चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेल्या निधी गुप्तानं गौरव आणि महिका या दोन लहानग्यांसह आत्महत्या केली. मनाला सुन्न करणारी ही बातमी. आई पोटच्या मुलासाठी काय करत नाही ? आई तर एक पिढीच घडवते. मुलांची शाळा नव्हे तर विद्यापीठच आई असते. गौरव आणि महिकाच्या आईनं असं का केलं असेल ?
अशी नसते गं आई ! असंच तर ही मुलं तिला म्हणत नसतील ना ?
आपल्या देशातली एकत्र कुटुंब पद्धती ही जगात आपली ओळख होती. मात्र या नाते - संबंधांमध्ये आता त्सुनामी आली आहे, हेच या आत्महत्येतून स्पष्ट होत नाही का ? आपणही किती संवेदनाहीन झालो आहोत. मनाला चटका लावणारी ही बातमी, मात्र त्यावर रोखठोक चर्चा झालीच नाही. समाजातली मते - मतांतरे व्यक्त झालीच नाहीत. 11 मार्चला जपानमध्ये त्सुनामी आली. त्या त्सुनामीत नाते संबंधांच्या या त्सुनामीची बातमी वाहून गेली.
जग सोडून जाणारी निधी गुप्ता, मरणाच्या वाटेवर जाताना मुलांना का सोबत घेऊन गेली असेल ? मुलांना मृत्यूच्या दाढेत लोटताना तिचे हात का थरथरले नसतील ? मुलांकडं बघून जगण्याची नवी जिद्द निर्माण होते. मुलांच्या निरागस हास्यासमोर जगातली सर्व दु:ख विसरून जायला होतं. मग हे सर्व निधीला का जाणवलं नसेल ?
आता या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सासरच्या मंडळींच्या जाचामुळे निधीने हे पाऊन उचलल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. पुढिल तपासात सत्य बाहेर येईलही. मात्र निधीबरोबर
वावरणा-यांना, तिच्या नातेवाईकांना तिची घालमेल जाणवली नसेल का ? निधीच्या पतीला दारूचं व्यसन होतं. तसंच प्रॉपर्टीवरूनही वाद सुरू होता. या कौटुंबिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी वेळीच का पुढाकार घेतला नसेल ? जर त्यांच्या कुटुंबात संवाद असता, नाते - संबंधांमध्ये जिव्हाळा असता तर अशी घटना नक्कीच घडली नसती.
आपली कौटुंबिक आस्था कमी होत चालल्याचंच हे प्रतीक आहे. नातेसंबंधांमध्ये निर्माण होणारा तणाव, वाढती स्पर्धा, आणि घड्याळाच्या काट्यालाही मागे टाकून पुढे जाण्याची घाई यामुळं प्रत्येक व्यक्ती आत्मकेंद्री होत चालली आहे. या आत्मकेंद्री प्रवृत्तीमुळं समाजातला संवाद खुंटत चालला आहे. त्यामुळंच समाजात निकोप वातावरण निर्माण व्हायला हवं. घर हे फक्त भिंती असता कामा नये. घराघरातली घट्ट नातेसंबंधच अशा प्रकारच्या आत्महत्या रोखू शकतात. जिवनात कितीही तणाव असला तरी आत्महत्या हा काही मार्ग नव्हे.
No comments:
Post a Comment