Friday, October 30, 2015

युतीला सत्ता कळेना ? (अचूक मारा - 5)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने पंधरा वर्ष राज्यावर सत्ता गाजवली. त्यांच्यातही धुसफूस सुरू असायची. अनेक वादाचे प्रसंग यायचे. मात्र किती ताणायचं आणि कधी सोडायचं यात आघाडीवाले बनेल होते. यात वादच नाही. पंधरा वर्ष विरोधी बाकांवर बसलेले शिवसेना-भाजप सख्ख्या भावाप्रमाणे सरकारच्या विरोधात रान उठवायचे. मात्र आता सत्ता आल्यावर हे दोघे सख्खे भाऊ पक्के वैरी झालेत.
वर्षपूर्ती होत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र सरकारलाच रस्त्यावर आणण्याची भाषा केली आहे. भाजपचे मंत्री वर्षपूर्तीच्या सोहळ्यात रंगलेले असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपचा रंग खरडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. अर्थात याला भाजपचे बनेल नेतेही कारणीभूत आहेतच. मोदींच्या नेतृत्त्वात भाजपला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. या यशानं उत्साहित झालेल्या भाजपनं राज्यातली शिवसेने बरोबरची युती तोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. भाजपनं स्वबळावर 122 जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीनंही आश्चर्यकारकरित्या राज्यात स्थिर सरकारची भाषा सुरू केली. त्यामुळे 63 जागा मिळवूनही शिवसेनेला किंमत मिळाली नाही. भाजप आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेचा चांगलाच राजकीय गेम केला. मुख्यमंत्र्यांबरोबर फक्त भाजपच्याच मंत्र्यांचा शपथविधी झाला. नंतर विस्तारात शिवसेनेला सामावून घेण्यात आलं. त्यातही हवी ती खाती मिळाली नाही. मंत्र्यांची संख्याही कमी ठेवण्यात आली. यामुळे शिवसेना दुखावली गेली. शिवसेनेची धुसफूस सुरूच राहिली. वाढत्या महागाईमुळे जनतेतही सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालाय. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी त्यात तेल ओतण्याचं काम केलं. त्यामुळे आपण सरकारपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची आयतीच संधी शिवसेनेला मिळाली. त्या बरोबरच गुलाम अलींच्या मैफलीला विरोध, पाकिस्तानी कलाकारांना विरोध, सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक ही जुनी विरोधाची हत्यारं बाहेर काढून भाजपचा होईल तितका मूखभंग करणंही शिवसेनेनं सुरूच ठेवलं. सरकारमध्ये दिलेला अल्प वाटा, वारंवार करण्यात आलेला अपमान याचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारला रस्त्यावर आणण्याचा इशारा दिल्याचं स्पष्टच आहे.  आता खरंच कोण कोणाला रस्त्यावर आणतं हे लवकरच स्पष्ट होईल.

Monday, October 12, 2015

'शाई'चे राजकीय रंग

शिवसेनेनं सुधींद्र कुलकर्णींवर शाई टाकून जोरदार सुरूवात केली. दणादण ब्रेकिंग न्यूज, त्यावरील प्रतिक्रिया, फोनो, लाईव्ह सुरू झाले. आता खुर्शीद कसुरींचं पुस्तक काही प्रकाशित होत नाही, असं वाटायला लागलं. धावती मुंबई थांबते की काय, असं वाटलं. मात्र दिवस जसजसा माथ्यावर येऊ लागला तसतशी परिस्थिती बदलत गेली. शिवसेना विरोध कायम असल्याचं सांगत होती. मात्र दिवस मावळताना खुर्शीद कसुरींचं पुस्तक प्रकाशित झालं. त्या कार्यक्रमात सुधींद्र कुलकर्णींनी, शिवसेनेला खडे बोलही सुनावले. मुंबई महाराष्ट्रीय आहे. तसंच मुंबई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असल्याचहीं सांगितलं. गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे भाजपनंही वचपा काढत, मुंबईत दणक्यात कार्यक्रम होऊ दिला. शिवसेनेनं कसुरींच्या कार्यक्रमाला केलेला विरोध ही आंतरराष्ट्रीय बातमी ठरली. मात्र त्याला स्थानिक राजकारणाचे पदर आहेत, हे त्यामागील सत्य आहे.
आता हे ही खरं आहे की, सीमेवर जवान शहीद होतात. पाकिस्तानातून दहशतवादी भारतात येतात. तेच दहशतवादी देशात बॉम्बस्फोट घडवतात. त्यात भारतीय नागरिक ठार होतात. दहशतवाद्यांना पाकिस्तानात आसरा मिळतो. काश्मीरमधल्या फुटिरतावाद्यांना पाकिस्तान प्रोत्साहन देतो. दर शुक्रवारी श्रीनगरमध्ये नमाजनंतर भारताचा झेंडा जाळला जातो. पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकावले जातात. जवानांवर दगडफेक केली जाते. हे सगळं खरं असलं तरीही पाकिस्तान सोबतचे संबंध सुधारणं गरजेचं आहे. दोन्ही देशांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे. पाकिस्तानचे नागरिक, कलाकार भारतात येणंही गरजेचं आहे.
आता शिवसेनेनंही थोडा विचार करावा. अर्थात शिवसेनेची पाकिस्तानच्या विरोधातली भूमिका काही नवी नाही. मात्र त्यात सातत्य दिसत नाही. कित्येक पाकिस्तानी कलाकार या मुंबईत येतात. चित्रपट, सिरीअल, लाफ्टर शोमध्ये सहभागी होतात. अदनान सामीला तर त्याचा देश पाकिस्तान आहे, हे सुद्धा आठवतं का ? अशी शंका येते. कित्येक पाकिस्तानी क्रिकेटर्स मुंबईत येत असतात. विरोध करायचाच असेल तर तो सगळ्यांनाच करा, नसता कोणालाच करू नका.

