Saturday, November 26, 2016

भक्तांनो, तुमच्या दैवतांची लाज राखा !

देशात सध्या मोदी पंथाच्या भक्तांची संख्या जास्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी हा पंथ जन्माला आला. या पंथातली मंडळी सोशल मीडियावर सक्रीय आहे. काही भक्त तर एटीएमच्या रांगेतही मोदींचं गुणगान करत असतात. काही भक्तांना रांगेत उभं राहून चिडलेल्या नागरिकांनी चोपही दिल्याच्या घटना घडल्या आहेत. अर्थात आपल्या देशात व्यक्तीपूजा जुनीच आहे. प्रत्येक नेत्याचा असा पंथ निर्माण झालेला आहे. त्या पंथातल्या अनुयायांना त्यांच्या नेत्याविषयी म्हणजेच दैवताविषयी बोललेलं, टीका केलेली आवडत आवडत नाही. भलेही ते दैवत जीवंत असो किंवा ढगात पोहोचलेलं असो.

असं म्हणतात पंडित नेहरूंची लोकप्रियताही अफाट होती. अर्थात माझा तेव्हा जन्म झालेला नव्हता. पण वाचून ऐकून माहित आहे. त्यांना त्या काळात लहान असताना किंवा कुमार असताना पाहिलेली मंडळी हयात आहे. त्यातले कित्येक 'कुमार' अजूनही नेहरूंच्या तितक्याच प्रेमात आहेत. अर्थात त्यांना भक्त म्हणलेलं आवडणार नाही. पुरोगामी लोकांमध्ये देव, दैवत, भक्त हा प्रकार नसतो. पण गुण सगळे हे मोदी पंथासारखेच आहेत. जाऊ द्या, तो काही मुख्य विषय नाही.
सध्या मोदी पंथातल्या भक्तांच्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीनं परदेशातला काळा पैसा भारतात आला तर प्रत्येक भारतीयाला १५ लाख मिळतील असं जाहीर भाषणांमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला असं वाटलं की, बँक खात्यात १५ लाख जमा होतील आणि अच्छे दिन येतील. पण आता अडीच वर्षे होऊन गेली पण खात्यात १५ लाख जमा झाले नाहीत. जमा तर सोडाच पण या नोटाबंदीमुळे खात्यात असलेले पैसे काढण्यासाठीही देशभक्तीचं नाव घेत रांगेत उभं राहावं लागतं.
त्यामुळे देशभक्त मोदी पंथातल्या भक्तांनो, पुढे या. दैवत मोदी यांची लाज राखा. भक्तांनो आता तुम्हीच वर्गणी काढा. काय असेल नसेल तो काळा-पांढरा पैसा एकत्र करा. मोदीच्या भक्तांमध्ये अनेक नेते, उद्योगपती, व्यापारी, दलाल, रिअल इस्टेट एजंट, व्याजानं पैसा देणारे असे अनेक जण आहेत. या तुम्ही सर्व पुढे या. तुमचा सगळा पैसा काढा आणि तो आमच्या सारख्या सामान्यांच्या बँक खात्यात जमा करा. तर आणि तरच तुमच्या दैवतांची लाज राखली जाईल. स्वीस बँकेतला आणि परदेशातला काळा पैसा भारतात आल्यावर आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत करू. तो पर्यंत तुम्ही आतापर्यंत जो पैसा कमावलात, तो तुमच्या नेत्यांनी दिलेलं आश्वासन पाळण्यासाठी जनतेत वाटा. मला विश्वास आहे. मोदी पंथातले भक्त असंच करतील. 'मोदी १५ लाख' या नावानं एक खातं उघडा त्याचा अकाऊंट नंबर तुम्ही भक्तांमध्ये वितरीत करा. आणि पैसे भरायला सुरूवात करा. भरपूर पैसे जमा झाले की, मग ते आमच्या सारख्यांच्या खात्यामध्ये जमा करा. मोदी भक्त हे करणारच. कारण त्यांच्या दैवतानेच हे आश्वासन दिलं होतं.
आता अच्छे दिन वाल्या मोदी भक्तांनंतर वळूयात ते 'गरिबी हटाव'वाल्या इंदिरा गांधींकडे. पाकिस्तानचे दोन तुकडे करून जगाचा नकाशा बदलणा-या इंदिरा गांधी यांच्यासारखं पोलादी व्यक्तीमत्व कोणीच नाही. इंदिरा गांधींनी गरिबी हटाव हा नारा देत सत्ता मिळवली होती. त्यांनी सत्ता मिळवली पण गरिबी कायमच राहिली. अर्थात भ्रष्ट काँग्रेस नेते, नेत्यांची हुजरेगिरी करणारे कार्यकर्त, दलाल, सहकारातून समृद्धीकडे गेलेले सहकार सम्राट, शिक्षण सम्राट यांची गरिबी दूर झाली यात शंका नाही. मात्र बहुसंख्य जनता ही गरिबच राहिली.
त्यामुळे काँग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्यांनो इंदिरा मातेचं स्वप्न पूर्ण करा. त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करा. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या गरिबांना तुम्ही आर्थिक मदत करा. काँग्रेस सत्तेत असताना सत्तेचा वापर करून जी काही माया काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी जमवली ती बाहेर काढा. तुमचे कारखाने विका, जमिनी विका, शिक्षण संस्था विका, दलालीतून मिळलेला पैसा बाहेर काढा पण इंदिरा मातेनं दिलेलं आश्वासन पूर्ण करा. गरिबी हटवाच. मला विश्वास आहे, इंदिरा मातेचं हे स्वप्न आणि आश्वासन पूर्ण केल्याशिवाय काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते शेवटचा श्वास घेणार नाहीत. तुम्हीही 'इंदिरा गरिबी हटाव' या नावानं खातं उघडून त्यात पैसे जमा करा. रग्गड पैसे जमा झाल्यावर ते गरिबांना वाटा. तुमची सत्ता आल्यावर या नावाने योजनाही सुरू करता येईल. नाही तरी काँग्रेस सरकारची कोणतीही योजना महात्मा गांधी, इंदिर गांधी, राजीव गांधी यांच्या नावाशिवाय सुरूच होत नाही. चला, मोदी पंथातल्या भक्तांनो आणि इंदिरा मातेच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनो करा सुरूवात. शुभस्य शीघ्रम.


