आवाज नाहीच. बघा पोलिसांच्या तपासातही हेच सिद्ध होईल. अहो अगदी सीबीआय, एफबीआय आणि काँग्रेस आय ने जरी तपास केला तरी दादांचा सत्यपणा सिद्ध होईल, यात वाद नाही. अहो इतका उर्मट, धमकी देणारा, दम देणारा आवाज दादांचा असणं शक्यच नाही. 
देशाचं रक्षण करणारा कोणीतरी एक सैनिक मासाळवाडीत जरा जास्तच बोलला. आता तो सैनिक सापडत नसल्याची बातमी वाचनात आली. अहो गेला असेल सीमेवर देशाचं रक्षण करायला. उगीच वाकडातिकडा अर्थ काढू नका. त्या सैनिकाला म्हणावं, इथं दादा आहेत. रक्षण करण्यासाठी. 'पाणी' पाजण्यासाठी. मात्र ही मायाच नागरिकांना कळत नाही. आणि हेच दृष्ट लोक दादांच्या विरोधात तक्रार नोंदवतात. आबांचे पोलीसही गुन्हा दाखल करतात. दादांच्या विरोधात पक्षांतर्गत विरोधकांनी उचल तर खाल्ली नाही ना ? या काळजीने राष्ट्रवादीतल्या दादा गटाच्या समर्थकांच्या छातीत धस्स झालं, बघा. अजित पवारांवर गुन्हा दाखल होणं हा, पुरोगामी महाराष्ट्रावरील कलंक आहे. 
तिसरं महायुद्ध हे पाण्यावरून होणार आहे. हे ग्रामीण भागातल्या जनतेला समजणार नाही. त्यांना हे लक्षात आणून देण्यासाठीच दादांनी जाणूनबुजूनच  तशी भाषा मासाळवाडीत वापरल्याचा एक मतप्रवाह जागतिक राजकारणात व्यक्त होतोय. मात्र मासाळवाडीतल्या दादांच्या भाषेचा अर्थ लक्षात न आल्यानेच माडियाची 'जल बिन मछली' अशी अवस्था झाली आहे.
मागील वर्षी राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. मुख्यमंत्र्यांनी 0.1 टक्काही सिंचन वाढलं नाही, असं धक्कादायक विधान केलं होतं. त्यामुळे राज्यात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांना बळ मिळालं होतं. मात्र त्यामुळे व्यथित झालेल्या दादांनी काकांनाही न सांगता थेट राजीनामा दिला. साधेसुधे नव्हे तर तब्बल 72 दिवस दादा मंत्रिपदापासून दूर होते. हे बघून जगभरातल्या सज्जनांचा जीव तीळतीळ तुटत होता. अखेर 72 दिवसांनी दादा मंत्रिमंडळात आले. हे पाहून स्वर्गातूनही त्या दिवशी देवांना पुष्पवृष्टी करण्याची इच्छा झाली असेल. देव पुष्पवृष्टी करणारही होते. मात्र राज्यात दुष्काळ असल्यानं ती फुलं सुकून जातील, या विचाराने देवांनी पुष्पवृष्टी केली नाही.
धरणात मूतण्याचं केलेलं विधान तर मीडिया किती बहिरा आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. 'दुष्काळामुळे राज्यातली धरणं मृतप्राय झाली आहेत', असं दादा म्हणाले होते. मात्र दादांच्या वाईटावर टपलेल्या मीडियाने मूत शब्दच लावून धरला. त्यामुळे व्यथित झालेल्या दादांनी प्रीतीसंगमावर आत्मक्लेश केला. दादा आत्मक्लेश करत असताना दादांचे राज्यभरातले कार्यकर्ते जेवले नाहीत. अनेक कॉन्ट्रॅक्टर तर त्या दिवशी सरकारी कार्यालयांमध्ये गेले नाहीत. त्यांनी त्या दिवशी बिल घेण्याच्या कामावर बहिष्कार टाकला, अशी चर्चा होती.
सहकार क्षेत्रातली काही लोकांची टगेगिरी दाखवून देण्यासाठी दादांनी स्वत:ला टग्या म्हणवून घेतलं होतं. मीडियातल्या काही घटकांची मुजोरी वाढल्यानं दादांना त्यांना 'समजेल' अशा भाषेत बोलावं लागलं होतं. मात्र दादांची प्रेमाची भाषा सामान्यांना कळतच नाही. इतका सहृदय इसम गावाला पाणी देणार नाही, असं बोलू तरी शकतो का ? अशी भाषा गुंडांची आहे, दादांची नाही. मुंबईत एसआरएसाठी चाळी, झोपडपट्ट्या रिकामी करण्यासाठी बिल्डर तिथल्या नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करतात. कृपया करून मुंबईतल्या बिल्डरांच्या उदाहरणाची दादांबरोबर तुलना करू नये. दादांची बहिणीवरील माया समजून घ्या. ( ही माया वेडी नाही, तर 'शहाणी' आहे.) दादांचं नेतृत्व ही आपल्या मिळालेली दैवी देणगी आहे. उगाच त्यांचं 'पाणी' जोखू नका.

Tuesday, April 8, 2014

मतदारांनो, सत्ताधा-यांना बदला आणि घ्या 'बदला' !

