Friday, December 28, 2018

सिनेमा लोकसभा निवडणुकीचा !



लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी भाजपनं आधार घेतलाय तो गांधी कुटुंबावर टीका करण्याचा. तर शिवसेनेला आजही 'ठाकरे' या करिश्माई नावाशिवाय इतर पर्याय नसल्याचं या सिनेमाच्या ट्रेलरवरून स्पष्ट होतं. एकंदरीतच निवडणुकीच्या आधी मतांसाठी हे सिनेमे तयार केलेत का ? असा प्रश्न निर्माण होतो.
2019च्या जानेवारी महिन्यात 'ठाकरे', द ऍक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर आणि एनटीआर हे तीन सिनेमा प्रदर्शित होत आहेत. या तिन्ही सिनेमात राजकीय व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या आहेत. मात्र 'ठाकरे' आणि 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर' वादाच्या भोव-यात अडकलेत.
लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच हे सिनेमा प्रदर्शित करण्याचं टायमिंग साधण्यात आलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुका सत्ताधा-यांसाठी सोप्या नाहीत. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंच्या करिश्म्यावर अवलंबून आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना पक्ष त्यांच्याच करिश्म्यावर वाटचाल करत होता. मात्र आता बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण शिवसेनेची भिस्त अजूनही बाळासाहेब ठाकरेंवरच आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची ही खेळी आहे, हे उघड गुपित आहे.
या सिनेमात मराठी मतदार आणि हिंदूत्ववादी मतदार यांना आवडतील अशा डायलॉगचा भडिमार करण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे वादळ. "वादळ असताना शांत राहयाचं असतं, आणि बाहेर शांतता असताना वादळ निर्माण करायचं असतं", हे बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य. पण शिवसेनाप्रमुखांचं हे वक्तव्य ते हयात नसले तरी तितकंच सत्य ठरलंय. आणि तेही त्यांच्याच आडनावानं त्यांच्यावर निघालेल्या सिनेमाच्या निमित्तानं.
'ठाकरे' सिनेमातल्या शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिरेखेच्या तोंडून निघालेले डायलॉग्ज आजही वादळ निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरले.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चपखल बसेल असाही एक डायलॉग सध्या जोरदार गाजतोय. ठाकरे सिनेमातल्या ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही जोरदार टोला लगावण्यात आलाय. एकंदरीतच काही डायलॉग्ज हे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन स्फोटक करण्यात आलेत, यात शंका नाही.
शिवसेनेसारखीच स्थिती भाजपचीही आहे. कारण भाजपकडेही स्वत:चं सांगण्यासारखं असं काही फारसं नाही. त्यामुळे गांधी कुटुंबावर टीका करण्याशिवाय दुसरा हुकूमी पत्ता भाजपकडे नाही. त्यामुळे या सिनेमातून भाजपला काँग्रेसवर जी टीका अपेक्षित आहे किंवा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची बदनामी करायची आहे तितकी करण्याची संधी साधून घेण्यात आली आहे, असं ट्रेलरवरून तरी दिसतं.

सिनेमात गांधी कुटुंबाला व्हिलन ठरवलं जात नाही ना, असाही प्रश्न निर्माण होतो. कारण मनमोहन सिंग यांची चितारण्यात आलेली व्यक्तीरेखा ही जाणूनबुजून त्यांना दुबळं दाखवण्याचा प्रयत्न आहे का ? अशी शंका उपस्थित व्हायला वाव आहे. कारण अनुपम खेर यांनी साकारलेल्या व्क्तीरेखेत मनमोहन सिंग यांचे सर्व संवाद हे दुय्यम असल्याचं लक्षात येतं. त्यांची बॉडी लँग्वेज ही पराभूत मानसिकता दाखवणारी असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं.
या सिनेमात राहुल गांधी हे मोबाईलवर खेळत असताना दाखवण्यात आलं आहे. या दृश्यातून त्यांना बालिश दाखवण्याचा प्रयत्न केला तर नाही ना, अशी शंका येते. पण हे इथंच थांबत नाही. कलंकित नेत्यांना निवडणुका लढवण्यापासून रोखणारा अध्यादेश काँग्रेस सरकार काढणार होतं. पण त्या आधी दिल्ली पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी मनमोहन सिंग यांच्यावर टीका करत तो अध्यादेश फाडून टाकला होता. हे दृश्यही सिनेमात चित्रीत करण्यात आलं आहे.
यूपीएचं सरकार मनमोहन सिंग नव्हे तर सोनिया गांधी चालवत होत्या, असाच सूर या सिनेमात लावण्यात आल्याचं दिसतंय.
एकंदरीतच द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर सिनेमाचा ट्रेलर पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप होण्याची शक्यता आहे. सिनेमा रिलीज होईपर्यंत राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
#संगो #बाळासाहेब #शिवसेना #भाजप #काँग्रेस #LOKSABHA2019

