Saturday, October 24, 2009

शिवसेनेचे ( रक्ताचं ) 'पाणी', मनसेची 'पत'

युतीचा विधानसभा निवडणुकीतला विजयाचा घास अखेर काँग्रेसने 'मनसे' आणि धनसे हिरावला. 'माझं सरकार येतंय' ही जाहिरात नागरिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. मात्र शिवसेनेला 50 च्या आतच जागा मिळाल्या. आणि युतीचे सरकार येण्याची शक्यता मावळली. मागील पाच वर्षात शिवसेनेनं शेतक-यांच्या प्रश्नांवर रान उठवले होते. इतकंच नव्हे तर 2003 मध्ये शेतक-यांच्या प्रश्नावर केलेले 'चालते व्हा' हे आंदोलनही यशस्वी ठरले होते. विदर्भात दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली काढलेली कापूस दिंडी, कर्जमुक्ती दिंडी यांना शेतक-यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शेतक-यांच्या कर्ज मुक्तीसाठी करण्यात आलेले 'देता की जाता' हे आंदोलनही शेतक-यांना कर्जमुक्ती देण्यासाठी मदत करणारे ठरले. मात्र विदर्भात युतीला जागांचे भरभरून दान मिळाले नाही. मराठवाड्यात तर शिवसेना आणि भाजपवर नामुष्कीची वेळ आली. मराठवड्यात अनेक ठिकाणी दोन किंवा तीन टर्म आमदार राहिलेल्या आमदारांच्या विरोधात नाराजी होती. मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारले नाही. परिणामी मतदारांनीच आमदारांना नाकारले. तर राहिलेली कसर मनसेने भरून काढली. सुमारे 40 पेक्षा अधिक ठिकाणी युतीच्या उमेदवारांचा मनसेमुळे थेट पराभव झाला. सरकारच्या विरोधातले जनमत विरोधी पक्षांमध्ये विभागले गेले आणि काँग्रेस आघाडीचा सत्तेवर येण्याचा मार्ग सुकर झाला.
मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेने दिलेला लढा हा कुणीही नाकारू शकत नाही. मात्र आता तो इतिहास झालाय हे ही तितकच खरं. मुंबईतला मराठी टक्का टिकवण्याचं श्रेय हे शिवसेनेलाच आहे. 1992 - 93 च्या जातीय दंगलीत धर्मांध शक्तींपासून बचाव करण्यातही शिवसेनाच आघाडीवर होती. आताही शेतक-यांच्या मुद्यावर आक्रमकपणे शिवसेनाच उतरली होती. विदर्भात आत्महत्या करणा-या शेतक-यांना आधार देण्याचा प्रयत्न करणारा एकमेव पक्ष ही शिवसेनाच. मात्र चूकलं कुठे ? तर मनसेचा उदय हा शिवसेनेच्या पराभवाचे कारण ठरला.
मनसेचा आक्रमक मराठीचा मुद्दा भावला
तीन वर्षापूर्वी मनसेची स्थापणा झाली होती. सर्व समाजांना बरोबर घेवून राज्याची प्रगती करण्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला अवघ्या 7 जागा मिळाल्या. मात्र नाशिक आणि पुणे महापालिकेत मनसेने चांगली कामगिरी बजावली. तरीही मनसेला कुणीही गृहित धरत नव्हतं. मात्र छठपुजेला विरोध, बिहारी विद्यार्थ्यांना झालेली मारहाण, त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर दाखल केलेले खटले, राज ठाकरेंना झालेली अटक, त्यानंतर रस्त्यावर उतरलेले युवक आणि महिला हे चित्र