Monday, December 7, 2015

चहा आणि मी !

पहिलं प्रेम सगळ्यांना आठवतं. मात्र पहिला चहा कधी प्यायलो हे कोणालाही आठवणार नाही. मलाही आठवत नाही. पण बहुतेक दुधाचे दात पडल्यानंतर चहाच्या बशीला तोंड लावलं असण्याची शक्यता आहे. प्रत्येक पालकांना त्यांचं मुलं गुटगटीत असावं असं वाटतं. त्यामुळे चहा पिऊ नये, हे बिंबवलं जातं. बोर्नव्हिटा टाकून दिलं जाणारं दूध मी लहानपणी प्यायचो. अर्थात त्यामुळे माझी प्रकृती काही सुधारली नाही. पण बोर्नव्हिटाचा खोटेपणा उघड झाला. बोर्न असताना आपण जे असतो तेच खरं, बाकी व्हिटा-बिटाचं काही खरं नसतं.
लहानपणी कोणाच्या घरी गेल्यावर चहा प्यायचा नाही, असं बजावून सगळे बाहेर पडायचो. मी कितीही आग्रह केला तरी चहा घ्यायचो नाही. मात्र माझा लहाना भाऊ नाही-नाही म्हणत बशी ओढायचा. अर्थात घरी आल्यानंतर त्याला त्याच्या चहाकर्माची फळं मिळायची.
सहावीत असताना मी चहा तयार करायला शिकलो. आमच्या शेजारी राहणा-या गरड काकू, जाधव काकू, बनकर काकू आईकडे गप्पा मारायला यायच्या. मी त्यांना चहा करायचो. काकू मंडळीही 'संतोष चांगला चहा करतो', असं म्हणायच्या. मग मी अधिक उत्साहाने विलायची, अद्रक टाकून मस्त चहा करायचो. कधी-कधी गवती चहाही टाकायचो. आमच्या छोट्या गल्लीत माझं मोठं नाव झालं.
सकाळी शाळेत जाताना थंडीत आईने करून दिलेल्या चहाची चव आजही आठवते. शाळेत असताना पॉकेट मनी ही संकल्पना आमच्या घरात रूढ झालेली नव्हती. परिचितांपैकी कोणाकडेही तसले फॅड नव्हते. त्यामुळे कधी तरी मिळालेले पैसे वाचवून हिवाळ्यात शाळे शेजारच्या टपरीवर चहा पिताना भारीच मजा वाटायची. साधारणपणे आठवी-नववीत असताना बाहेरचा चहा सुरू झाला.
अकरावीत कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या कॅन्टीनवर नियमीतपणे चहा घ्यायला सुरूवात झाली. मात्र चहाचं बिल कोणी द्यायचं यावरून बराच वेळ मित्रांची वादावादी व्हायची. चहाच्या चवीबरोबर गप्पा रंगत जायच्या. आता कॉलेजमध्ये कोणत्या गप्पा रंगतात त्याचा उल्लेख न करताही तुन्हाला ते कळेलच. मित्रांबरोबर फिरताना शहरात कोणत्या ठिकाणी चहा चांगला मिळतो हे ही कळायला लागलं. कधी-कधी जालन्याला माझा मित्र संभाजी शिरसाठकडे जाणं व्हायचं. तोही अट्टल चहाबाज. जालन्यातल्या सर्व फेमस ठिकाणी चहा घेण्याचा योग आला. अमरावतीमध्ये नोकरीच्या निमित्ताने चहाची सर्व चांगली ठिकाणी पादाक्रांत करून चहाचा आस्वाद घेतला. अर्थात या कामात आशिष यावलेची मदत झाली. आशिष चहा घेत नव्हता, मात्र चहा कुठे चांगला मिळतो हे त्याला माहित होते. एक सांगतो, गावाकडे गेल्यानंतर चुलीवर जो चहा केला जातो त्या चहाची लज्जत काही औरच.
चहा हा चहाच असतो. मात्र घरचा चहा वेगळा. ऑफिसच्या कॅन्टीनचा सर्वात वेगळा. ऑफिसच्या कॅन्टीनचा चहा म्हणजे कधीतरी चांगला होणार चहा असंच म्हणावं लागेल. मला वाटतं सर्व ऑफिसमध्ये असाच अनुभव येत असेल. चहा सर्वत्र मिळतो पण त्या ठिकाणानुसार त्याची चव बदलते. वाईट अनुभव येतो तो रेल्वे प्रवासात मनमाडला. दरवेळी तिथला तोंडाची चव बिघडवणारा चहा मी नव्या उत्साहानं घेतो, आणि तो चहा दरवेळी माझा उत्साहघात करतो.
मुंबईतही अनेक ठिकाणी चहा घेतला. पण चिंचपोकळी परिसरात गवतीचहा आणि अद्रक टाकून तयार केलेला जो चहा मनाला भावला तसा चहा मुंबईत इतरत्र कुठेही मिळाला नाही. आणि हो मी अजूनही घरी रोज चहा करतो. मुंबईत प्रतीक्षानगरला आलात तर घरी या. मग आपण चहा घेऊ.

