Tuesday, February 24, 2015

भुजबळांच्या चौकशीचा निषेध !

मराठी माणूस व्यापार, उद्योग-व्यवसायात प्रगती का करत नाही ? हा प्रश्न अनेक पिढ्यांपासून विचारला जातो. त्याचं उत्तर आहे, ते आपल्या वृत्तीमध्ये. तीच ती खेकड्याची वृत्ती. कोणी जरा चार पैसे (अगदीच शब्दश: घेऊ नका) कमवायला लागलं की, मराठी माणसाच्या पोटात दुखायलाच हवं.
आता हेच पाहा ना. छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ कधी कोणाच्या अध्यात ना मध्यात. आपण भले, आपलं राजकारण भलं आणि आपले उद्योग भले. (उद्योग हा शब्द व्यवसाय या अर्थाने घेतला आहे.) मात्र आता यांच्याच मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. राजकारण्यांनी फक्त काय राजकारणच करायला हवं का ? राजकारण करून उद्योग करू नये, असं कोणी लिहून ठेवलं आहे का ?
मराठी माणसाला आपण जर उकिरडे धुंडाळत असू तर इतरांनीही तेच केले पाहिजे असे वाटते. इतर उद्योगपती विदेशात खाणी विकत घेतात. मात्र आपल्या मराठी माणसापैकी कोणी उद्योग केला, त्यात यशस्वी झाला तर त्याच्याकडे मोठा गुन्हा केल्यासारखं पाहिलं जातं. माजी खासदार समीर भुजबळ, विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांनी जर काही कंपन्या स्थापन केल्या असतील तर त्यात चुकीचं ते काय ? आणि कंपन्या जर फायद्यात चालत असतील तर त्याबद्दल तरी त्यांना दोष कसा द्यायचा ?
आता राजकारणी लोकांच्या कंपन्या तोट्यात चालत का नाहीत ? असा प्रश्न जर कोणी विचारत असेल तर, त्याला माझ्याकडे उत्तर नाही. पण टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी हे सगळे उद्योगपती आहेत. मग आपले भुजबळ, मराठी भुजबळ उद्योगपती असतील तर त्यात वावगं असं काय आहे ? आता पंधरा वर्ष आघाडीचं सरकार होतं. त्या काळात मराठी उद्योजक निर्माण झाला, हे तर खरं म्हणजे आघाडी सरकारचं यशच मानायला हवं. आता युतीचं (की महायुतीचं ?) सरकार आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांनंतर हे सरकारही असंच एखादं राजकारणी कुटुंब उद्योगामध्ये, पोटापाण्याला लावेल. मग त्यांचीही अशीच चौकशी करणार का ? कोणत्याही राजकीय उद्योजकाची चौकशी करूच नका. उलट प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या यशस्वी उद्योजकांची व्याख्यानं ठेवा. यशस्वी उद्योजक कसं व्हावं ? या विषयावर त्यांचं मार्गदर्शन घ्या. तरुण मराठी बेरोजगारांना या नेते कम उद्योजकांनी मोफत मार्गदर्शन करायला हवं. कळू द्या बेरोजगारांना यशस्वी उद्योजक कसं व्हावं....

Saturday, February 21, 2015

धर्म रिटायर, दहशतवाद रिटायर !