Sunday, December 23, 2018

टीव्हीतली माणसं

10 जुलै 2003 रोजी मी हैदराबादला ई टीव्ही मराठीच्या प्रोग्रामींग विभागात रुजू झालो होतो. त्यानंतर साधारणत: सात-आठ महिन्यांनी सुट्टी काढून संभाजीनगरला आलो. (त्या काळी सुट्ट्या मिळत होत्या.) संभाजीनगर शेजारीच असलेल्या आमच्या मूळ गावी सोलेगावला गेलो. आजीला भेटलो. आजीच्या शेजारी दुसरी एक महिला होती. त्यांनी विचारलं, तुमचा नातू काय करतो ? आजीनं सांगितलं, त्यो टिहीत रंग भरितो.
आजीला वाटलं मी ई टीव्ही म्हणजेच टीव्हीचं उत्पादन करणा-या कंपनीत काम करत आहे. अर्थात टीव्हीत कधी रंग भरलेच नाही, असं नाही. कारण 1999 मध्ये चितेगावमधल्या व्हिडीओकॉन इंटरनॅशनल कंपनीत ट्रेनी म्हणून काम केलं होतं. त्यावेळी त्याच कंपनीत पर्मनंट होऊन सुखात आयुष्य घालवू असा विचार केला होता. पण या कंपन्या बदमाश असतात. अकरा महिन्यानंतर घरी पाठवतात. असं केलं नाही तर ट्रेनींना पर्मनंट करावं लागतं. व्हिडीओकॉननं मला पर्मनंट केलं नाही. आता बघा व्हिडीओकॉनची काय अवस्था झाली आहे. माझ्या सारख्या ट्रेनी कामगारांचे तळतळाट भोवले, दुसरं काय.
फेसबुक, यु ट्यूब, इंटरनेट अशी मनोरंजनाची अनेक साधणं आली असली तरी टीव्ही आजही आपलं महत्व राखून आहे. टीव्हीवर दिसणारी प्रतिमा हेच तिचं मुख्य बलस्थान आहे. व्हिडीओकॉन कंपनीत टीव्ही तयार करत असताना, या अशाच टीव्हीत आपण कधी दिसू असं स्वप्नही कधी पडलं नव्हतं. अर्थात आता पर्यंत जी काही स्वप्नं पडली, ती खरी झाली असंही झालेलं नाही. 
ई टीव्ही प्रोग्रामींगमध्ये असताना रघुनंदन बर्वे, विजय गालफाडे, अरविंद पाटील, कौराजी गावंडे या 'सज्जनां'चा सहवास लाभला. तिथं असणारं ऋषीतुल्य व्यक्तीमत्व म्हणजे राज साळोखे यांचा 'सत्संग' घडला. तर प्रकाश फडणीस या अवलिया माणसाकडून बरंच काही शिकायला मिळालं. ई टीव्हीला हैदराबादमध्ये जास्तीत जासत ईनहाऊस प्रोग्राम व्हायचे. फुलोरा, गाणे तुमचे आमचे, दर्शन हे कार्यक्रम आम्ही करत असू. नवं काही तरी करायचं म्हणून फुलोरा या कार्यक्रमात स्किट करण्याचं ठरलं. बाहेरून तीन-चारच कलाकार आणले. जास्त कलाकार आणले असते तर बजेट वाढणार होतं. त्यामुळे मी आणि रघुनंदननं त्या स्किटमध्ये अभिनय केला. ती स्किट ई टीव्हीवरून प्रसारित झाली. माझ्या सारख्या माणसाचा फोटो कधी पेपरमध्ये छापून येईल असं वाटायचं नाही, तो टीव्हीवर अभिनय करताना दिसला. फुलोरा, दर्शनमध्ये दिग्दर्शक म्हणूनही संतोष गोरे हे नाव दररोज जात होतं. हे सर्व स्वप्नवतच होतं. 
त्यानंतर ई टीव्ही न्यूजमध्ये बदली करून घेतली. अमरावतीमध्ये रिपोर्टिंग करताना अनेक पीटीसी न्यूज पॅकेजमध्ये ऑनएअर गेले. नंतर tv9 मध्येही अनेकदा लाईव्ह दिलं. टीव्ही पाहणारा माझ्या सारखा सामान्य माणूस टीव्हीतला माणूस बनला. पण आताच्या काळात टीव्हीत दिसणं हे काही अप्रूप राहिलेलं नाही. कारण फेसबुक लाईव्ह करूनही तुम्ही तुमच्या भावना, मतं अनेकांपर्यंत पोहचवू शकतात. तुमचे व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड करू शकता. अगदी स्वत:चं यू ट्यूब चॅनेलही काढू शकता. वेगवेगळ्या माध्यमातून लाईव्ह करू शकता. परिणामी सोशल मीडियामुळे सामान्य नागरिकांनाही चेहरा मिळाला आहे. तुमचा चेहरा झळकण्यासाठी आता फक्त टीव्हीवरच अवलंबून राहण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
अर्थात सगळ्यांचाच चेहरा काही धड नसतो (माझ्यासकट). पण तो चेहरा कुठे तरी दिसावा, आपल्याला लोकांनी ओळखावं असं वाटण्यात काहीच चूक नाही. टीव्हीतली माणसं जशी फेमस होतात तशी आता सोशल मीडियातली माणसंही फेमस होऊ लागली आहे. मी कंपनीत असताना जसे टीव्हीत रंग भरले, तसेच रंग आता अनेक युवक सोशल मीडियात भरत आहेत.
खमंग फोडणी - टेलिव्हिजनमध्ये आतापर्यंत 15 वर्ष काढली आहेत. चार चॅनेलमध्ये काम केलंय, म्हणजे नोकरीच केली. पण कधी चॅनेलचा मालक होईल असा विचारही कधी मनाला शिवला नाही. पण माझा मुलगा चॅनेलचा मालक झालाय. विश्वास बसणार नाही, पण तो चॅनेलचा मालक आहे. त्यानं स्वत:चं यू ट्यूब चॅनेल काढलं आहे. काळाचा महिमा. #संगो