खमंग फोडणी - भारत आणि पाकिस्तानमध्ये एवढी कटुता असली तरी पाकिस्तानी नागरिकांचा ओढा भारताकडेच आहे. अगदी त्यांच्या दहशतवाद्यांचाही. आपले चित्रपट, सिरीअल त्यांना खुणावत असतात. दहशतवादात जगत असलेल्या पाकिस्तानला त्यामुळे लोकशाहीप्रधान भारत आवडत असावा. नाही तरी किती काही झालं तरी, शेवटी बाप हा बापच असतो. त्यामुळे कार्ट कितीही वाया गेलेलं असलं तरी शेवटी बापाकडेच येतं, हे पाकिस्तानकडे पाहून लक्षात येतं.

Sunday, October 4, 2015

निवडणुकीच्या 'प्रचाराचं खाद्य' (अचूक मारा - 3)

निवडणुकीच्या 'प्रचाराचं खाद्य'

एका वेळच्या जेवणाला माणसाला लागतं तरी किती ? अर्थात कोणी किती खावं ? काय खावं ? काय खाऊ नये ? याचा हिशेब करण्याचा या लिखाणाचा हेतू नाही. मात्र काही दिवसांपूर्वी पर्युषण पर्वात मांसाहार बंदीवरून चांगलंच वातावरण तापलं होतं. त्यावेळी भाजपचे नेते मांसाहार बंदीसाठी पेटून उठले होते. त्या आधी दुष्काळ दौ-यावर गेलेल्या शरद पवारांचा एक फोटोही तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. दुष्काळ दौ-यात सुका मेवा आणि शरद पवार दिसत होते. त्यावरूनही चांगलाच धुराळा उडाला होता. मात्र त्यावेळी हे सभ्यतेला धरून आहे का ? असा सवाल विचारला गेला नव्हता. अर्थात राजकीय नेत्यांनीही परिस्थितीचं भान राखलंच पाहिजे. कारण आता फक्त माध्यमं दाखवतील तीच बातमी राहिलेली नाही. सोशल मीडिया हा सर्वसामान्यांच्या हाती आलेला आहे. त्यामुळे नेतेच काय, तर सगळ्यांनीच सारासार विवेक बुद्धीप्रमाणे वागण्याची गरज आहे.

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातातली प्लेट आणि समोरच्या टेबलवर खच्चून ठेवलेले विविध खाद्यपदार्थांचा, हा फोटो चांगलाच गाजतोय. सोशल मीडियासाठी हा फोटो खाद्य ठरला नसता तरच नवल. हातात प्लेट धरून बसलेले सीएम, टेबलवरून काकडी उचलत असलेले रावसाहेब दानवे, भरपेट खाल्ल्यानंतर तोंड पुसणारे विनोद तावडे ही मंडळी फोटोत दिसत आहेत. तर टेबलवर मिठाई, सुका मेवा, फळं आणि सलाड मांडून ठेवलेलं आहे. या पदार्थांची संख्या जवळपास 20 हून अधिक आहे. या नेत्यांनी या खाद्याचा समाचार घेतला. तर सोशल मीडियावर या नेत्यांचा समाचार घेणं सुरू आहे. फेसबुक आणि व्हॉट्स अपवर हा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, हे मात्र नक्की सांगता येत नाही. पण कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्यामुळे टायमिंग साधण्यात वाकबगार असलेल्या शिवसेनेनं तर हा फोटो व्हायरल केला नसेल ? असा सवालही आता उपस्थित होत आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त शेतक-यांची विचारपूस करत आहेत आणि सीएमचा हा फोटो, असे एकत्रित फोटोही चांगलेच व्हायरल झालेत. वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारणारे भाजप नेते, आणि शेतक-यांची विचारपूस करणारे उद्धव ठाकरे, हे दोन्ही फोटो बरंच काही सांगून जातात. आता तर कुठे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संग्रामाला सुरूवात झालीय. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी सोशल मीडियावरही ही लढाई अजून जोरकसपणे लढली जाईल, यात शंका नाही.
11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. त्या आधी भाजपची मुंबई आणि परिसरात भीमरथ यात्रा निघणार आहे. भूमिपूजनाची माहिती या निमित्ताने दिली जाणार आहे. टायमिंग साधण्यात भाजपवालेही काही कमी नाहीत. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम मागच्या महिन्यात होणार होता. पण तेव्हा कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे तर भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला नसेल ? अशी शंका येते. आता निवडणुकीची घोषणाही झालेली आहे. 11 ऑक्टोबरला भूमिपूजनही होईल आणि मतांची पायाभरणीही होईल.