Saturday, January 7, 2017

बालपण आणि शालेय जीवन !

प्रिय वाचकांनो २०१७ मधला हा पहिला ब्लॉग. बालपणीच्या आणि शालेय जीवनातल्या आठवणींचा माझ्या मनात असलेला ठेवा लिखित स्वरूपात मांडण्याचा हा प्रयत्न. अर्थात सगळं काही आठवत नाही. पण थोडं-थोडं इथं मांडणार आहे.
११ जून १९७७ ही माझी जन्म तारीख. माझे वडील तेव्हा कृषी विद्यापीठ परभणी येथे नोकरी करत होते. माझ्या जन्मानंतर वडिलांची संभाजीनगरला (तेव्हाचं औरंगाबाद. अजून कोर्टात केस सुरू आहे.) बदली झाली. हा माझा पायगुणही म्हणता येईल. संभाजीनगरला पैठण रोडला असलेल्या कृषी विद्यालयाच्या सरकारी निवासस्थानांमध्ये मी एक-एक पाऊल पुढे टाकलं. अगदी शहरात असलेला हा कृषी विद्यालयाचा परिसर अजूनही निसर्गरम्य असाच आहे. बहुतेक तीन वर्षांचा असताना मला जागृती प्राथमिक शाळेत टाकण्यात आलं. मी आणि माझ्याबरोबर संभाजी शिरसाट आम्हा दोघांना कृषी विद्यालयात लेबर म्हणून असलेले काका सायकलवर शाळेत सोडायचे. फार जास्त काही आठवत नाही, पण माझा बालवाडीत पहिला नंबर आला असं आई अजूनही सांगते. कुलकर्णी आडनावाच्या शिक्षिकेने हे आईला सांगितलं होतं. पण नंतर हा नंबर मला मिळवता आला नाही. बहुतेक नंबर आणि ज्ञानाचा संबंध नसतो, हे मला तेव्हाच कळालं असावं.
कृषी विद्यालयाच्या सरकारी निवासस्थानांमध्ये लहानपणीचे माझे मित्र संभाजी, धनंजय, सुशील, शरद अजूनही संपर्कात आहोत. लक्ष्मीकांत जाधव आणि मी तर साडूभाऊ झालो. कृषी विद्यालयाच्या परिसरातल्या शेतातून भरपूर फिरलो. दांडाच्या पाण्यातही खेळलो. संध्याकाळी वडील आणि त्यांचे मित्र फिरायला निघायचे. तेव्हा आम्ही सगळी मुलं पेढे, केळी, जिलेबी, द्राक्ष असं जेवढं काही आठवेल तेवढं आणायला सांगायचो.
 मी दुसरीत  असताना असताना माझा लहाना भाऊ बालवाडीत होता. पावसाळ्याचे दिवस असल्यानं आम्हाला घ्यायला येणारे काका वेळेत आले नव्हते. तो पर्यंत हा लहाना पठ्ठ्या शाळेपासून तब्बल तीन किलोमीटर चालत घरी गेला. मी शाळेतच थांबलेलो.  रवींद्र घरी गेल्यावर आईने विचारले भाऊ (मला माझा लहानाभाऊ, बहीण लहानपणापासूनच भाऊ म्हणतात.) कुठे आहे ? रवींद्रने उत्तर दिलं, तो हॉटेलमध्ये चहा पितोय. मग वडिलांनी सायकल दामटली. मी शाळेतच होतो. शाळेतल्या हरणाबाई वडील येईपर्यंत थांबून राहिल्या होत्या. मग घरी गेल्यानंतर बहुतेक रवींद्रची धुलाई झाली होती. 
तिसरीत असताना वडिलांची कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पात बदली झाली. त्यामुळे सरकारी निवासस्थान सोडावं लागलं. त्यानंतर आम्ही राहायला गेलो पदमपु-यात. तिथे कुमावत समाजाची मोठी वस्ती होती. त्यामुळे मी तिसरीतच हिंदी बोलायचा शिकलो. वडिलांचे मित्र शिरसाट काका हे ही पदमपु-यात राहायला आले होते. त्यामुळे संभाजी त्याचा भाऊ मंगेश आम्ही पुन्हा एकत्र आलो. तिथेही आम्हाला बरेच मित्र मिळाले. पदमपु-यात बहुतेक श्री नावाचं एक मंगल कार्यालय होतं. तिथं कोणाचंही लग्न असलं तरी ब-याचवेळा आम्ही जेवायला जायचो. संक्रांतींच्या वेळेस या भागात पतंग मोठ्या प्रमाणात उडवले जायचे. कटलेला पतंग पकडणे, फुलपाखरू पकडणे यात आमचा बराच वेळ जायचा.
पाचवीत मला पदमपु-यातल्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये टाकलं. पाचवी ते सातवी पर्यंत मी शाळेत होतो. तिथे मला संजय पंढरे, सोमनाथ पंढरे आणि संतोष पंढरे हे माझे जिगरी मित्र.  सहावीत असताना आम्ही नक्षत्रवाडीला राहायला गेलो. तिथे तर फुल धमाल. क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर जागा. बाजूला शेतं. क्रिकेट खेळायचं शेतात जाऊन पेरू खायचे, पाणी प्यायचं पुन्हा क्रिकेट खेळायचं. आता नक्षत्रवाडीतही शेतं राहिली नाहीत. जिथं आम्ही खेळायचो तिथं टाऊनशिप झाल्या आहेत. नक्षत्रवाडीत सर्व मध्यमवर्गीय वस्ती. तिथं खूप मित्र मिळाले. सुधीर निकम, राजू शिंदे, रिंकू त्रिवेदी, अशोक गायकवाड, गजू लंबे, गोकूळ गायकवाड आणि अजूनही भरपूर मित्र परिवार. संभाजीनगरला गेल्यावर सर्वांना आजही आवर्जून भेटतोच. सातवीत असताना आमची मुंबईला सहल गेली होती. तिथं मी आणि दिनेश कुंडलवाल सहलीची बस उभी असताना रोड ओलांडून कपडे घेण्यासाठी गेलो. आमचे शिक्षक तेव्हा बसमध्ये नव्हते. आम्ही पुन्हा रोड ओलांडून बसकडे यायला आणि मगरे सर येण्याचा टायमिंग साधला गेला. मुंबईत भररस्त्यात मगरे सरांनी मला आणि दिनेशला चोप दिला होता. आता मागील नऊ वर्षांपासून मुंबईत राहतो. पण रस्ता ओलांडताना मगरे सरांचा आजही भास होतो. याच शाळेत चित्रकलेला पाटील सर होते. ते इतके जोक करायचे की, सगळा वर्ग हसत राहायचा.