Saturday, December 8, 2018

भाजपची EXIT, POLL मध्ये काँग्रेसची बाजी ?


2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं अनेक मोठे विजय मिळवला. ख-या अर्थानं भाजपला अच्छे दिन आले. पण राजकारणाचं वारं कधी पलटेल याचा नेम नसतो. शुक्रवारी एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाले. आणि आता काँग्रेसचे अच्छे दिन येणार, असे संकेत मिळू लागले आहेत.राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र या तिन्ही राज्यांमध्ये मतदार बदल घडवण्याच्या मनस्थितीत असल्याचं एक्झिट पोलच्या निष्कर्षावरून स्पष्ट झालंय. एक्झिट पोलप्रमाणे जर कौल मिळाला तर राज्यातलं राजकारण झपाट्यानं बदलणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला राजस्थान, मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागात मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलीही परिस्थिती काही वेगळी नाही. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी मोदी आणि फडणवीस यांना मनी ऑर्डर पाठवून त्यांचा रोष व्यक्त करत आहेत. इतर पिकांनाही भाव देण्यात सरकार अपयशी ठरलंय. परिणामी शेतक-यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. तर कर्जमाफीचा घोळ मिटला अजून मिटलेला नाही. त्यामुळे शेतक-यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. दुष्काळ जाहीर करण्यात मोठा वेळ घेतला गेला. दुष्काळाची मदत शेतक-यांना मिळालेली नाही. ग्रामीण भागात यामुळे मोठा रोष पसरलेला आहे.
एक्झिट पोलच्या निष्कर्षाप्रमाणे निकाल लागले तर भाजप कमजोर होईल. शिवसेनेसमोर तोरा मिरवणा-या भाजपला बॅकफूटवर जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. जागावाटपाच्या बोलणीत भाजपचा नव्हे तर शिवसेनेचा शब्द अंतिम असेल. आधी लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात शिवसेना त्यांच्या अटी-शर्तींवर बोलणी करेल. मागील साडेचार वर्षांपासून अवमान सहन करणारी शिवसेना उट्टे काढणार यात शंका नाही.  त्यामुळे भाजप पडती बाजू घेऊन शहाणपण दाखवले की स्वबळाचा नारा देईल याचा अंदाज आता काढता येणं अवघड आहे.
सत्तेच्या मस्तीत असलेल्या भाजपला इतके दिवस त्यांच्या विरोधात असलेला रोष दिसत नव्हता. सामान्यांचा संताप समजत नव्हता. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि एनडीएतल्या पक्षांनाही किंमत दिली जात नव्हती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर आता मोठं आव्हान असेल. अच्छे दिनचं स्वप्न दाखवणा-या भाजपचे बुरे दिन आता सुरू झालेत, हे मात्र खरं.