मनसेची ताकद वाढवायला पोषक ठरलं. परप्रांतियांचे मत मिळवण्याच्या नादात, आणि आक्रमक हिंदूत्वाची कास धरत चालल्याने काही प्रमाणात मराठी मतदार शिवसेनेपासून दुरावला होताच. आणि 1995 नंतर परप्रांतिय पुन्हा काँग्रेसच्या दावणीला गेले. आणि हिंदूत्वाच्या मुद्यावर वाढलेला शिवसेनेचा जनाधार कमी व्हायला सुरूवात झाली. नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेशानंतरही शिवसेनेने घवघवीत यश मिळवलं. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतरही मुंबई महापालिकेवर भगवा फडकलाच. मात्र राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला आणि एक प्रकारे शिवसेनेच्या वर्मावर घाव टाकला. मनसेचे 13 आमदार निवडून आले तर, शिवसेनेचे 40 पेक्षा उमेदवार मनसेमुळे पराभूत झाले. राज्यात पराभवच्या मार्गावर असलेले निष्क्रीय काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेवर आले.
आता पुढिल काळात शिवसेनेला त्यांच्या शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्या आधिच्याच धाक, दहशत, दरारा या मार्गाने वाटचाल करावी लागेल. त्याच बरोबरीने शेतक-यांचे प्रश्न, स्थानिकांना रोजगार, जबाबदार विरोधी पक्ष या भूमिका सक्षमपणे वठवल्यास शिवसेनेला पुन्हा मराठी माणसांचे प्रेम मिळणे अवघड जाणार नाही. तर मनसेला आता मुंबई, ठाणे, नाशिकच्या पलीकडे राज्यात पक्ष वाढवण्याची संधी आहे. त्यांचे 13 आमदार विधानसभेत आणि राज ठाकरे रस्त्यावर मराठीचा मुद्दा किती जोरकसपणे मांडतात, परप्रांतियांचे वाढते आक्रमण रोखण्यासाठी मनसे कोणती भूमिका घेते, महागाई, भारनियमन या मुद्यावर सरकारची कशी अडचण होते यावर मनसेचे यश अवलंबून राहील.
एक मात्र निश्चीत आहे की, मागील पाच वर्षात मराठवाडा आणि विदर्भातल्या रणरणत्या उन्हात शिवसेनेने रक्ताचे पाणी करून शेतक-यांचे प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला. तर मनसेने पहिल्याच फटक्यात 13 आमदार निवडून आणत राज्यात त्यांच्या पक्षाची पत निर्माण केली. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षांना एकमेकांशी स्पर्धा करत त्यांचा विस्तार करावा लागणार आहे. मात्र हा विस्तार करताना त्याचा फायदा काँग्रेसला कितपत होवू द्यायचा याचा विचार हे दोन्ही पक्ष कधी तरी करणार आहेत ? कारण काँग्रेसच्या राजकारणात महत्व आहे ते फक्त दलित - मुस्लिमांना नव्हे तर त्यांच्या वोट बँकेला. तसंच आता प्रत्येक शहरात वाढत असलेल्या परप्रांतियांच्या वोट बँकेला. त्यामुळे हे काँग्रेसचे आघाडी सरकार मराठी नागरिकांसाठी कोणतेही ठोस विकास कार्यक्रम राबवेल हे समजणे चूकीचे आहे. परिणामी शिवसेना आणि मनसे यांनी एकत्रितपणे समान कार्यक्रम ठरवला तरच काँग्रेसला राज्यातून हटवता येईल. आणि मराठी माणसाला सुखाचे दिवस येवू शकतील.