Saturday, September 10, 2016

मराठा क्रांती कोणत्या दिशेने ?

कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाच्या निघत असलेल्या विराट मोर्चांनी आता राजकीय पक्षांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली, आणि कोणाच्याही नेतृत्वाशिवाय हे मोर्च निघत आहेत. मात्र या मोर्चावर भाष्य करताना, मोर्चेक-यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. त्यामुळे या मोर्चांमागे राष्ट्रवादी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र चर्चाही सुरू आहे, आणि मोर्चेही सुरू आहेत.
अॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात आणि शैक्षणिक आरक्षणाच्या मागणीसाठी हे मोर्चे निघत आहेत. पवारांनी या दोन्ही मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे. मात्र पवारांनी यात राजकीय फायदा पाहिला असावा असं तरी प्राथमिकदृष्ट्या वाटतं. कारण राज्यात मागील १७ वर्षांपासून शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यातले ९० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत. त्यातही मराठवाड्यातील शेतक-यांची संख्या जास्त आहे. मराठा शेतकरी मरत असताना पवार साहेब आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काय केलं ? असा सवाल या निमीत्ताने निर्माण होतो. ज्या सिंचन घोटाळ्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर होत आहेत, त्यांनी जर मराठवाड्यातले सिंचन प्रकल्प (भ्रष्टाचार न करता) पूर्ण केले असते तर, मराठा शेतक-यांवर आत्महत्येची वेळ आली नसती.
शरद पवारांनीच मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाचा १४ जानेवारी १९९४ रोजी नामविस्तार केला होता. परिणामी १९९५च्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होऊन त्याची राजकीय किमत मोजावी लागली, असं शरद पवार म्हणतात. मात्र पवारांच्या या वक्तव्यात तथ्य वाटत नाही. कारण १९९०च्या विधानसभा निवडणुकीपासून मराठवाड्यात शिवसेनेचा झंझावात सुरू झालेला होता. तो १९९५ मध्येही कायम होता. त्यातच १९९३ मध्ये मुंबईत झालेले बाँबस्फोटही मतदारांच्या लक्षात होते. त्यामुळे काँग्रेसची सत्ता जाणारच होती. त्यामुळे पवारांनी केलेल्या राजकीय किमत मोजण्याच्या वक्तव्याला तसा अर्थ राहत नाही.
आता राज्य आणि केंद्रात काँग्रेस कमजोर झाली आहे. हे पवारांच्याही लक्षात आलेलं आहे. त्यामुळे कोपर्डीमुळे दुखावलेला मराठा समाज आणि इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून सुरू असलेल्या अटक सत्रामुळे नाराज झालेला मुस्लीम समाज, यांची मोट बांधण्याचा हा प्रयत्न असल्याचं लक्षात येतं. राज्यात पवारांसारखा ज्येष्ठ नेता कोणीच नाही. यावेळी पवारांनी मतांची तजवीज करण्याऐवजी सामाजिक सौहार्द जपण्यासाठी पावलं टाकणं गरजेचं होतं. अर्थात अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केली होती. पण राज ठाकरे यांना कोणी गांभीर्यानं घेत नाही. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. सरकारने तसं अधिवेशन बोलावलं असतं तर, सर्व पक्षाच्या नेत्यांची भूमिका कळायला मदत झाली असती.
मराठा समाजाच्या मोर्चांना कमी लेखण्याचा मुळीच हेतू नाही. बहुसंख्येने खेड्यात आणि शेतीवर अवलंबून असलेला हा समाज आहे. त्यातच निसर्ग साथ देत नाही आणि सरकार मालाला भाव देत नाही. अशा परिस्थितीत हा मराठा शेतकरी फास लावून घेतो. दुसरं कोणी असतं तर नक्षलवादी झालं असतं. अॅट्रोसिटी कायद्याविषयी तक्रारी असतील तर त्या चर्चेतून नक्कीच दूर होऊ शकतील. अॅट्रोसिटीचा दुरूपयोग करणा-यांना त्यांचे बांधव ओळखून आहेत. अशांना कोणीही जवळ करत नाही. पण आपल्याकडूनही कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही, ही काळजीही मराठा समाजाला घ्यावीच लागेल.
मराठा समाजासमोरचा मुख्य प्रश्न आहे तो, शेतमालाला भाव कसा मिळेल, शेतीला पाणी कसं मिळेल, शैक्षणिक आरक्षण, हुंडा पद्धत आणि रूढी-परंपरांचा पगडा. हे प्रश्नही मोर्चात मांडायला हवेत. मराठ्यांच्या या क्रांती मोर्चातून समाजाचे हे प्रश्नही सुटले तर शेतक-यांचं भलं होईल.

