
हैदराबादच्या डेस्कवर मी 1 ऑक्टोबर 2004 ते 15 ऑक्टोबर 2006 पर्यंत काम केले. त्या आधी मी ई टीव्हीच्या प्रोग्रामींग डिपार्टमेंटमध्ये होतो. तिथल्या आठवणी नंतर कधी तरी मांडेन. मात्र प्रोग्रामींग डिपार्टमेंटमध्येच असताना संभाजीनगरचे शैलेश लांबे, प्रवीण अंधारकर यांच्याबरोबर ओळख झालेली होती. त्यामुळे न्यूज डिपार्टमेंटमध्ये येताना कोणताही नवखेपणा माझ्यात नव्हता.
डेस्कवर गेलो तेव्हा विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होती. मी आणि राहुल वाघ एकाच दिवशी जॉईन झालो होतो. डेस्कवर चार जणांची एक टीम तयार करून प्रत्येकाकडे स्वतंत्र विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. मी, श्रीरंग खरे आणि केतकी मराठवाडा विभागातल्या बातम्यांवर नजर ठेऊन होतो. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत त्या विभागातले अपडेट्स देत राहण्याची ती कामाची पद्धत ठरवण्यात आली होती.विधानसभा निवडणूक संपली आणि त्या नंतर सुरू झाली ती धमाल. दर दोन आठवड्यांनंतर न चुकता नाईट शिफ्ट लागायचीच. अर्थात थोडेफार अपवाद वगळून. मात्र आम्ही त्या रात्रींचा दिवस करून पार धमाल उडवून द्यायचो. आणि त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या आसपास तीन - चार कॉपी एडिटर ( तरूणी ) डेस्कवर आल्या. मग काय सगळं वातावरणच बदलून गेलं.
नेहमीप्रमाणे आमच्या एका मित्राने ( इथं नाव देता येणार नाही.) उमेदवारी जाहीर केली. दुस-याने सर्वांनी विनंती करून स्वत:साठी एक 'मतदारसंघ' आरक्षित करून घेतला. तर दुस-या एका मित्रानं मेनअँक्टर ( एडिटिंग सॉफ्टवेअर ) शिकवण्याच्या प्रयत्नातून 'मासा' गळाला लागतो का ? याचा अंदाज घेतला.
याचवेळी गिरीश अवघडे आणि रमेश जोशी बरोबर मैत्री जमली. अर्थात डेस्कवर तेव्हाही गटबाजी आणि राजकारण होतं. मात्र आम्ही 'अलिप्त राष्ट्रांचे' प्रतिनिधी असल्याने आम्ही कोणत्याही गटाचं मंडलिकत्व पत्करलं नव्हतं. त्यामुळे हसतखेळत मजा करणे, आणि कामही करणे या पद्धतीने आमचे काम सुरू असायचे. 'फाईव्ह डेज वीक'चा आद्य प्रणेता म्हणजे गिरीश अवघडे. आठवड्यातल्या एका वीकली ऑफ बरोबर नियमीत एक दांडी मारून त्यानं फाईव्ह डेज वीकची बीजं रोवली. गिरीशचाच कित्ता पुढे चिन्मय काळे यानं सार्थपणे पुढे नेला. त्याचीही दर आठवड्याला एक दांडी चुकली नाही. नंतर हा चिन्मय बुलेटिन प्रोड्युसरही झाला होता.
नाईट शिफ्ट हा एक स्वतंत्र विषय आहे. आमच्या काही मित्रांना तर तीन - तीन महिने नाईट शिफ्ट लावण्यात आली होती. एखादा फार शहाणपणा दाखवत असेल, हुज्जत घालत असेल, प्रस्थापितांच्या गटाला जुमानत नसेल तर त्याच्यावर नाईट शिफ्टचं हत्यार उगारलं जायचं. जर नाईट टाळायची असेल तर मग गटबाजी करणे, हांजी हांजी करणे हे दुसरे मार्ग होते. अर्थात दुस-या मार्गानं जाणा-यांची संख्या फार जास्त होती. त्यामुळे लिडर हा स्वतंत्र बाण्याचा असणं किती गरजेचं आहे, हे लक्षात येतं.
