Monday, August 5, 2019

बाळासाहेबांचं स्वप्न शाहांनी साकारलं !

काश्मीर प्रश्नावर देशात सर्वात आक्रमक भूमिका घेतली ती शिवसेाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. काश्मीरी पंडितांवरील अन्यायाच्या विरोधात बोलणारा एकमेव नेता म्हणजे शिवसेनाप्रमुखच. कलम ३७० हटवण्याची मागणी बाळासाहेब ठाकरेंनी सातत्यानं केली होती. माझ्या हाती जर सत्ता दिली तर कलम ३७० रद्द करेन असं शिवसेनाप्रमुख अनेक जाहीर सभांमध्ये म्हटलं. अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्न अमित शाहांनी साकारलं. काश्मीर प्रश्न आणि दहशतवादावर शिवसेनाप्रमुखांनी त्यांची परखड मतं व्यक्त केली होती. त्यावरून अनेकदा वादही निर्माण झाला होता. पण आता केंद्रातल्या एनडीए सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे राज्यभरात शिवसैनिक जल्लोष करताहेत. शिवसेनाप्रमुखांची इच्छा पूर्ण झाली. दहशतवादामुळे काश्मीरी जनता आणि काश्मीरी पंडित यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पण त्या विषयावर बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणीच भाष्य करत नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही या क्षणी बाळासाहेबांचीच आठवण आली. राज्यभरात रस्त्यांवर शिवसैनिकांचा जल्लोष, मुंबईत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आणि तिकडे दिल्लीत संजय राऊतांनीही राज्यसभेत आनंद व्यक्त केला. संजय राऊत राज्यसभेत बोलत असताना इतर सदस्यही त्यांच्या वक्तव्यांना जोरदार दाद देत होते. 
शिवसेना भाजप ही देशातली सर्वात जुनी युती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ही युती साकारली. हिंदूत्व आणि काश्मीरच्या प्रश्नावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेत्यांचं एकमत होतं.
शिवसेना भाजपमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. पण अनेक महिन्यांनी दोन्ही पक्षांचं एकमत झालं. शिवसेनेनं दिलखुलासपणे भाजपचं अभिनंदन केलं. एकंदरीतच मिशन काश्मीरच्या निमित्तानं दोन्ही पक्षाचं युतीचं नंदनवन पुन्हा बहरलं, असंच म्हणावं लागेल.
तर दुसरीकडे अमित शाह यांच्या मास्टरस्ट्रोकनं देशातलं वातावरणच बदलून गेलं. देशभरात जल्लोष सुरू झाला. काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत देश जल्लोषात बुडून गेला. मुंबईत शिवसेना भवनसमोरही शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलम ३७० हटवण्यासाठी नेहमीच आग्रही होते. काश्मीरच्या मुद्यावरून बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा काँग्रेस आणि पाकिस्तानवर टीका केली. पण शिवसैनिकांसह देशातल्या नागरिकांना जल्लोष करण्याची संधी दिली ती अमित शाह यांनी. अमित शाह हे अत्यंत कठोर निर्णय घेणारे नेते आहेत.  मागील आठवडाभरापासून काश्मीरमधला बंदोबस्त वाढवण्यात आला होता. काश्मीरविषयी मोठा निर्णय घेतला जाणार याची तेव्हाच जाणिव झाली होती. काश्मीरच्या प्रश्नावर भाजपनं नेहमीच आक्रमक भूमिका घेतलीय. अखेर भाजपनं त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याची हिंमत दाखवली. काश्मीरमध्ये असंच घडायला हवं अशी जनतेची इच्छा होती. अखेर तब्बल ७० वर्षांनंतर भळभळती जखमी भरली गेली. त्यामुळे जनता बेभान होऊन जल्लोष करायला लागली. देशात आता पर्यंत काश्मीरविषयी कठोर निर्णय घेण्याची हिंमत कोणीच दाखवली नव्हती. पण अमित शाह यांनी हा निर्णय घेतला. अमित शाह यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधक गर्भगळीत झाले. देशहिताचा आणि देशवासीयांच्या मनात जे आहे ते शाह यांनी करून दाखवलं. भाजपला या निर्णयाचा कितपत राजकीय फायदा होईल, हा पुढचा भाग राहिला. मात्र अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेला हे नक्की.
दहशतवाद हा चर्चेनं नव्हे तर बंदूकीच्या गोळीनं संपतो, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची रोखठोक विचारसरणी. अमित शाह हे भाजपचे असले तरी त्यांची विचारसरणी आणि कृती ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित असल्याचं जाणवतं. ३७० तर सुरूवात आहे. आगामी काळात समान नागरी कायदा देशात लागू होईल, यात आता शंका उरली नाही.

2 comments: