Sunday, February 17, 2019

कॅन्सर : काश्मीरचा आणि टाईम्सचा


अतिरेकी आदिल दार याचा TIMES OF INDIAनं दिलेल्या बातमीच्या शिर्षकात अतिरेकी असा उल्लेख करण्याऐवजी लोकल यूथ असा उल्लेख करण्यात आला. पुलवामात आत्मघातील हल्ला करणारा, पाकिस्तानात ट्रेनिंग घेतलेला आदिल याला अतिरेकी म्हटलं गेलं नाही. त्यामुळे देशभरात गदारोळ माजला. अनेक जणांनी TIMES OF INDIA बंद करत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. मी ही TIMES OF INDIA बंद केला आहे.

 अतिरेकी आदिल दार याचा व्हिडीओ सगळ्यांनीच पाहिला आहे. त्या व्हिडीओत आदिल दार याचे भारत आणि हिंदू धर्मियांविषयी काय विचार आहेत, हे जगानं पाहिलं आहे. आदिल हा पूर्णपणे कट्टरपंथीय होता. मुलांनी प्रेमात पडू नये, असं तो म्हणायचा. काश्मीरमध्ये काही दहशतवादी मुलींच्या प्रेमात पडून लष्कराच्या हाती लागले होते. यामुळे तो असं म्हणायचा. तसंच व्हॅलेंटाईन डे हे काही इस्लामला अनुसरून नाही. त्यामुळेही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा हल्ला घडवून आणण्याचा त्याचा हेतू असू शकतो. तसंच महिलांनी बुरख्यातच राहावं अशी त्याची बुरसटलेली जिहादी विचारसरणी होती. इतकंच नव्हे तर माझ्या मृत्यूनंतर जल्लोष करा, असंही तो त्याच्या नातेवाईकांना सांगायचा. आत्मघाती हल्ला केल्यानंतर जन्नत मिळते, असा या जिहादी श्वापदांचा समज आहे. आणि खरंच असं असेल तर जगातल्या सर्व जिहादींनी एकाच वेळी त्यांच्या राहत्या घरात स्वत:ला बॉम्बने उडवून टाकावं. म्हणजे त्यांना जन्नत मिळेल. आणि ती घाण संपल्यामुळे या पृथ्वीचा स्वर्ग होईल.
 आदिल हा पाकिस्तानात एक वर्षापासून ट्रेनिंग घेत होता. संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अफझल गुरू याला नऊ फेब्रुवारी रोजी फासावर लटकवण्यात आलं होतं. त्यामुळे याच तारखेच्या आसपास घातपाताचा त्यांचा डाव होता. तसंच ताल्हा रशीद  आणि उस्मान हैदरचा खात्मा करण्यात आला होता. मसूद अझरच्या पुतण्यालाही ठार करण्यात आलं होतं. त्यामुळेही जैशचे अतिरेकी बदला घेण्याची संधी शोधत होते. पुलवामामध्ये ज्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला ते ठिकाण आदिल दार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. तिथूनच त्यानं त्याची गाडी सुमारे दोनशे किलो स्फोटकांनी भरून आणली होती. हीच गाडी भरधाव वेगानं त्यानं सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवून आत्मघाती हल्ला घडवून आणला.  
आदिल दार याला स्फोट घडवण्यासाठी जे वाहन देण्यात आलं, ते लोकल मदतीमुळे मिळालं. याचाच अर्थ दहशतवाद्यांचा स्लीपर सेल हा किती मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे, हे लक्षात येतं. या स्लीपर सेलकडे पाकिस्तानातले दहशतवादी स्फोटकं पुरवतात. 
पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. अनेक दहशतवादी संघटना तिथं कार्यरत आहेत. मसूद अझरच्या जैश ए महंमदनं काश्मीरसह भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले केले आहेत. पाकिस्तानात जैश ए महंमदचा तळ आहे. त्याच ठिकाणी आतापर्यंत अनेक हल्ल्यांचा कट शिजलाय. पुलवामातल्या आत्मघाती हल्ल्याचा कटही त्याच ठिकाणी शिजला. आदिल दार हा काश्मीरमधून तिथं पोहोचला होता. 
एक वर्षापासून आदिलचं पाकिस्तानात मानवी बॉम्ब बनण्याचं ट्रेनिंग सुरू होतं.
सहा महिन्यांपूर्वी  जैश ए महंमदने मोठ्या हल्ल्याचा कट आखला. कट रचण्यात आला त्यावेळी मानवी बॉम्ब बणून आत्मघाती हल्ला करण्यासाठीचं आदिल दार याचं तेव्हा तिथेच ट्रेनिंग सुरू होतं. जैश ए महंमदचा म्होरक्या मसूद अझर, आदिल दारसह तिघांनी हल्ल्याचा कट रचला. जैशच्या मुख्यालयात या कटाची माहिती फक्त मसूद अझर याला होती. भारतातल्या त्यांच्या स्लीपर सेललाही या कटाची माहिती नव्हती. त्यांना फक्त लोकल सपोर्ट देण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दक्षिण काश्मीरमधले पुलवामा, त्राल हे दहशतवाद्यांचे गड मानले जातात. या भागात दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो. इथंच आदिल दार आणि त्याच्या हॅण्डलरलाही आश्रय मिळाला. त्यांना स्थानिक पातळीवरूनही मदत झाली. जर या दोघांना आश्रय मिळाला नसता, मदत मिळाली नसती तर हा हल्ला टळला असता.
काश्मीर खो-यातल्या नागरिकांची मानसिकता ही भारतविरोधी आहे. काश्मीरच्या कॅन्सरमुळे भारताच्या इतर भागांचं नुकसान होतंय. त्यावर आता जालीम उपाय करण्याची गरज आहे. त्यामुळे चर्चा, वाटाघाटी असल्या निरर्थक गोष्टींमध्ये वेळ न घालवता सरकारने बॉम्ब आणि बुलेटची भाषा करावी. आणि तसं होत नसेल तर ती 56 इंचाची छाती, मोदी जॅकेटमध्येच लपवून ठेवावी.

