Thursday, November 4, 2010

ओबामांना दाखवा 'भ्रष्टाचाराचा ओसामा'

दरवर्षी नित्यनेमाणं येणारी दिवाळी आनंद आणि उत्साह घेऊन येत असते. या वर्षी भारतात दिवाळी बरोबरच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा येत आहेत. आता थोरा - मोठ्यांचे पाय लागणार म्हटल्यावर धावपळ होणं सहाजिक आहे. मुंबईही सध्या चकाचक होत आहे. सुरक्षा कशाला म्हणतात ? सुरक्षा कशी असते ? हे ही या निमीत्ताने दिसून येईल.
बराक ओबामा मुंबईत मणीभवनला भेट देणार आहेत. ओबामा यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा पगडा आहे. महात्मा गांधींविषयीचा आदर ओबामांनी अनेकदा व्यक्त केलेला आहे. महात्मा गांधींच्या विचारांचे पाईक सध्या देशावर आणि महाराष्ट्रात सत्तेत आहेत. केंद्र आणि राज्यावर महात्मा गांधींच्या विचारांचे पाईक असलेल्या गांधी घराण्याचे नियंत्रण आहे. इतका हा देश गांधीमय झालेला आहे. तेव्हा बराक ओबामांनी मणीभवन तर बघावेच. पण त्या बरोबर गांधीजींचा वारसा सांगणा-या त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक शहरात केलेले भूखंड आणि भ्रष्टाचाराचे प्रतापही बघावेत. अर्थात हे सगळे प्रताप बघायचे ठरवले तर सलग दोनदा भारतात जन्म घ्यावा लागेल. यावरून हे काम किती अवघड आहे, हे लक्षात येईल.
तरी ओबामांना 'आदर्श सोसायटी' दाखवायलाच हवी. आमच्या देशात शहीद आणि त्यांच्या पत्नींनी काय 'मान' दिला जातो, हे त्यांना यामुळे लक्षात येईल. शहिदांच्या पत्नींचे नाव पुढे करून भूखंड लाटायचा आणि त्यावर आपले इमले रचायचे, अशा अवलादी या देशात आहेत. ओबामांनी वाट वाकडी करून 'आदर्श सोसायटी' पाहणे अत्यंत गरजेचे आहे. पैसा कसा आणि कुठेही, कसा खाता येऊ शकतो ? याचा परिपाठच तिथे उभारण्यात आला आहे. मात्र एका बाबतीत महात्मा गांधीजींच्या वंशजांचे मोठेपण मानलेच पाहिजे. गांधींच्या नियंत्रणाखाली असलेला काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारातला ट्रेन्ड सेट करणारा पक्ष आहे. बोफोर्स, आदर्श असे कितीतर ट्रेन्ड या पक्षाने देशात सेट केले आहेत.
कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचारामुळे जगप्रसिद्ध झालेले सुरेश कलमाडी, सासू आणि मेहुण्यांच्या फ्लॅट्समुळे गोत्यात आलेले अशोक चव्हाण, झेंडा मार्चसाठी वसुली अभियान करणारे माणिकराव ठाकरे यांची तर ओबामांनी स्वतंत्रपणे तासभर भेट घेतली पाहिजे. मुले, पत्नी यांच्या नावे फ्लॅट्सची तजवीज करणारे कुटुंबदक्ष सरकारी अधिकारी यांच्याकडूनही ओबामांना बरंच काही शिकता येण्यासारखं आहे. काम करतानाही कुटुंबापासून नाळ तुटू न देण्याची अधिका-यांची कामगिरी अचाटच म्हणायला हवी.
दोन वर्षानंतर अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. त्यावेळी ओबामांनाही बरेच डॉलर्स खर्च करावे लागतील. प्रचारासाठी तजवीज करावी लागेल. त्यासाठी ओबामांनी तातडीने माणिकराव ठाकरे यांना भेटून पैसा कसा जमा करावा, मंत्रिमंडळाकडून कशी वसूली करावी या विषयीची विस्तृत माहिती घ्यायला हवी. आणि सुरेश कलमाडींना तर त्यांनी अमेरिकेतच न्यायला हवं. कारण इतक्या अचाट मेंदूचा हा माणूसच अमेरिकीची संकटात सापडलेली अर्थव्यवस्था तारू शकतो.
खमंग फोडणी - अमेरिकेनं जंग जंग पछाडले तरी अजून त्यांना ओसामा बिन लादेन अजून सापडलेला नाही. मात्र भारतात जागोजागी भ्रष्टाचाराचे ओसामा दिसून येतात. ओसामा बिन लादेन हातात बंदूक घेऊन लोकांना ठार मारतो. मात्र हे भ्रष्टाचारी ओसामा बंदूकीने नव्हे तर त्यांच्या भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकांना जगणं मरणापेक्षा यातनामय करताहेत. देशातला भ्रष्टाचाराचा ओसामा असाच वाढत राहिला तर या देशात काही दिवसानंतर फक्त त्यांचीच साम्राज्य तयार होतील. आणि इथल्या नागरिकांना त्यांचे बटिक म्हणून रहावे लागेल.

1 comment:

 1. आपला भ्रष्टाचार ओबामा यांना दाखवुन काय मिळणार. आपल्या घराला लागलेली आग आपणच विझवायला पाहीजे - बाकीचे दिवाळी समजुन टाळ्या मारतील व आनंद घेतील. ज्या भारतात लोकांच्या भ्रष्टाचार संबंधीत संवेदना बधिर झाल्या आहेत त्यांना काय समजणार व काय सांगणार. जो भ्रष्टाचार करत नाही तो मुर्ख व भ्रष्टाचार करणारा स्मार्ट असे जिथे गणले जाते तिथे सगळा असाच सावळा गोंधळ चालणार.

  कोठलाही देश स्वतःचा फायदा बघते. अमेरीका स्वतःचा फायदाच बघते. आपला देश स्वतः फायदा बघत नाही
  - आपण अजुन सुद्धा बांगलादेशी निर्वासितांना शरण देतो.
  - चिन ब्रह्मपुत्रा वळवते आहे त्यांच्या कडे - पण आपण माणुसकी म्हणुन सिंधु नदी वाहु देतो पाकीस्तानात.
  - पाकीस्तान अतीरेक्यांना शिकवुन पाठवत आहेत आपल्या कडे व आपण त्यांना पुरग्रस्तांसाठी अपमान सहन करुन मदत पुरवत आहोत.

  ReplyDelete