Sunday, June 26, 2016

भाजपा के शोले


(स्थळ 120 रुपयात गुजराती थाळी मिळणारं हॉटेल)

गब्बर शहा - दसरा कब है दसरा ?

सांबा माधव - पण सिनेमात तर होळी होती ना ?

गब्बर शहा - हमारी संघपर निष्ठा हैं. और दसरा ही हमारे लिये सबसे बडा त्यौहार है. ये तुम कभी मत विसरा.

सांबा माधव - चुकीला माफी असावी सरदार.

गब्बर शहा - अरे वो सांबा, कितने चुनाव जिते है हम ?

सांबा माधव - लोकसभा आणि त्यानंतरच्या सुमारे 6 विधानसभा जिंकलोत सरदार. (सांबाला हरलेल्या विधानसभा सांगायच्या असतात पण सरदार खुश होणार नाही, म्हणून मनोगत दाबून ठेवतो.)

गब्बर शहा - सुअर के बच्चो. महाराष्ट्र में रोज हमारी सच्चाई का सामना हो रहा हैं.

सांबा माधव - सरदार, मी मनोगतमधून रोखठोक दणके दिले आहेत.

गब्बर शहा - तुम्हाला काय वाटलं सरदार खुश होईल ? शाबासकी देईल ?

सांबा माधव - सरदार मी आपलं मीठ खाल्लंय.

गब्बर शहा - आता खाकरा खा, भूल्यो गोली खा.

तितक्यात जयची एन्ट्री होते.

जय फडणवीस - सरदार तुम्ही निझामाच्या बापासारखी कृती करू नका. एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब छोटे सरदार आहेत. त्यात तुम्हालाही सरदार म्हणायचं. मोठा गोंधळ उडतोय आमचा.

एकनाथ ठाकूर - सरदार हे पाहा. जय अजून गोंधळलेलाच आहे. आणि माझा महसूल तोडून तुम्ही माझे हातच तोडून टाकलेत.

जय फडणवीस - वीरू या संकटात मला हात दे.

वीरू बापट - आता मी कोणालाही हात देणार नाही. किंवा कोणाचाही हात हातात घेणार नाही.

गब्बर शहा - 50-50 मैल अंतरावर जेव्हा कोणी मोठी व्यक्ती झोपत नाही तेव्हा त्याला तुझ्या अकाऊंटला 15 लाख जमा होणार असल्याची बतावणी करून झोपी लावतात. आणि तुम्ही त्या 'उठा'ला आडवा करू शकत नाही.

सुरमा सोमय्या - सरदार, बीएमसीतल्या घोटाळ्याची चौक्शी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा. लोकलचे डबे भरून पुरावे देण्याची माझीई तैय्यारी आहे.

