Wednesday, December 23, 2009

गाडगे बाबा ते सत्य साई बाबा

20 डिसेंबरला संत गाडगे बाबांची पुण्यतिथी होती. अर्थात ती साजरी झाली असं म्हणता येणार नाही, हे ही तितकंच खरं. गाडगे बाबांनाही त्यांना संत म्हटलेलं आवडत नव्हतं. मात्र सवयीने आपण त्यांना संत म्हणतो. कारण आपल्या मानगुटीवर बसलेले बाबा, संत, पीर काही केल्या खाली उतरत नाहीत. 13 फेब्रुवारी 1876 ते 20 डिसेंबर 1956 या ऐंशी वर्षाच्या कालावधीत गाडगे बाबांनी केलेले कार्य आजच्या तथाकथित व्हाईट कॉलर रोटरी, लायन्स समाजसेवकांच्या थोबाडीत मारणारे आहे.
स्वच्छतेचा संदेश देणा-या गाडगे बाबांनी अंधश्रद्धा, रूढी - परंपरा, बुवाबाजी यावर कडाडून प्रहार केला. मात्र आज नागरिकांना समाजसुधारक बाबांची गरज राहिलेली नाही. नेटवर सत्य साई बाबा टाईप करून इन्टर केल्यावर 15,50,000 रिझल्ट्स मिळतात. साई बाबा टाईप केल्यावर 27,00,000 रिझल्ट्स मिळतात. तर गाडगे बाबा टाईप केल्यानंतर मिळणा-या रिझल्ट्सची संख्या ही फक्त 79, 700 इतकी आहे. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश देणारे, अंधश्रद्धेचा मार्ग कसा धोकादायक आहे, हे सांगणारे गाडगे बाबांचा 'रिच' किती कमी आहे, तेच दिसून येतं. तर दूसरीकडे हवेतून अंगठी देणारे, वेगवेगळे चमत्कार करणारे सत्य साई बाबांचा भक्त परिवार मोठा असल्याचं दिसून येतं. तर कोणतंही सामाजिक कार्य न केलेले आणि फक्त 'सबका मालिक एक' (बरं यात काय मोठं, हे तर कुणीही सांगू शकलं असतं. किंवा आतापर्यंतच्या संतांनी तेच सांगितलंय.) म्हणणारे शिर्डीचे साई बाबा आता ग्लोबल झालेत.
हिवाळी अधिवेशनाचं आजच सूप वाजलं. 20 डिसेंबरला अधिवेशन सुरू होतं. मात्र मुख्यमंत्र्यांना वाट वाकडी करून अमरावती जिल्ह्यात जायला सवड मिळाली नाही. अमरावती जिल्ह्यातल्या शेडगाव या गाडगे बाबांच्या जन्मगावी जाऊन त्यांच्या समाधीवर डोकं टेकवण्याइतकीही बुद्धी आमच्या राज्यकर्त्यांना होत नाही. आणि भोंदू सत्य साई बाबांची पाद्यपुजा 'वर्षा' या सरकारी बंगल्यात केली जाते. शंकरराव चव्हाण हे ही सत्य साई बाबांचे भक्त होते. तोच वारसा आता अशोकराव चव्हाण चालवत आहेत. काय पण वारसा म्हणायचा. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे ही सत्य साई बाबांचे भक्त. अनेक राजकारणी त्यांचे भक्त.
काही महिन्यांपूर्वी सत्य साई बाबा पुण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अनेक नेते, अभिनेते, व्यावसायिक विमानतळावर ताटकळत उभे होते. गाडगे बाबांनी निरक्षर जनतेला रूढी - परंपरांच्या जोखडातून तोडण्याचा प्रयत्न केला. बुवाबाजीच्या आहारी जाऊ नका असा संदेश दिला. आणि आज साक्षर, प्रगत आणि श्रीमंतही असलेला समाज एका भोंदू बाबाच्या स्वागतासाठी ताटकळत उभा असलेला पाहण्याची वेळ आपल्यावर यावी, हे खरंच दूर्दैव आहे. आणि हेच राजकारणी समाजाला दिशा देणार आहेत. त्यामुळे समाजाची कोणत्या दिशेने वाटचाल होणार, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
गाडगे बाबांच्या जन्मगावी कोणताही शासकीय कार्यक्रम झाला नाही. कोणत्याही सरकारी अधिका-याने तेथे उपस्थिती लावली नाही. किमान आर.आर.पाटील यांना तरी गाडगे बाबांची आठवण यायला काय हरकत होती ? गाडगे बाबांच्या नावे राज्यपातळीवर त्यांनी राबवलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. 'बिन पैशाची विकासयोजना' अशी टीका करण्यात आलेल्या या अभियानाला जनतेचा झपाटून प्रतिसाद मिळाला. आर.आर.पाटील यांची स्वच्छ प्रतिमा या अभियानामुळे आणखीनच उजाळून निघाली. त्या आर.आर.पाटील यांनाही गाडगे बाबांचा विसर पडावा, हे खेदजनक बाब म्हणायला हवी. गाडगे बाबांनी केलेल्या सामाजिक कार्याचा या प्रकारच्या घटनांमधून राजकारण्यांवर विसर पडू लागल्याचं आता सिद्ध होतंय. भोंदू सत्य साई बाबांची 'पाद्यपुजा' करणा-या नालायक राजकारण्यांना ज्याची 'आद्यपुजा' करायला हवी त्या गाडगे बाबांचा विसर पडत असेल तर अशा नाठाळांच्या माथी काठीच हाणायला हवी.

