Tuesday, November 8, 2011

पाकिस्तानात चार हिंदू डॉक्टरांचे हत्याकांड, हिंदूस्थानात कोणी ऐकणार आहे का ?

पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात चार हिंदू डॉक्टरांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. शिकारपूरनजीकच्या चक टाऊन परिसरातल्या एका क्लिनिकमध्ये हे ह्त्याकांड करण्यात आलं. या घटनेत तीन हिंदू डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. तर चौथ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाली. अर्थात पाकिस्तानात हिंदूंच्या या नरकयातना काही नवीन नाहीत. मात्र या नरकयातना कधी थांबणार ? याचंही उत्तर कोणाकडे नाही. संपूर्ण पाकिस्तानातच हिंदू समाजाला टार्गेट केलं जात आहे. चक टाऊन परिसरात असलेले पन्नास हजार हिंदू आणि पाकिस्तानातल्या विविध भागात असलेले हिंदू दहशतीखाली जगत आहेत. अर्थात माझ्यासारख्या मुंबईत बसलेल्या एका पत्रकाराला त्या विषयी काय माहिती आहे ? असा प्रश्न कोणत्याही सेक्युलर किंवा अभ्यासू व्यक्तीला पडणं सहाजिक आहे. चार हिंदू डॉक्टरांची हत्या झाल्याची बातमी सगळ्यांनाच माहिती झाली आहे. अर्थात वृत्तपत्रात आल्यामुळं ती माहित झाली आहे.
मागील आठवड्यातही शंभर हिंदू तरूणांनी धर्मांतर करून ते मुस्लिम झाल्याची एक बातमी मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीनुसार मशिदीच्या इमामने या तरूणांनी त्यांच्या स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय धर्मांतर केल्याचा दावा केलाय. अहो इमामसाहेब मात्र पाकिस्तानात तर सोडाच पण कधी हिंदूस्थानातही कधी कोणत्या शंभर मुस्लिम तरूणांनी स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारल्याची बातमी कधी कोणी वाचलेली नाही. अगदी सेक्युलरसुद्धा हे मान्य करतील. पाकिस्तानात भरदिवसा हिंदू तरूणींना पळवून नेऊन त्यांच्या बरोबर निकाह लावले जात आहेत. हिंदू तरूणींची ही विटंबना तिथं खुलेआम सुरू आहे. ही सगळी माहिती कोणत्याही वाचकाला pakistanhindupost.blogspot.com/ वर वाचता येईल.


चार हिंदू डॉक्टरांच्या हत्येच्या निषेधार्थ तिथल्या हिंदूंनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मात्र तिथल्या इस्लामी राजवटीत हिंदूंना कोणताही न्याय मिळण्याची शक्यता नाही. तिथले हिंदू हिंदूस्थानकडे डोळे लावून बसले आहेत. आम्हाला हिंदूस्थानात आश्रय द्या, अशी त्यांची मागणी आहे. मात्र आमच्या धर्मनिरपेक्ष सरकारकडे हिंदूंसाठी वेळ नाही, अर्थात हिंदूंसाठी तो कधीच नसतो. नाही तरी आपल्या देशात दोन कोटी बांग्लादेशी सुख आणि समाधानानं राहत आहेत. त्यात जर आपल्या रक्तामांसाच्या पाकिस्तानातल्या हिंदूंची भर पडली तर असा कोणता फरक पडणार आहे ?


पाकिस्तानला जर तिथल्या हिंदूंना संरक्षण देता येत नसेल तर त्यांनी तिथल्या हिंदूंना भारतात जाण्याची परवानगी द्यावी. आणि हिंदूस्थानातल्या मुस्लिमांनाही पाकिस्तानात बोलवावं. कारण ज्या देशांची फाळणीच धर्माच्या आधारावर झालेली आहे, तिथं दोन्ही देशांमधील नागरिकांची आदलाबदल करावीच लागेल.

