Sunday, July 21, 2019

आगामी परीक्षा आणि विद्यार्थ्यांची तयारी !

परीक्षा जवळ आल्यावर बरेच विद्यार्थी अभ्यासाची तयारी सुरू करतात. वर्षभर अभ्यास केलेला नसल्यामुळे परीक्षेच्या काळात त्यांची तारांबळ उडते. तर जे अभ्यासू विद्यार्थी असतात ते वर्षभर अभ्यास करतात, परीक्षेची तयारी करत असतात. त्यामुळे त्यांना परीक्षेचं टेन्शन नसतं.
वाचकहो, मी शालेय किंवा महाविद्यीन परीक्षांविषयी बोलत नाही. तर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या राजकीय परीक्षांविषयी बोलतोय. विधानसभेची निवडणूक म्हणजे राजकीय परीक्षाच आहे. मागील परीक्षेत म्हणजे 2014 मध्ये झालेल्या परीक्षेत भाजपनं पहिला तर शिवसेनेनं दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे भाजपला मॉनिटर (सीएम) करण्यात आलं. आणि आश्चर्य म्हणजे त्या वेळी नापास झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या मॉनिटरला स्थिर वर्गासाठी (सरकार) पाठिंबाही दिला होता. अर्थातच त्यामुळे दुसरा क्रमांक मिळवूनी सन्मान मिळत नसल्यानं शिवसेना फटकून वागली. नंतर झालेल्या घटक चाचणी परीक्षेत वेगळा अभ्यास केला. स्वबळावर मॉनिटर होऊ असा नाराही दिला. जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकट्यानंच अभ्यास केला. मात्र लोकसभेच्या सराव परीक्षेत शिवसेनेनं मॉनिटरसोबत जुळवून घेतलं. लोकसभा परीक्षेच्या आधी अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर सर्व नेते मंडळी एकाच वाहनातून आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुढच्या परीक्षेचा अभ्यास एकत्रितपणे करणार असल्याची ग्वाही दिली.

आता परीक्षा अवघी दोन महिन्यांवर आली आहे. मागील पाच वर्षात शिवसेना भाजपने वेगवेगळा अभ्यास करूनही चांगले मार्क मिळवले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परीक्षेत यश मिळवता आलं नाही. त्यातच लोकसभेच्या परीक्षेआधी महाराष्ट्र प्रशालेत वंचित नावाचा विद्यार्थी दाखल झाला. या विद्यार्थ्यानं त्याचा मोठा अभ्यास झाला असल्याचा दावा केला. आता पर्यंत सोडवलेल्या परीक्षेचा दाखला दिला. पहिला नंबर मिळवूच असा दावा केला. पण केलेल्या दाव्यापासून तो विद्यार्थीच वंचित राहिला. तर मनसे या जुन्या विद्यार्थ्यानं परीक्षाच दिली नाही. मात्र नापास झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी या विद्यार्थ्यांना 'कॉपी' पुरवली. मनसेनं चांगले पॉईंट्स काढले. अभ्यास केला. पण मनसेच्या 'कॉपी'चा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला नाही. ते पुन्हा नापास झाले.
विधानसभेच्या परीक्षेसाठी शिवसेना आणि भाजपनं 'आमचं ठरलंय' असं सांगत अभ्यास झाला असल्याचं जाहीर केलं आहे. तसंही महाराष्ट्र वर्गाचा मॉनिटर हा अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध आहेच. 288 मार्कापैकी दोन्ही विद्यार्थ्यांनी 144-144 मार्कांची तयारी केलीय. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे तीन विद्यार्थी एकत्रपणे अभ्यास करण्याची फक्त चर्चाच करत आहेत. त्यांनी अजून पुस्तकही उघडलेलं नाही. काँग्रेसला मनसे हा विद्यार्थी त्यांच्यासोबत अभ्यास करायला नकोय. कारण मनसे सोबत आली तर दुसऱ्या वर्गातल्या परीक्षेत मार्क कमी होण्याची भीती काँग्रेसला वाटते. वंचित या विद्यार्थ्यानं आपल्यासोबत अभ्यास करावा अशी काँग्रेसची इच्छा आहे. पण आपल्याच पुस्तकाप्रमाणे अभ्यास करायचा अशी अट वंचितनं ठेवलीय. त्यामुळे मागच्या रांगेतल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे. काँग्रेस आणि वंचित या विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळे युतीच्या विद्यार्थ्यांना आता किंचितही टेन्शन राहिलेलं नाही, अशी परिस्थिती आहे. या परीक्षेत चांगले मार्क मिळवूच असा विश्वास युतीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीतच या सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासणारे शिक्षक आहेत ते, महाराष्ट्रातले मतदार. हा शिक्षकरूपी मतदार सर्व गोंधळ पाहत आहे. या गोंधळाचा मार्कांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   #संगो #bjp #shivsena #congress #ncp #mns #vba

Thursday, July 11, 2019

वन नेशन, वन स्पोर्ट !