शिवसेनेचे ( रक्ताचं ) 'पाणी'

Wednesday, October 7, 2009

दिवट्यांना पाडा, घराणेशाहीला गाडा

राष्ट्रपतींचे पुत्र रावसाहेब शेखावत यांच्या उमेदवारीमुळे घराणेशाहीला आता उघडपणे राजमान्यता मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रपतींचे पुत्र मैदानात उतरतात म्हटल्यावर सगळ्याच पक्षातील प्रस्थापितांना ग्रीन सिग्नलच मिळाला. लोकसभा निवडणुकीतही संजीव नाईक, समीर भुजबळ, मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि निलेश राणेही वडिलांच्या 'पुण्याई'वर निवडून गेले. आता विधानसभा निवडणुकीत तर या लोकशाहीतील सरंजामदारांनी तर धुमाकूळच घातलाय. अमित देशमुख, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, राजन सातव, राहुल पुगलिया, संग्राम थोपटे, राजीव आवळे, प्रशांत ठाकूर, संदीप नाईक, पंकज भुजबळ, पुनम महाजन, आशिष देशमुख, पंकजा मुंडे - पालवे, कॅप्टन अभिजीत अडसूळ, कल्पना अढळराव पाटील यांच्यासारखे सर्वपक्षीय वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनेक प्रस्थापितांची आता तिसरी आणि चौथी पिढीही आता राजकारणात स्थिरावू लागली आहे.
बरं आता या सगळ्यांनाच समाजसेवेची तळमळ आहे. आपल्या राज्याला समाज सुधारणेचा मोठा वारसाही मिळालेला आहे. कोणतंही पद नसताना गाडगे महाराज फक्त त्यांच्या स्वच्छता आणि सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून संत पदाला पोचले. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की, सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नाही. मग आता अमित देशमुख, प्रणिती शिंदे खराटा घेवून लातूर आणि सोलापूर स्वच्छ करतील. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतील. मात्र हे शक्य असले तरी होणे नाही. संत गाडगे बाबांच्या नव्हे तर शिर्डीचे साई बाबा आणि सत्य साई बाबा यांच्या चरणी नतमस्तक होणा-यांची ही अवलाद सामाजिक सुधारणेचे कार्य करतील असं समजण्याचा गैरसमज कुणीही मनात ठेवू नये.
राजकारण्यांना घरात मंत्रीपदे, खासदार - आमदार ही पदे हवी आहेत, ती त्यांची पापे झाकण्यासाठी. जुन्या काळात गुप्त धनावर म्हणे नागाबा बसलेला असायचा. त्या प्रमाणेच ही पिल्ले काम करणार आहेत. दलालीची मलाई, कामांची ठेके ही आपल्याच घरात आली पाहीजे. सर्व पक्षीय कार्यकर्ते हे फक्त आता घोषणा देण्यापुरतेच मर्यादीत राहणार आहेत. वरील कोणत्याही नेत्याला असं वाटत नाही की, भ्रष्टाचाराची गंगा कार्यकर्त्याच्या घरापर्यंत जावी. ( अर्थात आमदार झाल्यावर त्याचाही बंगला होईलच.) दलाली खावून त्याचेही पोट सुटावे, दहाही बोटांमध्ये सोन्याच्या मोत्यासहीत अंगठ्या असाव्यात, त्यानेही ठेके आणि टक्केवारी घेवून स्वत:च्या पायावर उभं रहावं असं या नेत्यांना वाटतच नाही.
राजकारणी घराण्यांनी मोठ्या शिक्षण संस्था आणि साखर कारखाने उभारले आहेत. यातील भ्रष्टाचार बाहेर येवू नये यासाठी तसेच त्यांचा कारभार बिनबोभाट चालावा यासाठी त्यांना सरकारवर अंकुश ठेवायचा असतो. त्यासाठी खासदार, आमदार ही पदे उपयोगाची ठरतात. त्यामुळे या नेत्यांना ही पदे समाजसेवेसाठी नव्हे तर त्यांची पापे झाकण्यासाठी वापरायची आहेत.
या प्रकारे राजकारण सुरू राहिलं तर या राजकीय घराण्यांचीच मक्तेदारी निर्माण होईल. नव्हे तर ती आता झाल्यातच जमा आहे. ही घराणी पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकत राहतील. सामान्यांसाठी निर्माण केलेल्या लोकशाहीसाठी हा मोठा धोका आहे. गोरे इंग्रज तर गेले मात्र आता हे काळे इंग्रज लोकशाहीच्या माध्यमातून आपले शोषण करत आहेत. तेव्हा या निवडणुकीत या दिवट्यांना पराभूत केलेच पाहीजे. नाही तर लोकशाहीचा पराभव व्हायला वेळ लागणार नाही.

खमंग फोडणी - गणेश नाईक यांनी ख-या अर्थाने लोकशाहीची सेवा चालवली आहे. ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या गणेश नाईकांचे सुपुत्र संजीव नाईक हे त्याच जिल्ह्याचे खासदार आहेत. आता त्यांचे दुसरे सुपुत्र विधानसभेची निवडणूक लढवून विधीमंडळात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. खासदार आणि आमदार या दोन्ही पदांच्या माध्यमातून त्यांनी दिल्ली आणि मुंबईतील मोठी राजकीय पदे मिळवली आहेत किंवा त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आता गणेश नाईक यांनी आता देश किंवा राज्याच्या राजकारणात गुरफटून न जाता जिनेव्हात संयुक्त राष्ट्रात त्यांच्या कार्याची पताका फडकवली पाहीजे. म्हणजे त्यांच्या घराणेशाहीला फक्त प्रादेशिक किंवा राष्ट्रीय इतका संकुचित अर्थ न राहता जागतिक वलय प्राप्त हाईल. जय हो.