काश्मीरमधली अमरनाथ यात्रा बंद करण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'मुंबईतून एकही मुस्लिम हज यात्रेला जावू देणार नाही' असा खणखणीत इशारा दिला होता. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीतपणे पार पडली होती. असाच खणखणीत इशारा पाकिस्तानला भरण्याची हिंमत आपल्या केंद्र सरकारमध्ये आहे का ? ही हिंमत नसल्यामुळेच पाकिस्तानातल्या हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

Monday, October 17, 2011

महायुतीचा 'भीम'टोला !

खडकवासला मतदारसंघात महायुतीनं मिळवलेला अनपेक्षित विजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मस्तवाल राजकारणाला सणसणीत चपराक लगावणारा ठरला आहे. रमेश वांजळेंच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली सहानभुती, राष्ट्रवादीची मनी आणि मसल पॉवर, हातात असणारी सर्व सत्ताकेंद्र यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं पहिल्या दिवसापासूनच जड मानलं जात होतं. मात्र मी सांगेन तेच धोरण आणि तोरण, म्हणणा-यांचं मतदारांनी राजकीय सरणच इथं करून टाकलं.
मनसेच्या तिकीटावर निवडून आलेल्या रमेश वांजळेंच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या गोटात ओढून आणलं. रमेश वांजळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असं विधान सुप्रिया सुळे यांनी नागपूरात करून टाकलं होतं. रमेश वांजळेंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सलोख्याचे संबंध होते, असं सांगण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणीही ओरबडून खाण्याची ही स्वार्थी राजकीय प्रवृत्ती सामान्य मतदारांना मुळीच पसंत पडली नाही.
हर्षदा वांजळे या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. विधानसभा निवडणुकीत कै. रमेश वांजळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं. मात्र तिथं त्यांची हेटाळणी करण्यात आली. नंतर ते मनसेच्या तिकीटावर निवडूनही आले. अर्थात हा इतिहास सर्वांना माहित आहे. तोच इतिहास मतदारांच्याही लक्षात होता. त्यामुळे हर्षदा वांजळेंची राजकीय कोलांटउडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रेताच्या टाळूवरील लोणीही ओरबाडण्याच्या प्रवृत्तीचा मतदारांना वीट आला. आणि याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात दादा आणि ताईच्या साक्षीनं पराभवाला सामोरं जावं लागलं.
वेगवेगळ्या पक्षातले नेते फोडून पक्ष मोठा होत नाही. तर पक्षातल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष मोठा होतो हे आता अजित पवारांनी समजून घेण्याची गरज आहे. मात्र हे त्यांना समजणार नाही. कारण हे त्यांच्या काकांनाही कधी समजलं नाही. ज्या पक्षाची निर्मितीच मुळात वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांच्या जीवावर झालेली आहे, तिथं या पेक्षा वेगळं काही घडण्याची अपेक्षाही ठेवण्याची गरज नाही.


या पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यशैलीत बदल होईल अशा भ्रमात विरोधी पक्षांनी राहू नये. याचा वचपा काढण्यासाठी आता आगामी काळात पुण्यात पुन्हा जातीय राजकारणाला वेग दिला जाईल. जेम्स लेन, दादोजी कोंडदेव या सारखे मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेटवले जातील. दादरचं चैत्यभूमी नामांतर करण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरेल. शिवशक्ती - भीमशक्तीमध्ये कशा प्रकारे विघ्न आणली जातील यासाठी विविध मुद्दे मांडले जातील. कारण शिवशक्ती - भीमशक्तीच्या जोरदार टोल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला घरातच तोंडावर आपटावं लागलं आहे.

आता शिवसेना, भाजप, रिपाइं या महायुतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न न सोडवता दलित समाजाला झुलवण्याचं काम काँग्रेसनं केलं होतं, हा इतिहास इथं विसरता येणार नाही. आता त्याच काँग्रेसमधून फुटून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस जुना इतिहास साकारण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सुचवलेला मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा पर्याय सरकारने स्वीकारला. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार सर्व जनतेनं स्वीकारला. आता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाला रोखण्यासाठी 'दादर चैत्यभूमी' असा नामविस्तार करण्यात काय हरकत आहे ?

