Wednesday, March 30, 2011

पाकिस्तानचा पाडाव, आता लक्ष्य लंका दहन

वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार समजल्या जाणा-या टीम इंडियानं अपेक्षेप्रमाणं पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. टीम इंडियानं आता फायनलमध्ये प्रवेश केलाय. वीरेंद्र सेहवागचा धडाका पाहता टीम इंडिया 300 पेक्षा जास्त धावा करणार असं वाटत होतं. मात्र मधली फळी अपेक्षीत कामगिरी करू शकली नाही. त्यामुळं टीम इंडिया 260 धावा करू शकली. सहा जीवदान मिळूनही सचिन तेंडूलकरला सेंच्युरीची सेंच्युरी करण्यात अपयश आलं. आता मुंबईत होम ग्राऊंडवर सचिन शतक ठोकून वर्ल्ड कप जिंकून देईल अशी खात्री वाटतेय.
मीडल ऑर्डरला सातत्य राखता येत नाही, ही टीम इंडियाची नेहमीचीच डोकेदुखी झालेली आहे. त्यातच बॉलिंगची नसलेली धार, ही सुद्धा चिंतेची बाब म्हणावी लागेल.
टीम इंडियाच्या बॉलिंगला धार नसताना सेमी फायनलमध्ये मिळालेलं यश उल्लेखनीय आहे. आता फायनलमध्ये श्रीलंकेचं दहन झालंच पाहिजे. तब्बल 28 वर्षानंतर भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी प्राप्त झाली आहे. 'अभी नहीं तो कभी नहीं' या न्यायानं एक पाऊल पुढे टाकत टीम इंडियानं वर्ल्ड कप मिळवलाच पाहिजे.

Sunday, March 20, 2011

जाणता राजा !

