Sunday, June 18, 2017

मातोश्रीगडाची लढाई

हिंदूस्थानच्या (अखंड नव्हे) दौ-यावर निघालेला अफझल खान तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येणार अशी वार्ता माध्यमातून प्रकट जाहली होती. स्वराज्यावरील हे सर्वात मोठं संकट. २०१४ पासून हा अफझल्या आणि त्याच्या फौजांनी समस्त सैनिकांच्या जीवाला घोर लावला आहे. महाराष्ट्र मुलखात २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदा, नगर पालिका निवडणुकांमध्ये या फौजांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. इतकंच काय तर या वर्षी आधूनिक स्वराज्याची राजधानी बालेकिल्ला मुंबई नगरीतही या फौजांनी ८२ मोहरा (नगरसेवक) जिंकल्या होत्या.
१९६६ पासून मुंबई इलाक्यात श्रीमान शिवसेनाप्रमुखांची डरकाळी सर्वांच्या परिचयाची होती. १९९० नंतर ही डरकाळी महाराष्ट्रात पसरली. १९९५ मध्ये राज्यात पुन्हा शिवशाही आली होती. अखंड हिंदस्थानात कट्टर हिंदूत्ववादी नेते अशी त्यांची ओळख होती. त्या काळात अफझल खानाचे पूर्वज मातोश्री गडावर मांजरीसारखे दबकत जाऊन मुजरा ठोकायचे. मात्र म्हणतात ना प्रत्येक कुत्र्याचा दिवस येतो. अगदी तसं झालं. दिवस नाही त्यांची वर्ष आली. मातोश्रीगडासमोर माना झुकवणारे आता ललका-या द्यायला लागले.
तीन दिवसांच्या दौ-यात अफझल त्याच्या दौ-याच्या तिस-या दिवशी मातोश्री गडावर येणार असल्याची वार्ता ब्रेकींग न्यूजच्या दवंडीतून पिटली गेली. मातोश्रीगडावर लागलीच सरदारांची बैठक झाली. कलानगरच्या पायथ्याशी मोठा शामियाना उभारावा, अशी कल्पना सूचवण्यात आली. पण ती मान्य झाली नाही. नाही तर सगळ्यांना प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेल्या शामियान्याची आठवण झाली असती. असो. मातोश्रीगडावरच भेटण्याचा कार्यक्रम ठरला. दोन्ही बाजूंकडून प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील असं ठरलं. त्यातील एक जण शामियान्याबाहेर थांबेल आणि इतर दूर राहतील असं ठरलं. त्यानुसार अफझल फौजेतल्या प्रदेशाध्यक्षाला मुख्य बैठकीत नेलं गेलं नाही. या महाराष्ट्र इलाक्याचा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफझलसोबत बैठकीला गेला. मातोश्रीगडाचे उद्धवराजे आणि बालराजे यांच्या सोबत अफझलची एक तास खलबतं झाली. दिल्लीच्या तख्तावर कोणाची निवड करावी,यावर खलबतं झाली. या काळात स्वबळ, खिशातील राजीनामे हे विषय चर्चेला येणार नाहीत याची आधीच बोलणी झाली होती. त्यामुळं वाघनखं आणि बिचवा बाहेर निघाले नाही. मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी वाघनखं, बिचवा बाहेर निघतील. तो पर्यंत स्वराज्यावरील संकट दूर झालं आहे.