Saturday, February 16, 2019

शहिदांच्या ज्वाला, देशात अंगार


देशभरात  नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर कित्येकांचे डोळे पाणावले. देशासारखीच स्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या मातीतले मलकापूरचे वीर जवान संजय राजपूत यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं. लोणार तालुक्यातल्या चोरपांगरा गावातले शहीद नितीन राठोड यांनी हौतात्म्य पत्कारलं. 
शहीद जवान नितीन राठोड यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या विविध ठिकाणाहून नागरिकांनी गर्दी केली. शहीद जवान नितीन राठोड अमर रहे असा जयघोष सुरू होता. भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या. तर पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देऊन नागरिक त्यांचा संताप व्यक्त करत होते. सरणा-या दिवसाबरोबर गर्दी वाढत होती. मिळेल त्या ठिकाणी नागरिक दाटीवाटीनं उभे होते. अखेर अंत्यसंस्काराची वेळ जवळ आली. बंदुकीच्या फैरी झाडून शहीद नितीन राठोड यांना मानवंदना देण्यात आली. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीद नितीन राठोड यांनी जिथे जन्म घेतल्या त्या गावातल्या मातीत त्यांना अग्नि देण्यात देण्यात आला. धगधगत्या ज्वालांमध्ये भारत मातेचा पूत्र देशाच्या मातीचा सन्मान राखण्यासाठी त्याच मातीत मिसळून गेला. 
ज्या गावात, ज्या घरात शहीद संजय राजपूत हे लहानाचे मोठे झाले तिथला प्रत्येक माणूस रडला. ज्या घरात संजय राजपूत मोठे झाले, त्या घरावर शोककळा पसरली होती. त्यांचे सर्व कुटुंबीय शोकसागरात बुडाले.  राजपूत कुटुंबीयाची जी भावना आहे, तीच भावना सध्या सर्व देशवासीयांची सर्वांना हवाय तो फक्त बदला.
मलकापूरमध्ये संजय राजपूत यांचं पार्थिव पोहोचल्यावर नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा  देण्यात आल्या.  भल्या मोठ्या मैदानात शहीद संजय राजपूत यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आलं. पण हे भलंमोठं मैदानही गर्दीसमोर तोकडं पडलं. अखेरचा सलाम देण्यासाठी जागा मिळेल तिथे नागरिक उभे होते. मैदानात आणि घरांच्या गच्चीवर नागरिक उभे होते. झाडांवर चढून शहिदाच्या निरोपाचा हा क्षण डोळयात साठवण्यासाठी अनेकांची धडपड सरू होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात अंगार पेटला होता. अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी रांग लावण्यात आली. फुलं, पुष्पचक्र हे अश्रूंमध्ये भिजवून वाहिले जात होते. शहिदाच्या शवपेटीला अखेरचा हात लागावा यासाठी उपस्थितांची धडपड सुरू होती. देशाचा सुपूत्र त्याचं कर्तव्य बजावून पुढच्या प्रवासासाठी निघाला. यावेळी आपला हात तरी शहिदाच्या शवपेटीला लागावा हीच भावना प्रत्येकाच्या मनात होती.  जय आणि शुभम ही संजय राजपूत यांची दोन मुलं. शहीद पित्यावर अंत्यसंस्काराचे विधी या लहान वयात करण्याची वेळ नियतीनं आणली. हे दृश्य पाहून सर्व उपस्थित हेलावले.  बंदुकीच्या फैरी झाडून शहीद संजय राजपूत यांना सलामी देण्यात आली. बुंदकीतून फैरी झाडल्या जात होत्या याचवेळी नागरिकांमधूनही सातत्यानं घोषणाबाजी सुरूच होती.  भारत माता की जय आणि संजय राजपूत अमर रहे, असा जयघोष सुरू होता. भारतमातेसाठी बॉम्बच्या ज्वाळात शहीद झालेल्या या सुपूत्राचा धगधगत्या ज्वालांमध्ये अंत्यसंस्कार सुरू झाला. सरणात जशा ज्वाला भडकल्या तशाच ज्वाला इथं उपस्थित असलेल्यांच्या मनात भडकल्या होत्या. 
या ज्वालांनी शहीद संजय राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पण देशातल्या नागरिकांच्या मनात भडकलेल्या ज्वाला लवकर शांत होणार नाहीत.  जो पर्यंत या शहिदांचे मारेकरी, दहशतवाद्यांना आसरा देणारे गद्दार आणि दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान या सर्वांचा हिशेब होत नाही, तोपर्यंत देशाच्या नागरिकांच्या मनात असलेला हा बदल्याचा अग्निही शांत होणार नाही.