2014 हे महत्वाचं वर्ष आहे. लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र या फक्त निवडणुका नाहीत, तर ही वेळ आहे, सूड घेण्याची. केंद्र आणि राज्यातल्या सत्ताधा-यांना बदलून बदला घेण्याची 2004 ते 2014 या मागील दहा वर्षापासून देशावर यूपीएची सत्ता आहे. 2004 ते 2009 या काळात यूपीएचा कार्यकाळ निश्चीतच समाधानकारक होता. अर्थात हे साध्य झालं डाव्यांमुळे. डाव्यांच्या पाठिंब्यावर असलेल्या यूपीए - 1 मध्ये भ्रष्टाचार झाला नाही. डाव्यांची सरकारवर नजर असल्यानं काँग्रेसी मंत्र्यांना भ्रष्टाचार न करता काम करण्याशिवाय पर्यायच नव्हता. अणूकराराच्या मुद्यावरून काँग्रेसेनं समाजवादी पार्टीबरोबर मेतकूट जमवलं, आणि डाव्यांना बाजूला सारलं.
2009 मधल्या निवडणुकीत अणूकरार जिंकल्यामुळे आलेला आत्मविश्वास आणि निष्कलंक सरकारची पुण्याई या बळावर काँग्रेसनं 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या. केंद्रात काँग्रेसप्रणीत यूपीए - 2 सरकार सत्तेत आलं. मात्र आता या सरकारला डाव्यांचा धाक नव्हता. कारण डावे भूईसपाट झाले होते. मग काय ? कॉमनवेल्थ, 2 जी स्कॅम, देशाचा 'मानबिंदू' ठरणारा कोळसा घोटाळा, रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सलचा भाचा लाच घेताना पकडला जाणे अशा चढत्या क्रमाने काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले. कोळसा घोटाळ्यात तर कित्येक खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, मीडिया हाऊसेस यांनी हात काळे केले. (तोंड हा शब्द मुद्दाम वापरलेला नाही.)
सरकारमधील मंत्री भ्रष्टाचाराचे उच्चांक प्रस्थापित करत असताना महागाई वाढतच होती. शेतक-यांच्या पिकाला भाव मिळत नसल्यानं आत्महत्याही थांबत नव्हत्या. देशभरात बॉम्बस्फोटांचं सत्रही सुरूच होतं. पाकिस्तानची तर भारतीय सैनिकांचे शीर कापण्यापर्यंत हिंमत वाढली. केंद्र सरकारकडून निराशाजनक कारभार सुरू असताना राज्यातील सत्ताधारी शिलेदारही भ्रष्टाचारात कुठेच कमी पडत नव्हते. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा राज्यात झाला. तर दुष्काळग्रस्त भागातील जनता पाण्याची मागणी करत असताना त्यांना मूत पाजण्याची भाषा या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतक-यांची पिळवणूक होते. मात्र या बाजार समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे शेतक-यांची पिळवणूक करून राष्ट्रवादीवाले गब्बर होत आहेत. परिणामी ही पिळवणुकीची केंद्र बंद होणार नाहीत. शेतक-यांच्या पिकांना भाव मिळण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत नाहीत. गारपिटीमुळे मराठवाडा, विदर्भातला शेतकरी उध्वस्त झाला. मात्र त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. टोलचा पैसा हा कंत्राटदारांच्या मार्फत सत्ताधा-यांना पोहोचवला जात आहे. मुख्यमंत्री आश्वासन देऊनही 28 टोलनाके बंद करू शकले नाहीत. या वरून टोलमाफियाच सरकार चालवत नाही ना ? असा सवाल उपस्थित होतो.
हे सर्व लक्षात ठेऊन मतदारांनी सत्ताधा-यांना हुसकावून लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच भाजपनंही नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट करून सरकारविरोधी जनमत जमवायला सुरूवात केली आहे.  देशभरात नरेंद्र मोदी आणि राज्यात महायुतीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचं विविध ओपिनियन पोल्सच्या रिझल्टमधून स्पष्ट होत आहे.
मात्र काँग्रेसनं आता मोदींनी मीडिया विकत घेतल्याची बोंब ठोकायला सुरूवात केली आहे. भाजपवाले खोटा प्रचार करण्यात आघाडीवर आहेत, असा आरोप काँग्रेस करत आहे. अंबानी-अदाणी मोदींच्या पाठिशी आहेत, असा ही आरोप केला जातोय. जर भाजपला खोटाच प्रचार करायचा असता तर त्यांनी तो 2009 मध्ये का केला नाही ? त्यांनी तेव्हाच मीडियाला पैसे का दिले नाहीत ? याचं उत्तर काँग्रेसवाले देत नाहीत. कारण 2009 मध्ये काँग्रेसच्या यूपीए - 1ची प्रतिमा चांगली होती. तेव्हा मतदारांनी लालकृष्ण अडवाणी आणि एनडीएला नाकारलं होतं. मात्र आता 2014 मध्ये काँग्रेसची भ्रष्टाचाराची लफडी जगजाहीर झाली आहेत. काँग्रेस आणि यूपीएची प्रतिमा मलिन झालेली आहे. काँग्रेसवाले भ्रष्टाचारच करतात हे, मतदारांना पटलेलं आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदींना पाठिंबा वाढत चालला आहे. आणि त्याकडे दुर्लक्ष करून, मीडियावर खापर फोडण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.