Sunday, December 23, 2018

टीव्हीतली माणसं

10 जुलै 2003 रोजी मी हैदराबादला ई टीव्ही मराठीच्या प्रोग्रामींग विभागात रुजू झालो होतो. त्यानंतर साधारणत: सात-आठ महिन्यांनी सुट्टी काढून संभाजीनगरला आलो. (त्या काळी सुट्ट्या मिळत होत्या.) संभाजीनगर शेजारीच असलेल्या आमच्या मूळ गावी सोलेगावला गेलो. आजीला भेटलो. आजीच्या शेजारी दुसरी एक महिला होती. त्यांनी विचारलं, तुमचा नातू काय करतो ? आजीनं सांगितलं, त्यो टिहीत रंग भरितो.
आजीला वाटलं मी ई टीव्ही म्हणजेच टीव्हीचं उत्पादन करणा-या कंपनीत काम करत आहे. अर्थात टीव्हीत कधी रंग भरलेच नाही, असं नाही. कारण 1999 मध्ये चितेगावमधल्या व्हिडीओकॉन इंटरनॅशनल कंपनीत ट्रेनी म्हणून काम केलं होतं. त्यावेळी त्याच कंपनीत पर्मनंट होऊन सुखात आयुष्य घालवू असा विचार केला होता. पण या कंपन्या बदमाश असतात. अकरा महिन्यानंतर घरी पाठवतात. असं केलं नाही तर ट्रेनींना पर्मनंट करावं लागतं. व्हिडीओकॉननं मला पर्मनंट केलं नाही. आता बघा व्हिडीओकॉनची काय अवस्था झाली आहे. माझ्या सारख्या ट्रेनी कामगारांचे तळतळाट भोवले, दुसरं काय.
फेसबुक, यु ट्यूब, इंटरनेट अशी मनोरंजनाची अनेक साधणं आली असली तरी टीव्ही आजही आपलं महत्व राखून आहे. टीव्हीवर दिसणारी प्रतिमा हेच तिचं मुख्य बलस्थान आहे. व्हिडीओकॉन कंपनीत टीव्ही तयार करत असताना, या अशाच टीव्हीत आपण कधी दिसू असं स्वप्नही कधी पडलं नव्हतं. अर्थात आता पर्यंत जी काही स्वप्नं पडली, ती खरी झाली असंही झालेलं नाही. 
ई टीव्ही प्रोग्रामींगमध्ये असताना रघुनंदन बर्वे, विजय गालफाडे, अरविंद पाटील, कौराजी गावंडे या 'सज्जनां'चा सहवास लाभला. तिथं असणारं ऋषीतुल्य व्यक्तीमत्व म्हणजे राज साळोखे यांचा 'सत्संग' घडला. तर प्रकाश फडणीस या अवलिया माणसाकडून बरंच काही शिकायला मिळालं. ई टीव्हीला हैदराबादमध्ये जास्तीत जासत ईनहाऊस प्रोग्राम व्हायचे. फुलोरा, गाणे तुमचे आमचे, दर्शन हे कार्यक्रम आम्ही करत असू. नवं काही तरी करायचं म्हणून फुलोरा या कार्यक्रमात स्किट करण्याचं ठरलं. बाहेरून तीन-चारच कलाकार आणले. जास्त कलाकार आणले असते तर बजेट वाढणार होतं. त्यामुळे मी आणि रघुनंदननं त्या स्किटमध्ये अभिनय केला. ती स्किट ई टीव्हीवरून प्रसारित झाली. माझ्या सारख्या माणसाचा फोटो कधी पेपरमध्ये छापून येईल असं वाटायचं नाही, तो टीव्हीवर अभिनय करताना दिसला. फुलोरा, दर्शनमध्ये दिग्दर्शक म्हणूनही संतोष गोरे हे नाव दररोज जात होतं. हे सर्व स्वप्नवतच होतं. 
त्यानंतर ई टीव्ही न्यूजमध्ये बदली करून घेतली. अमरावतीमध्ये रिपोर्टिंग करताना अनेक पीटीसी न्यूज पॅकेजमध्ये ऑनएअर गेले. नंतर tv9 मध्येही अनेकदा लाईव्ह दिलं. टीव्ही पाहणारा माझ्या सारखा सामान्य माणूस टीव्हीतला माणूस बनला. पण आताच्या काळात टीव्हीत दिसणं हे काही अप्रूप राहिलेलं नाही. कारण फेसबुक लाईव्ह करूनही तुम्ही तुमच्या भावना, मतं अनेकांपर्यंत पोहचवू शकतात. तुमचे व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड करू शकता. अगदी स्वत:चं यू ट्यूब चॅनेलही काढू शकता. वेगवेगळ्या माध्यमातून लाईव्ह करू शकता. परिणामी सोशल मीडियामुळे सामान्य नागरिकांनाही चेहरा मिळाला आहे. तुमचा चेहरा झळकण्यासाठी आता फक्त टीव्हीवरच अवलंबून राहण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
अर्थात सगळ्यांचाच चेहरा काही धड नसतो (माझ्यासकट). पण तो चेहरा कुठे तरी दिसावा, आपल्याला लोकांनी ओळखावं असं वाटण्यात काहीच चूक नाही. टीव्हीतली माणसं जशी फेमस होतात तशी आता सोशल मीडियातली माणसंही फेमस होऊ लागली आहे. मी कंपनीत असताना जसे टीव्हीत रंग भरले, तसेच रंग आता अनेक युवक सोशल मीडियात भरत आहेत.
खमंग फोडणी - टेलिव्हिजनमध्ये आतापर्यंत 15 वर्ष काढली आहेत. चार चॅनेलमध्ये काम केलंय, म्हणजे नोकरीच केली. पण कधी चॅनेलचा मालक होईल असा विचारही कधी मनाला शिवला नाही. पण माझा मुलगा चॅनेलचा मालक झालाय. विश्वास बसणार नाही, पण तो चॅनेलचा मालक आहे. त्यानं स्वत:चं यू ट्यूब चॅनेल काढलं आहे. काळाचा महिमा. #संगो

1 comment:

  1. संतोष भाउ जुनी आठवन सांगीतली मि संतोष सुकाशे हारसुलीचा

    ReplyDelete