बुलेटिन काढण्याची आशिष चांदोरकरची शैली सर्वात चांगली होती. कोणतंही टेन्शन न घेता तो बुलेटिन काढायचा. त्यामुळं हे तर सोपं काम असं वाटायचं. तर दुसरीकडे केतकी आणि नरेश बोभाटे ज्या पद्धतीनं बुलेटिन काढायचे ते पाहून काळजात धडकी भरायची. हे काम फार अवघड आणि कधीच जमणार नाही असं वाटायचं. धनंजय कोष्टींची शैलीही अशीच टेन्शन फ्री. गजानन कदम तर पीटीआय शिवाय दुस-या कोणत्याच बातम्यांना हात लावायचे नाही. तर डॉक्टर रेळेकर लाल रंगाचं स्वेटर घालून शिफ्टमध्ये आल्याबरोबरच बुलेटिन लावून टाकायचे. हळू हळू अवरली, आपली मुंबई या बुलेटिनपासून माझी सुरूवात झाली. नंतर वृत्तवेधही केलं. वृत्तवेध हे त्या काळात बुद्धिवादी बुलेटिन प्रोड्युसर्सचं काम मानलं जात होतं.
हिवाळी अधिवेशन जवळ आल्यावर डेस्कवर जबरदस्त लॉबिंग सुरू व्हायचं. अशोक सुरवसे सरांच्या नजरेत भरण्यासाठी प्रयत्न सुरू केले जायचे. राजकारणातला अभ्यास सर्वांना कळेल अशा पद्धतीनं मार्केटिंग केलं जायचं. त्यासाठी प्रत्येक ग्रुपचे काही फंडे होते. आपल्या गटातील एकेकाची स्तुती केली जायची. काही जण तर हातात तेलाची बाटली बुमप्रमाणे पकडून रूमवर पीटीसीची प्रॅक्टीस करायचे.
2005 ते 2006 या काळात डेस्कवर ख-या अर्थानं हुकूमत गाजवली ती चंद्रकांत फुंदेनं. मात्र तो बाबा या नावानं परिचित होता आणि अजूनही आहे बरंका. अर्थात या डेस्कवर माझं झालेलं 'गारू' हे नामकरण अजूनही कायमच आहे. इथं मुद्दा आहे तो बाबाचा. भडक डोक्याचा बाबा रोज वादळ निर्माण करायचा. सगळ्यांशी भिडायचाही. बरं त्याचा अविर्भावही 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' असाच होता. अर्थात हे वाचल्यानंतर त्याचा मला फोन येईल. 'ए गा-या माजला का xxx, पण तू चांगलं लिहतो रे', अशी कॉमेन्टही देईल. बाबाचा एक डायलॉग फेमस होता. तो म्हणजे, I dont like this. बाबा सारखाच योगेश बिडवई. आता तो अण्णा या नावाने ओळखला जातो. नवीन आलेल्या कॉपी एडिटरला प्रिन्टचा अऩुभव घ्या, असा सल्ला तो न मागता द्यायचा.
बाबा, अभिजित कांबळे, स्वप्नील बापट आणि रूपेश कलंत्री हे ज्या ठिकाणी रहायचे त्याचं नाव हवेली होतं. बरं हे चौघेही वेगवेगळ्या प्रवृत्तीचे. बाबा आणि अभिजित बुद्धिवादी. तर स्वप्निल आणि रूपेश कलाप्रेमी. या हवेलीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. त्यातला भेळीचा किस्सा प्रसिध्द आहे. अशाच कार्यक्रमांच्या दरम्यान स्वप्नील त्याच्या कविता ऐकवायचा. एक कप चहा आणि पोहे, यासाठी मीही त्या कविता ऐकायचो. नाही म्हणायला कधीकधी चांगल्या कविताही करायचा म्हणा. नाईट शिफ्टला रुपेशनं आणलेली शाल, अकरा ते एक ठरलेली झोप त्यानंतर पुन्हा साडेपाच ते सातची झोप कधीच चुकली नाही.
नंतरच्या काळात स्नेहा आणि सुप्रिया डेस्कवर आल्या. त्यामुळे डेस्कच्या सांस्कृतिक वैभवात अजूनच भर पडली.
डेस्क मीटिंग हा प्रकार म्हणजे झालेल्या चुकांचा आढावा, प्लॅनिंगचा आखाडा असायचा. चिकून गुनिया की चिकन गुनिया, करात की कारत या सारख्या विषयांवर तिथं किस पाडला जायचा. मेघराज पाटील अशा मीटिंगमध्ये त्यांचा मुद्दा कधीच सोडायचे नाहीत. आपल्या मुद्दावर ठाम राहणं, ही त्यांची खासियत. अशाच मीटिंगमधल्या एक'संघ' गुणांवरून राजेंद्र हुंजे एके दिवशी 'राजामाणूस' होणार हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं.