Saturday, November 24, 2018

मुंबई टू अयोध्या

उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही अयोध्येला भेट दिली नव्हती. तरीही राम मंदिर प्रकरणात त्यांची नेहमीच चर्चा होते. कारण 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर देशभरात आगडोंब उसळला. मात्र मंदिर वहीं बनायेंगे अशी घोषणा देणारे भाजपचे नेते बॅकफूटवर आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मशीद पाडली नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
तर अयोध्येत न जाता फक्त मुंबईत बसून बाळासाहेब ठाकरेंनी बाजी पलटवून टाकली. "जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर त्यांचा अभिमान वाटतो", असं वक्तव्य करून बाळासाहेब ठाकरेंनी खळबळ उडवून दिली. देशासह जगभरातल्या मीडियात फक्त बाळासाहेब ठाकरेंची चर्चा सुरू झाली. भारतातले सर्वात मोठे हिंदूत्ववादी नेते अशी त्यांची ओळख जगभरात बनली.
अर्थात मराठी माणसाचा मुद्दा घेऊन जन्माला आलेल्या शिवसेनेला हिंदूत्वाचं कधीच वावगं नव्हतं. 1989 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी गर्व से कहो हम हिंदू हैं, असा नारा देत हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतला. तर आता 26 वर्षांनंतर उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेताना 'पहले मंदिर फिर सरकार', ही घोषणा दिली. 
मराठीचा मुद्दा सत्तेवर येण्याइतकी मतं मिळवून देत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदूत्वाचा कैवार घेतलाय. त्यामुळे चलो अयोध्या, हा नारा देत उद्धव ठाकरे शिवसैनिकांसह अयोध्येत पोहोचले. तिथं त्यांचं जोरदार स्वागत झालं. अयोध्येत त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. तसंच मंदिर बांधण्यासाठी सरकारनं विधायक आणावं, त्याला शिवसेना पाठींबा देईल असंही स्पष्ट केलं.
स्पष्ट बहुमत असूनही मंदिर बनत नाही, या मुद्याकडे लक्ष वेधून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. मंदिर कधी बांधणार याची तारीख हवी, असं बोलून त्यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंदिर बांधून झाल्यावर भक्त होऊन दर्शनासाठी येईल असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. लक्ष्मण किलावर त्यांनी उपस्थिती लावली. पूजा केली. शरयू नदीवरील आरतीमध्येही त्यांनी सहभाग घेतला. एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी तिथं कारसेवाच केली. महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक त्यांनी अयोध्येत नेऊन शक्ति प्रदर्शन केलं. इतकंच नव्हे तर देशभरातल्या मीडियाचं लक्षही वेधून घेतलं.
शिवसेनाप्रमखांचा 1992 मधला कालखंड आणि आता 2018 मधला उद्धव ठाकरेंची अयोध्या भेट यात मोठा फरक आहे.  1989 पासून हा राम मंदिराचा मुद्दा तापायला सुरूवात झाली होती. त्यामुळे शिवसेनेनंही, हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व असा नारा दिला. राजकारणाची दिशा ओळखून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतला. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या. मुंबईतही मोठ्या प्रमाणात दंगल पेटली. त्यावेळी शिवसैनिकांनी हिंदूंचं रक्षण केलं असा दावा शिवसेनेकडून आजही केला जातो. दंगलींनंतर 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बारा बॉम्बस्फोट झाले. महाराष्ट्र आणि देशभरात धार्मिक राजकारण, दंगली यामुळे मतांचं ध्रवीकरण झालं. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं राज्यात सर्वाधिक 75 जागा जिंकल्या. या यशाला किनार होती ती, बाबरी मशीद पाडणं, जातीय दंगली आणि मुंबईतल्या बॉम्बस्फोटांची. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद, बॉम्बस्फोट, दंगली या मुद्दांचं त्यांच्या भाषणात चांगलंच भांडवल केलं. तेव्हा हे सर्व मुद्दे ताजे होते. निवडणुकांपर्यंत या मुद्यांची धग जाणवत होती. पण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तशी परिस्थिती नाही. राम मंदिराच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. मतदारांना मंदिर मशीद नव्हे तर विकासाचे मुद्दे हवे आहेत. त्यातच निवडणुकांना अजून पाच महिने तरी अवकाश आहे. त्यामुळे राम मंदिराचा हा मुद्दा निवडणुकीपर्यंत जीवंत ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे. 
राजकारणात 26 वर्ष हा काही छोटा कालखंड नसतो. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. 26 वर्षांपूर्वीचा मुद्दा आता पुन्हा चालेलच याची कोणतीही खात्री नाही. 26 वर्षांपूर्वी देशात असलेली स्थिती आता बदलली आहे. आताची युवा पिढी ही करिअरवर लक्ष देणारी आहे. शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. जागतिकीकरणामुळे अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर - मशीद हे भावनिक मुद्दे आताच्या पिढीला तितकेसे आकर्षित करतील का ? याबद्दल साशंकताच आहे.
उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन शक्ति प्रदर्शन करण्यात यशस्वी झाले. त्यांनी सर्व मीडियाचा फोकस स्वत:वर केंद्रीत करण्यात यश मिळवलं. पण 1995 मध्ये बाबरीमुळे बाळासाहेब ठाकरेंना जसा फायदा झाला  तसा फायदा राम मंदिराच्या मुद्यामुळे उद्धव ठाकरेंना 2019 च्या निवडणुकीत होईल का ? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी काही काळ जावा लागेल.