रामूकाका दानवे - म्या सांबाला सांगितलं होतं, तुह्या मनोगतानं वाघवाले फक्त बिचकले पाह्यजे. पण सांब्यानं वाघाच्या शेपटावर पाय टाकून महाच चकवा केला राव.

गब्बर शहा - आता माझा गुजराती सल्ला ऐका. वाघवाल्यांना आपल्या दुकानातून पाह्यजे तितका माल उधारीवर द्या. उधारी वाढू द्या. वाघ काय पळून जाणार नाही. मग नंतर हिशेब पुरा करू..

तितक्यात वेटर बिल घेऊन येतो. जय मीटिंग असल्याचं सांगून काढता पाय घेतो. गाडीची चावी माझ्याकडे असल्याचं सांगत वीरू पाय काढतो. तितक्यात सुरमाला कोणत्या तरी चॅनेलवर फोनोसाठी थ्रू केलं जातं. सांबा त्याची काळी-पांढरी दाढी खाजवत मनोगतसाठी दुसरा लेख लिहायला बसतो. ठाकूरला हात नसल्यानं तो खिशात हात घालू शकत नाही. तर रामूकाका दानवे कधीच चकवा देऊन गायब झालेले असतात.

गब्बर शहा - (स्वगत) हे बिल मला द्यावं लागतंय. ही माझी फौज चांगलीच बिलंदर निघाली. गुजरात्याला बिल द्यायला लावू शकतात तर हे बिलंदर अजून बरंच काही करू शकतात, या विचारात गब्बर गढून जातो.

Sunday, February 14, 2016

असुरक्षित भारत !


जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये देशाच्या विरोधात झालेली घोषणाबाजी, अफजल गुरू आणि मकबूल भटचा शहीद असा केलेला उल्लेख हा आगामी काळात देशात यादवी माजू शकते याचीच चिन्हं म्हणावी लागतील.
जेएनयूत अफजल गुरूसाठी झालेल्या कार्यक्रमाला  पाकिस्तानातला दहशतवादी हफीज सईदचा पाठिंबा होता. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिलीय. त्यामुळे जेएनयूतल्या राष्ट्रद्रोह्यांचे धागे-दोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचलेले असल्याचं स्पष्ट होतं. मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड आहे.
श्रीनगरमध्ये दर शुक्रवारी युवक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतात. तिथं पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकावले जातात. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. मात्र आपले जवान त्या देशद्रोह्यांवर फक्त अश्रूधुराचा मारा करतात. यामुळे दिवसेंदिवस राष्ट्रद्रोही शक्तींची हिंमत वाढत चालली आहे. श्रीनगरमधल्या देशद्रोह्यांना गोळ्या घातल्या असत्या तर, जेएनयूमधली पाकिस्तान धार्जिणी पिलावळ वळवळली नसती. अफजल गुरू आणि मकबूल भटचे फोटो खुलेआमपणे मिरवले नसते. "काश्मीर की आझादी तक जंग चलेगी, भारत की बरबादी तक जंग चलेगी", अशी घोषणा देण्याची हिंमत झाली नसती.
देशद्रोह्यांची हिंमत अशीच वाढत गेली तर देशात सशस्त्र उठाव होण्याची भीती नाकारता येत नाही.
विद्यापीठांमध्ये राष्ट्रद्रोही कार्यरत आहेत. यावरून राष्ट्रद्रोह्यांची संख्या किती वाढली आहे, याचा अंदाज करता येतो. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राची तर ही भारतातली मोठी 'संपत्ती'च म्हणावी लागेल. पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर, त्यांना साथ देण्यासाठी हेच राष्ट्रद्रोही पुढे सरसावणार नाहीत हे कशावरून ? नाही तरी त्यांनी दिलेली, "भारत की बरबादी तक जंग चलेगी" ही घोषणा तेच सांगते. भारतापुढे मोठं भीषण संकट उभं ठाकलेलं आहे. राष्ट्रद्रोही, देशाच्या एकात्मतेवर उठलेले (काही) पुरोगामी, देशातल्या अतिरेकी संघटना, त्यांचे स्लीपर सेल, अतिरेक्यांचे समर्थक, नक्षलवादी, माओवादी, बांगलादेशातून आलेले घुसखोर, ईशान्य भारतात वाढलेले बांगलादेशी या सर्व भारतविरोधी  शक्ती उठाव करण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही.
भारतात नेहमी घातपाती कारवाया करणारा पाकिस्तान या सर्वांना साथ देतोच आहे. कारण या देशाचे तुकडे करणे हा पाकिस्तानचा हेतू लपलेला नाही. आणि देशातच निपजलेल्या राष्ट्रद्रोह्यांनाही देशाचे तुकडेच करायचे आहेत. राजकीय पक्षांमधले मतभेदही पाकिस्तानच्या पथ्यावरच पडणारे आहेत. जेएनयूमध्ये गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चकार शब्दानंही अफजल गुरूचा उदोउदो करणारे, देशविरोधी घोषणा देणारे यांचा निषेध केला नाही. ही बाबही सर्व देशवासियांना धक्का देणारी होती.
ज्या देशात अफजल गुरू, मकबूल भट, इशरत जहाँला शहीद संबोधणारी औलाद पैदा होते, त्या देशाचा भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे, असं म्हणता येईल का ?