डेस्कवर काही राजकारणीसुद्धा होते. राजकारणातून पत्रकारितेत आलेला अनिल पवार आणि पत्रकारितेतून राजकारणात जाण्यासाठी इच्छूक असलेला धनंजय शेळके. दोघेही 'राष्ट्रवादा'ने ओतप्रोत भरलेले होते.
दर आठवड्याला येणारा टॅमचा रिपोर्ट डेस्कवर सगळ्यांना पाहण्यासाठी खुला असायचा. त्यामुळं कोणतं बुलेटिन कसं रेटिंग मिळवतंय, कुठे काम करण्याची गरज आहे, हे पाहता यायचं. लक्षात घ्या ही सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या गोष्टी न्यूज चॅनेल्समध्ये आता होताहेत. यावरून ई टीव्ही काळाच्या किती पुढे होती, हे लक्षात येतं.
नाईट शिफ्टला मी, गिरीश रमेश आणि पॅनलला जर दीपक शितोळे, शिरीष जाधव असेल तर रात्रभर जोक्स, एकमेकांची खेचणे, सिगरेट याची बहार यायची. चहासाठी कुणाला तरी कटवावं लागायचं. अरे हो, पॅनलवरून आठवलं. आनंदी कुलकर्णीसमोर पॅनलवाले म्हटलं की, त्याचा शुद्ध सात्विक संताप व्हायचा. आणि मग तो म्हणायचा, हॅलो माझंही मास कॉम झालं आहे.
या सर्व गदारोळात तिथं साजरा होणार गणेशोत्सव मनाला आनंद देणारा ठरायचा. दहा दिवस आरती आणि नंतर आलमपनाहमध्ये पार्टी रंगायची. जोक्स, एकपात्री नाटक, फिश पॉण्ड्स आणि नंतर डान्स. असा कार्यक्रम असायचा. एकदा सर्वांना डान्सची प्रतीक्षा असताना मृदूला जोशी यांचं सतारवादन रंगलं होतं. मग सगळ्यांना टाळ्या वाजवाव्या लागल्या होत्या. कार्यक्रमांच्या वेळी माधुरी गुंटीचा उत्साहही मोठा असायचा. अशाच एका कार्यक्रमात 'अखिल भारतीय आंबट पक्ष' स्थापन झाला होता. आता त्याची शाखा आयबीएन लोकमत आणि पुण्यापर्यंत आहे. जिज्ञासूंनी जुन्या ई टीव्हीएन्सकडून त्यांची नावे घ्यावी. याच कार्यक्रमात सादर केलेली नक्कल तुफान हिट झाली होती. त्यानंतर आ आन्टे आमलापुरम, या गाण्यावर सगळा डेस्क थिरकला होता.
डेस्कवर डाव्यांचाही एक गट होता. मात्र त्यांची गटबाजी नव्हती. मेघराज पाटील, निमा पाटील, माणिक मुंडे हे डाव्या विचारांचे. त्यांचं ऐकायलाही मजा यायची. निमा आणि हृषीकेशची राजकीय जुगलबंदीही चांगलीच रंगायची.
सुनील बोधनकर आणि जयंत गायकवाड सारखे अंग्री यंग मॅनही डेस्कवर त्यांचा आब राखून होते. प्रवीण ब्रम्हपूरकर तर हृषीकेशचा मानसपूत्रच होता, म्हणजे अजूनही आहे.
अँकर होण्यासाठी तिथं सातत्यानं प्रयत्न सुरू असायचे. अर्थात माझाही होता. पण तू मराठवाड्यातला असं म्हणून तूझा उच्चार योग्य नाही. परिणामी मला साधा व्हीओ सुद्धा करू दिला जायचा नाही. ( आताही सिस्टीममध्ये फार काही फरक पडला नाही. असो.) आता मराठवाड्यातलाच असला तरी मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपुरेच राज्य करतोय. बरंय त्याला अजून या उच्चारवाल्यांनी घरी पाठवलेलं नाही. अशा प्रकारे एकमेकांचे पत्ते पद्धतशीरपणे दूर करण्यात काही सहकारी निष्णात होते.
