Tuesday, February 24, 2015

भुजबळांच्या चौकशीचा निषेध !

मराठी माणूस व्यापार, उद्योग-व्यवसायात प्रगती का करत नाही ? हा प्रश्न अनेक पिढ्यांपासून विचारला जातो. त्याचं उत्तर आहे, ते आपल्या वृत्तीमध्ये. तीच ती खेकड्याची वृत्ती. कोणी जरा चार पैसे (अगदीच शब्दश: घेऊ नका) कमवायला लागलं की, मराठी माणसाच्या पोटात दुखायलाच हवं.
आता हेच पाहा ना. छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ कधी कोणाच्या अध्यात ना मध्यात. आपण भले, आपलं राजकारण भलं आणि आपले उद्योग भले. (उद्योग हा शब्द व्यवसाय या अर्थाने घेतला आहे.) मात्र आता यांच्याच मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. राजकारण्यांनी फक्त काय राजकारणच करायला हवं का ? राजकारण करून उद्योग करू नये, असं कोणी लिहून ठेवलं आहे का ?
मराठी माणसाला आपण जर उकिरडे धुंडाळत असू तर इतरांनीही तेच केले पाहिजे असे वाटते. इतर उद्योगपती विदेशात खाणी विकत घेतात. मात्र आपल्या मराठी माणसापैकी कोणी उद्योग केला, त्यात यशस्वी झाला तर त्याच्याकडे मोठा गुन्हा केल्यासारखं पाहिलं जातं. माजी खासदार समीर भुजबळ, विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांनी जर काही कंपन्या स्थापन केल्या असतील तर त्यात चुकीचं ते काय ? आणि कंपन्या जर फायद्यात चालत असतील तर त्याबद्दल तरी त्यांना दोष कसा द्यायचा ?
आता राजकारणी लोकांच्या कंपन्या तोट्यात चालत का नाहीत ? असा प्रश्न जर कोणी विचारत असेल तर, त्याला माझ्याकडे उत्तर नाही. पण टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी हे सगळे उद्योगपती आहेत. मग आपले भुजबळ, मराठी भुजबळ उद्योगपती असतील तर त्यात वावगं असं काय आहे ? आता पंधरा वर्ष आघाडीचं सरकार होतं. त्या काळात मराठी उद्योजक निर्माण झाला, हे तर खरं म्हणजे आघाडी सरकारचं यशच मानायला हवं. आता युतीचं (की महायुतीचं ?) सरकार आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांनंतर हे सरकारही असंच एखादं राजकारणी कुटुंब उद्योगामध्ये, पोटापाण्याला लावेल. मग त्यांचीही अशीच चौकशी करणार का ? कोणत्याही राजकीय उद्योजकाची चौकशी करूच नका. उलट प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या यशस्वी उद्योजकांची व्याख्यानं ठेवा. यशस्वी उद्योजक कसं व्हावं ? या विषयावर त्यांचं मार्गदर्शन घ्या. तरुण मराठी बेरोजगारांना या नेते कम उद्योजकांनी मोफत मार्गदर्शन करायला हवं. कळू द्या बेरोजगारांना यशस्वी उद्योजक कसं व्हावं....

No comments:

Post a Comment