Sunday, November 29, 2015

चहा, आमीर, माहेर





मुलगा रोज सकाळी साडेआठ वाजता शाळेत जातो. तसा साडेसात वाजता एक चहा होतो. पण तो घाई-गडबडीतला चहा. चहा पिणं ही सुद्धा एक शास्त्रोक्त कला आहे. त्यामुळे मुलगा शाळेच्या स्कूल बसमधून रवाना झाल्यानंतर दुसरा चहा घेणं क्रमप्राप्त ठरतं. चहाचे घोट घेताना पेपरमध्ये आलेल्या वेगवेगळ्या बातम्या वाचणंही सुरूच असतं. कितीही असहिष्णुतेची चर्चा असली तर पेपर वाचतोच. आमीर खानची पत्नीही पेपरमधल्याच बातम्या वाचून बेचैन झाली होती. ती मग आमीरला मुलांच्या सुरक्षिततेसाठी परदेशात जाऊ या का, असं म्हणाली. मग काय एकच गदारोळ उडाला.
घरातली गोष्ट बाहेर येऊ द्यायची नसते, या उक्तीचा प्रत्यय आमीरला (माहित असेल तर) आला असेल. संसारात झाकली मूठ महत्त्वाची असते. तसं पाहिलं तर हा आमीरचा दुसरा संसार. मोठा माणूस म्हटल्यावर संसाराची संख्याही वाढत जाऊ शकते. अर्थात तो काही नियम नाही. पण कितीही संसार झाले तरी पतीनं शांतपणे ऐकून घ्यावं आणि बाहेर बोलू नये, हे संसारातलं शाश्वत सत्य.हे सत्य मला पहिल्याच संसारात कळालं. 

त्यामुळे मी पत्नीला विचारलं, पेपरमधल्या बातम्या वाचून तूझं मत काय ? तेव्हा पत्नी म्हणाली, मुख्य पेपरला लगेच हात लावायचाच नाही. आधी पुरवणी वाचा. सखी, मैत्रीण, सई टाईपच्या पुरवण्या वाचा. मग विवा, आरोग्याचा ओवा वाचा. त्यानंतर हॅलो, टुडे सारखं इंग्रजी शिर्षक असलेलं काही तरी वाचा. त्यानंतर मुख्य पेपर वाचा आणि लगेच कामाला लागा. कारण पेपर काढणं हा एक बिझनेस आहे. तुम्ही नाही का चॅनेलमध्ये बुलेटिन काढता तसं. मग काय चहाने नाही, पण पत्नीच्या बोलण्याने किक बसली.
स्वत:ला सावरत पत्नीला विचारलं, या वातावरणात देश सोडून जावं असं तुला वाटतं का ? त्यावर पत्नी म्हणाली, फक्त दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी नेत जा. सामान्य पत्रकाराची सामान्य पत्नी.