Friday, February 12, 2016

जेएनयूतले राष्ट्रद्रोही


"काश्मीर की आझादी तक जंग चलेगी, भारत की बरबादी तक जंग चलेगी‘...ही घोषणा पाकिस्तानात नव्हे तर जेएनयूच्या कॅम्पसमध्ये खुलेआमपणे देण्यात आली. ‘द कंट्री विदाउट ए पोस्ट ऑफिस’ या शिर्षकाखाली जेएनयूमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा दावा विद्यार्थी करत होते. मात्र सांस्कृतिक कार्यक्रमाची झूल पांघरूण देशविरोधी वक्तव्य तिथं केली गेली. त्यासाठी मुहूर्त निवडला गेला होता तो, 9 फेब्रवारीचा. याच दिवशी तीन वर्षांपूर्वी अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आलं होतं. अफजल गुरू हा भारतीय न्यायव्यवस्थेचा बळी असल्याचा आरोप करण्यात आला. इतक्यावरच ही राष्ट्रद्रोही मंडळी थांबली नाही. 'अफजल हम तुम्हारे अरमानो को मंजिलों तक पहूँचायेंगे', अशी घोषणाबाजी करून संसदेवर पुन्हा हल्ला करण्याची गर्भित धमकीच देण्यात आली.
 11 फेब्रुवारी 1984 रोजी दहशतवादी मकबूल भटला फासावर लटकवण्यात आलं होतं. भारतीय विमानाचं अपहरण, ब्रिटनमधल्या भारतीय उच्चायुक्तातील अधिकारी रवींद्र म्हात्रे यांची हत्या यात मकबूल भटचा सहभाग होता. तर संसदेवरील हल्ल्यात अफजल गुरू दोषी होता. मात्र या दोन्ही दहशतवाद्यांचं उदात्तीकरण सुरू होतं.
भारत सरकार देत असलेल्या निधीतून हे विद्यार्थी जेएनयूमध्ये शिक्षण घेतात. हा निधी सामान्य जनतेनं दिलेल्या कराच्या रूपातून येतो. आणि घेतलेल्या या शिक्षणाचा वापर हे विद्यार्थी देशाच्या विरोधात करतात, असंच यातून स्पष्ट होतं. भारतीयांच्या पैशावर पोसलेली ही औलाद आता देशाच्या विरोधातच गरळ ओकू लागली आहे. विद्यापीठ म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं ठिकाण होय. मात्र या ठिकाणी तर चक्क राष्ट्रविरोधी शक्ती एकत्र येत असल्याचं चित्र आहे. सियाचीनमध्ये सीमेचं रक्षण करताना बर्फाखाली गाडले गेलेले हणमंतप्पांवर दिल्लीत त्यावेळी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढत होते. तर दुसरीकडे फ्रीडम ऑफ स्पिचच्या नावाखाली जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी शक्ती देशाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात धन्यता मानत होती. या असल्या राष्ट्रविरोधी शक्तींवर सरकारने कठोर कारवाई करून त्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे. ज्यामुळे नंतर कोणी अशी हिंमत करण्याचं स्वप्नही पाहणार नाही.