Monday, February 11, 2019

'ठाकरे' : मैदानातले, मनातले आणि पडद्यावरचे


जाहीर सभेत लाखोंच्या गर्दीत मैदान गाजवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, या महाराष्ट्राने पाहिले आहेत. लाखो लोकांनी त्यांच्या जाहीर सभा ऐकल्या नव्हे तर जीवंत अनुभवल्या आहेत. त्या लाखो लोकांसारखा मी सुद्धा आहे. शिवसेनाप्रमुखांची तर मी अनेक भाषणं ऐकली आहेत. शिवसेनाप्रमुखांची भाषणं मी वेगवेगळ्या शहरात जाऊन ऐकली आहेत. संभाजीनगर, मुंबई, नाशिक, अमरावती या ठिकाणी झालेल्या शिवसेनाप्रमुखांच्या अनेक जाहीर सभेतली भाषणं ऐकली आहेत.
ठाकरे सिनेमाच्या सिल्व्हर स्क्रिनला नवाजुद्दीन सिद्दीकी यानं व्यापून टाकलं होतं, यात शंका नाही. पण त्या सिल्व्हर स्क्रिनवर म्हणजेच पडद्यावर मी, शिवसेनाप्रमुखांनी गाजवलेली मैदानं शोधत होतो. मुंबईतलं शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थ सिनेमात आहे. पण संभाजीनगरमधलं मराठवाडा सांस्कृतिक मैदान यात नाही. याच मैदानात 1988 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पहिली सभा घेतली. आणि तिथून  शिवसेना मराठवाड्यात झपाट्यानं आणि जोमानं वाढली. संभाजीनगर हे माझं आवडतं शहर, असा उल्लेख शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे करायचे. पण या सिनेमात मराठवाडा सांस्कृतिक मैदान दिसलंच नाही. 

सिनेमात औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव दिल्याचा उल्लेख 1994 सालातला दाखवण्यात आलाय. पण तो चुकीचा आहे. 1988 मध्येच शिवसेनाप्रुखांनी औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलं होतं.
नाशिकमधल्या गोल्फ क्लब मैदानावर शिवसेनेचं 1994 मध्ये अधिवेशन झालं होतं. शिवसेनेला सत्तेत आणण्यात त्या अधिवेशनाचा मोठा वाटा होता. पण सिनेमात ना गोल्फ क्लब दिसलं ना त्या वेळचं अधिवेशन.
मैदानातले ठाकरे शोधत ठाकरे सिनेमा पाहिला. अर्थात शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे हे अडीच तासांच्या सिनेमात दाखवणं तसं अशक्यच. पण हे शिवधनुष्य पेलण्यात संजय राऊत आणि अभिजित पानसे यशस्वी झाले.
माझ्या लहानपणी पाहिलेले आक्रमक, सावळे आणि दाढी ठेवणारे शिवसैनिक सिनेमात दिसले. शिवसेनेच्या पाटीवर जसा आक्रमक वाघ असतो अगदी तसेच शिवसैनिक या सिनेमात घेण्यात आले. शिवसेनाप्रुखांचा आक्रमकपणा, विनोदीपणा आणि हजरजबाबीपणा या सिनेमात पाहायला मिळाला.
नागपूरच्या विमानतळावर हल्ला करण्यासाठी आलेल्यांना निडरपणे सामारे जाणारे शिवसेनाप्रमुख पाहताना अंगावर रोमांच उभं राहिलं. तर समुद्राकडे धाव घेणा-या चिमुरडीच्या आईला, मुलीला पोहायला शिकवलं का ? असं विचारताना शिवसेनाप्रमुखांचा मिश्किलपणा पुन्हा आठवला. दंगल, आणीबाणी, बॉम्बस्फोट हे सर्व प्रसंग सिनेमात पाहताना, प्रत्यक्ष पाहत असल्याचा भास होतो.
दत्ताजी नलावडे, सुधीर जोशी, मनोहर जोशी पडद्यावर पाहायला मिळाले. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक ही मंडळी जर शिवसेनेत असती तर त्यांनाही पडद्यावर मोठं स्थान मिळालं असतं. आणि अजून एक भुजबळ, राणे यांची आता जी अवस्था झालेली आहे, ती अवस्था ते जर शिवसेनेत असते तर झाली नसती. हा सुद्धा 'ठाकरे' महिमा म्हणायला हवा. #संगो