Thursday, November 25, 2010

'इंडिया इज इंदिरा' ते 'इंडिया माता'

'इंदिरा इज इंडिया अँन्ड इंडिया इज इंदिरा' या शब्दात काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष देवकांत बरूआ यांनी इंदिरा गांधींची महती गायली होती. देशातल्या राजकीय चाटूगिरीतला हा सर्वोच्च नमूना होता. आता जवळपास पस्तीस वर्षानंतर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या वेळी फक्त ठिकाण आणि नेते बदललेत. मात्र त्यांचा पक्ष तोच आहे, काँग्रेस. अलाहाबादेत काँग्रेसच्या संदेश यात्रेचा दुसरा टप्पा सोनिया गांधींच्या सभेने सुरू झाला. काँग्रेसला सव्वाशे वर्ष झाल्यानिमित्त ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी सोनिया गांधींना 'इंडिया माता' संबोधणारी पोस्टर लावण्यात आली होती. काँग्रेसचे सारथ्य हे राहुल गांधींकडे दिल्याचेही पोस्टरमध्ये दर्शवण्यात आले. भविष्यात काय वाढून ठेवलंय, त्याचीच ही झलक होती.
जगदंबिका पाल यांनी या पोस्टरचे समर्थनही केले. हे तेच ते थोर नेते एका दिवसाचे मुख्यमंत्री, रात्री बारा वाजता ज्यांचा शपथविधी झाला होता ती ही थोर विभूती. असो.
सोनिया गांधींनी गरिबांसाठी जे कार्य केलंय त्यामुळं त्या 'इंडिया माता' या पदाला पोचल्या आहेत, असं पाल हे महाशय म्हणाले. आता त्यांचा तरी काय दोष म्हणायचा ? चाटुगिरी ही तर काँग्रेसची संस्कृतीच आहे. त्यातून भले - भले सुटले नाहीत. शंकरराव चव्हाणांनी संजय गांधींचे जोडे उचलले, रमेश बागवेंनी राहुल गांधींचे जोडे उचलले होते. कुणाला तरी खुश केल्याशिवाय तिथं काही मिळतच नाही. त्यामुळं चाटुगिरीशिवाय काँग्रेसमध्ये पर्याय नाही.
शाळेत असताना गांधी जयंतीला आम्हाला शहरातून फेरी काढायला लावायचे. त्या फेरीत आम्ही शाळकरी विद्यार्थी 'एक रूपय्या चांदी का, देश हमारा गांधी का' अशी घोषणा द्यायचो. असं गांधीवादाचं बाळकडू प्रत्येकाला देण्याचा हा सरकारी पातळीवरचा प्रयत्न होता आणि अजूनही आहे.
तर अशा या इंदिरा माता, आता सोनिया माता आणि पुढिल काळात देशाचं सारथ्य ज्यांच्या हाती येणार आहे असे राहुल दादा. तुम्हीच आम्हा गरिबांचे मायबाप. कारण भ्रष्टाचा-यांना आणि धनदांडग्यांना तुमची गरज नाही. भ्रष्ट नेते हे तुमच्या पायरीवरच पडलेले आहेत. तेव्हा हे माते, तुझे आशिर्वाद असेच आमच्या पाठिशी असू दे. कोणालाही काहीही कमी पडू देऊ नको. चुकलं माकलं माफ कर.

No comments:

Post a Comment