Wednesday, January 13, 2016

ब्रेकिंग न्यूज !शिफ्ट मॉर्निंग असो की इव्हिनिंग, नाही तर नाईट. शिफ्ट या कधीच चुकत नाहीत. आणि चुकत नाहीत त्या ब्रेकिंग न्यूजही.
ब्रेकिंग न्यूज येते ती वादळासारखी. आणि एका क्षणात न्यूजरूममधलं वातावरण बदलून जातं. असाईनमेंटकडून एकाचवेळी ऑक्टोपसवर फ्लॅश टाकले जातात आणि तोंडीही ब्रेकिंग सांगितली जाते. ब्रेकिंग सांगण्याची ही नवी पद्धत आहे. (ऑक्टोपस हे एक सॉफ्टवेअर आहे. त्यात बुलेटिन लावलं जातं. स्क्रिप्ट केली जाते. ऑनलाईन ग्राफिक्स केलं जातं.) त्याचवेळी आऊटपूटची टीमही दणादण ब्रेकिंग बडवायला सुरुवात करते. बातमी फक्त आपल्याकडे आहे. आधी ब्रेक करा. व्हिज्युअल्स येत आहेत. अशी वर्दी असाईनमेंटकडून दिली जाते. एकच गोष्ट असाईनमेंटकडून तीन-चार जण चार-पाच वेळा ओरडून सांगत असतात. त्यालाही आऊटपूट जोरकसपणे उत्तर देत असतं. व्हिज्युअल्स कधी येणार ते नेमकं सांगा. फक्त रिपोर्टरचा फोनो नको. एक्सपर्टही द्या. नेहमीसारखे फोन कट होणार नाहीत, असं सुनावण्यासही आऊटपूटमधला एखादा मागे-पुढे पाहत नाही. फिल्डवरून लाईव्ह कधी मिळणार ते सांगा.  मात्र ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नसते. त्यामुळे असाईनमेंट काही बोलत नाही. मात्र पुढे कधी तरी त्याचे उट्टे काढले जातात. चुकीला माफी कधीच नसते.
ब्रेकिंग न्यूजच्या वेळेस न्यूजरूममध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो. याला काही सहका-यांची अंधश्रद्धा तितकीच कारणीभूत आहे. जितका गोंधळ जास्त तितकं काम जास्त, अशी काही जणांची असलेली श्रद्धा या गोंधळास जास्त कारणीभूत आहे. चॅनेल कोणतंही असो. असे अंधश्रद्धाळू गोंधळी सगळीकडेच आहेत. अर्थात या गोंधळात शांतपणे काम करणारेच जास्त काम करत असतात. मात्र ते शांत असल्यानं स्वाभाविकपणे त्यांचा आवाज होत नाही. असो. त्यात जर संपादक न्यूजरूममध्ये असतील तर गोंधळ करणा-यांचा आवाज शिगेला पोहोचतो. हे दाखवण्याचं काम आहे, हे जाणकारांच्या लक्षात आलंच असेल.
न्यूजरूममध्ये खणाखणी सुरू असतानाच तिकडे पीसीआरमध्येही घणघोर लढाई सुरू असते. पीसीआरला एकाच वेळी न्यूजरूम, असाईनमेंट, एडिट फ्लोअर टॉक बॅकवरून वेगवेगळी माहिती देत असतो. फोनो, लाईव्ह थ्रू करण्याविषयी असाईनमेंट बोलत असतं. तर ब्रेकिंग, हेडर अपडेट करा. नवी व्हिज्युअल्स घ्या, जुनी घेऊ नका असा संदेश न्यूजरूम देत असतं. तर एडिट फ्लोअरही आलेली नवी व्हिज्युअल्स फटाफट एडिट करून देत असतं. त्यांचाही टॉक बॅकवरून पीसीआरला मारा सुरू असतो. हे सर्व सांभाळत पीसीआरची टीम बुलेटिन ऑन एअर करत असते. अँकरलाही कमांड देत असते. काही सहका-यांना न्यूजरूममध्ये घातलेला गोंधळ कमी वाटतो म्हणून ते पीसीआरमध्ये जाऊनही त्यांच्या शैलीत गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र पॅनल प्रोड्युसर खमक्या असेल तर या गोंधळातही बुलेटिन व्यवस्थितपणे करतोच.
तिकडे फिल्डवरून रिपोर्टर उन्हातान्हात फोनवर अपडेट देत असतात. लाईव्ह देत असतात. किती वेळ फोनो, लाईव्ह द्यावं लागेल याची शाश्वती नसते. ब्रेकिंग न्यूजच्या वेळी फिल्डवर रिपोर्टर माहिती देत असतो, त्यामुळेच बातमीला वजण मिळतं.
अशा घणघोर प्रसंगात न्यूजरूम, पीसीआर, असाईमेंट, रिपोर्टर पेटून काम  काम करत असतात. त्याचवेळी   -हस्व, दीर्घ हेरून खिंडीत पकडणारी एक स्वतंत्र ब्रिगेडही त्यांचं अस्तित्व दाखवून देत असते. अर्थात आपल्या चॅनेलवर काही चुकीचं जाऊ नये अशी त्यांची भूमिकाही असू शकते. कारण चुकलेल्या ब्रेकिंग न्यूजचे फोटो निघतात. त्यात प्रतिस्पर्धी चॅनेलमध्ये काम करणारे एकेकाळी आपले असलेले सहकारीच आघाडीवर असतात. आता चॅनेलवॉर म्हटल्यावर थोडीफार मारामार होणारच. मग व्हॉट्सअपवर त्या चुका फिरत राहतात. तेवढीच चर्चा होते. मात्र काम करताना थोडं फार इकडं-तिकडं व्हायचंच. कधी-कधी घाई गडबडीत चुकीचीही ब्रेकिंग दिली जाते. अशा वेळी आपल्या चॅनेलच्या इज्जतचा सवाल असल्यानं शांत बसायचं असतं. पण हीच चूक दुस-या चॅनेलनं केली की मग गावभर बोभाटा होणारच, हे सांगण्याची गरज नाही.