क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवानं देशभरातले क्रिकेट फॅन निराश झाले. क्रिकेट हा देशाताला लोकप्रिय खेळ आहे. भारतात क्रिकेटला धर्म आणि सचिनला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. त्यामुळे क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत झालेला पराभव टीम क्रिकेट फॅन्सच्या जिव्हारी लागणारा ठरला. अर्थात आपल्या देशात क्रिकेटशिवाय इतर खेळ जास्त लोकप्रिय नाहीत. नाही म्हणायला देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. पण हॉकीतला जिंकलो काय आणि हरलो काय, कोणालाच काही वाटत नाही. जगात फुटबॉल प्रचंड लोकप्रिय आहे. पण फुटबॉलमध्येही आपल्या देशाची छाप दिसत नाही.
ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसह चीन आणि युरोपियन देश पदकांची लयलूट करतात. ऑलिम्पिकची मेडल लिस्ट बघताना आपल्याला खालून सुरूवात केली तरच भारत लवकर सापडतो. ऑलिम्पिकमधली सुमार कामगिरी आपल्या जिव्हारी लागत नाही. क्रिकेटला दिलं जाणारं प्रचंड महत्त्व. क्रिकेट स्पर्धांचं जास्त प्रमाणात होणारं आयोजन, आयपीएल या सर्वांमुळे देशातल्या नागरिकांसमोर क्रिकेटशिवाय इतर खेळ येतच नाही. एकाच खेळावर आपला देश अवलंबून आहे. फुटबॉल, हॉकी या सांघिक खेळांना महत्त्व देणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल हॉकी आणि फुटबॉलमध्ये देशाची कामगिरी सुधारणं गरजेचं आहे. तसंच टेनिस, बॅडमिंटन या खेळांमध्येही जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होणं गरजेचं आहे. ऑलिम्पिकमधल्या जिम्नॅस्टिकसह विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपण मेडल मिळवत नाही, तो पर्यंत क्रिकेटची लोकप्रियता कायम राहिल. अर्थात क्रिकेटचा प्रत्येक वर्ल्ड कप टीम इंडिया जिंकू शकत नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नैराश्य निर्माण होतं. हे टाळायचं असेल तर इतर सांघिक आणि वैयक्तिक खेळांची कामगिरी उंचावणं गरजेचं आहे.

खमंग फोडणी - भारताचा सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानं क्रिकेट फॅन निराश झाले. पण मोदीविरोधक प्रचंड खूश झाले. कारण टीम इंडियानं जिंकलेल्या वर्ल्ड कपसोबत नरेंद्र मोदींचा फोटो नसणार, या कल्पनेनंच मोदीविरोधकांना हर्षवायू झाला. नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी झाली पाहिजे या म्हणीची या निमित्तानं आठवण झाली. मोदींचा विरोध मान्य. लोकशाहीत विरोध करणं चुकीचं नाही. पण वर्ल्ड कपमध्ये भारत हारावा इतका मोदीद्वेष योग्य वाटत नाही. पण एक सांगू का, थोडं चुकीचं वाटेल. पण मोदी विरोधक समजू शकतील. 1983 मध्ये भारतानं वर्ल्ड कप जिंकला. इंदिरा गांधींनी टीम इंडियासोबत फोटो काढला. 1984 मध्ये इंदिरा गांधीची दुर्दैवानं हत्या झाली. देशाला मोठा राजकीय नेता आणि पंतप्रधान गमवावा लागला. 2011 मध्ये भारतानं वर्ल्ड कप जिंकला. मनमोहनसिंग यांनी टीम इंडियासोबत फोटो काढला. 2014 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली. 2019 मध्येही काँग्रेसचा पराभव झाला. 2024 मध्येही सत्तेत येण्याची शक्यता नाही.