Friday, October 30, 2015

युतीला सत्ता कळेना ? (अचूक मारा - 5)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने पंधरा वर्ष राज्यावर सत्ता गाजवली. त्यांच्यातही धुसफूस सुरू असायची. अनेक वादाचे प्रसंग यायचे. मात्र किती ताणायचं आणि कधी सोडायचं यात आघाडीवाले बनेल होते. यात वादच नाही. पंधरा वर्ष विरोधी बाकांवर बसलेले शिवसेना-भाजप सख्ख्या भावाप्रमाणे सरकारच्या विरोधात रान उठवायचे. मात्र आता सत्ता आल्यावर हे दोघे सख्खे भाऊ पक्के वैरी झालेत.
वर्षपूर्ती होत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र सरकारलाच रस्त्यावर आणण्याची भाषा केली आहे. भाजपचे मंत्री वर्षपूर्तीच्या सोहळ्यात रंगलेले असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपचा रंग खरडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. अर्थात याला भाजपचे बनेल नेतेही कारणीभूत आहेतच. मोदींच्या नेतृत्त्वात भाजपला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. या यशानं उत्साहित झालेल्या भाजपनं राज्यातली शिवसेने बरोबरची युती तोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. भाजपनं स्वबळावर 122 जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीनंही आश्चर्यकारकरित्या राज्यात स्थिर सरकारची भाषा सुरू केली. त्यामुळे 63 जागा मिळवूनही शिवसेनेला किंमत मिळाली नाही. भाजप आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेचा चांगलाच राजकीय गेम केला. मुख्यमंत्र्यांबरोबर फक्त भाजपच्याच मंत्र्यांचा शपथविधी झाला. नंतर विस्तारात शिवसेनेला सामावून घेण्यात आलं. त्यातही हवी ती खाती मिळाली नाही. मंत्र्यांची संख्याही कमी ठेवण्यात आली. यामुळे शिवसेना दुखावली गेली. शिवसेनेची धुसफूस सुरूच राहिली. वाढत्या महागाईमुळे जनतेतही सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालाय. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी त्यात तेल ओतण्याचं काम केलं. त्यामुळे आपण सरकारपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची आयतीच संधी शिवसेनेला मिळाली. त्या बरोबरच गुलाम अलींच्या मैफलीला विरोध, पाकिस्तानी कलाकारांना विरोध, सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक ही जुनी विरोधाची हत्यारं बाहेर काढून भाजपचा होईल तितका मूखभंग करणंही शिवसेनेनं सुरूच ठेवलं. सरकारमध्ये दिलेला अल्प वाटा, वारंवार करण्यात आलेला अपमान याचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारला रस्त्यावर आणण्याचा इशारा दिल्याचं स्पष्टच आहे.  आता खरंच कोण कोणाला रस्त्यावर आणतं हे लवकरच स्पष्ट होईल.