झी 24 तासमध्ये असताना प्रसाद घाणेकर हा आमचा टिकरवरचा सहकारी -हस्व, दीर्घमध्ये निष्णात होता. तो शिफ्टला असला म्हणजे वेलांटी पहिली की दुसरी, ऊकार कोणता द्यायचा ? हे सगळे त्यालाच विचारत. हळूहळू त्याची कीर्ती वाढली. मग त्याला डॉक्टर हे नाव पडलं. घाणेकर असला की ब्रेकिंग बिनचूक जाणार हे नक्की.
हल्ली प्रत्येक चॅनेलमध्ये -हस्व, दीर्घ समजणा-या व्यक्तीला डॉक्टर म्हणतात. घाणेकरला बातम्यांची समज होती. स्क्रिप्टही जमायचं. नंतर तो बुलेटिन प्रोड्युसर झाला, अर्थात त्यासाठी त्याला चॅनेल बदलावं लागलं. आता आमचा tv9 मधला सहकारी, डॉक्टर वैभव देसाई हाही चांगला तयार होत आहे.
आणि हो या -हस्व, दीर्घवरून एक भारी किस्सा आठवला. आमचे एक माजी सहकारी योगेश बिडवई यांनी ज्युनिअर्सला सूचनावजा इशारा दिला होता. विचारणा-याने वेलांटी, ऊकार हा पहिला की दुसरा असा विचारायचं. सांगणारा (म्हणजेच योगेश बिडवई) त्याचं उत्तर -हस्व की दीर्घ असं देणार.
असेच एक माजी सहकारी चंद्रकांत फुंदे यांनीही त्यांच्या स्क्रिप्टमधील फक्त -हस्व, दीर्घ तपासावे कंटेन्टला हात लावायचा नाही, असा थेट इशाराच दिला होता. बिडवई आणि फुंदे ही जोडी अण्णा आणि बाबा नावाने फेमस आहे.
झी 24 तासमध्ये असताना बुलेटिन काढणा-या प्रोड्युसरलाच पीसीआरमध्ये जाऊन फोनो आणि लाईव्ह थ्रू करण्याची काशी करावी लागायची. एकदा बुलेटिन लावल्यानंतर नेहमीप्रमाणे पीसीआरला गेलो. त्या दिवशी जय हो या गाण्यासाठी गुलझार यांना ऑस्कर मिळाला होता. नेहमीप्रमाणे वेगवेगळे फोनो घेतले जात होते. मीच फोनो थ्रू करत होतो. गुलझार यांच्यासारख्याच एका प्रसिद्ध गीतकाराला फोन करून प्रतिक्रिया मागितली. त्या गीतकाराने फोनो मागितल्यावर लगेच फोन आदळून दिला. मोठी व्यक्ती किती खोटी असू शकते हे त्या दिवशी कळालं. त्या मोठ्या व्यक्तीला पुन्हा खोटं पाडण्याची इच्छा नसल्यानं, त्यांच्या नावाचा इथं उल्लेख करत नाही.
झीमध्ये असाईनमेंटची टीम बुलेटिन प्रोड्युसरकडे फोन नंबर द्यायची. त्यातून कधी कधी मोठी गंमत व्हायची. तेव्हाचे मनसेचे आमदार राम कदम यांनी कोणतं तरी आंदोलन केलं होतं. त्यावर त्यांचा फोनो घ्यायचा होता. असाईनमेंटने दिलेल्या नंबरवर मी कॉल केला. म्हटलं सर तुम्ही जे आंदोलन केलंय त्यावर तुमचा फोनो हवा आहे. त्यावर पलीकडून आवाज आला, मी तर घरीच बसलो आहे. कोणतंही आंदोलन केलेलं नाही. मग मी विचारलं आपण राम कदम बोलत आहात का ? उत्तर आलं, रामदास कदम. मग मी सॉरी म्हणून फोन ठेवून दिला. बडे बडे चॅनेल में छोटी छोटी चूक होती रहती है. काय ?
ब्रेकिंग न्यूजमुळे न्यूजरूममध्ये असाईनमेंट आणि आऊटपूट एकाच वेळी कामाला (त्याला चॅनेलच्या बोलीभाषेत धंद्याला म्हणतात.) लागलेलं असतात. मात्र त्यावेळीही इतक्या गोंगाटात फिचर्स, स्पोर्टस् आणि इंटरटेन्मेंटची टीम शांत असते. त्यांच्यावर या गोंधळाचा काही परिणाम होत नाही. अर्थात ते काही टाईमपास करत नसतात. तेही त्यांच्या शोचं काम करत असतात. हेच त्यांच्या शांततेचं रहस्य असतं.
ब्रेकिंग न्यूजच्या वेळी खरा कस लागतो तो, अँकरचा. कारण सुरुवातीला आलेली बातमी अतिशय त्रोटक असते. एका लाईनच्या माहितीवर बुलेटिन खेचायचं असतं. अनुभवी अँकर या समरप्रसंगी त्यांचं कौशल्य दाखवून देतात. रिपोर्टर आणि तज्ज्ञांना विविध प्रश्न विचारून बुलेटिन प्ले अप केलं जातं. अर्थात कधी कधी प्रश्नांची पुनरावृत्तीही केली जाते, हा भाग वेगळा. आणि जर मोठ्या ब्रेकिंगच्या वेळी नवीन अँकर असेल तर प्रोड्युसर आणि वरिष्ठ अँकरला पीसीआरमध्ये धाव घ्यावी लागते. टॉकबॅकवरून प्रश्न सांगून वेळ मारून न्यावी लागते. काही वेळात ब्रेकिंग असणा-या न्यूजचे व्हिज्युअल्स येतात. मग त्यावर वॉटर मार्क टाकला जातो. रिपोर्टर घटनास्थळी पोहोचून लाईव्ह द्यायला सुरुवात करतात. लाईव्ह संपेपर्यंत डेस्कवरील सहकारी पॅकेज तयार करतात. आणि एका ब्रेकिंगपासून सुरू झालेला प्रवास पॅकेजवर संपतो. बातमी मोठी असेल तर दोन ते तीनही पॅकेज बदडले जातात.