मजहब नहीं सिखाता आपसमें बैर रखना,
हिंदी है हम, हिंदी है हम !
कवी इक्बाल यांचं हे गीत शाळेत असताना जोरजोरात म्हटल्याचं सगळ्यांना आठवत असेलच. मजहब नहीं सिखाता आपसमें बैर रखना, अशी रचना करणारे इक्बालच देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तानात गेले. देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावरच झाली होती, हे सत्य आहे. तरीही आपण म्हणत असू की, 'धर्म तोडता नहीं जोडता है', तर तो जोकच म्हणायला हवा. आणि आता तर जगच जणू धार्मिक फाळणीच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं भयावह चित्र निर्माण झालंय. वाढत्या दहशतवादामुळे इस्लामी जग विरूद्ध इतर अशी सरळसरळ फाळणी होण्याचा स्पष्ट धोका दिसतोय. वाढत्या दहशतवादी घटनांमुळे सर्व धर्मीयांच्या मनात दहशतवाद आणि अतिरेकी धर्मप्रेमाच्या विरोधात रोष निर्माण होऊ लागला आहे. कारण प्रत्येकाला रोजच्या जीवनात जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. त्यात पुन्हा दहशतवादाचा धोका, हा संघर्ष आता सामान्यांना नकोसा झाला आहे.
आणि काय तर म्हणे सगळेच धर्म शांततेचा संदेश देतात. सगळे धर्म जर शांततेचा संदेश देत असतील, सर्व धर्मीयांमध्ये संघर्ष का होतोय ? याचं उत्तर मिळू शकेल का ? अर्थात याचं उत्तर मिळणार नाही. पण रोजच्या जीवनात धर्माची गरज उरलेली नाही. आपल्या रोजच्या संघर्षात धर्माचं कोणतंही स्थान नाही.
त्यामुळे मजहब, धर्म, रिलीजन या संकल्पनाच आता रिटायर करण्याची वेळ आली आहे. कारण जगातल्या सर्वच दहशतवादाचं मूळ हे धर्मातच आहे. अगदी पेशावर ते पॅरिस पर्यंतच्या घटना पाहिल्या तरी हे लक्षात येतं. परिणामी धर्म, मजहब या कालबाह्य आणि दहशतवादी संकल्पना डोक्यातून दूर गेल्यासच व्यक्ती एकमेकांकडे माणूस म्हणून पाहू शकतो हे ही तितकंच खरं. अमूक एक्या जातीची किंवा धर्माची व्यक्ती असेल तर तो असाच वागणार, अथवा ते लोकच तसे, ही पूर्वग्रहदूषित मतंही जळून जातील.
धर्म रिटायर झाले तर, यावर गुजराण करणा-या दलालांची रोजी-रोटीच बंद होईल. मग त्यांनाही सामान्यांना गंडवता येणार नाही, फसवणूक करता येणार नाही. पर्यायानं ते ही अंगमेहनत करतील, नेकीनं पैसा कमावतील. म्हणजे जे काम धर्मानं झालं नाही ते धर्म रिटायर झाल्यानं होऊ शकेल.

खमंग फोडणी - जगात खरं पाहिलं तर दोनच धर्म आहेत. त्यातला पहिला शरीरधर्म आणि दुसरा शेजारधर्म. आणि जात म्हणाल तर एकच आणि ती म्हणेज जावयाची जात. कोणाचं या पेक्षा वेगळं मत असेल तर सांगा...

संघर्षशील दादा !