मार्केटिंगच्या व्हॉईस ओव्हरसाठी सगळ्यांच्या उड्या पडायच्या. कारण खणखणीत शंभर रूपये मिळायचे. अभय जिन्सीवालेपण त्याचा व्हीओ करायचा. मार्केटिंग डिपार्टमेंटमधून फोन आल्यावर तो उचलून गुपचूपपणे पावले व्हीओ करण्यासाठी चालायची.
काही अँकर्सचे ऑन एअर किस्से अजूनही ताजे आहेत. एका अँकरने नियमभंग हा शब्द वाचताना विनयभंग असा वाचला होता. तर दुसरीने आगीचा अँकर असा काही वाचला होता की, विचारायची सोय नाही. तर तिसरीने कहरच केला होता. अडवाणींनी प्रयाण केलं, असं वाचण्याऐवजी पलायन केलं, असं वाचून मोठाच हादरा दिला होता.
मात्र सागर गोखले आणि मकरंद माळवेची बातच और. दोघांचा अभ्यास आणि शैली उत्तम. मात्र नवीन आलेल्या कॉपी एडिटर्सबरोबर दोघेही वरिष्ठ असतानाही चांगलं मार्गदर्शन करायचे. प्रसिद्धी या दोघांच्या डोक्यात गेलेली नव्हती. मकरंद माळवे यानं आणलेला कप अजूनही डेस्कवर जतन केल्याचं सांगण्यात येतंय. चहा शेअर करण्यासाठी कॅन्टीनवाला एक्सट्रा कप द्यायचा नाही. त्यामुळे मकरंदच्या सुपीक पुणेकरानं घरून हा कप आणला. पाच रूपयाचा चहा आणि कॉफी दोघांना यामुळे शेअर करता यायचा
मे 2005 हा डेस्कवर विवाहाचा महिना ठरला होता. हृषीकेश देशपांडे, मी, अभिजीत कांबळे, अभय हे सगळे एकाच महिन्यात विवाहबद्ध झालो होतो. पुढच्याच महिन्यात राहुल वाघचंही लग्न झालं होतं.
साहित्य संमेलन म्हणजे दुर्गेश सोनार हे समीकरण ई टीव्हीत पक्क होतं. त्याच्याही कविता उत्तरोत्तर रंगत जायच्या. महाराष्ट्र माझा हे बुलेटिन काढण्यात त्याची हातोटी होती. RO लॉक हा शब्दही तिथंच ऐकायला मिळाला. आता 24 तासच्या दुनियेत ही संकल्पना म्हणजे काही औरच.
ई टीव्हीचा इनपुट विभाग सर्वाधिक कार्यक्षम आहे. कारण तिथं दर महिन्याला एक - दोन स्ट्रिंजर तर तीन - चार महिन्याला एका रिपोर्टरचा राजीनामा ठरलेला असतो. तिथला 'कामाचा' झपाटा संशोधनाचा विषय आहे. इथल्या सारखे रिपोर्टर कुठेच काढले जात नाहीत. बहुतेक एचआर डिपार्टमेंटला काम मिळावं, यासाठी हा उद्योग असावा.
दूर मुलखात असलेले आम्ही सहकारी तिथं एकमेकांना आधार होतो. आता जवळपास सगळेच मुंबईत आहोत. मात्र या शहराने आमच्यातली मैत्री, स्नेह, जिव्हाळा ओरबडून घेतला आहे. मित्र आता जणू स्पर्धक झाले आहेत. तीन - तीन महिने कुणाचा फोन नसतो. मी भला माझं काम भलं, ही या शहराची जीवनपद्धती सगळ्यांनीच आत्मसात केली आहे. या शहराच्या वेगानं आपल्यातल्या जिव्हाळ्याला कधीच मागं टाकलंय. पण जिव्हाळा कायम ठेवायचा असेल तर एकमेकांना साद द्या. कारण या आठवणी, हे मित्र कधीच मिळणार नाहीत.
गारु छान झालाय ब्लॉग. अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. विशेष म्हणजे रुपक किंवा अप्रत्यक्ष उल्लेख न घेता लिहले आहे. त्यामुळे आणखी आवडला.
ReplyDeleteआलमपनहामधल्या पार्टीमध्ये तुम्ही केलेली गजानन कदम यांची नक्कल तर मी कधीच विसरु शकत नाही. मला वाटतंय बहुधा त्याच पार्टीत आपली पहिली ओळख झाली.
क्या बात हैं गारू.... तुझ्या या ब्लॉगमुळे पुन्हा एकदा आरएफसीमधल्या आपल्या डेस्कवर जाण्याचा आनंद मिळाला.... ई टीव्हीतले किस्से आणि अनुभव यांचं एक भन्नाट पुस्तकच होऊ शकेल....
ReplyDeleteगारु, मस्त लिहिलयंस.. 'ती' बातमी ऐकल्यापासून आपापल्या गटागटात ही चर्चा नक्कीच होती.. आठवणी जागवल्या जातच होत्या... वाईटही वाटत होतं.. पण ते सगळं एकाच ब्लॉगमध्ये लिहिलस.. छान वाटलं.. इतक्या लोकांची नावं लक्षात ठेवलीस, त्यांचे स्वभाव, त्यांची शैली, त्यांचे किस्से अजूनही असे डोळ्यांसमोर आहेत... काही 'विशेष' वर्णनं फारच महत्वाची.. कारण त्याशिवाय या ब्लॉगला पूर्णत्व नव्हतं.. पाच हजार पगार होता.. त्यातले 4,300 च हातात मिळायचे.. पण लाखमोलाची माणसं, मित्र-मैत्रिणी भेटल्या, अनुभव हे सगळं त्या पैशात नाहीच विसरता येणार.. या सगळ्या समृद्ध आठवणी जागवल्यास, त्याबद्दल मनापास्नं धन्यवाद.. हैदराबादला असताना मी लिहिलेल्या एका कवितेची ओळ आठवली, हा ब्लॉग वाचून.. "बरंच काही आठवताना साठवावंस वाटलं म्हणून..."
ReplyDeletechan garu... Sagle mhantat Etv madhe kamai hot nahi.. pan khup changle mitra hi aapli kamai.. mi tar nashib kadhle tyababt...
ReplyDeleteajun bhag 2 lihi.. tula shubhechya... :)
धन्यवाद ओंकार. आलमपनाहमध्ये गजानन कदम यांच्याबरोबरच मेघराज पाटील सर यांचीही केलेली नक्कल सगळ्यांनाच आवडली होती.
ReplyDeleteधन्यवाद दुर्गेश. ई टीव्हीची आठवण कधीच जावू शकत नाही. इतके भन्नाट किस्से सगळ्यांच्याच संग्रहात आहेत. तिथला प्रत्येक क्षण आपण सगळेच जिवंतपणे जगलो आहोत. त्यामुळेच या मुर्दाड मुंबई शहरात हैदराबादच्या जिवंतपणाची सातत्याने आठवण येते. मात्र वर्तमानकाळ आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे या हृदयातल्या आठवणी शेअर करणं आपल्या हाती आहे.
ReplyDeleteधन्यवाद स्वप्नील. आता तर ई टीव्हीपेक्षा जास्त पगार मिळतो. मात्र तिथल्या सारखा जिव्हाळा, मैत्री कुठे मिळेल ? तिथले सगळेच किस्से मनात सातत्यानं उचंबळून येत होते. अनेक दिवसांपासून त्यांना शब्दरूप करायचं होतं. मात्र हे करताना कुणी चुकूनही दुखावू नये ही भीती होती. शेवटी सगळे आपलेच आहेत, हे मनाशी पक्क करून ब्लॉग लिहला. अपेक्षेपेक्षा जास्त तो सगळ्यांनाच भावला. कारण सगळ्यांच्याच मनात ई टीव्हीनं घर केलेलं आहे.
ReplyDeleteधन्यवाद रूपेश. ई टीव्हीतली कमाई हा भाग आता तर विषयच नाही. कारण त्या कमाईत आणि तिथल्या वातावरणात मिळालेले मित्र आणि जिव्हाळा कुठेच नाही. आपले ई टीव्हीतलेच सगळे मित्र वेगवेगळ्या चॅनेलमध्ये आहेत. मात्र सगळेच ई टीव्हीच्याच नावाने उसासे टाकतात. मुंबईतली जीवघेणी स्पर्धा तिथं नव्हती.