Saturday, December 12, 2009

शुभ बोलले...नारायणराव !

राज्यात, देशात ( आणि बहुतेक जगातसुद्धा ) काही मोजकेच नेते सत्य बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यात माननीय नारायणराव राणे यांचा समावेश असणारच, यात कोणीही शंका बाळगण्याचे आता कारण राहिलेले नाही. युतीच्या काळात मुख्यमंत्री असताना ( त्यानंतर अजून तरी नाही.) त्यांनी केलेल्या कामाचे आजही दाखले दिले जातात. ( नंतरच्या काळात काही काम केले का? याचा आता शोध आहे, असं म्हणतात.) नारायणरावांच्या कामाचा झपाटा असा काही होता की, नोकरशहा त्यांना घाबरून असायचे. तो काही येथे आपला मुद्दा नाही.
शिवसेनेत पदांचा बाजार मांडला जात असल्याची तोफ डागत सत्यवचनी नारायणराव राणे यांनी गदारोळ माजवून दिला होता. त्यानंतर अर्थातच त्यांना शिवसेना सोडावी लागली. तर शिवसेनेचा दावा होता की त्यांची हकालपट्टी करण्यात आली. काही का असेना असत्यावर प्रहार करण्याचा राणे यांचा बाणा त्यावेळी सिद्ध झाला. काँग्रेस पक्षात आल्यावरही त्यांनी त्यांची मुख्यमंत्रीपदाची विच्छा लपवून ठेवली नाही. अर्थात त्यांची ही विच्छा काँग्रेसने अजून तरी पूर्ण केलेली नाही. मात्र राणे यांनी हार मानली नाही. दिल्लीला वा-या सुरूच ठेवल्या. अहमद पटेल, मार्गारेट अल्वा, प्रभा राव यांच्या मार्फत फिल्डींग लावून ठेवली. मात्र मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकावणी देणं सुरूच ठेवलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रीपद देण्याचे मान्य केले होते, हे सत्य जाहीरपणे सांगून टाकले.
26/11 च्या हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रीपद गेले. आणि अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. कर्तबगार नारायणराव राणे यांच्यावर पुन्हा अन्याय झाला. आणि राणे यांनी त्यांच्या सत्याचा प्रहार थेट काँग्रेसवरच केला. 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांना काही काँग्रेस नेत्यांनी मदत केल्याचा आरोप करत राणे यांनी त्यांच्या सत्यवचनी स्वभावाचा पुन्हा जगाला प्रत्यय दिला. काही दिवसातच ते त्या नेत्यांची नावेही जाहीर करणार होते. अजून तरी ती जाहीर झाली नसली तरी, काही दिवसातच ती होतील याविषयीही कोणाच्या मनात शंका नाही. मात्र काही हितशत्रूंना नारायणरावांच्या सत्य बोलण्याविषयी शंका आली. आणि त्यांनी न्यायालयात राणेंच्या विरोधात याचिका दाखल केली. वेडे कुठले, राणेंच्या सत्यावर प्रहार करण्याचे पाप कसे करता ?