मी एकदा नाईट शिफ्टला असताना उपोषणाला बसलेले बाबा रामदेव असेच पसार झाले होते. तेव्हा एकच हल्लकल्लोळ उडाला होता. मग काय रात्रीपासूनच ब्रेकिंग सुरू झाल्या होत्या. 2009 मध्ये पाकिस्तानात श्रीलंकेच्या टीमवर हल्ला झाला होता. त्यावेळी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत मी पीसीआरमध्येच होतो. तिथेच बसून फोनो आणि लाईव्ह थ्रू करत होतो. ना नाष्टा, ना जेवण, ना सुसू ब्रेक. पार वाट लागली होती. तसंच 9/11, त्सुनामी, राम मंदिराचा निकाल, लोकसभा-विधानसभा-पालिका निवडणुकांचे निकाल, विलासराव देशमुखांचं निधन, गोपीनाथ मुंडेंचं निधन या ब्रेकिंग करणं सोपं नव्हतं.
मात्र काही सहकारी यातही भाग्यवान आहेत. त्यांना ब्रेकिंग न्यूज येणार आहे याची आधीच माहिती असते का ? अशी शंका येते. कारण ज्या दिवशी ब्रेकिंग असते त्या दिवशी यांचा विकली ऑफ असतो किंवा ते रजेवर असतात.
ब्रेकिंगचं प्रेशर सर्वात जास्त असतं ते त्यावेळी रनडाऊनवर असलेल्या बुलेटिन प्रोड्युसरवर. कारण त्याला त्या क्षणी येणारी सर्व माहिती सेकंदात ऑन एअर करायची असते. त्याचवेळी संपादक, शिफ्ट इन्चार्ज, असाईनमेंट यांच्याकडून सातत्याने माहिती, सूचना यांचा मारा सहन करत ब्रेकिंग अपडेट करायची असते.  फोनो, लाईव्ह फटाफट घ्यायचे असतात. एक ब्रेकिंग संपली म्हणजे काम संपत नाही. कारण पुढची ब्रेकिंग कोणत्याही क्षणी येणार असते.