Monday, October 12, 2015

'शाई'चे राजकीय रंग

शिवसेनेनं सुधींद्र कुलकर्णींवर शाई टाकून जोरदार सुरूवात केली. दणादण ब्रेकिंग न्यूज, त्यावरील प्रतिक्रिया, फोनो, लाईव्ह सुरू झाले. आता खुर्शीद कसुरींचं पुस्तक काही प्रकाशित होत नाही, असं वाटायला लागलं. धावती मुंबई थांबते की काय, असं वाटलं. मात्र दिवस जसजसा माथ्यावर येऊ लागला तसतशी परिस्थिती बदलत गेली. शिवसेना विरोध कायम असल्याचं सांगत होती. मात्र दिवस मावळताना खुर्शीद कसुरींचं पुस्तक प्रकाशित झालं. त्या कार्यक्रमात सुधींद्र कुलकर्णींनी, शिवसेनेला खडे बोलही सुनावले. मुंबई महाराष्ट्रीय आहे. तसंच मुंबई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असल्याचहीं सांगितलं. गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे भाजपनंही वचपा काढत, मुंबईत दणक्यात कार्यक्रम होऊ दिला. शिवसेनेनं कसुरींच्या कार्यक्रमाला केलेला विरोध ही आंतरराष्ट्रीय बातमी ठरली. मात्र त्याला स्थानिक राजकारणाचे पदर आहेत, हे त्यामागील सत्य आहे.
आता हे ही खरं आहे की, सीमेवर जवान शहीद होतात. पाकिस्तानातून दहशतवादी भारतात येतात. तेच दहशतवादी देशात बॉम्बस्फोट घडवतात. त्यात भारतीय नागरिक ठार होतात. दहशतवाद्यांना पाकिस्तानात आसरा मिळतो. काश्मीरमधल्या फुटिरतावाद्यांना पाकिस्तान प्रोत्साहन देतो. दर शुक्रवारी श्रीनगरमध्ये नमाजनंतर भारताचा झेंडा जाळला जातो. पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकावले जातात. जवानांवर दगडफेक केली जाते. हे सगळं खरं असलं तरीही पाकिस्तान सोबतचे संबंध सुधारणं गरजेचं आहे. दोन्ही देशांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे. पाकिस्तानचे नागरिक, कलाकार भारतात येणंही गरजेचं आहे.
आता शिवसेनेनंही थोडा विचार करावा. अर्थात शिवसेनेची पाकिस्तानच्या विरोधातली भूमिका काही नवी नाही. मात्र त्यात सातत्य दिसत नाही. कित्येक पाकिस्तानी कलाकार या मुंबईत येतात. चित्रपट, सिरीअल, लाफ्टर शोमध्ये सहभागी होतात. अदनान सामीला तर त्याचा देश पाकिस्तान आहे, हे सुद्धा आठवतं का ? अशी शंका येते. कित्येक पाकिस्तानी क्रिकेटर्स मुंबईत येत असतात. विरोध करायचाच असेल तर तो सगळ्यांनाच करा, नसता कोणालाच करू नका.

खमंग फोडणी - भारत आणि पाकिस्तानमध्ये एवढी कटुता असली तरी पाकिस्तानी नागरिकांचा ओढा भारताकडेच आहे. अगदी त्यांच्या दहशतवाद्यांचाही. आपले चित्रपट, सिरीअल त्यांना खुणावत असतात. दहशतवादात जगत असलेल्या पाकिस्तानला त्यामुळे लोकशाहीप्रधान भारत आवडत असावा. नाही तरी किती काही झालं तरी, शेवटी बाप हा बापच असतो. त्यामुळे कार्ट कितीही वाया गेलेलं असलं तरी शेवटी बापाकडेच येतं, हे पाकिस्तानकडे पाहून लक्षात येतं.

Sunday, October 4, 2015

निवडणुकीच्या 'प्रचाराचं खाद्य' (अचूक मारा - 3)

निवडणुकीच्या 'प्रचाराचं खाद्य'

एका वेळच्या जेवणाला माणसाला लागतं तरी किती ? अर्थात कोणी किती खावं ? काय खावं ? काय खाऊ नये ? याचा हिशेब करण्याचा या लिखाणाचा हेतू नाही. मात्र काही दिवसांपूर्वी पर्युषण पर्वात मांसाहार बंदीवरून चांगलंच वातावरण तापलं होतं. त्यावेळी भाजपचे नेते मांसाहार बंदीसाठी पेटून उठले होते. त्या आधी दुष्काळ दौ-यावर गेलेल्या शरद पवारांचा एक फोटोही तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. दुष्काळ दौ-यात सुका मेवा आणि शरद पवार दिसत होते. त्यावरूनही चांगलाच धुराळा उडाला होता. मात्र त्यावेळी हे सभ्यतेला धरून आहे का ? असा सवाल विचारला गेला नव्हता. अर्थात राजकीय नेत्यांनीही परिस्थितीचं भान राखलंच पाहिजे. कारण आता फक्त माध्यमं दाखवतील तीच बातमी राहिलेली नाही. सोशल मीडिया हा सर्वसामान्यांच्या हाती आलेला आहे. त्यामुळे नेतेच काय, तर सगळ्यांनीच सारासार विवेक बुद्धीप्रमाणे वागण्याची गरज आहे.

