Saturday, February 16, 2019

शहिदांच्या ज्वाला, देशात अंगार


देशभरात  नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर कित्येकांचे डोळे पाणावले. देशासारखीच स्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या मातीतले मलकापूरचे वीर जवान संजय राजपूत यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं. लोणार तालुक्यातल्या चोरपांगरा गावातले शहीद नितीन राठोड यांनी हौतात्म्य पत्कारलं. 
शहीद जवान नितीन राठोड यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या विविध ठिकाणाहून नागरिकांनी गर्दी केली. शहीद जवान नितीन राठोड अमर रहे असा जयघोष सुरू होता. भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या. तर पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देऊन नागरिक त्यांचा संताप व्यक्त करत होते. सरणा-या दिवसाबरोबर गर्दी वाढत होती. मिळेल त्या ठिकाणी नागरिक दाटीवाटीनं उभे होते. अखेर अंत्यसंस्काराची वेळ जवळ आली. बंदुकीच्या फैरी झाडून शहीद नितीन राठोड यांना मानवंदना देण्यात आली. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीद नितीन राठोड यांनी जिथे जन्म घेतल्या त्या गावातल्या मातीत त्यांना अग्नि देण्यात देण्यात आला. धगधगत्या ज्वालांमध्ये भारत मातेचा पूत्र देशाच्या मातीचा सन्मान राखण्यासाठी त्याच मातीत मिसळून गेला. 
ज्या गावात, ज्या घरात शहीद संजय राजपूत हे लहानाचे मोठे झाले तिथला प्रत्येक माणूस रडला. ज्या घरात संजय राजपूत मोठे झाले, त्या घरावर शोककळा पसरली होती. त्यांचे सर्व कुटुंबीय शोकसागरात बुडाले.  राजपूत कुटुंबीयाची जी भावना आहे, तीच भावना सध्या सर्व देशवासीयांची सर्वांना हवाय तो फक्त बदला.
मलकापूरमध्ये संजय राजपूत यांचं पार्थिव पोहोचल्यावर नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा  देण्यात आल्या.  भल्या मोठ्या मैदानात शहीद संजय राजपूत यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आलं. पण हे भलंमोठं मैदानही गर्दीसमोर तोकडं पडलं. अखेरचा सलाम देण्यासाठी जागा मिळेल तिथे नागरिक उभे होते. मैदानात आणि घरांच्या गच्चीवर नागरिक उभे होते. झाडांवर चढून शहिदाच्या निरोपाचा हा क्षण डोळयात साठवण्यासाठी अनेकांची धडपड सरू होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात अंगार पेटला होता. अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी रांग लावण्यात आली. फुलं, पुष्पचक्र हे अश्रूंमध्ये भिजवून वाहिले जात होते. शहिदाच्या शवपेटीला अखेरचा हात लागावा यासाठी उपस्थितांची धडपड सुरू होती. देशाचा सुपूत्र त्याचं कर्तव्य बजावून पुढच्या प्रवासासाठी निघाला. यावेळी आपला हात तरी शहिदाच्या शवपेटीला लागावा हीच भावना प्रत्येकाच्या मनात होती.  जय आणि शुभम ही संजय राजपूत यांची दोन मुलं. शहीद पित्यावर अंत्यसंस्काराचे विधी या लहान वयात करण्याची वेळ नियतीनं आणली. हे दृश्य पाहून सर्व उपस्थित हेलावले.  बंदुकीच्या फैरी झाडून शहीद संजय राजपूत यांना सलामी देण्यात आली. बुंदकीतून फैरी झाडल्या जात होत्या याचवेळी नागरिकांमधूनही सातत्यानं घोषणाबाजी सुरूच होती.  भारत माता की जय आणि संजय राजपूत अमर रहे, असा जयघोष सुरू होता. भारतमातेसाठी बॉम्बच्या ज्वाळात शहीद झालेल्या या सुपूत्राचा धगधगत्या ज्वालांमध्ये अंत्यसंस्कार सुरू झाला. सरणात जशा ज्वाला भडकल्या तशाच ज्वाला इथं उपस्थित असलेल्यांच्या मनात भडकल्या होत्या. 
या ज्वालांनी शहीद संजय राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पण देशातल्या नागरिकांच्या मनात भडकलेल्या ज्वाला लवकर शांत होणार नाहीत.  जो पर्यंत या शहिदांचे मारेकरी, दहशतवाद्यांना आसरा देणारे गद्दार आणि दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान या सर्वांचा हिशेब होत नाही, तोपर्यंत देशाच्या नागरिकांच्या मनात असलेला हा बदल्याचा अग्निही शांत होणार नाही.

No comments:

Post a Comment