आठवीत माझी पुन्हा शाळा बदलली. औरंगपु-यातल्या आनंद कृष्ण वाघमारे शाळेत मला टाकण्यात आलं. त्याच शाळेत रवींद्रनं सहावीत प्रवेश घेतला. तर आमची लहानी बहिण कविताला शारदा मंदिरमध्ये चौथ्या वर्गात प्रवेश मिळाला. मी, रवींद्र आणि सर्व मित्रमंडळी सकाळी सिटी बसने शाळेत निघायचो. तेव्हा स्कूल बस सारखं शाळांचं व्यापारीकरण झालेलं नव्हतं. आमच्या सगळ्यांचे पास होते. बसमध्ये जर कोणी चुकून पुस्तक काढून वाचायला बसलं तर त्याला अभ्यासू म्हणून चिडवायचे. त्यामुळे पुस्तक वाचण्याच्या भानगडीत कोणी पडायचं नाही. नक्षत्रवाडीच्या पुढचा स्टॉप होता, कांचननगर. हा जर उच्च मध्यमवर्गीय लोकांचा एरिया होता. इथली मंडळी पुस्तकात डोकं घालणारी होती. मुली जरा जास्तच दीड शहाण्या होत्या. अर्थात थोडं ब्राह्मणी कल्चरही होतं त्यांचं. ते बसमध्ये पुढे बसायचे. मग आम्ही एक आयडिया करायचो. आम्ही सर्व मुलं पहिल्याच स्टॉपला सर्व विंडो बळकवून टाकायचो. मग त्यांना झक मारत आमच्या शेजारी बसावं लागायचं.
इथून हळूहळू जातींची माहिती मिळायला लागली होती. कारण आधीची महात्मा फुले हायस्कूल आणि आताची आनंद कृष्ण वाघमारे प्रशाला यात मोठं अंतर होतं. वाघमारे प्रशालेचं वातावरण ब्राह्मणी असल्यानं मला लवकर जुळवून घेता आलं नाही. आधीचीच महात्मा फुले हायस्कूल मला जास्त आठवायची.
पण नंतर हळूहळू रूळलो. आठवीत असताना मला रेडिओवर विविधभारती ऐकण्याची सवय लागली होती. मग वडिलांनी माझ्या वर्गशिक्षिका सराफ मॅडम यांच्याकडे तक्रार केली. सराफ मॅडमने भर वर्गात माझा असा काही कान पिरगळला की, विविधभारतीवर गाणं ऐकणंच बंद झालं. सराफ मॅडम भूगोल आणि हिंदी शिकवायच्या. पृथ्वीचा आकार गोल नसून जिऑईड आहे, हे माझ्या आजही लक्षात आहे. आठवीत मेरा प्रिय नेता या विषयावर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर निबंध लिहला होता. सराफ मॅडम शाळेतल्या कोणत्याच विद्यार्थ्याला हातात घड्याळ घालू द्यायच्या नाही. त्या सवयीचा असा परिणाम झाला की, मी आजही हातात घड्याळ घालत नाही.
शिक्षा करण्यात मुख्याध्यापक सौंदनकर सर आघाडीवर असायचे. ते बाजूला उभं राहून असा काही चिमटा काढायचे की, अजून ती कळ आठवते. विद्यार्थ्यांमध्ये माने सरही लोकप्रिय होते. ज्या वर्गातून विद्यार्थ्यांचा जास्त आवाज यायचा त्या वर्गात माने सर आहेत, हे लक्षात यायचं. प्रशालेतल्या सर्वात विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणजे वादे मॅडम. त्यांचा तास असल्यावर वर्गात उल्हासाचं वातावरण असायचं.
याच काळात बहुतेक सर्वच मुलं (एकतर्फी) प्रेमात पडायचे. कधी-कधी तर दोघे जण एका मुलीच्या प्रेमात पडायचे. तिच्यावरून मारामा-याही व्हायच्या. पण त्या बिचारीला आपल्या प्रेमावरून काय लढाई सुरू आहे, याची माहितीही नसायची. जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील, जाधव या आडनावाच्या मुलींवरच सर्वात जास्त एकतर्फी प्रेम केलं जात असावं, असा माझा तेव्हाचा अंदाज होता. सध्या काय परिस्थिती आहे, याची मला माहिती नाही.
गुलमंडीवर गेल्यावर वडील हमखासपणे उत्तम मिठाई भांडारमधली इम्रती खाऊ घालायचे. आजही गुलमंडीवर गेल्यावर इम्रती खाल्ल्याशिवाय पाय निघत नाही. शहरातली स्टेट आणि मोहन थिएटर वेगळ्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध होती. तिथून कधी गेल्यावर थिएटरवरच्या पोस्टरकडे मान फिरायचीच. अजून एक गंमत म्हणजे, त्या थिएटरमधून बाहेर पडणारे माना खाली घालून तर रस्त्यावरील लोक थिएटरकडे मान फिरवून चालायचे.
वाघमारे प्रशालेमध्ये माझा सर्वात जिगरी मित्र नितीन बिडवे. निलेश राजपूत, पप्पू त्रिवेदी, अनिल पाका, शैलेंद्र खडके यांच्याशी जरा जास्त सलगी होती. एकदा शाळेच्या सहलीत बसमधून परतीच्या प्रवासात आम्ही सर्वांच्या बुटाच्या लेस रात्रीच्या अंधारात अशा काही अडकवल्या होत्या की, सकाळी सगळेच धडपडले होते.
आठवीत मी हिंदी घेतल्यानं मला ब वर्ग मिळाला होता. तर रवींद्रने संस्कृत घेतल्यामुळे त्याला अ वर्ग मिळाला होता. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांमध्ये रवींद्र चांगलंच नाव कमवत होता. त्यामुळे त्याला शाळेत रोज सकाळी पेपरमधील हेडलाईन्स वाचायला लावायचे. कोणत्याही वक्तृत्व स्पर्धेत जाण्याअगोदर रवींद्रला आमच्या ब वर्गात सरावासाठी आणलं जायचं. मात्र माझे वर्गमित्र असा काही गोंधळ घालायचे की, भाषण करणं अवघड होऊन जायचं.
शाळेत असताना दूरदर्शन हेच एकमेव मनोरंजनाचं साधन होतं. त्यामुळे चित्रहार, छायगीत आणि रंगोली एकदम लोकप्रिय. त्यात दाखवलेलीच गाणी दुस-या दिवशी सगळे गुणगुणायचे. त्या काळात गणेशोत्सवात गणेश मंडळं व्हिडीओवर चित्रपट दाखवले जायचे. आम्ही ते सर्व चित्रपट बघायचो.

