Monday, February 11, 2019

'ठाकरे' : मैदानातले, मनातले आणि पडद्यावरचे


जाहीर सभेत लाखोंच्या गर्दीत मैदान गाजवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, या महाराष्ट्राने पाहिले आहेत. लाखो लोकांनी त्यांच्या जाहीर सभा ऐकल्या नव्हे तर जीवंत अनुभवल्या आहेत. त्या लाखो लोकांसारखा मी सुद्धा आहे. शिवसेनाप्रमुखांची तर मी अनेक भाषणं ऐकली आहेत. शिवसेनाप्रमुखांची भाषणं मी वेगवेगळ्या शहरात जाऊन ऐकली आहेत. संभाजीनगर, मुंबई, नाशिक, अमरावती या ठिकाणी झालेल्या शिवसेनाप्रमुखांच्या अनेक जाहीर सभेतली भाषणं ऐकली आहेत.
ठाकरे सिनेमाच्या सिल्व्हर स्क्रिनला नवाजुद्दीन सिद्दीकी यानं व्यापून टाकलं होतं, यात शंका नाही. पण त्या सिल्व्हर स्क्रिनवर म्हणजेच पडद्यावर मी, शिवसेनाप्रमुखांनी गाजवलेली मैदानं शोधत होतो. मुंबईतलं शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थ सिनेमात आहे. पण संभाजीनगरमधलं मराठवाडा सांस्कृतिक मैदान यात नाही. याच मैदानात 1988 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पहिली सभा घेतली. आणि तिथून  शिवसेना मराठवाड्यात झपाट्यानं आणि जोमानं वाढली. संभाजीनगर हे माझं आवडतं शहर, असा उल्लेख शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे करायचे. पण या सिनेमात मराठवाडा सांस्कृतिक मैदान दिसलंच नाही. 

सिनेमात औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव दिल्याचा उल्लेख 1994 सालातला दाखवण्यात आलाय. पण तो चुकीचा आहे. 1988 मध्येच शिवसेनाप्रुखांनी औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलं होतं.
नाशिकमधल्या गोल्फ क्लब मैदानावर शिवसेनेचं 1994 मध्ये अधिवेशन झालं होतं. शिवसेनेला सत्तेत आणण्यात त्या अधिवेशनाचा मोठा वाटा होता. पण सिनेमात ना गोल्फ क्लब दिसलं ना त्या वेळचं अधिवेशन.
मैदानातले ठाकरे शोधत ठाकरे सिनेमा पाहिला. अर्थात शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे हे अडीच तासांच्या सिनेमात दाखवणं तसं अशक्यच. पण हे शिवधनुष्य पेलण्यात संजय राऊत आणि अभिजित पानसे यशस्वी झाले.
माझ्या लहानपणी पाहिलेले आक्रमक, सावळे आणि दाढी ठेवणारे शिवसैनिक सिनेमात दिसले. शिवसेनेच्या पाटीवर जसा आक्रमक वाघ असतो अगदी तसेच शिवसैनिक या सिनेमात घेण्यात आले. शिवसेनाप्रुखांचा आक्रमकपणा, विनोदीपणा आणि हजरजबाबीपणा या सिनेमात पाहायला मिळाला.
नागपूरच्या विमानतळावर हल्ला करण्यासाठी आलेल्यांना निडरपणे सामारे जाणारे शिवसेनाप्रमुख पाहताना अंगावर रोमांच उभं राहिलं. तर समुद्राकडे धाव घेणा-या चिमुरडीच्या आईला, मुलीला पोहायला शिकवलं का ? असं विचारताना शिवसेनाप्रमुखांचा मिश्किलपणा पुन्हा आठवला. दंगल, आणीबाणी, बॉम्बस्फोट हे सर्व प्रसंग सिनेमात पाहताना, प्रत्यक्ष पाहत असल्याचा भास होतो.
दत्ताजी नलावडे, सुधीर जोशी, मनोहर जोशी पडद्यावर पाहायला मिळाले. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक ही मंडळी जर शिवसेनेत असती तर त्यांनाही पडद्यावर मोठं स्थान मिळालं असतं. आणि अजून एक भुजबळ, राणे यांची आता जी अवस्था झालेली आहे, ती अवस्था ते जर शिवसेनेत असते तर झाली नसती. हा सुद्धा 'ठाकरे' महिमा म्हणायला हवा. #संगो

No comments:

Post a Comment