Friday, October 23, 2020

सत्ता आणि निष्ठा

 

एकनाथ खडसे यांनी कमळाचं फूल बाजूला सारत अखेर हातावर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बांधलंच. कोणत्याही नेत्याच्या पक्षांतराच्या वेळी समुद्राच्या भरती ओहोटीची आठवण येते. कारण निसर्गाचा हा नियम राजकारणालाही लागू पडतो. ज्या भाजपमध्ये सहा वर्षांपूर्वी सर्वपक्षीय भरती सुरू होती, त्याच भाजपमधून आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे बाहेर पडले. अर्थात राजकारणात पक्षांतर करणं काही नवी गोष्ट नाही. या आधीही अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत. शिवसेनेनं मुख्यमंत्री केलेले नारायण राणे यांच्यावरही पक्ष बदलण्याची वेळ आली. (त्यांनी तर दोनदा पक्ष बदलला, स्वत:चाच पक्ष काढून विसर्जितही केला ही बाब वेगळी.) छगन भुजबळ, गणेश नाईक अशा अनेक नेत्यांनी दोनदा पक्ष बदलले. जुन्या पक्षात गोची होत असेल, पंख छाटले जात असतील किंवा नव्या पक्षात मोठी संधी मिळत असेल तर पक्षांतर करण्यात चूक तरी काय ? अर्थात चूक काहीच नाही. त्यामुळे 2014च्या विधानसभा निवडणुकी आधी विखे, मोहिते, मधुकरराव पिचड, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील असे अनेक बडे नेते भाजपच्या छावणीत दाखल झाले. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासारख्या बाहेरून आलेल्यांचा भाजपमध्ये उत्कर्ष सुरू झाला. 

एकनाथ खडसे तर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र 2014 मध्ये खडसेंचे ज्युनिअर असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. पक्ष वाढवण्यासाठी ज्या नेत्यांनी हयात घालवली त्यात एकनाथ खडसेंचं नाव आघाडीवर होतं. मात्र मुख्यमंत्रीपदी डावलण्यात आल्यानं त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ही नाराजी भाजपच्या नेतृत्वाला आवडली नाही. मोदी-शाह यांच्या नव्या भाजपमध्ये वाजपेयी, अडवाणी, मुंडे, महाजन यांच्या बरोबर काम करणाऱ्या खडसेंचा पडता काळ सुरू झाला. खडसेंना महसूलमंत्री करण्यात आलं. मात्र भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणावरून 4 जून 2016 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. अनेक मंत्र्यांना क्लीनचिट मिळत असताना खडसेंना मात्र बाजूला सारण्यात आलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर खडसेंना तिकीटही नाकारण्यात आलं. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांचाही पत्ता कापण्यात आला. पंकजा मुंडेंना तिकीट मिळालं, मात्र त्यांचा पराभव झाला. अर्थात मधल्या काळात एकनाथ खडसेंनी अनेकदा त्यांची नाराजी व्यक्त केली. 'नानासाहेब फडणवीस बारभाई कारस्थान' हे पुस्तक लिहूणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. पक्ष सोडत असताना त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच त्यांनी टीका केली.

आघाडीचं सरकार असताना विरोधी पक्षनेते असलेल्या एकनाथ खडसेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला होता. खडसेंचा तिखट हल्ला राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर, एकनाथ खडसेंवर तोडपाणीचा आरोप केला होता. ज्या खडसेंवर तोडपाणीचे आरोप केले होते, तेच खडसे आता राष्ट्रवादीत आले आहेत. राजकारणात अशा अनेक घटना घडतात. सिंचन घोटाळ्यावरून भाजपनं अजित पवारांवर टीका केली होती. त्यांना तुरूंगात टाकू असंही निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं गेलं. मात्र त्याच अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली.


नारायण राणे आणि नितेश राणे यांनीही काँग्रेसमध्ये असताना भाजप-शिवसेनेच्या सरकारवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंचा राजकीय बळी घेतल्याचं ट्विट नारायण राणेंनी केलं होतं. बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


राणेंचे पुत्र नितेश राणे यांनीही काँग्रेसमध्ये असताना भाजपवर टीका केली होती. मराठा आरक्षण आणि बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण दिल्याच्या मुद्यावरून त्यांनी प्रचंड थयथयाट केला होता. बाबासाहेब पुरंदरेंबद्दल अपमानास्पद वक्तव्य केली होती. संभाजी भिडेंचा एकेरी उल्लेख केला होता. पुण्यातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणा-यास 5 लाख रुपये रोख देऊन जंगी सत्कार करु अशी वादग्रस्त घोषणाही नितेश राणेंनी केली होती. मात्र आता ज्यांच्यावर बहुजन नेतृत्वाला टार्गेट केल्याचा आरोप केला त्याच भाजपमध्ये राणेंनी मुक्काम ठोकला आहे.

राजकारणात आता निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते कमी होत चालले आहेत. प्रत्येकाला आपला उत्कर्ष साधायचा आहे. त्यासाठी सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश करायचा आणि हेतू साधायचा हा सरळ हिशेब आहे. भाजप सत्तेत होती तेव्हा नेत्यांनी भाजपची वाट धरली. आता महाविकास आघाडी सत्तेत असल्यानं नेत्यांची पाऊलं इकडे वळू लागली आहेत. #संगो #bjp #eknathkhadse