Monday, September 14, 2009

दूरदर्शन : सुवर्णमयी इतिहासाचा सुवर्ण महोत्सव

भारतीय माध्यमातील इलेक्ट्रॉनिक युगाची सुरूवात दूरदर्शनमुळे झाली. आज दूरदर्शनचा सुवर्णमहोत्सव साजरा होतोय. आपल्यापैकी अनेकांची जन्मही झाला नव्हता तेव्हा हे माध्यम अवतरलं. त्यामुळे 50 वर्षापूर्वी दूरदर्शनची किती नवलाई असेल याची कल्पनाही करणं कठिणच आहे. दिल्लीतल्या एकमेव केंद्रापासून सुरूवात झालेल्या दूरदर्शनचा व्याप आता देशभर पसरलाय. प्रत्येक राज्यासाठी दूरदर्शनने स्वतंत्र प्रादेशिक वाहिनी दिली. मुंबईत 1972 मध्ये दूरदर्शन केंद्र सुरू झालं. 1983 चा विश्वचषक जिंकल्याचा क्षण कोट्यवधी भारतीयांनी दूरदर्शनच्या माध्यमातून बघितला, आणि देशात क्रिकेटची लोकप्रियता आणि दूरदर्शनचे आकर्षण शिगेला पोचलं.
1985 नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले. आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन दर्शकांना भारावणारे असेच होते. इतकंच कशाला तर सलमा सुल्तान हिने लावलेल्या टिकलीचीही मोठी चर्चा व्हायची.
मात्र 90 च्या दशकात खाजगी दूरचित्रवाहिन्यांचे आगमन झाले आणि दूधात खडा पडला. अभिरूचीहीन कार्यक्रमांना मोठा प्रेक्षकवर्ग मिळत गेला. अर्थात याला दूरदर्शनचा सरकारी कारभारही तेवढाच कारणीभूत होता. मात्र दूरदर्शनने सामाजिक बांधिलकी कायम जपली. किरण चित्रे यांचा 13 सप्टेंबरचा लोकसत्तामधील लेख दूरदर्शनची जबाबदारी आणि आताच्या वृत्तवाहिन्या ( इंग्रजी, हिंदी आणि मराठीसुद्धा ) यांचा नंगानाच दाखवण्यासाठी पुरेसा आहे. भिवंडी दंगलीची व्हिज्युअल्स असताना दूरदर्शनने संयमीतपणे ती बातमी प्रसारीत केली. मात्र त्याकाळी जर एखाद्या वृत्तवाहिनीकडे ही व्हिज्युअल्स पोचली असती तर एक्सुक्लुसिव्हच्या नावाखाली दिवसभर गोंधळ उडवून दंगलीचे लोण राज्यभर पोचले असते.
केशराच्या कुरणात गाढवे चरत आहेत ?
दूरदर्शनच्या इतिहासाची पाने चाळताना सध्याच्या परिस्थिती बरोबरही नकळत तूलना होते. तेव्हा दूरदर्शनने जपलेला प्रबोधनाचा वारसा इतर वाहिन्यांवर दिसून येत नाही. मात्र असे असूनही दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग आधीच्या तूलनेत बराच कमी झालाय, हे ही तेवढंच खरं आहे. बदाम, काजू गोड लागत नसले तरी शरीरासाठी आरोग्यवर्धक आहेत. तर मिठाई कितीही आकर्षक आणि गोड असली तरी तिच्यामुळे शेवटी शरीराचे नुकसानच होणार आहे. सध्या प्रेक्षकांचंही तसंच झालं आहे. प्रेक्षक दूरदर्शनच्या बदामापेक्षा खाजगी वाहिन्यांच्या मिठाईकडे मोठ्य़ाप्रमाणात ओढला गेलाय.
दूरदर्शनवर अर्ध्या तासाचा चित्रहार असायचा, दर शनिवारी अर्ध्या तासाचा कार्टूनचा कार्यक्रम असायचा, आठवड्यातून एक हिंदी आणि एक मराठी सिनेमा प्रसारीत केला जायचा, ठराविक वेळीच अर्ध्या तासाच्या बातम्या प्रसारीत व्हायच्या मात्र आता वरील प्रत्येक कार्यक्रमासाठी डझनावारी 24 तासांच्या वाहिन्या सुरू झाल्या आहेत. सुमारे वीस वर्षापूर्वी सर्व कुटुंब एकत्रितपणे दूरदर्शनचे कार्यक्रम बघायचे. मात्र आता दूरदर्शनप्रमाणे इतर कोणत्याही वाहिन्यांवरील कार्यक्रम आपण सहकुटुंब पाहू शकतो काय ? मला वाटतं या प्रश्नाच्या उत्तरातच दूरदर्शनचं कार्याचं उत्तर सामावलंय.

6 comments:

 1. अगदी खरं आहे तुमचं. दुरदर्शनची सर आताच्या खाजगी वाहिन्यांना नाही. सगळा सवंगपणा आहे...

  छान लेखाजोगा घेतला आहे... लिहित राहा !!!

  ReplyDelete
 2. चांगला लेख. माहितीपूर्ण. मात्र, एखाद्या जुन्या गोष्टीचे कौतुक करताना दुस-या नव्या गोष्टींवर टीका केलीच पाहिजे का?

  ReplyDelete
 3. इलेक्ट्रॉनिक माध्यमाला पन्नास वर्षं पूर्ण झाली, असं नाही म्हणता येणार कारण रेडिओ हे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे. ते तर स्वातंत्र्याच्या आधीपासून आहे. बाकी छान आहे. बातम्यांच्या बाबतीत दूरदर्शन चांगलंच आहे. पण सिरियल्स खासगी वाहिन्यांसारख्याच उथळ असतात आता. प्रेक्षक जुन्या चांगल्या कार्यक्रमांच्या आठवणी काढून उसासे टाकतात. पण चांगले कार्यक्रम लावले तर बघत नाहीत, असं काहीसं दुष्टचक्र आहे.

  ReplyDelete
 4. दूरदर्शनच्या अनेक मालिका अगदी ऑल टाईम ग्रेट ठरव्या अशा होत्या.रामायण,महाभारत,नुक्कड,देख भाई देख,तहकीकात ते अगदी जंगल बूक चंद्रकांता या मालिका बघत आपण सारे लहाणाचे मोठे झालो.परंतु खाजगी वाहिन्यांच्या आगमनानंतर दूरदर्शन मागे पडलंय..बदलत्या स्वरुपासोबत adjust होण्यास दूरदर्शनला अजुनही जमलेले नाही.हे मात्र खरे.

  ReplyDelete
 5. काळाप्रमाणे आवडीनिवडी बदलत जातात त्याप्रमाणे या आवडी पण बदलल्या... पहिले दुरदर्शन जे दाखवायच ते लोकांना आवडायच आता टेस्ट बदललीये आणि महत्वाच म्हणजे या क्षेत्रात वाहणा-या आधुनिक वा-यांनी नुकसानापेक्षा फायदाच जास्त केला आणि त्यामुळेच सर्वसानाम्य माणुसही मीडीयासोबत जोडल्या गेला..

  ReplyDelete
 6. एक शुन्य शुन्य मालिका यु टुब वरती सापडत नाही प्लीज सहकार्य करा

  ReplyDelete