Tuesday, October 19, 2010

शिवसेनेचा 'आदित्यो'दय आणि 'वाग्या' वेताळ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरील सभा नेहमीच्या उत्साहात संपन्न झाली. प्रखर राष्ट्रवादी ( घड्याळवाले नव्हे ) विचारांचा दुष्काळ असलेल्या देशात विचारांचे सोने दृष्टीस पडत नाही. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाकडे, ते देणार असलेल्या विचारांकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. शिवसेनाप्रमुखांनीही त्यांच्या खणखणीत आणि दणदणीत विचारांनी पार दाणादाण उडवून दिली. काश्मीरपासून ते बांग्लादेशपर्यंत आणि नेहरूंपासून ते माणिकरावांपर्यंत त्यांनी सगळ्यांनाच 'ठाकरी' तडाखा दिला.
शिवसेनेची 'यवा सेना'ही याच मुहूर्तावर मैदानात उतरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे हे आतापर्यंत कोणत्याही घटनात्मक पदावर बसलेले नाहीत. त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. पायाशी आलेली पदं नाकारणारे हे घराणे. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री या पदावर बसवले. शिवसेनाप्रमुखांना 'किंग' नव्हे तर 'किंगमेकर'च्या भूमिकेत रहायला आवडते. आदित्य ठाकरे यांच्याकडे 'युवा सेना'चे सेनापतीपद देण्यात आलं. आणि वृत्तपत्रांमधून गदारोळ सुरू झाला. बरं हे पद काही घटनात्मक पद नाही.
जवाहरलाल नेहरू - पंतप्रधान, इंदिरा गांधी - पंतप्रधान,राजीव गांधी - पंतप्रधान, सोनिया गांधी - खासदार, राहुल गांधी - खासदार आणि भावी पंतप्रधान. ही घराणेशाहीची घटनात्मक पदे. तरीही अनेक पत्रकार, चॅनेल्स यांनी घराणेशाहीच्या नावाखाली शिवसेनेवर टीका का केली असेल ? या ठिकाणी प्रामाणिकपणे असं वाटतं की, शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या भाषणात 'पेड न्यूज'चा मुद्दा मांडल्याने 'पेड पत्रकारांच्या' मूळावर (पोटावर) घाव बसला. आणि ते चवताळून उठले. बरं 'पेड न्यूज'विषयी बोलताना बाळासाहेबांनी न्यूज चॅनेल्सचा उल्लेखही केला नव्हता. मग तो 'वाग्या' वेताळ का घुमू लागला असेल ? शिवसेनेत घराणेशाहीला धारा नाही, हे शिवसेनाप्रमुखांचे वाक्य तुम्हाला पटते का ? असा सवाल त्याने का उपस्थित केला असेल ? हा सवाल उपस्थित करून आपल्या सोयीची टाळकी बोलवायची, आपल्याला हवे ते त्यांच्याकडून वदवून घ्यायचे आणि स्वत:च आपली पाठ थोपटून घ्यायची असा हा प्रकार. त्या संपूर्ण चर्चेत ठाकरे घराण्यातली कोणतीही व्यक्ती घटनात्मक पदावर बसलेली नाही, त्यांनी निवडणूक लढवलेली नाही, या मुद्यांकडे का दूर्लक्ष केले असेल ? कारण या चर्चेतून शिवसेना द्वेषाची मळमळ ओकून टाकण्याचाच उद्देश असावा, असं एकंदरीत चर्चेतून स्पष्ट होतं.
या चर्चेत आदित्य ठाकरेंना तलवार देण्यावर टीका करण्यात आली. शिवसेनाप्रमुखांच्या भाषेवर आक्षेप घेण्यात आले. हा नेता मोठा कसा ? असा सवालही उपस्थित करून पुढिल परिणामांची चिंता न करता हे विधान करत असल्याचंही म्हटलं गेलं. ही पत्रकारिता म्हणायची की मस्ती ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते आहेत की नाही याचे प्रमाणपत्र काय हा 'वाग्या' वेताळ देणार का ?
बाळासाहेबांच्या भाषेवर आक्षेप घेणा-या या महाशयांनी त्यांच्या भाषेमुळे त्या चॅनेलमधून किती लोकांना नोकरी सोडायला लावली आहे, याची ते माहिती देतील का ? त्यांच्या भाषेमुळे कित्येकांनी ते चॅनेल नव्हे तर पत्रकारिताच सोडून दिली. त्यांचा कार्यालयातला थयथयाट, तुला अक्कल नाही असे शब्द तिथे नेहमीच गुंजत असतात. तुम्ही काम करण्याच्या लायकीचे नाहीत, असे शब्द कितीतर डेसीबल्समध्ये तिथे आदळत असतात.
स्त्रियांना संरक्षणासाठी शस्त्रे द्या, असंही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावर बोलले. ही शस्त्र जर आधीच दिली गेली असती तर एका महिला कर्मचा-याकडून त्यांना 'ग्रेट भेट' नव्हे तर 'लाईफ टाईम' भेट मिळाली असती आणि 'चला, थोबाडीत खाऊ या' अशी हेडलाईनही झाली नसती.
वाद निर्माण करून हल्ले ओढवून प्रसिद्धी मिळवायची. टीआरपी वाढवायची असा हा डाव आहे. दर एक दोन वर्षांनी त्यांना असा वाद किंवा हल्ला हवाच आहे. बहुतेक याची त्यांनाच सवयच झाली असेल. असो.
शिवतीर्थावर लाखो शिवसैनिक जमले होते. शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी ते तिथे जमले होते. त्या गर्दीतला मी ही एक वारकरी. माझ्या दैवतावर चर्चेत ठरवून केलेला हा हल्ला मनाला पटला नाही. माझ्या दैवताची ही विटंबना सहन होणार नाही. त्यासाठी हा ब्ल़ॉग प्रपंच. तूर्तास इतकेच. खालच्या या दोन वेळी वरील सर्व ब्लॉगचा खुलासा नाहीत. माझ्या मनातली भावना व्यक्त केली. इतकंच.

1 comment:

  1. आदित्यचे आडनाव ठाकरेच्या ऐवजी गोरे असते तर त्यांना युवा सेनेचे अध्यक्षपद मिळाले असते का ? कोणतीही राजकीय कर्तबगारी नसताना केवळ घरण्यामुळेच त्यांना युवासेनेची जाहगिरी मिळाली आहे.शिवसेनेत घराणेशाही आहे. ती मान्य करण्याचा दिलदारपणा दाखवा ना !

    ReplyDelete