Saturday, July 1, 2017

एक वाटी...शेजारधर्माची !

माझ्या सारखे अनेक जण त्यांचं मूळगाव सोडून नोकरी-धंद्यानिमीत्त बाहेर गावी राहत असतात. अनेकांना ते ज्या शहरात नोकरी-धंद्यानिमीत्त वास्तव्यास आहेत, त्या शहराला नाव ठेवण्याची खोड असते. अर्थात ही खोड माझ्यातही आहे, पण कमी प्रमाणात. हैदराबादला तर मुळीच नाव ठेवावं वाटत नाही. रेड्डी हे आमच्या घरमालकाचं आडनाव. दररविवारी त्यांच्याघरून बिर्याणीचं ताट आमच्या घरी यायचं. मग माझी पत्नी अंजली ही, तिनं केलेला जो काही स्पेशल मेनू असेल तो रेड्डी आन्टीकडे द्यायची. खीर, दाळबाटी, चिकन किंवा पालकपनीर यापैकी जे काही केलं असेल त्याची देवाणघेवाण व्हायची. या शेजारधर्मामुळे माझ्या पत्नीलाही हैदराबादी बिर्याणी चांगल्या प्रकारे करता यायला लागली. आपण हॉटेलमध्ये जी चिकन किंवा मटन बिर्याणी खातो, ती निव्वळ खिचडीच म्हणावी लागेल. कारण हैदराबादी बिर्याणी करण्यासाठी लागणारी मेहनत आणि वेळ हॉटेलवाले देणं शक्यच नाही.
हैदराबादनंतर अमरावतीमध्ये वर्षभर वास्तव्य होतं. त्या काळात शेजारच्या राऊत कुटुंबाबरोबरही अशीच देवाणघेवाण सुरू असायची. अमरावतीनंतरचा पुढील पाडाव होता, मुंबई. मागील दहा वर्षापासून याच शहरात वास्तव्य आहे. सुरूवातीला खारघर, त्यानंतर नेरूळ आणि आता साडेसहा वर्षांपासून सायन प्रतीक्षानगरमध्ये वास्तव्य आहे. दाटीवाटीच्या या शहरात कोणालाही शेजारधर्माची वाटी द्यावी वाटत नाही. अर्थात आपण वाटी दिली तर कोणी नाही म्हणणार नाही. खारघर आणि नेरूळच्या सीवूड्स या भागात जवळपास साडेतीन वर्ष वास्तव्य केलं. पण चुकूनही शेजा-यांनी शेजारधर्म म्हणून वाटी पाठवली नाही. बंद दरवाजे पाहण्याची सवय लागली होती. चुकून कोणाचं दार उघडलं तर लगेच आतून आवाज यायचा, दरवाजा बंद कर. घरात कोणी माणूसच काय तर हवाही यायला नको, असं त्यांना वाटत असावं. दरवाजा बंद कर, हे बहुतेक अस्सल मुंबईकरांचं ब्रीदवाक्य असावं.
आता साडेसहा वर्षापासून सायन प्रतीक्षानगरमध्ये वास्तव्य आहे. नाही म्हणायला मी ज्या फ्लोअरवर राहतो त्या फ्लोअरवर वाटी देवाणघेवाण करण्याची लुप्त होत चालली परंपरा सध्या तरी जीवंत आहे. शेजारच्या घावरे काकू, पवार आणि परब वहिनी यांच्याकडून शेजारधर्माची वाटी येते. श्रावण लागण्याच्या आधी खास कोंबडीवडे आणि मालवणी पद्धतीचे मासे  शेजारधर्माची पताका फडकवत आमच्या घरी येतात. मग आम्हीही मराठवाडा किंवा नगर स्टाईलने केलेल्या मटनाची वाटी माझा मुलगा वेदच्या हाती रवाना करतो.
बदलत्या पिढ्यांबरोबर आणि शहरीकरणाबरोबर काही गोष्टी या बदलतच जाणार आहेत. पण संभाजीनगरमध्ये लहानपणी आमच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या गरड काकू, भालेराव काकू, जाधव काकू, बनकर काकू, फ्रान्सीस आंटी, तांगडे काकू, सूर्यवंशी काकू यांचा शेजारधर्म पाहायला मिळाला. तिथं शेजारधर्मासाठी रविवारची अट नव्हती. कोणत्याही दिवशी वाटीची देवाणघेवाण सुरू असायची. शेजारच्या काकूंच्या घरातून भाजीचा खमंग वास दरवळायचा. आणि काही वेळाने तीच भाजी वाटीतून आमच्या घरी यायची. आईने केलेली काळ्या मसाल्याची भाजी सर्वांच्या आवडीची असायची. त्या भाजीची वाटी घरोघरी पोहोचती करण्याचं काम कधी तरी माझ्याकडे असायचं. पण माझी बहीण कविता हिच्याकडेच भाजी पोहोचती करण्याची जबाबदारी असायची.
अजून एक आठवलं. लहानपणी नवे कपड परिधान केल्यावर शेजा-यांकडे जावून ते दाखवयाचे, ही एक प्रथा होती. आमचे शेजारचे मित्रही त्यांनी परिधान केलेले कपडे घरी येऊन दाखवायचे. मग छान छान, असं म्हणत कौतुक सोहळा व्हायचा. आता बंद दवाजांच्या या संस्कृतीत शेजारधर्मही दरवाजांच्या आत बंद झाला आहे. कोंडलेला शेजारधर्म पुन्हा बाहेर काढायला हवा.