Saturday, April 19, 2014

'सिंचन (घोटाळा), मूत आणि पाणी'

वेड लागलंय वेड, राज्यातल्या मीडियाला वेड लागलंय. अजित पवारांसारख्या निर्लेप आणि सालस व्यक्तीमत्वाच्या या संत माणसावर तुटून पडलेत हे मीडियावाले. मात्र मीडिया आणि विरोधी पक्षाला त्यांची, बहिणीवरील माया दिसत नाही. बहिणीवरील मायेपोटी ते मासाळवाडीच्या गावक-यांना म्हणाले, 'बहिणीला मतं दिली नाही तर गावाचं पाणी तोडेन'. मात्र  मी़डिया आणि विरोधकांना हे कळालंच नाही. आणि जो काही पुरावा म्हणून ऑडिओ ऐकवला जातोय, तो दादांचा आवाज नाहीच. बघा पोलिसांच्या तपासातही हेच सिद्ध होईल. अहो अगदी सीबीआय, एफबीआय आणि काँग्रेस आय ने जरी तपास केला तरी दादांचा सत्यपणा सिद्ध होईल, यात वाद नाही. अहो इतका उर्मट, धमकी देणारा, दम देणारा आवाज दादांचा असणं शक्यच नाही. 
देशाचं रक्षण करणारा कोणीतरी एक सैनिक मासाळवाडीत जरा जास्तच बोलला. आता तो सैनिक सापडत नसल्याची बातमी वाचनात आली. अहो गेला असेल सीमेवर देशाचं रक्षण करायला. उगीच वाकडातिकडा अर्थ काढू नका. त्या सैनिकाला म्हणावं, इथं दादा आहेत. रक्षण करण्यासाठी. 'पाणी' पाजण्यासाठी. मात्र ही मायाच नागरिकांना कळत नाही. आणि हेच दृष्ट लोक दादांच्या विरोधात तक्रार नोंदवतात. आबांचे पोलीसही गुन्हा दाखल करतात. दादांच्या विरोधात पक्षांतर्गत विरोधकांनी उचल तर खाल्ली नाही ना ? या काळजीने राष्ट्रवादीतल्या दादा गटाच्या समर्थकांच्या छातीत धस्स झालं, बघा. अजित पवारांवर गुन्हा दाखल होणं हा, पुरोगामी महाराष्ट्रावरील कलंक आहे. 
तिसरं महायुद्ध हे पाण्यावरून होणार आहे. हे ग्रामीण भागातल्या जनतेला समजणार नाही. त्यांना हे लक्षात आणून देण्यासाठीच दादांनी जाणूनबुजूनच  तशी भाषा मासाळवाडीत वापरल्याचा एक मतप्रवाह जागतिक राजकारणात व्यक्त होतोय. मात्र मासाळवाडीतल्या दादांच्या भाषेचा अर्थ लक्षात न आल्यानेच माडियाची 'जल बिन मछली' अशी अवस्था झाली आहे.
मागील वर्षी राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. मुख्यमंत्र्यांनी 0.1 टक्काही सिंचन वाढलं नाही, असं धक्कादायक विधान केलं होतं. त्यामुळे राज्यात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांना बळ मिळालं होतं. मात्र त्यामुळे व्यथित झालेल्या दादांनी काकांनाही न सांगता थेट राजीनामा दिला. साधेसुधे नव्हे तर तब्बल 72 दिवस दादा मंत्रिपदापासून दूर होते. हे बघून जगभरातल्या सज्जनांचा जीव तीळतीळ तुटत होता. अखेर 72 दिवसांनी दादा मंत्रिमंडळात आले. हे पाहून स्वर्गातूनही त्या दिवशी देवांना पुष्पवृष्टी करण्याची इच्छा झाली असेल. देव पुष्पवृष्टी करणारही होते. मात्र राज्यात दुष्काळ असल्यानं ती फुलं सुकून जातील, या विचाराने देवांनी पुष्पवृष्टी केली नाही.
धरणात मूतण्याचं केलेलं विधान तर मीडिया किती बहिरा आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. 'दुष्काळामुळे राज्यातली धरणं मृतप्राय झाली आहेत', असं दादा म्हणाले होते. मात्र दादांच्या वाईटावर टपलेल्या मीडियाने मूत शब्दच लावून धरला. त्यामुळे व्यथित झालेल्या दादांनी प्रीतीसंगमावर आत्मक्लेश केला. दादा आत्मक्लेश करत असताना दादांचे राज्यभरातले कार्यकर्ते जेवले नाहीत. अनेक कॉन्ट्रॅक्टर तर त्या दिवशी सरकारी कार्यालयांमध्ये गेले नाहीत. त्यांनी त्या दिवशी बिल घेण्याच्या कामावर बहिष्कार टाकला, अशी चर्चा होती.
सहकार क्षेत्रातली काही लोकांची टगेगिरी दाखवून देण्यासाठी दादांनी स्वत:ला टग्या म्हणवून घेतलं होतं. मीडियातल्या काही घटकांची मुजोरी वाढल्यानं दादांना त्यांना 'समजेल' अशा भाषेत बोलावं लागलं होतं. मात्र दादांची प्रेमाची भाषा सामान्यांना कळतच नाही. इतका सहृदय इसम गावाला पाणी देणार नाही, असं बोलू तरी शकतो का ? अशी भाषा गुंडांची आहे, दादांची नाही. मुंबईत एसआरएसाठी चाळी, झोपडपट्ट्या रिकामी करण्यासाठी बिल्डर तिथल्या नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करतात. कृपया करून मुंबईतल्या बिल्डरांच्या उदाहरणाची दादांबरोबर तुलना करू नये. दादांची बहिणीवरील माया समजून घ्या. ( ही माया वेडी नाही, तर 'शहाणी' आहे.) दादांचं नेतृत्व ही आपल्या मिळालेली दैवी देणगी आहे. उगाच त्यांचं 'पाणी' जोखू नका.

No comments:

Post a Comment