Sunday, December 31, 2023

एकाची एन्ट्री अन् दोन बाजीगर

 

2023 या मावळत्या वर्षात मनोज जरांगे-पाटील हे नवं नेतृत्व समोर आलं आहे. उपोषणकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील हिरो झालं. ज्या कुणी लाठीचार्जचा आदेश दिला त्याचे तर जरांगे पाटलांनी आभार मानायला हवे. गोळीबार झाल्याचा दावाही आंदोलकांकडून करण्यात आला होता. एकंदरीतच लाठीचार्जच्या घटनेनंतर मनोज जरांगे-पाटील यांचं नेतृत्व इतर कोणत्याही मराठा नेत्यांपेक्षा मोठं झालं आहे. राज्यातील सर्वपक्षीय मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यापुढे खुजे ठरल्याचं पाहायला मिळत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण हे आणि असे अनेक मराठा नेते जरांगे पाटील यांच्या लोकप्रियतेशी तुलना करू शकत नाहीत, यात शंकाच नाही.


बड्या नेत्यांना घेता येणार नाहीत अशा लाखांच्या सभा मनोज जरांगे-पाटलांनी घेतल्या. शंभर एकरच्या मैदानात भरगच्च झालेली गर्दी, असा करिश्मा मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवला आहे. राज्यभरात कुठेही सभा घेतली तरी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचं कसब मनोज जरांगे-पाटील यांनी दाखवून दिलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. सरकारला मराठा आरक्षणासाठी तातडीनं कार्यवाही करण्याची वेळ आली. एकंदरीतच राज्याच्या राजकारणात नवा नेता म्हणून मनोज जरांगे पाटलांची एन्ट्री झाली.

दुसरीकडे अजित पवार सरत्या वर्षातील खरे बाजीगर ठरले. शिवसेना-भाजपनं 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करून अजित पवार यांची प्रतिमा मलिन केली होती. पण त्याच अजित पवारांसोबत शिवसेनेनं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. मविआचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवार हे एकनाथ शिंदें आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसले. अजित पवारांच्या घोटाळ्याचे पुरावे भाजपच्या नेत्यांनी दिले होते. सिंचन घोटाळ्यांची बैलगाडीभर कागदपत्रे भाजपने चितळे समितीचे माधवराव चितळे यांच्याकडे सादर केले होते. सिंचन घोटाळा संदर्भातील सुमारे 14 हजार पानाचे पुरावे 4 बॅगा भरून बैलगाडीवरून नेण्यात आले होते. संभाजीनगरमधील वाल्मीत चितळे समितीला हे पुरावे देण्यात आले होते. ज्यांनी बैलगाडीभर पुरावे दिले त्याच भाजप नेत्यांना अजित पवारांना आपल्या सत्तेच्या गाडीत घेण्याची वेळ आली.  

अजित पवार निधी देत नाहीत, शिवसेना संपवत आहेत असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केला होता. त्याच शिवसेना शिंदे गटासोबतही अजित पवार टेचात सरकारमध्ये सहभागी झाले. दुसरा एखादा नेता असता तर कोलमडून गेला असता. पण अजित पवारांनी ज्यांनी टीका केली, त्यांच्यावरच सोबत नेण्याची वेळ आणली. हरलेली बाजी जिंकत अजित पवार बाजीगर ठरले.

तर दुसरीकडे छगन भुजबळ महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळ्या प्रकरणी अडीच वर्ष जेलमध्ये राहिले होते. तेलगी घोटाळ्यातही भुजबळांचं नाव आलं होतं. वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी केली होती. मुंबईतल्या सांताक्रूझ मधील फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या सर्व घोटाळ्याच्या आरोपांमुळे आणि जेलवारीमुळे छगन भुजबळ बदनाम झाले होते. पण मविआच्या काळात त्यांना पावन करून सरकारमध्ये मंत्री करण्यात आलं. त्यानंतर महा्युतीच्या सरकारमध्येही छगन भुजबळ मंत्री झाले. ज्यांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्याच सोबत छगन भुजबळ बसले. इतकंच नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळांनाच बळ देण्याचं काम सरकारला करावं लागलं, अशी चर्चा आहे. एकंदरीतच जेलवारी, घोटाळ्यांचे आरोप यावर मात करत छगन भुजबळ दुसरे बाजीगर ठरले.