Friday, September 2, 2011

ई टीव्ही : एक समृद्ध आठवण !

ई टीव्हीला सोनी टीव्ही समूह विकत घेणार असल्याची एक बातमी मागच्या महिन्यात चर्चेचा विषय झाली होती. अर्थात दूरचित्रवाहिन्यांच्या विश्वात व्यवहार आणि 'धंदे' काही नवीन नाहीत. मात्र ई टीव्ही विकली जाणार या बातमीनं अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्या या माध्यमातून सर्वांबरोबर पुन्हा जागवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तुम्ही सर्व तुमच्या कॉमेन्टस आणि ई मेलमधून अधिक माहिती कळवा, म्हणजे ती ही या ब्लॉगमध्ये समाविष्ट करता येईल.


हैदराबादच्या डेस्कवर मी 1 ऑक्टोबर 2004 ते 15 ऑक्टोबर 2006 पर्यंत काम केले. त्या आधी मी ई टीव्हीच्या प्रोग्रामींग डिपार्टमेंटमध्ये होतो. तिथल्या आठवणी नंतर कधी तरी मांडेन. मात्र प्रोग्रामींग डिपार्टमेंटमध्येच असताना संभाजीनगरचे शैलेश लांबे, प्रवीण अंधारकर यांच्याबरोबर ओळख झालेली होती. त्यामुळे न्यूज डिपार्टमेंटमध्ये येताना कोणताही नवखेपणा माझ्यात नव्हता.
डेस्कवर गेलो तेव्हा विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होती. मी आणि राहुल वाघ एकाच दिवशी जॉईन झालो होतो. डेस्कवर चार जणांची एक टीम तयार करून प्रत्येकाकडे स्वतंत्र विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. मी, श्रीरंग खरे आणि केतकी मराठवाडा विभागातल्या बातम्यांवर नजर ठेऊन होतो. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत त्या विभागातले अपडेट्स देत राहण्याची ती कामाची पद्धत ठरवण्यात आली होती.
विधानसभा निवडणूक संपली आणि त्या नंतर सुरू झाली ती धमाल. दर दोन आठवड्यांनंतर न चुकता नाईट शिफ्ट लागायचीच. अर्थात थोडेफार अपवाद वगळून. मात्र आम्ही त्या रात्रींचा दिवस करून पार धमाल उडवून द्यायचो. आणि त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या आसपास तीन - चार कॉपी एडिटर ( तरूणी ) डेस्कवर आल्या. मग काय सगळं वातावरणच बदलून गेलं.
नेहमीप्रमाणे आमच्या एका मित्राने ( इथं नाव देता येणार नाही.) उमेदवारी जाहीर केली. दुस-याने सर्वांनी विनंती करून स्वत:साठी एक 'मतदारसंघ' आरक्षित करून घेतला. तर दुस-या एका मित्रानं मेनअँक्टर ( एडिटिंग सॉफ्टवेअर ) शिकवण्याच्या प्रयत्नातून 'मासा' गळाला लागतो का ? याचा अंदाज घेतला.
याचवेळी गिरीश अवघडे आणि रमेश जोशी बरोबर मैत्री जमली. अर्थात डेस्कवर तेव्हाही गटबाजी आणि राजकारण होतं. मात्र आम्ही 'अलिप्त राष्ट्रांचे' प्रतिनिधी असल्याने आम्ही कोणत्याही गटाचं मंडलिकत्व पत्करलं नव्हतं. त्यामुळे हसतखेळत मजा करणे, आणि कामही करणे या पद्धतीने आमचे काम सुरू असायचे. 'फाईव्ह डेज वीक'चा आद्य प्रणेता म्हणजे गिरीश अवघडे. आठवड्यातल्या एका वीकली ऑफ बरोबर नियमीत एक दांडी मारून त्यानं फाईव्ह डेज वीकची बीजं रोवली. गिरीशचाच कित्ता पुढे चिन्मय काळे यानं सार्थपणे पुढे नेला. त्याचीही दर आठवड्याला एक दांडी चुकली नाही. नंतर हा चिन्मय बुलेटिन प्रोड्युसरही झाला होता.