आणि आताही सत्यवचनी नारायणराव राणे यांनी विविध सामाजिक संस्थांनी केलेले संशोधन आणि सर्वेक्षणाचा दाखला देत शेतक-यांच्या आत्महत्येमागे दारू हे ही एक कारण असल्याचे सत्य उघड केलं आहे. ज्याचा पाया सत्याचा आहे, तो कुणाचीही पर्वा न करता सत्य बोलणारच हे राणे यांनी सिद्ध केलं आहे. नारायणराव राणे यांच्या काँग्रेस पक्षाच्या सरकारने शेतक-यांना इतके पॅकेज दिले. त्यांची कर्जमाफी केली. आणि या शेतक-यांनी त्या पॅकेजची लाज राखली नाही. पॅकेजचा पैसा त्यांनी दारूत उडवला, नशा केली. या नशाबाज शेतक-यांचा नक्शा नारायणराव राणे यांनी उतरवला. त्याबद्दल अखंड महाराष्ट्राने त्यांचे ऋणी राहायला हवे. कारण हे सत्य आहे. नारायणराव राणे काँग्रेसमध्ये असले तरी त्यांचा नाईलाज आहे. कारण त्यांच्याकडे महसूल खाते आहे. राणे यांच्याकडे कृषी खाते किंवा थेट मुख्यमंत्रीपद असते तर त्यांनी शेतक-यांच्या पिकाला जास्तीत जास्त भाव दिला असता. आणि त्यांच्यावर आत्महत्येची किंवा दारू पिण्याची वेळ येवू दिली नसती. राणे यांनी शेतक-यांच्या पिकाला इतका भाव दिला असता की शेतक-यांनी थेट विदेशातूनच दारू मागवून पिली असती.
शिवसेनेनेही या मुद्यावर आता राजकारण करू नये. शेतकरी संघटनांनीही हा मुद्दा लावून धरू नये. कुणी समाधी आंदोलन करू नये. नारायणराव राणे बोलले ते सत्यच. नशाबाज शेतकरी हा महाराष्ट्राला कलंक आहे. तो कलंक धुवून काढण्याचे कार्यच नारायणराव राणे यांनी केलंय. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या कामगिरीबद्दल त्यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार दिला पाहिजे. नसता या सरकारला सत्याची चाड नसल्याचा आरोप सामान्य नागरिकांकडून होईल.

खमंग फोडणी - शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोकण आणि गोवा महामार्गावरील पेट्रोलपंप आणि हॉटेल्समध्ये विदर्भातील शेतक-यांना भागीदार करून घेण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव असल्याची बातमी आहे. बहुतेक हिवाळी अधिवेशनातच तसा कायदाही होणार आहे. पेट्रोलपंप आणि हॉटेलच्या व्यवसायामुळे (धंदा शब्द वापरला नाही.) तरी शेतकरी जगतो का ? याचा अभ्यास आणि संशोधन सामाजिक संस्था करणार आहेत. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांवर लगाम बसेल अशी शक्यताही आता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईत स्वाभिमानने 'पाणी' दाखवल्यावर पोलिसांनी त्यांना फोडून काढले. शेतक-यांनी त्यांच्या स्वाभिमानाचे पाणी दाखवत आसूड ओढला तर....विचार करा....सत्यवचनी.....