Wednesday, October 24, 2018

दुष्काळातली समुद्र संजीवनी

राज्यावर असलेली दुष्काळाची छाया आता गडद होत चालली आहे. सरणारा प्रत्येक दिवस भीषण दुष्काळाकडे पाऊल टाकत चालला आहे. यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी बरसला. त्यामुळे राज्यावर मोठं संकट निर्माण झालं. राज्य सरकार जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसाठा तसंच जमिनीतील पाण्याची पातळी उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यंदा निसर्गानं साथ दिली नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी होणं अशक्यच आहे. निसर्गासमोर सगळेच हतबल आहेत. त्याला सरकारही अपवाद नाही.
पण याच निसर्गानं महाराष्ट्राला भला मोठा समुद्रकिनारा दिलेला आहे. हे पाणी वापरलं जाऊ शकतं. हे पाणी खारं असलं तरी अत्याधुनिक शोधांमुळे हेच पाणी पिण्यालायक करता येणं शक्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इस्त्रायलच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी एका यंत्रातून पिण्यालायक झालेलं समुद्राचं पाणी या दोन्ही नेत्यांनी प्यायलं होतं. त्याविषयीच्या बातम्या आणि फोटो जगभरात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर भारत दौ-यावर आलेले इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी, समुद्री जल शुद्धीकरणाचं ते यंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं होतं. जीपमध्ये बसवण्यात आलेलं हे यंत्र गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात बीएसएफला देण्यात आलं.
इस्त्रायलनं लावलेला हा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून दोन्ही देशांमध्ये संरक्षण विषयक अनेक करारही झाले आहे. इस्त्रायलमधल्या कृषी तंत्रज्ञानानं महाराष्ट्राला मागील दोन दशकांपासून भूरळ घातलेली आहे. लहरी हवामानाचा फटका महाराष्ट्राला बसतोय. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. परिणामी आता ईस्त्रायलचं समुद्री जल शुद्धिकरणातलं तंत्रज्ञान महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. 

दोन्ही देशांमधली मैत्री पाहता हे तंत्रज्ञान भारताला देताना इस्त्रायलकडून कोणतीही अडचण येणार नाही.
राज्याला लाभलेल्या विस्तृत समुद्र किना-यांवर इस्त्रायलच्या मदतीनं मोठे प्रकल्प टाकून समुद्रातलं खारं पाणी शुद्ध करणं गरजेचं आहे. यातून मुंबईची तहान भागवता येईल. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या पालघर जिल्ह्यातील धरणांमधील पाणी इतर टंचाई असलेल्या जिल्ह्यांमधल्या नागरिकां पुरवता येईल. मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये असे प्रकल्प तयार करून ते पाणी राज्यात पुरवता येईल. अर्थात त्यासाठी होणारा खर्च हा मोठा असेल. पण राज्यातल्या दुष्काळग्रस्त नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी होणार हा खर्च परवडणारा आहे. 
महाराष्ट्रच नव्हे तर देशातील इतर राज्यांनाही मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्या भागांमध्येही समुद्री जल शुद्धिकरणाचे मोठे प्रकल्प तयार करता येऊ शकतील. अर्थात हा प्रकल्प किंवा उद्योग खर्चिक आहे, अशी टीकाही होऊ शकेल. त्यात चूक असं काहीच नाही. पण समुद्राचं पाणी विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. तर दुसरीकडे आपलेच बांधव पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. मुक्या जीवांचेही हाल होत आहेत. शेतीचं मोठं नुकसान होत आहे. परिणामी हेच अमर्याद असलेलं समुद्राचं पाणी शुद्ध करून राज्यातल्या गरजूंपर्यंत लवकरात लवकर पोहोचवणं गरजेचं आहे. 

Monday, May 28, 2018

थर्ड क्लास !

सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची मजाच काही और होती. मल्टिस्क्रिनमधला प्रेक्षक वर्ग हा हातचं राखून सिनेमा पाहणारा. ना शिट्ट्यांचा आवाज ना टाळ्यांचा. नाही म्हणायला मोठा आवाज होणार नाही, याची काळजी घेत हसणारा प्रेक्षक. तर याच्या उलट चित्र सिंगल स्क्रिनमध्ये असायचं. हिरोच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांचा आवाज असायचा. पण वाढत्या मल्टिस्क्रिनमुळे दर्दी प्रेक्षक कमी होत चालला आहे. सिंगल स्क्रिनमध्ये तिकीटांचे दर जास्त नसायचे. बाल्कनी, फर्स्ट क्लास आणि थर्ड क्लास अशी तिकीटांची उतरंड होती. पण प्रत्येकाला परवडेल त्या प्रमाणे तिकीट काढता येत होतं. मल्टिस्क्रिनमधला माजोरडेपणा तिथं नव्हता. इंटर्व्हलमध्ये खाल्लेल्या दोन रुपयाच्या समोस्याची चव अजूनही आठवते. मुंबईत तर असं म्हणतात की, एका फेमस समोस्यावाल्याकडून २० रूपयात दोन समोसे खरेदी करतात. आणि तेच मल्टिप्लेक्समध्ये ६० रुपयाला विकतात. १२० रुपयात पॉपकॉर्न विकत घेऊन खरेदी करणा-याच्या जीवाची 'लाहीलाही' सिंगल स्क्रिनमध्ये होत नव्हती.
ते जाऊ द्या. कारण आपल्या ब्लॉगचा आजचा विषय हा काही अर्थकारणाचा नाही. तर थर्ड क्लासचा आहे. मैने प्यार किया हा सिनेमा मी आठवीत असताना थर्ड क्लासमध्ये पाहिला होता. संभाजीनगरला अंजली थिएटरमध्ये हा सिनेमा पाहिला होता. त्या काळी संभाजीनगरमधलं सर्वात भारी थिएटर म्हणजे अंजली थिएटर होते. ते मला खूप आवडायचं. त्यामुळे मला पत्नीही अंजली नावाचीच मिळाली.
सिनेमा तर बघायचा होता पण जवळ पैसे नव्हते. नेमकी तेव्हा दिवाळी होती. लक्ष्मीपूजन झालेलं होतं. नेमके तीन रुपये घेतले. (ढापले म्हणा किंवा चोरी केली म्हणा.) बसचा पास असल्यानं जाण्या-येण्याची पैशाची चिंता नव्हती. तडक अंजली थिएटर गाठलं. थर्ड क्लासच्या लाईनमध्ये उभा राहिलो. बुकींगवाल्याकडे पैसे दिले. पण चोरी पकडली गेलीच. पैशांना कुंकू लागलेलं होतं. बुकींगवाला हसत म्हणाला, लक्ष्मीपूजनाचे पैसे आणले का ?. पण त्यानं तिकीट दिलं. बहुतेक माझ्या आधी काही मुलं लक्ष्मीपूजनाचे पैसे घेऊन आले असतील. लाल रंगाचं तिकीट मिळालं. डिग्री मिळाल्यावर एखाद्याला जसा आनंद व्हावा तसा मला झाला. ते लाल तिकीट घेऊन सर्वात पुढे बसलो. मेरे रंग में रंगने वाली, या गाण्याचे रंग जवळून अनुभवता आले.
मी आणि माझा मित्र रिंकू त्रिवेदी कोळसे सर कडे ट्युशनला जायचो. कोळसे सर वाल्मीमध्ये (water and land management institute) नोकरीला होते. त्यांच्या ऑफिसकडून आम्हाला ते अजिंठ्याला नेणार होते. ऐनवेळी हा प्रोग्राम कॅन्सल झाला. पण अजिंठ्याला जायचं असल्यानं घरून पैसे घेतलेले होते. लगेच प्लॅन शिजला आमचा अवली मित्र राजू शिंदे याला बरोबर घेतलं. अंबा किंवा अप्सरा थिएटरला मिथूनचा प्रेम प्रतिज्ञा सिनेमा चित्रपट बघितला. दिवसभर खाण्यासाठी पैसे लागणार होते. त्यामुळे हा सिनेमाही थर्ड क्लासमध्ये पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
१९९१ मध्ये मी, माझा भाऊ रवींद्र, मित्र संभाजी शिरसाट, त्याचा भाऊ मंगेश असे सर्व २६ जानेवारी रोजी सिनेमा बघायला बाहेर पडलो. पण त्या दिवशी सर्व थिएटरवाल्यांनी बंद पुकारला होता. परिणामी सिनेमा तर काही बघायला मिळाला नाही. पण जाण्यायेण्यात आणि हॉटेलमध्ये पैसे खर्च झाले. थोडे पैसे उरले. दुस-या दिवशी मी आणि संभाजीनं प्लॅन केला. रवींद्र आणि मंगेशला काहीही न सांगता गुपचूप सिनेमा बघायला गेलो. पैसे कमी असल्यानं पुन्हा थर्ड क्लासचं तिकीट काढलं. मिथूनचा प्यार का देवता हा सिनेमा बघितला. मिथूनला गरिबांचा अमिताभ, का म्हणतात हे त्यामुळे लक्षात आलं.
पण मी आणि संभाजी सिनेमा बघायला गेलो, ही बातमी फुटलीच. आपल्याला सोडून भाऊ सिनेमा बघायला गेले याचा रवींद्र आणि मंगेशच्या बालमनावर मोठा परिणाम झाला. बरेच दिवस त्यांना अन्नपाणी गोड लागलं नाही.
काही महिन्यांनी संभाजी, मंगेश जालन्याला राहायला गेले. जालन्यातले थिएटर त्या काळी तरी काही धड नव्हते. १९९२ मध्ये माधुरी दीक्षितचा बेटा सिनेमा लागला होता. संभाजी माधुरीचा जबरदस्त फॅन. सिनेमा तो बघण्यासाठी संभाजी जालन्याहून आला. आम्ही दोघे सादिया थिएटरला पोहोचलो. संभाजीने येताना जास्त पैसे आणले होते. पण सिनेमा हाऊसफुल्ल झालेला होता. तिकीटं संपली होती. पण ब्लॅक वाल्यांकडे तिकीट होती. फर्स्ट क्लासचं तिकीट होतं १५ रुपयाला. दोघांचे मिळून ३० रुपये होत होते. पण संभाजीकडे ४०च रुपये होते. ब्लॅक वाल्याला परिस्थिती समजावून सांगितली. मित्र जालन्याहून आलेला आहे, पैसे कमी आहेत. आणि आश्चर्य घडलं. ब्लॅकवाल्यानं ३०ची दोन तिकीटं ४० रुपयात दिली. ब्लॅकवाला असला तरी त्याच्या मनात काळंबेरं नव्हतं.
पण कोणताच क्लास नसलेल्या अशा टुरिंग टॉकिज म्हणजेच तंबूतही सिनेमा पाहण्याचं भाग्य मला लाभलं. साधारणपणे चौथी किंवा पाचवीत असताना टुरिंग टॉकिजमध्ये सिनेमा पाहिलेले आहेत. गंगापूर तालुक्यातलं आमचं गाव सोलेगाव. तिथून जवळ असलेल्या रांजणगावमध्ये उन्हाळ्यात उर्स भरायचा. उर्सासाठी टूरिंग टॉकिज आलेल्या असायच्या. रात्री बैलगाडीतून काकासोबत आम्ही रांजणगावला निघायचो. माझे अंकुश काका हे ही सिनेरसिक होते. गावातून अनेक गाड्या रांजणगावला जायच्या. दर्शन ऊरकून कधी एकदा तंबूत घुसतो याची घाई असायची. बरेच सिनेमे पाहिले. पण सध्या फक्त लोहा हाच सिनेमा आठवतोय. तिकीट काढा आणि कुठेही जागा धरून बसा. सगळ्यांचा एकच क्लास. ना बाल्कनी, ना फर्स्ट क्लास, ना थर्ड क्लास. अशी समानता तिथं होती. पण या मल्टिप्लेक्स आणि मल्टिस्क्रिनमध्ये समानताच नाही. सगळा पैशांचा खेळ. त्यामुळे पांढरपेशा वर्गच तिथं पाहायला मिळतो. कमी पैसे असलेला थर्ड क्लासच त्यांनी बाद केला आहे.