दहावीत असताना ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली गेली. त्यावेळी आम्ही शाळेत होते. शहरात दंगल उसळली. शाळा लवकर सोडण्यात आली. तणावाच्या वातावरणात घराकडे निघालो. भीती म्हणजे काय असते, याचा भीषण अनुभव घेत होतो. सर्वांचेच पालक चिंतेत होते. घरी गेल्यानंतर आईने आम्हाला कवटाळलंच. सहावी-सातवीपासून जात कळायला लागली होती. मात्र या दंगलीमुळे धर्मही कळायला लागला. १९९३च्या मार्च महिन्यात दहावीची परिक्षा झाली. त्या आधी मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते. शालेय जीवन संपतानाच दहशतवादाची सुरूवातही बघायला मिळाली. शालेय जीवनाचा शेवट झाला, पण या दहशतवादाचा शेवट होईल का ?

6 comments:

 1. नेहरू, गांधी, फुले,अंबेडकर जयंतीला शाळेतली मुलं रावीदादा कडून भाषणं लिहून घ्यायची हे पण आठवतं मला :)

  ReplyDelete
 2. Very nice storng and sweet memory .

  ReplyDelete
 3. चांगलं लिहिलंय गारू

  ReplyDelete
 4. खूपच छान लिखा३ण केले आहे. नाईस वन

  ReplyDelete
 5. व्वा संतोष..त्यावेळचं सगळं वातावरण आणि तुझ्या मनावर कोरलेले क्षण आमच्यापर्यंत पोहोचवलेस. ते दिवस पुन्हा येणे नाही...सागर गोखले

  ReplyDelete