Saturday, March 14, 2015

मुंबई हायकोर्टाचं अभिनंदन !

सार्वजनिक उत्सवांसाठी रस्त्यांवर मंडप उभारणा-या उत्सवमूर्तींचे बांबू हायकोर्टाच्या आदेशामुळे उखडले जाणार आहेत. कारण सार्वजनिक उत्सवांसाठी रस्त्यांवर मंडप नको, असा आदेशच मुंबई हायकोर्टाने दिलाय. इतकंच नव्हे तर रस्त्यावर चालणे हा सर्वसामान्य माणसांचा मूलभूत हक्क आहे. तो हिरावून घेता येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. हायकोर्टाच्या या आदेशामुळे सर्वसामान्य सुखावणार यात शंका नाही. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अर्थात यातही सर्वसामान्यच मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात. उत्सवासाठी भररस्त्यात मंडप टाकले जातात. रस्ते अडवले जातात. याचाही त्रास हा सर्वसामान्य नागरिकांनाच होतो. त्यामुळे हायकोर्टाने घेतलेली ही भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे.
इतकंच नव्हे तर ध्वनीप्रदूषणावरही हायकोर्टाने मत मांडलंय. मोठमोठ्याने वाजवल्या लाऊडस्पीकरचा त्रास होत असल्यास त्याविरोधात कोणालाही तक्रार करण्याची मुभा आहे. त्यासाठीची तक्रार नोंदविण्यासाठी फोन, ई-मेल, एसएमएसद्वारे तक्रार नोंदवण्याची यंत्रणा उभारण्य़ाचे पालिका आणि प्राधिकरणांना राज्य सरकारने निर्देश द्यावे, असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. ही यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत नागरिकांनी 100 नंबरवर तक्रार करावी. तक्रारीची गुप्तता पाळण्याची जबाबदारी ही पोलिसांची असन त्यांनी ती पार पाडावी, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलंय.
रेल्वे स्टेशन, रहदारीचे मार्ग, हॉस्पिटल, टॅक्सी-रिक्षा स्टॅण्ड, शाळा-कॉलेजच्या परिसरात मंडप उभारण्यास आणि लाऊडस्पीकर लावण्यास कायद्याने परवानगी देता येत नाही.
एकंदरीतच आता गणेशोत्सवाची गरज उरली आहे का ? हा ही प्रश्नच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात नागरिकांमध्ये एकजूट करणे, प्रबोधन करणे यासाठी गणेशोत्सव गरजेचा होता. मात्र आता गणेशोत्सव हा राजकीय नेत्यांच्या हातात गेलेला आहे. प्रबोधनाचा भागही कधीच लयाला गेलेला आहे. तीच गत दहीहंडीची झालीय. हा उत्सव तर कधीच राजकीय नेत्यांचा इव्हेंट झालाय. नवरात्रौत्सवातही धार्मिकता कमी आणि धांगडधिंगा जास्त अशी परिस्थिती आहे. या उत्सवांसाठी रस्त्यांवर मंडप लावले जात असल्यानं वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होतो. आता कोर्टाच्या निर्णयानंतर हे चित्र बदलेल अशी आशा आहे. मात्र सर्वपक्षीय राजकीय नेते, अगदी पुरोगामी-प्रतिगामीही या मुद्याकडे कसे पाहतात ? हे ही तितकंच महत्त्वाचं ठरणारं आहे.
रस्त्यावरील मंडपच नव्हे तर सर्वच धर्मांच्या निघणा-या मिरवणुका, जुलूस यांमुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या मुद्याकडेही तितकंच लक्ष देण्याची गरज आहे.

खमंग फोडणी - रस्त्यावर मंडप उभारणं बंद झालं तर रेडिमेड नेते तयार होण्याची प्रक्रिया थांबण्याची शक्यता वाटतेय. मात्र रस्त्यावर मंडप उभारून नेते होण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्यास चांगल्या नेतृत्वाची भरणी होईल.

No comments:

Post a Comment