Sunday, February 11, 2018

दाळ-बट्टी रोजगार योजना !

दाळ-बट्टी माझा आवडता पदार्थ, मला करताही येतो. दाळ-बट्टीला गंगापूर तालुक्यात बट्ट्या, बाफळ्या म्हटलं जातं. तर राजस्थानी लोक त्याला दाल-बाटी म्हणतात. मराठवाड्यात अनेक ठिकाणी नवरदेवाकडून जेव्हा गाव पंगत असते त्यावेळी दाळ-बट्टी केली जाते. तसंच आता हुरड्याच्या कार्यक्रमातही दाळ-बट्टी करण्याकडे कल वाढला आहे.
दाळ-बट्टी ही दोन प्रकारे करता येते. त्यातला पहिला प्रकार म्हणजे गव्हाचं जाड पीठ, मक्याचं पीठ आणि थोडासा रवा एकत्र करून ते पीठ मिसळून घ्यावं. त्यात ओवा, चवी प्रमाणे मीठ टाकावं. थोडासा सोडा टाकावा म्हणजे बट्टी खुसखुशीत होते. पीठ मळून झाल्यावर त्याचे लाडू सारखे गोळे करून घ्यावे. नंतर हे गोळे उकळत्या पाण्यात उकडून काढावे. उकडून काढलेल्या गोळ्यांचे थंड झाल्यावर, चार तुकडे करावे. ते तुम्ही तेलात किंवा गावरान तुपात तळून काढू शकतात. ज्या पाण्यात हे गोळे उकळून काढले तेच पाणी दाळ (वरण) करण्यासाठी वापरावं. त्यामुळे दाळही चवदार होते. 
गावाकडे दाळ-बट्टी करताना वेगळी पद्धत वापरली जाते. गव्हाचं जाडसर पीठ ओवा टाकून मळलं जातं. त्याचे गोळे केले जातात. एक छोटासा खड्डा खणून त्यात गोव-या जाळल्या जातात. चांगला विस्तव झाल्यावर त्यात गोळे चांगले भाजले जातात. ही झाली विस्तवावर तयार केलेली बट्टी. गावजेवणासाठी ही दाळ-बट्टी  चांगलीच लोकप्रिय आहे.
सध्या पकोडा रोजगार योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावरून सुरू असलेल्या गरम राजकारणात अनेक जण पकोडे तळत आहेत. तर मग मी माझी बट्टी का का तळू नये ? मागे पुढे दाळ-बट्टीचा व्यवसाय सुरू करण्याचाही एक सुप्त विचार आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत माझ्या हातची बट्टी चाखली आहे, त्या सर्वांनीच मला व्यवसायात उडी मारण्याचा सल्ला दिला आहे. बघू यात...

