Friday, October 29, 2010

विधवांच्या वैधव्यावर नेत्यांचे फ्लॅट्स

देशाला बाहेरच्या शत्रूंचा जितका धोका नाही, तितका धोका हा भ्रष्टाचा-यांचा आहे. अतिरेक्यांपेक्षाही हे शत्रू जास्त धोकादायक आहेत. कारगिलमध्ये जे सैनिक देशाच्या संरक्षणासाठी शहीद झाले, त्यांच्या विधवा पत्नींसाठी नौदलाचा भूखंड देण्यात आला होता. मात्र हा भूखंड आपले भ्रष्ट नेते आणि अधिका-यांनी अक्षरश: लाटला. ज्या - ज्या अधिकारी आणि मंत्र्यांसमोर 'आदर्श' सोसायटीची फाईल गेली त्या सगळ्यांना फ्लॅट्सची खिरापत वाटली गेली. आठ ते दहा कोटींचा भाव असलेले फ्लॅट्स 50 ते 60 लाखात विकले गेले. आता मेथीची जुडी स्वस्त मिळते म्हणल्यावर आपण नाही का दोनच्या ऐवजी चार जुड्या घेतो. तसंच या नेत्यांनीही केलं. स्वस्तात प्राईम लोकेशनला फ्लॅट्स म्हटल्यावर सासू, मेव्हणा आणि दूरच्या पाहुण्यांनाही फ्लॅट्स दिले गेले. सनदी अधिका-यांनीही त्यांनी ज्या तत्परतेने कामे केली त्याची फ्लॅट्सच्या माध्यमातून पुरेपूर किंमत वसूल केली. कारण अशी तत्पता ते काही 'आम आदमीसाठी' दाखवत नाही.
आमच्या भ्रष्ट नेत्यांनो आणि अधिका-यांना तुम्ही भ्रष्टाचार सुरूच ठेवा. कारण तो थांबवणं आता तुम्हाला शक्य नाही. मात्र थोडी तरी मनाची लाज ठेवा. ज्या देशातल्या मातीत जन्मलात, ज्या देशाचं अन्न खाता त्याच्याशी तरी प्रतारणा करू नका. जे सैनिक देशासाठी शहीद झाले, त्यांच्या ऋणातून थोडीतरी उतराई व्हा. कारण तुम्हाला खाण्यासाठी अख्खा देश आहे. तुमचे फारच थोडे घोटाळे उघड होतात. जे उघड झालं ते अगदीच हिमनगाचं टोक आहे, हे ही सगळ्यांना माहीत आहे. मात्र जो भूखंड शहिदांच्या विधवांसाठी होता त्याला हात लावताना तुमचे हात थरथरले नाहीत का ? शत्रूच्या गोळ्यांना निधड्या छातीने सामो-या गेलेल्या सैनिकांचेही तुम्हाला स्मरण झाले नाही का ?
कोट्यवधीच्या फ्लॅट्समध्ये तुम्ही रहायलाही जाल. मात्र त्या फ्लॅट्समध्ये तुम्हाला झोप येईल का ? या प्रश्नाचं आधी उत्तर द्या. फ्लॅटच्या भिंतींना जो लाल रंग असेल तो रंग तुम्हाला अतिरेक्यांच्या गोळ्यांनी चाळण झालेल्या शहीदांच्या लाल रक्तांची आठवण करून देईल. ज्या अलिशान फ्लॅटच्या गॅलरीतून तुम्ही समुद्र किनारा पहाल आणि त्या नंतर जेव्हा मान करून शुभ्र आकाश पहाल तेव्हा, शहीदांच्या पत्नींच्या उजाड झालेल्या कपाळाची तुम्हाला आठवण येईल. शहिदांची मुलं तुम्हाला प्रश्न विचारतील, आमच्या वडिलांनी देशासाठी मरण पत्करलं. आणि तुम्ही आम्हाला आमच्या हक्काच्या घरातही राहू देणार नाहीत का ? नेते आणि अधिका-यांनो इतकं तुमचं रक्त पांढरं झालंय का ? की तुम्हाला तुमच्या स्वार्थाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही.
शहीद झालेल्या सैनिकांच्या वारसांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यासाठी ब-या बोलाणं ते फ्लॅट्स खाली करा. नाही तर सामान्य नागरिकांना हातात दगड घेऊन तुमच्या फ्लॅट्सवर भिरकावे लागतील. आता जनतेचा उठाव होण्याची वाट पाहू नका. जनता चिडलेली आहे. जर जनेतेने दगड हातात घेतले तर परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल. याचे भान ठेवा.

1 comment:

  1. Dear Shri Gore,
    Forgive me for typing in English as I do not know how to use the Marathi font provided by Gmail on the blog.
    I read your blog with interest. I generally agree with your views. Do write on social matters too. Politicians have become too thick-skinned and howsoever we protest, they will not budge from their nefarious activities.
    Yeshwant Karnik.

    ReplyDelete