राजकारणात कोणताच पराभव हा शेवटचा नसतो असं म्हटलं जातं. त्या सोबत आता असं म्हणावं लागेल की, कोणताही घोटाळा आणि जेलवारीमुळे राजकीय नेत्याचा शेवट होत नसतो. सरत्या वर्षानं हा दिलेला धडा आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. #संगो

Friday, June 30, 2023

'रिमझिम' आणि 'आरडी'

 

मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाल्यावर 'रिमझिम गिरे सावन' हे गाणं आपसूकच ओठांवर येतं. आणि याच पावसाळ्यात या गाण्याचे संगीतकार आर.डी. बर्मन यांचा जन्मदिवस. 27 जून हा आर. डी. बर्मन यांचा जन्मदिवस. पावसाळ्यात जन्मदिन असणाऱ्या या संगीतकाराचं चिंब पावसानं भरलेलं आणि मुंबईचं  सौंदर्य खुलवणारं रिमझिम गिरे सावन हे गाणं म्हणजे मास्टरपीसच. पंचमदांनी दिलेल्या सुमधूर संगीतानं ओथंबलेलं हे गाणं पावसात चिंब झालेल्या कोट्यवधी प्रेमिकांच्या मनात नेहमीच गुंजत असतं.  संगीतकार राहुल देव बर्मन हे आर.डी. बर्मन या नावानं सर्वांनाच माहित आहेत. आणि त्यांच्या जादुई संगीतामुळे त्यांना पंचमदा असंही म्हटलं जातं. पंचमदांच्या संगीताच्या जोरावर अनेक सिनेमे सुपरहिट झाले. काळाच्या पुढे असलेल्या या संगीतकाराच्या संगीताची जादू आजही कायम आहे. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरूणाईच्या ओठांवर असलेल्या गाण्याच्या भावना पंचमदांनी त्यांच्या संगीताच्या जादूनं प्रेममय करून टाकल्या. जब हम जवां होंगे, हे गाणं त्याची साक्ष देतं. 

थिरकवणाऱ्या संगीताचा साज देतानाच प्रेमिकांच्या मनाचा आवाजही आर.डी. बर्मन यांनी ओळखला. आणि प्रेमिकेच्या सौंदर्याची तारीफ करणाऱ्या गाण्याला अप्रतिम संगीताची साथ दिली. आर.डी. बर्मन यांच्या संगीताचं गारूड अनेक वर्षांनंतरही कायमच आहे. उलट जितके आर.डी. ऐकावे तितकंच त्यांचं संगीत अविट होत जातं. थिरकवणारं संगीत, प्रेमात पडलेल्यांना आवडणारं संगीत देणाऱ्या आर.डी. बर्मन यांनी गंभीर पठडीतल्या गाण्यांनाही साज चढवला. याचं उदाहरण म्हणजे, 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' हे गाणं आहे.

सिनेसृ्ष्टीत किती तरी संगीतकार आले आणि गेले. मात्र काळाच्या अतित असं संगीत देण्याची जादू केली ती फक्त आर.डी. बर्मन यांनी. त्यामुळेच पंचमदांचं संगीत बेभान करतं, तुम्हाला धुंद करतं आणि कायम तुमच्या ओठांवर राहतं. इतकंच नव्हे या पिढीतल्या संगीतकारांनाही पंचमदांचा संगीत खुणावतं. पंचमदांच्या गाण्यांचं रिमिक्स मोठ्या प्रमाणात करण्याचा मोह संगीतकारांना होतो. एकंदरीतच रिमिक्सच्या या जमान्यातही फिक्स असलेले एकमेव संगीतर आर. डी. बर्मनच आहेत आणि भविष्यातही राहतील यात शंकाच नाही. आर. डी. बर्मन म्हणजे बॉलिवूडला झिंग देणारा संगीतकार.  आर. डी. बर्मन पंचमदा या नावानंही ओळखले जातात. त्यांनी संगीत दिलेल्या शोले सिनेमातलं सर्वच  गाणी गाजली. मात्र असं संगीत पुन्हा होणं अशक्यच. 

आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि त्याला किशोरकुमारचा आवाज हे कॉम्बिनेशन म्हणजे सुपरहिटचा फॉर्म्युलाच. आणि हा फॉर्म्युला दोन सुपरस्टारसाठी लकी ठरला. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठीही पंचमदांचं संगीत, किशोरकुमारांचा स्वरसाज जादूई ठरला.  त्यामुळेच बेमिसाल सिनेमातली गाणी प्रचंड गाजली. काश्मीरचं सौंदर्य, किशोरकुमारांचा आवाज आणि आर.डी. बर्मन यांच्या संगीतानं 'कितनी खूब सुरत ये तस्बीर हैं' या गाण्याचं चित्र प्रत्येकाच्या मनात कायमचंच ठसलं. आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि त्याला आशा भोसलेंचा स्वर असेल तर ते गाणं कायमचंच रसिकांच्या हृदयात कोरलं जातं. 'दो लफ्जों की', हे गाणं रसिकांच्या मनात कायमचंच घर करून राहिलं आहे.

मागील सात दशकातील कोणताही सिनेमा पाहा आणि त्यातली गाणी ऐका. प्रत्येक सुपरहिट सिनेमातल्या गाण्यांना संगीत फक्त आर. डी. बर्मन यांचंच आहे. त्यातले काही सिनेमे तर फक्त आर.डी. बर्मन यांच्या जादुई संगीतामुळे हिट झालेत. आर. डी. बर्मन यांच्या संगीताच्या तालावर बॉलिवूडेच सुपरस्टार ठेका धरत सिनेमा सुपरहिट करून गेले. त्या सिनेमांच्या यादी पाहायची झाली तर ती खूप मोठी आहे. त्यामुळे त्यातल्या मोजक्याच सिनेमांची ही नावं पाहा.शोले, शान, दिवार, शक्ती,  द ग्रेट गॅम्बलर, सत्ते पे सत्ता, बॉम्बे टू गोवा,  अजनबी, कटि पतंग,  अमर प्रेम, आप की कसम,  मेरे जीवन साथी,  बहारों के सपने,   तीसरी मंजिल,  घर,  द ट्रेन,  आंधी, परिचय, अनामिका,  आंधी,  पडोसन, हम किसी से कम नहीं,  रामपूर का लक्ष्मण,  गोलमाल,  यादों की बारात, मासूम, सागर,  रॉकी,  लव्ह स्टोरी,  1942 अ लव्ह स्टोरी. ही नावं पाहूनच या सिनेमातली गाणी का हिट ठरली हे लक्षात येतं. कारण त्या सिनेमातल्या गाण्यांमध्ये संगीत नव्हे तर त्यात प्राण ओतण्याचं काम पंचमदांनी केलं होतं. पंचमदांनी तयार केलेली धून अवर्णनीय अशीच असायची. त्यांनी संगीत दिलेली गाणी अनेक गायक-गायिकांनी गायली. मात्र आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर असेल तर गाणं सुपरहिट होणारच यात कोणतीही शंकाच नव्हती. मात्र आशाताईं प्रमाणेच  आर.डी. बर्मन यांच्या संगीताचा साज स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जादूई आवाजालाही तितकाच परिसस्पर्श देणारा ठरला. 

थिरकायला लावणारं संगीत ही आर.डी. बर्मन यांच्या संगीताची जादू. हा संगीतकार काळाच्या खूप पुढे होता. त्यामुळेच की काय पंचमदा कधीही आऊटडेटेड होत नाहीत. म्हणूनच प्रत्येक पिढी जेव्हा प्रेमात पडते तेव्हा त्यांच्या सूराला संगीत देण्याचं काम पंचमदा करत असतात. हिंदी सिनेसृष्टीच्या संगीताला वेगळा टच देण्याचं काम आर.डी. बर्मन यांनी केलं. त्यांच्या संगीतावर आतापर्यंत पाच पिढ्या मंत्रमुग्ध झाल्या. आताच्या तरूण पिढीतही त्यांचीच गाणी जास्त प्रमाणात रिमिक्स केली जातात. तरूणाई कोणत्याही काळातली असो त्यांना थिरकवणारं संगीत हे फक्त पंचमदा यांचंच असतं. थिरकवणारं संगीत देणाऱ्या पंचमदा यांनी आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या गीतांनाही साज चढवला. आणि त्यामुळेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आर. डी. बर्मन यांनी दिलेलं संगीत प्रत्येकाच्या कानात गुंजत राहतं. पंचमदा जितके ऐकावेत तितकं त्यांचं संगीत अजून ऐकावं, असंच वाटत राहतं. #संगो