Saturday, January 6, 2018

ढिम्म सरकार, ३ दिवस हिंसाचार

भीमा कोरेगावसह सणसवाडी, वढू बुद्रूक, शिरुर परिसरात १ जानेवारी रोजी भयानक हिंसाचार झाला. भीमा कोरेगावमधल्या विजयस्तंभावर येणा-या अनुयायांवर हल्ले करण्यात आले. त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. हा हल्ला जरी एक तारखेला झाला असला तरी त्याची तयारी ब-याच महिन्यांपासून सुरू होती. या भागात पद्धतशीरपणे मराठा युवकांचं ब्रेन वॉश करण्यात आलं होतं, याची माहिती आता उघड झाली आहे. या ब्रेन वॉशमधूनच गोविंद गायकवाड यांच्या समाधीची मोडतोड करण्यात आली. संभाजी महाराजांच्या मृतदेहाचे तुकडे एकत्र करून गोविंद गायकवाड यांनी अंत्यसंस्कार केले होते. नंतर या गोविंद गायकवाड यांनाही मोघलांनी मारून टाकलं होतं. हा बहुजनांच्या एकतेचा इतिहास बदलून टाकण्याचा विडाच जातियवादी संघटनांनी घेतलेला आहे. गोविंद गायकवाड यांचं कर्तृत्व नाकारण्यात आलं. मराठा तरूणांना भडकवण्यात आलं. भडकवणा-या संघटना बाजूला राहिल्या. १ तारखेला हिंसाचार घडवण्याचं पातक घडलं. या हिंसाचारासाठी दगड साठवण्यात आले होते. याची खबरही गृहखात्याला नव्हती. ब-याच महिन्यांपासून खोटा इतिहास पसरवला जात आहे, हे ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित नव्हतं. १ जानेवारीला हिंसाचार घडत होता, गाड्या फोडल्या जात होत्या, अनुयायांवर हल्ले होत होते तरीही पोलिसांनी काहीच केलं नाही. त्या दिवशीच जर पोलिसांनी लाठीमार केला असता किंवा गोळीबार केला असता तर हिंसाचार लगेचच थांबला असता. १ जानेवारीला पोलिसांनी काहीच केलं नाही. त्यामुळे २ आणि ३ जानेवारीलाही पोलीस, सरकार ढिम्म राहिलं.
१ जानेवारीचे पडसाद २ जानेवारीला उमटले. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारला. १ जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा उद्रेक ३ तारखेला पहायला मिळाला. बहुतांश ठिकाणी बंद शांततेत पार पडलाही. मात्र मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. बेस्ट बसेस, अनेक कार, दुचाकींचं नुकसान झालं. काही ठिकाणी लोकलवर दगडफेक झाली. बाईकवरून जाणारेही आंदोलकांच्या रोषाला बळी पडले. अर्थात पोलीस १ तारखेच्या निष्क्रीयतेमुळे आधीच बॅकफूटवर गेलेले होते. त्यामुळे मुंबई परिसर हा जणू काही काश्मीर किंवा सीरिया झाला होता. अर्थात हा काही पहिलाच बंद नव्हता की, ज्यात हिंसाचार झाला. अर्थात हा काही शेवटचाही बंद नसेल. या राज्यानं आणि मुंबईनं अनेक बंद पाहिले आहेत. अगदी दंगली, बॉम्बस्फोटही पाहिले आहेत. आझाद मैदानात धर्मांध मुस्लीमांनी केलेला जिहादही पाहिलेला आहे.
बंद घडवणारे जॉर्ज फर्नांडिस यांना बंदसम्राट म्हटलं जायचं. डाव्या पक्षांनीही अनेकदा बंद करून उद्योगांची वाट लावलेली आहे. विरोधी पक्षात असताना भाजपनंही बंद केलेच आहेत. धाक, दहशत, दरारा या पद्धतीनं बंद करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व राज्यभरात मोठं झालं. बंद यशस्वी करणं ही नेतृत्व प्रस्थापित करण्याची एक पायरी आहे. या पायरीवरून आता पर्यंत अनेक नेते पुढे गेले आहेत. तीच पायरी पार करून प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्वही मोठं व्हायला मदत झाली आहे. बंद हे असंवैधानिक आहेत. तरीही ते पुकारले जातातच. दुष्काळ आवडे सर्वांना याप्रमाणे बंद आवडे राजकीय पक्षांना अशी स्थिती आहे.
पण या ३ दिवसाच्या हिंसाचारामुळे राज्यात पुन्हा जातीयवाद फोफावणार हे स्पष्ट झालं आहे. मराठा आणि दलित समाजात फूट पाडण्याचा डाव यशस्वी झाला आहे. गुजरातला संघाची प्रयोगशाळा म्हटलं जातं. गुजरात मॉडेल म्हणजे विकासाचं मॉडेल नाही. तर मुस्लीमांची भीती दाखवून मतं मिळवायची, हे गुजरात मॉडेल आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातल्या काही हताश पुरोगामी शक्ती कार्य करत आहेत, असं वाटतंय. जिग्नेश मेवानी, उमर खालिद, कन्हैया कुमार यासारखी मंडळी राज्यात फिरवून तणाव निर्माण करायचा. भाजप जशी मुस्लीमांची भीती दाखवतं, त्याचप्रमाणे ही मंडळी हिंदूत्ववाद्यांची भीती दाखवून मतांची मशागत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जशी संघाची गुजरातची प्रयोगशाळा धोकादायक आहे तशीच ही काही हताश पुरोगाम्यांची महाराष्ट्रातली प्रयोगशाळाही धोकादायक आहे.
पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे दोन्ही प्रयोगशाळेतून जातीयवादाची रसायनं मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील. अजून मोठे हिंसात्मक बंद, मोठे मोर्चे पुकारले जातील. अर्थात त्यावेळीही सरकार ढिम्मच राहील. कारण यातूनच मतांचं पीक बहरणार आहे. शेतक-यांच्या पिकाला जरी भाव नसला तरी हे मतांचं पिक सत्ता मिळवण्यासाठी मदतीचं ठरणार आहे.