जगाच्या इतिहासात अनेक राजे - महाराजे, सुलतान होऊन गेले आहेत. अर्थात यामध्ये मोठ्या प्रमाणात वंश परंपरा किंवा दगाबाजी करून झालेलेही अनेक जण होते. मात्र या सर्व राजे - महाराजे, आणि सुलतानांची आज आठवण ठेवली जाते. कोणत्या राजाची जयंती उत्साहात साजरी केली जाते ? अनेक राजे, सुलतान हे इतिहासात गडप झाले आहेत. मात्र एक जाणता राजा असा आहे की, ज्याची अनेक वर्षांपासून उत्साहात जयंती साजरी केली जाते. आणि तो राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. कारण शिवाजी महाराज हे काही वंश परंपरेने राजे झाले नव्हते. इतिहास हा त्यांच्या शिवाय अधूरा आहे, कारण स्वत: शिवाजी महाराजांनीच इतिहास घडवलेला आहे.
मोघलशाही, आदिलशाहीमुळे खचून गेलेल्या इथल्या रयतेला लढायला शिकवलं ते शिवाजी महाराजांनी. चार शतकांपूर्वी आपल्या देशात ख-या अर्थानं जन्म झाला तो लोकशाहीचा. शिवाजी महाराजांचा शिवकाल हीच खरी लोकशाही. मावळ्यांच्या मदतीनं त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता तर हा देश इस्लामी राजवटीचा गुलाम बनला असता. सर्वांना डोक्यावर गोल टोप्या घालून मशिदीत नमाज अदा करावी लागली असती. मात्र शिवाजी महाराजांमुळं ही 'हरित क्रांती' टळली.
शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अफाट होती. स्वराज्य प्रबळ करण्यासाठी किल्ले आणि सागरी किल्ले महत्वाचे आहेत. हे त्यांनी हेरलं होतं. मात्र या सर्वांपेक्षा त्यांच्यातली जिद्द आणि गनिमी कावा आजही प्रेरणा देणारा आहे.
संपूर्ण शिवचरित्र हेच विविध पराक्रमांनी भारलेलं आहे. मात्र यात मैलाचा दगड ठरावा तो प्रतापगडच. कारण याच प्रतापगडाच्या पायथ्याशी जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास घडला. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी अफजल खान हजारो सैन्य, मोठं घोडदळ, अजस्त्र हत्ती, दारूगोळा घेऊन चालून आला होता. मात्र शिवाजी महाराजांनी युद्ध कलेचं मोठं उदाहरण इथं जगाला दाखवून दिलं. महाराजांनी मोठ्या चातूर्यानं खानाला निरोप पाठवून बोलणीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावलं. अफजल खानाला वाटलं की, शिवाजी महाराज घाबरले. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की, तो आता महाराजांनी जो भाग कायम पायदळी तुडवलेला आहे, तिथंच तो चालला होता. एवढंच नव्हे तर हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला शेवटी दहा जण घेऊन महाराजांबरोबर बोलणी करण्यासाठी यावं लागलं. शिवाजी महाराजही दहा जणांसह खानाच्या भेटीला गेले.
मात्र खानानं जो दगाफटका करायचा तो केलाच. त्यानं शिवाजी महाराजांवर वार केला. खानाची प्रवृत्ती महाराजांना माहित असावी, त्यामुळं त्यांनी आधीच घातलेल्या चिलखतामुळं ते बचावले. दुस-याच क्षणी महाराजांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. ही घटना म्हणजे महाराजांनी अफजल खानाचा वध केला, इतकीच मर्यादीत नाही. कारण त्या काळात देशात पसरत असलेल्या इस्लामी साम्राज्यालाच या वधामुळं धक्का बसला. मोघलांची सगळी शक्ती शिवाजी महाराजांच्या विरोधात खर्ची पडली. मोघल साम्राज्य भारतातच अडकून पडलं. शिवाजी महाराज नसते तर मोघल साम्राज्याचा श्रीलंका, म्यानमार आणि त्याच्या पुढेही विस्तार झाला असता. मात्र शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळं ही हिरवळ दूरवर पसरू शकली नाही.
वैरी मेला वैर संपले, या न्यायानं महाराजांनी अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधली. महाराजांनीच त्याची आतडी बाहेर काढली होती. कारण दहशतवाद हा असाच संपवायचा असतो. बिर्याणी खायला देऊन दहशतवाद संपत नसतो. मात्र एकदा अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याची कबर बांधण्याचा दिलदारपणा इतिहासात कुठे सापडणं शक्यच नाही. मात्र ही कबर म्हणजेही एक इशाराच होता. या हिंदवी स्वराज्यावर जर चालून आलात तर तुमचीही अशीच कबर खोदली जाईल, असा इशाराच महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी घालून दिला.
शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात मुस्लिमांनाही दुय्यम वागणूक नव्हती. सैन्यात आणि महाराजांच्या अंगरक्षकांमध्येही मुस्लिम होते. लढाईच्या वेळी महिला आणि त्यांच्या अब्रूचं रक्षण करण्याचा दंडकच घालून देण्यात आला होता. या मुळंच सर्व रयतेला हे आपलं राज्य वाटत होतं. हा राजा जनतेला जाणून घेणारा होता. जनतेलाही राजाचं प्रेम जाणवत होतं. त्यामुळंच हा राजा 'जाणता राजा' म्हटला
परकीयांशी दिलेला लढा, जिंकलेले किल्ले, आग्र्याहून सुटका, सुरतची लूट, राज्याभिषेक या सारख्या अनेक शौर्यांची प्रेरणा महाराजांपासून घेता येते. सागराचे महत्व आणि त्याच्या सुरक्षेचा वेध चार शतकांपूर्वीच महाराजांनी घेतला होता. त्यामुळंच त्यांनी अनेक जलदूर्ग बांधले. मात्र शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या नादान राज्यकर्त्यांना घेता आला नाही. आणि त्यामुळंच मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. राज्यकर्त्यांची शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची मानसिकता नाही. त्यांचा 'आदर्श'च मुळात 31 मजल्यांचा आहे. त्या कुलाब्यातल्या सोसायटीत चार फ्लॅट पदरात पाडणं हाच त्यांचा आदर्श.
व्हियतनाम मधल्या जनतेनंही अमेरिकेच्या साठ हजार सैनिकांची कबर खोदली होती. कारण तिथल्या जनतेनं शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आत्मसात केला होता. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या जोरावर त्यांनी बलाढ्य अमेरिकेला धूळ चारली. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यामुळंच विजय मिळाल्याचं तिथली जनता सांगते. असा हा जागतिक किर्तीचा राजा आपल्या देशात होऊन गेला. आणि आज आपल्यावरच दहशतवादी हल्ले होताहेत. कारण आपण दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत बसलो आहोत. दहशतवाद असा संपूष्टात येत नाही, हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आहे. होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा हर हर महादेव, जय भवानी - जय शिवाजी, मग बघा कुणाची माय व्याली आहे, इथं हल्ले करायला ?