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातातली प्लेट आणि समोरच्या टेबलवर खच्चून ठेवलेले विविध खाद्यपदार्थांचा, हा फोटो चांगलाच गाजतोय. सोशल मीडियासाठी हा फोटो खाद्य ठरला नसता तरच नवल. हातात प्लेट धरून बसलेले सीएम, टेबलवरून काकडी उचलत असलेले रावसाहेब दानवे, भरपेट खाल्ल्यानंतर तोंड पुसणारे विनोद तावडे ही मंडळी फोटोत दिसत आहेत. तर टेबलवर मिठाई, सुका मेवा, फळं आणि सलाड मांडून ठेवलेलं आहे. या पदार्थांची संख्या जवळपास 20 हून अधिक आहे. या नेत्यांनी या खाद्याचा समाचार घेतला. तर सोशल मीडियावर या नेत्यांचा समाचार घेणं सुरू आहे. फेसबुक आणि व्हॉट्स अपवर हा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, हे मात्र नक्की सांगता येत नाही. पण कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्यामुळे टायमिंग साधण्यात वाकबगार असलेल्या शिवसेनेनं तर हा फोटो व्हायरल केला नसेल ? असा सवालही आता उपस्थित होत आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त शेतक-यांची विचारपूस करत आहेत आणि सीएमचा हा फोटो, असे एकत्रित फोटोही चांगलेच व्हायरल झालेत. वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारणारे भाजप नेते, आणि शेतक-यांची विचारपूस करणारे उद्धव ठाकरे, हे दोन्ही फोटो बरंच काही सांगून जातात. आता तर कुठे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संग्रामाला सुरूवात झालीय. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी सोशल मीडियावरही ही लढाई अजून जोरकसपणे लढली जाईल, यात शंका नाही.
11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. त्या आधी भाजपची मुंबई आणि परिसरात भीमरथ यात्रा निघणार आहे. भूमिपूजनाची माहिती या निमित्ताने दिली जाणार आहे. टायमिंग साधण्यात भाजपवालेही काही कमी नाहीत. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम मागच्या महिन्यात होणार होता. पण तेव्हा कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे तर भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला नसेल ? अशी शंका येते. आता निवडणुकीची घोषणाही झालेली आहे. 11 ऑक्टोबरला भूमिपूजनही होईल आणि मतांची पायाभरणीही होईल.

Monday, September 28, 2015

विविधतेत एकता (अचूक मारा - 2 )

'अचूक मारा' या साप्ताहिक सदराच्या पहिल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर जाण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार पंतप्रधान अमेरिकेच्या
दौ-यावर आहेत. अर्थात तिथे त्यांची जोरदार भाषणबाजीही सुरू आहे. मोदी रविवारी फेसबुकच्या मुख्यालयात गेले. त्यांनी सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. लहान असताना आई उपजीविकेसाठी भांडी घासायची, असं मोदींनी सांगितलं. पण ते जाऊ द्या. कारण मोदींची भाषणं आता भारतात नव्हे विदेशातच जास्त ऐकली जातात.

नरेंद्र मोदी अमेरिकेत असतानाच इकडे गणेश भक्तांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. वाजतगाजत, डीजेच्या कल्लोळात बेधुंद होत गणरायाला भावुक होऊन कसा निरोप देतात ? हे त्या भक्तांनाच माहित. गणेश विसर्जनाच्या आधी बकरी ईद होऊन गेली. त्यावेळी अनेक ठिकाणी नेहमी प्रमाणे रस्त्यावर नमाज अदा केली गेली. आपल्या देशात विविधतेत एकता आहे, असं जे म्हटलं जातं त्याची प्रचिती आली.
बघा तुमची गणेशोत्सवाची मिरवणूक रस्त्यावर तर आमची नमाजही रस्त्यावरच. तुम्ही सामान्यांना त्रास देता, आम्हीही देतो. दुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत नाही, आम्ही पण बुरसटलेले. तुम्ही 5 हजार वर्षांपूर्वीच्या प्रथा पाळता, आम्ही पण अरबस्थानातल्या जुनाट प्रथांचं अंधपणे पालन करतो. खरंच विविधतेत एकता म्हणतात ती यालाच. हे विश्व चालवणारी शक्ती खरंच अस्तित्वात असेल तर, यांना अक्कल देण्यासाठी पुन्हा अवतार घे. नको, नको अवतार नको. पुन्हा तुझे नवे भक्त निर्माण व्हायचे. त्यांचा नवा धर्म व्हायचा. इथं आधीच्याच धर्मांनी काय कमी उच्छाद मांडलाय, त्यात पुन्हा नवा धर्म हवाच कशाला. जाऊ द्या, चाललंय ते चालू द्या....एन्जॉय...बाकी काय म्हणता ?

