Sunday, July 21, 2019

आगामी परीक्षा आणि विद्यार्थ्यांची तयारी !

परीक्षा जवळ आल्यावर बरेच विद्यार्थी अभ्यासाची तयारी सुरू करतात. वर्षभर अभ्यास केलेला नसल्यामुळे परीक्षेच्या काळात त्यांची तारांबळ उडते. तर जे अभ्यासू विद्यार्थी असतात ते वर्षभर अभ्यास करतात, परीक्षेची तयारी करत असतात. त्यामुळे त्यांना परीक्षेचं टेन्शन नसतं.
वाचकहो, मी शालेय किंवा महाविद्यीन परीक्षांविषयी बोलत नाही. तर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या राजकीय परीक्षांविषयी बोलतोय. विधानसभेची निवडणूक म्हणजे राजकीय परीक्षाच आहे. मागील परीक्षेत म्हणजे 2014 मध्ये झालेल्या परीक्षेत भाजपनं पहिला तर शिवसेनेनं दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे भाजपला मॉनिटर (सीएम) करण्यात आलं. आणि आश्चर्य म्हणजे त्या वेळी नापास झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या मॉनिटरला स्थिर वर्गासाठी (सरकार) पाठिंबाही दिला होता. अर्थातच त्यामुळे दुसरा क्रमांक मिळवूनी सन्मान मिळत नसल्यानं शिवसेना फटकून वागली. नंतर झालेल्या घटक चाचणी परीक्षेत वेगळा अभ्यास केला. स्वबळावर मॉनिटर होऊ असा नाराही दिला. जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकट्यानंच अभ्यास केला. मात्र लोकसभेच्या सराव परीक्षेत शिवसेनेनं मॉनिटरसोबत जुळवून घेतलं. लोकसभा परीक्षेच्या आधी अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर सर्व नेते मंडळी एकाच वाहनातून आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुढच्या परीक्षेचा अभ्यास एकत्रितपणे करणार असल्याची ग्वाही दिली.

आता परीक्षा अवघी दोन महिन्यांवर आली आहे. मागील पाच वर्षात शिवसेना भाजपने वेगवेगळा अभ्यास करूनही चांगले मार्क मिळवले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परीक्षेत यश मिळवता आलं नाही. त्यातच लोकसभेच्या परीक्षेआधी महाराष्ट्र प्रशालेत वंचित नावाचा विद्यार्थी दाखल झाला. या विद्यार्थ्यानं त्याचा मोठा अभ्यास झाला असल्याचा दावा केला. आता पर्यंत सोडवलेल्या परीक्षेचा दाखला दिला. पहिला नंबर मिळवूच असा दावा केला. पण केलेल्या दाव्यापासून तो विद्यार्थीच वंचित राहिला. तर मनसे या जुन्या विद्यार्थ्यानं परीक्षाच दिली नाही. मात्र नापास झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी या विद्यार्थ्यांना 'कॉपी' पुरवली. मनसेनं चांगले पॉईंट्स काढले. अभ्यास केला. पण मनसेच्या 'कॉपी'चा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला नाही. ते पुन्हा नापास झाले.
विधानसभेच्या परीक्षेसाठी शिवसेना आणि भाजपनं 'आमचं ठरलंय' असं सांगत अभ्यास झाला असल्याचं जाहीर केलं आहे. तसंही महाराष्ट्र वर्गाचा मॉनिटर हा अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध आहेच. 288 मार्कापैकी दोन्ही विद्यार्थ्यांनी 144-144 मार्कांची तयारी केलीय. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे तीन विद्यार्थी एकत्रपणे अभ्यास करण्याची फक्त चर्चाच करत आहेत. त्यांनी अजून पुस्तकही उघडलेलं नाही. काँग्रेसला मनसे हा विद्यार्थी त्यांच्यासोबत अभ्यास करायला नकोय. कारण मनसे सोबत आली तर दुसऱ्या वर्गातल्या परीक्षेत मार्क कमी होण्याची भीती काँग्रेसला वाटते. वंचित या विद्यार्थ्यानं आपल्यासोबत अभ्यास करावा अशी काँग्रेसची इच्छा आहे. पण आपल्याच पुस्तकाप्रमाणे अभ्यास करायचा अशी अट वंचितनं ठेवलीय. त्यामुळे मागच्या रांगेतल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे. काँग्रेस आणि वंचित या विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळे युतीच्या विद्यार्थ्यांना आता किंचितही टेन्शन राहिलेलं नाही, अशी परिस्थिती आहे. या परीक्षेत चांगले मार्क मिळवूच असा विश्वास युतीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीतच या सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासणारे शिक्षक आहेत ते, महाराष्ट्रातले मतदार. हा शिक्षकरूपी मतदार सर्व गोंधळ पाहत आहे. या गोंधळाचा मार्कांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   #संगो #bjp #shivsena #congress #ncp #mns #vba

No comments:

Post a Comment