Sunday, March 13, 2011

अशी नसते गं आई !

8 मे महिला दिन. ऑफिसमध्ये सकाळ पासून महिला दिना विषयीच्या बातम्या सुरू होत्या. वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी बजावणा-या महिलांच्या बातम्या प्रत्येक बुलेटिनमध्ये जात होत्या. आणि त्यातच एक ब्रेकिंग न्यूज आली. मालाड पूर्वेला सह्याद्री टॉवर्स इमारतीत राहणा-या निधी गुप्ता या महिलेनं दोन लहान मुलांसह आत्महत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही बातमी, आणि एकीकडे महिली दिनाच्या बातम्या देत असतानाच निधी गुप्ताच्या आत्महत्येचीही बातमी करावी लागली.

चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेल्या निधी गुप्तानं गौरव आणि महिका या दोन लहानग्यांसह आत्महत्या केली. मनाला सुन्न करणारी ही बातमी. आई पोटच्या मुलासाठी काय करत नाही ? आई तर एक पिढीच घडवते. मुलांची शाळा नव्हे तर विद्यापीठच आई असते. गौरव आणि महिकाच्या आईनं असं का केलं असेल ?
अशी नसते गं आई ! असंच तर ही मुलं तिला म्हणत नसतील ना ?
आपल्या देशातली एकत्र कुटुंब पद्धती ही जगात आपली ओळख होती. मात्र या नाते - संबंधांमध्ये आता त्सुनामी आली आहे, हेच या आत्महत्येतून स्पष्ट होत नाही का ? आपणही किती संवेदनाहीन झालो आहोत. मनाला चटका लावणारी ही बातमी, मात्र त्यावर रोखठोक चर्चा झालीच नाही. समाजातली मते - मतांतरे व्यक्त झालीच नाहीत. 11 मार्चला जपानमध्ये त्सुनामी आली. त्या त्सुनामीत नाते संबंधांच्या या त्सुनामीची बातमी वाहून गेली.
जग सोडून जाणारी निधी गुप्ता, मरणाच्या वाटेवर जाताना मुलांना का सोबत घेऊन गेली असेल ? मुलांना मृत्यूच्या दाढेत लोटताना तिचे हात का थरथरले नसतील ? मुलांकडं बघून जगण्याची नवी जिद्द निर्माण होते. मुलांच्या निरागस हास्यासमोर जगातली सर्व दु:ख विसरून जायला होतं. मग हे सर्व निधीला का जाणवलं नसेल ?
आता या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सासरच्या मंडळींच्या जाचामुळे निधीने हे पाऊन उचलल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. पुढिल तपासात सत्य बाहेर येईलही. मात्र निधीबरोबर
वावरणा-यांना, तिच्या नातेवाईकांना तिची घालमेल जाणवली नसेल का ? निधीच्या पतीला दारूचं व्यसन होतं. तसंच प्रॉपर्टीवरूनही वाद सुरू होता. या कौटुंबिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी वेळीच का पुढाकार घेतला नसेल ? जर त्यांच्या कुटुंबात संवाद असता, नाते - संबंधांमध्ये जिव्हाळा असता तर अशी घटना नक्कीच घडली नसती.
आपली कौटुंबिक आस्था कमी होत चालल्याचंच हे प्रतीक आहे. नातेसंबंधांमध्ये निर्माण होणारा तणाव, वाढती स्पर्धा, आणि घड्याळाच्या काट्यालाही मागे टाकून पुढे जाण्याची घाई यामुळं प्रत्येक व्यक्ती आत्मकेंद्री होत चालली आहे. या आत्मकेंद्री प्रवृत्तीमुळं समाजातला संवाद खुंटत चालला आहे. त्यामुळंच समाजात निकोप वातावरण निर्माण व्हायला हवं. घर हे फक्त भिंती असता कामा नये. घराघरातली घट्ट नातेसंबंधच अशा प्रकारच्या आत्महत्या रोखू शकतात. जिवनात कितीही तणाव असला तरी आत्महत्या हा काही मार्ग नव्हे.