Friday, April 9, 2010

तुम हमे वोट दो, हम तुम्हे पानी देंगे

महापालिका निवडणुकीचा प्रचार आज थंडावला. नवी मुंबई आणि संभाजीनगरसाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दोन्ही शहरात सभा घेतल्या. जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी तर संभाजीनगरात धक्कादायक विधान केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जैस्वाल गटाला सत्ता दिली तर शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, शहराला पुरवठा करण्यासाठी पुरेसं पाणी आहे. मात्र युतीची सत्ता असल्याने ते पाणी द्यायचं नाही, अशी भूमिका आघीडीने घेतली आहे. चला या निमीत्ताने झारीतले शुक्राचार्य जनतेला दिसले. तसंच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचं पाणीही जोखता आलं.
मुख्यमंत्र्यांनीही नवी मुंबईत वाढिव एसएफआयचं आश्वासन देताना आपण वाढपी असल्याचं सांगत मतदारांना एक प्रकारे काँग्रेसकडेच सत्ता सोपविण्याचे निर्देशच दिले. निवडणुकीत आश्वासनं काही नवी नाही. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपण सत्ता कशा प्रकारे वाकवू शकतो याचीच प्रचिती दिली. नाही तरी काँग्रेस आघाडीच्या या राज्यात काही दिल्याशिवाय काही मिळत नाहीच. त्याला ही निवडणूक तरी कशी अपवाद ठरेल. अर्थात काँग्रेसच्या रक्तातच हा गुण आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशाला जे काही स्वातंत्र्य मिळाले ते काँग्रेस मुळेच मिळाले असा दावा काँग्रेसवाले अगदी देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीपासून करताहेत. बरं हे स्वातंत्र्य कसं मिळालं तर पाकिस्तान देवून. या न्यायाने काही दिल्याशिवाय काही मिळत नाही, हे खरंच.
काँग्रेसचे हे वाढपी मुख्यमंत्री सांगतात की ओळखीचा वाढपी असल्यावर शेवटच्या पंगतीत शेवटच्या रांगेत असला तरी बुंदी मिळते. आता ही बुंदी पात्रात पाडायची म्हणजे काँग्रेसला मत द्यावं लागणार असाच हा इशारा आहे. मात्र वाढप्याचाही हा काय नादानपणा म्हणायचा, राज्य चालवता आणि महापालिकेसाठीही तुमची औकात काय आहे ती दाखवून देता. महापालिका विरोधकांच्या ताब्यात असल्यावर विकास कामांना खीळ घालायची, सरकारकडून सहकार्य करायचे नाही. आणि पुन्हा विकास झाली नाही अशी बोंब ठोकायची. ही दुटप्पी नीती आता जगजाहीर झाली आहे. त्यामुळे जनतेनेही काँग्रेसची ही कुल्हेकुई ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे.

खमंग फोडणी - लग्न सराई आता सुरू झालेली आहे. त्यातल्या काही तिथी तर अगदीच दाट आहेत. त्यामुळे लग्नातच्या ठिकाणी पाहुणेमंडळींची मोठी धांदल उडणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लग्नाच्या ठिकाणी पोचण्यासाठी घामाघूम होत आणि धावपळ करत जावं लागणार. लग्न लावल्यानंतर पंगतीला बसल्यावर अशोकरावांचा शोध घ्या. दिसल्यावर त्यांना हात दाखवा. आणि वाढिव बुंदी ताटात पाडून घ्या. कारण राज्याला आता नवा वाढपी मिळालाय. घ्या बुंदी.

No comments:

Post a Comment