1 फेब्रुवारी 2015 रोजी माझे वडील विठ्ठलराव गोरे यांचं निधन झालं. 11 जानेवारीला वडिलांच्या बाईकला एका कारने धडक दिली होती. संभाजीनगरजवळ नगर रोडवर हा अपघात झाला होता. अपघातानंतर कारचालक पळून गेला. पण जवळच असलेल्या बडवे इंजिनिअरींग कंपनीतल्या कामगारांनी वेळीच धाव घेऊन मदत केली. अर्ध्या तासाच्या आत वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 11 जानेवारीलाच ऑपरेशन झालं. मात्र त्याच दिवसापासून वडील कोमात होते. वयाच्या 65 व्या वर्षी वडिलांनी तब्बल 22 दिवस मृत्यूबरोबर झुंज दिली, संघर्ष केला. वडिलांना आम्ही भावंडं, काका आणि गावाकडची सगळी मंडळी दादाच म्हणायचो.
संघर्ष तर लहानपणापासूनच दादांचा सोबती होता. गंगापूर तालुक्यातल्या आमच्या सोलेगावात शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे पहिलीपासूनच दादांना शिक्षणासाठी घर सोडावं लागलं. मामा आणि आत्याच्या गावाला आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. कासोडा, एकलहरा, म्हारोळा या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण केलं. रोज दहा-दहा किलोमीटर पायपीट केली. नववी-दहावी पर्यंतचं शिक्षण गंगापूरला घेतलं.  गव्हर्मेंट कॉलेजला B.A.चं शिक्षण सुरू असतानाच 1970 मध्ये दादांचा विवाह झाला. 1972च्या भीषण दुष्काळात आईनेही गावाकडे कष्ट केले. 1975 मध्ये वडिलांना परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठात नोकरी मिळाली. त्यानंतर आई-वडील परभणीला गेले. माझा जन्म 1977चा, त्याच वर्षी वडिलांची संभाजीनगरला बदली झाली. 1984 पर्यंत आम्ही तिघे भावंडे आणि आई-वडील कृषी विद्यालयाच्या क्वार्टरमध्ये राहत होतो. त्यानंतर पदमपुरा, नक्षत्रवाडी, पुन्हा क्वार्टर आणि शेवटी उल्का नगरीत घर घेतलं. 1985-86 मध्ये दादांनी गावाकडे विहीर खोदण्यासाठी कर्ज घेतलं, विहीर बांधली. या काळात इतर लोक स्वस्तात प्लॉट घेत होते. मात्र दादांना ओढ होती ती गावाची आणि शेतीची. अर्थात हा सर्व आतबट्ट्याचा व्यवहार ठरला. कर्ज वाढलं. पण याचा आमच्या शिक्षणावर परिणाम झाला नाही. तिघा भावंडांना हवं ते क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. माझा लहाना भाऊ रवींद्र शालेय-महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व आणि वाद-विवाद स्पर्धेत यश मिळवत होता. याचाही वडिलांना अभिमान होता. रवींद्र याच गुणाच्या जोरावर त्याच्या वकिलीच्या क्षेत्रात यशस्वी होतोय. आपल्या कुटुंबातला पहिला वकिल रवींद्र झाल्याचा दादांना सार्थ अभिमान होता. माझी बहिण शिक्षिका झाली. तिला सरकारी नोकरी मिळाली, ते ही लाच न देता. हा प्रसंग वडील वारंवारपणे सांगायचे.
शिक्षणाची आवड असणा-या दादांनी आम्ही लहान असताना M.A. पूर्ण केलं. निरक्षर असणा-या आमच्या आईला साक्षर केलं. लहाण्या काकाचंही शिक्षण पूर्ण केलं. गावाकडे गेल्यावर तसंच लग्न कार्याच्या निमीत्ताने एकत्र आल्यावरही दादा शिक्षणा विषयी बोलायचे. मुलींना शिकवा, त्यांचं लवकर लग्न करू नका, हे सांगायचे. दहावीनंतर कृषी पदविका या अभ्यासक्रमाला अनेकांना दादांनी प्रवेश मिळवून दिला.
2008 मध्ये दादा रिटायर झाले. मात्र त्यानंतर दादा जास्तच अॅक्टिव्ह झाले. गावाकडे संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून शेतीचे उपक्रम सुरू केले. कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, शेतकरी मेळावे या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होतो. शेतक-याच्या पिकाला भाव मिळत नाही, याची त्यांना खंत होती.  मात्र आयुष्याच्या या टप्प्यावर वडील रोज सकाळी एक तास वॉक करायचे. तीन महिन्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनमध्ये दादांचा दुसरा क्रमांक आला होता. सर्व कसं छान सुरू होतं. मात्र त्या अपघाताने दादांना हिरावून मोठा आघात केला. असं असलं तरी सतत संघर्ष करून कधीच हार न मानणारे दादा, भविष्यातही मानसिक बळ देत राहतील.