Saturday, February 18, 2023

शिवसेना : बाळासाहेब ते शिंदे

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. 56 वर्ष ज्यांची पकड होती त्या शिवसेनेवर आता ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं नाही. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवसेनेची स्थापना केली होती. मुंबईत मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेनं आक्रमकपणे लढली. सुरवातीला मुंबई आणि ठाणे परिसरात जोमानं वाढलेली शिवसेना ऐंशीच्या दशकात राज्यात विस्तारासाठी सज्ज झाली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. 1995च्या विधानसबा निवडणुकीत शिवसेनेचे 75 आमदार निवडून आले होते. राज्यात पहिल्यांदाच बिगरकाँग्रेसी असलेलं युती सरकार सत्तेत आलं होतं. 

1999 नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राजकारणात जास्त सक्रीय नव्हते. कारण उद्धव ठाकरे पक्षात सक्रीय होऊ लागले होते. महाबळेश्वरमध्ये 2003ला शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं. शिवसेनेसाठी हा मोठा टर्निंग पॉईंट होता. त्याचे पडसाद पुढच्या दोन वर्षातच उमटले. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली. तर 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली होती. शिवसेना या धक्क्यातूनही सावरली. 2014 मध्ये उद्धव ठाकरेंनी स्वबळावर 63 जागा जिंकल्या. 2019 मध्ये शिवसेना भाजपची पुन्हा युती झाली. शिवसेनेनं 56 जागा जिंकल्या. मात्र शिवसेनेनं भाजपची साथ सोडून मविआच्या साथीनं सत्ता स्थापन केली. हा शिवसेनेसाठी दुसरा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या सत्तेमुळे शिवसेनेतील हिंदूत्ववादी नेते दुखावले. राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पक्षाला मारक ठरत असल्यानं एकनाथ शिंदेंनी दुसरा गट स्थापन करून भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टातली आणि निवडणूक आयोगातली लढाई सुरू झाली. निवडणूक आयोगातली लढाई एकनाथ शिंदेंनी जिंकली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं एकनाथ शिंदेंना मिळालं. पक्षावरील ठाकरे कुटुंबाची सत्ता संपुष्टात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतही शिवसेनेनं अनेक बंड पाहिले, पक्षांतरं पाहिली. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पण या आघातानंतरही शिवसेना वाढली. इतके सर्व बंड पचवणारी शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून सुरू झालेली शिवसेनेची वाटचाल आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सुरू झाली आहे.

आव्हान वाढलं...

उद्धव ठाकरे यांच्यासमोर आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान निर्माण झालं आहे. पक्ष आणि चिन्हं हे दोन्ही त्यांच्या हातून एकनाथ शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे आता शुन्यातून सुरूवात करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. उद्धव ठाकरेच नव्हे तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरेंनीही मैदानात शड्डू ठोकला. पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी ठाकरे कुटुंबानं आता रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. शिवसैनिकांमध्ये पुन्हा जोश निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाषण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो अशा शब्दात त्यांनी निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. मात्र हे आव्हान उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड खडतर असणार आहे.

कारण 40 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. अनेक माजी खासदार, आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. धनुष्यबाण चिन्हं सर्वांच्या परिचयाचं आहे. त्यामुळे नवं चिन्ह घेऊन उद्धव ठाकरेंना मतदारांसमोर जावं लागणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत मोठे नेते नाहीत. त्यामुळे मतदारांसमोर भाषण करायला उद्धव ठाकरेंसमोर दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे फक्त सामान्य शिवसैनिकांनाच सोबत घेऊन त्यांना लढाई लढावी लागणार आहे.

मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकाही एका वर्षावर आल्या आहेत. आणि त्या आधीच पक्ष आणि चिन्हं गेल्यानं उद्धव ठाकरेंना नव्यानं पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. एकंदरीतच ऐतिहासिक संकटावर उद्धव ठाकरे कशा प्रकारे मात करतात? यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. #संगो