Tuesday, September 22, 2015

काय, चाललंय काय ?

(मित्रांनो, मागील काही दिवसांपासून ब्लगॉवरील नियमीत लिखाणात खंड पडला आहे. मात्र आता दर सप्ताहाला ब्लॉगवरून नियमीतपणे  'अचूक मारा' केला जाणार आहे. त्यात आठवड्यातील (मला वाटलेल्या) महत्वाच्या घटनांवर घणाघात केला जाणार आहे. 'अचूक मारा' हे साप्ताहिक सदर फेसबुकवरही टाकलं जाईल. )

काय, चाललंय काय ? असाच प्रश्न आता सगळ्यांना पडलाय. देशात 'अच्छे दिन' येऊन आता कुठे सव्वा वर्ष झालंय. (सव्वा रुपया दक्षिणा काढा, अशी कोटी मी करणार नाही. कारण सव्वा रुपयासाठीचे 25 पैसे चलनातून बाद झाले आहेत.) पंतप्रधान यथा शक्ती विदेशात जाऊन देशाची गरिमा वाढवत आहेत. पंतप्रधान पुन्हा विदेशात जात आहेत. 23 सप्टेंबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर रवाना होत आहेत. आपल्या देशात कितीतरी म्हणजे, अब्जावधींची गुंतवणूक दुसरे देश करत आहेत. अर्थात अजून मूर्त स्वरूपात ही गुंतवणूक दिसलेली नाही. पण दिसेल, लगेच धीर सोडून चालणार नाही. काश्मीरमध्ये दर शुक्रवारी नमाजनंतर पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकत आहेत. लगेच सव्वा वर्षात फुटिरतावादी राष्ट्रीय विचारधारेत येतील, असं म्हणनं ही चुकीचंच म्हणावं लागेल. पण हीच गोष्ट दोन वर्षांपूर्वी घडली असती तर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर कोणत्या शब्दात टीका झाली असती ? याचा तुम्हीच विचार करा.
आता सामान्य माणसाच्या हातात फक्त विचार करण्याशिवाय राहिलंय तरी काय म्हणा. जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर, त्यांनी सर्वात आधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना हटवण्याची मागणी केली असती. राजनाथसिंहांच्या जागी रामदास कदम यांनाच केंद्रीय गृहमंत्री केलं असतं. नाही तरी रामदास कदम यांना राज्यातलं गृहमंत्री हवंच आहे. त्यांना थेट प्रमोशन मिळालं असतं. शिवसेनाप्रमुखांनीही रामदास कदमांना काश्मीरमधल्या राष्ट्रद्रोह्यांना यमसदनी पाठवण्याचा आदेश दिला असता. कदमांनीही सैन्याला आदेश देऊन, राष्ट्रद्रोह्यांच्या योग्य ठिकाणी गोळ्या घातल्या असत्या. असो.
तरी बरं झालं पाऊस पडला. नाही तर राज्य सरकार हे दुष्काळातच वाहून गेलं होतं. दुष्काळग्रस्त भागात दुष्काळाची दाहकता दिसत होती. पण सरकारचं अस्तित्व दिसत नव्हतं. मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्यानं सरकारच्या नाकर्तेपणावर पाणी पडलं.
पावसाचं प्रमाण कमी असलं तरी सनातन्यांचं पीकही राज्यात चांगलंच फोफावलंय. विचारांचा प्रतिवाद करण्याऐवजी आता थेट गोळ्या घालण्याचीच आधूनिक पद्धती सनातन्यांनी विकसीत केली आहे. एक मात्र भारी आहे, सनातन्यांना धर्म पुरातन हवा आहे. मात्र माणसं मारण्यासाठी हत्यारं आधुनिक वापरली जातात. पाहा हा विरोधाभास.