ReplyDeleteगोरे गारु, खरचं ते दिवस खुपच छान होते.. आता ते परत येणार नाहीत, पण तुझ्यामुळं त्या आठवणी मात्र परत जाग्या झाल्या.. Thanks a lot
ReplyDeleteधन्यवाद सुनील. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करण्याचा माझा उद्देश सफल झाला. सगळ्यांच्याच मनात या आठवणी दाटून आलेल्या होत्या, त्या माझ्या ब्लॉगमुळे शब्दबद्ध झाल्या इतकंच. सगळ्यांनीच दिलेला प्रतिसाद मनाला प्रसन्न करणारा ठरला.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteआलमपन्हामध्येच संतोष गोरेला डान्स करताना मी पाहिला. आत्ममग्न पण तरीही बेभानपणे नाचणाऱ्या संतोषची पुढची स्टेप प्रेडीक्ट करणं अवघड होतं. ते दृश्य अजूनही डोळ्यासमोरुन जात नाही. तो काही न 'घेता' नाचला का घेऊन हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत..न्यूजमध्ये नवीन म्हणून आलेल्या गोरेकडे एवढी राजकीय माहिती आणि विश्लेषण करण्याची हातोटी कशी आली याचंही कोडं आणि कौतूक होतं
ReplyDeletesahi re garu. mala watate, ekhad dusara apwad wagalata, etvla koni visaruch shakanar naahi. ani tithe kaam kartana ji kaahi maja aali tyachi sar tar kashalach naahi. eka divsat ek kinva don buletinsathi kaam karaycho, pan kiti bebhan houn. lai bhaari.
ReplyDeleteधन्यवाद सागर. आलमपन्हामध्ये काहीही न देता आणि न घेता परफॉर्मन्स दिला होता.आणि प्रत्येक व्यक्तीतली काहीतरी सकारात्मक आणि नकारात्मक बाजूचं निरीक्षण मिश्कील शैलीत करण्याची सवय असल्यानं त्याचं विश्लेषण विनोदी ढंगानं केलं. इतकंच. मात्र तुमच्या सारख्या सहका-यांनी वरिष्ठ असूनही दिलेली आपुलकी ई टीव्हीमध्ये जिव्हाळा निर्माण करणारी ठरली.
ReplyDeleteधन्यवाद निमा. दिवसभरात एक किंवा दोन बुलेटिन, मात्र कोणतीच बातमी आपण रिपीट करायचो नाही.तिथल्या कामाची सर कुठेच नाही. तुझ्या सारखी वरिष्ठ आणि अनुभवी सहकारी, मात्र नव्या सहका-यांना अधिकारवाणीने नव्हे तर मित्रत्वाच्या नात्यानं सल्ला देण्याची पद्धत सगळ्यांच्याच लक्षात राहिली. आणि जवळपास सगळेच वरिष्ठ असंच सहकार्य करणारे असल्यानं ई टीव्ही मनात घर करून राहिली आहे. ती कायमचीच.
ReplyDeletewah garu kya baat hai...tuza lekh aani saglya comment...etvla kuni kadhi isaruch shaknar nahi....tumhala maherwashinisarkhi etv chi aathawan yete na...manasa badalali tari..funde tasech aahet ithale ekhada garu ekhada meghraj ekhada makrand.....aamhi chalavu ha pudhe warsa....
ReplyDeleteधन्यवाद माधुरी. तुझ्या स्वभावासारखीच तुझी ही दिलदार प्रतिक्रिया. सगळ्या माहेरवाशीणींना कशी माहेराची ओढ आहे, हे या ब्लॉग आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होतं. यादे याद आती है...
ReplyDeleteगारू 'व्यक्ती आणि वल्ली भाग दोन' लिहायला हरकत नाही. लिखाणाची भट्टी चांगलीच जमलीय...फक्त उणिव भासली ती आमच्या बॅचमधल्या लोकांच्या व्यक्तीचित्रणाची...त्यातल्या त्यात एका जागतीक आणि अभिजात सिनेमाच्या अभ्यासकाची नोदं तुम्ही जरूर घ्यायला हवी होती. पण हरकत नाही हे ही नसे थोडके!!!!
ReplyDeleteधन्यवाद विनोद. भट्टी जमणारच होती, कारण एकेकाचे अनेक भन्नाट किस्से आहेत. तूझी सूचना मान्य. भाग - 2 नक्कीच येणार.
ReplyDeleteगारू...एक नंबर आहे हा आठवणींचा खजिना...या भागाने काय दिलं ? हेच बघा, तुमचे जुने सहकारी पुन्हा एका क्षणात एकामागोमाग एक हजर झाले...हा गारू इफेक्ट म्हणावा लागेल...भाग दोनही वाचायला नक्की आवडेल....प्रशांत अनासपुरे
ReplyDeleteभाग - 2 नक्कीच येणार...?
ReplyDelete