नाईट शिफ्ट हा एक स्वतंत्र विषय आहे. आमच्या काही मित्रांना तर तीन - तीन महिने नाईट शिफ्ट लावण्यात आली होती. एखादा फार शहाणपणा दाखवत असेल, हुज्जत घालत असेल, प्रस्थापितांच्या गटाला जुमानत नसेल तर त्याच्यावर नाईट शिफ्टचं हत्यार उगारलं जायचं. जर नाईट टाळायची असेल तर मग गटबाजी करणे, हांजी हांजी करणे हे दुसरे मार्ग होते. अर्थात दुस-या मार्गानं जाणा-यांची संख्या फार जास्त होती. त्यामुळे लिडर हा स्वतंत्र बाण्याचा असणं किती गरजेचं आहे, हे लक्षात येतं.
बुलेटिन काढण्याची आशिष चांदोरकरची शैली सर्वात चांगली होती. कोणतंही टेन्शन न घेता तो बुलेटिन काढायचा. त्यामुळं हे तर सोपं काम असं वाटायचं. तर दुसरीकडे केतकी आणि नरेश बोभाटे ज्या पद्धतीनं बुलेटिन काढायचे ते पाहून काळजात धडकी भरायची. हे काम फार अवघड आणि कधीच जमणार नाही असं वाटायचं. धनंजय कोष्टींची शैलीही अशीच टेन्शन फ्री. गजानन कदम तर पीटीआय शिवाय दुस-या कोणत्याच बातम्यांना हात लावायचे नाही. तर डॉक्टर रेळेकर लाल रंगाचं स्वेटर घालून शिफ्टमध्ये आल्याबरोबरच बुलेटिन लावून टाकायचे. हळू हळू अवरली, आपली मुंबई या बुलेटिनपासून माझी सुरूवात झाली. नंतर वृत्तवेधही केलं. वृत्तवेध हे त्या काळात बुद्धिवादी बुलेटिन प्रोड्युसर्सचं काम मानलं जात होतं.
हिवाळी अधिवेशन जवळ आल्यावर डेस्कवर जबरदस्त लॉबिंग सुरू व्हायचं. अशोक सुरवसे सरांच्या नजरेत भरण्यासाठी प्रयत्न सुरू केले जायचे. राजकारणातला अभ्यास सर्वांना कळेल अशा पद्धतीनं मार्केटिंग केलं जायचं. त्यासाठी प्रत्येक ग्रुपचे काही फंडे होते. आपल्या गटातील एकेकाची स्तुती केली जायची. काही जण तर हातात तेलाची बाटली बुमप्रमाणे पकडून रूमवर पीटीसीची प्रॅक्टीस करायचे.
2005 ते 2006 या काळात डेस्कवर ख-या अर्थानं हुकूमत गाजवली ती चंद्रकांत फुंदेनं. मात्र तो बाबा या नावानं परिचित होता आणि अजूनही आहे बरंका. अर्थात या डेस्कवर माझं झालेलं 'गारू' हे नामकरण अजूनही कायमच आहे. इथं मुद्दा आहे तो बाबाचा. भडक डोक्याचा बाबा रोज वादळ निर्माण करायचा. सगळ्यांशी भिडायचाही. बरं त्याचा अविर्भावही 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' असाच होता. अर्थात हे वाचल्यानंतर त्याचा मला फोन येईल. 'ए गा-या माजला का xxx, पण तू चांगलं लिहतो रे', अशी कॉमेन्टही देईल. बाबाचा एक डायलॉग फेमस होता. तो म्हणजे, I dont like this. बाबा सारखाच योगेश बिडवई. आता तो अण्णा या नावाने ओळखला जातो. नवीन आलेल्या कॉपी एडिटरला प्रिन्टचा अऩुभव घ्या, असा सल्ला तो न मागता द्यायचा.
बाबा, अभिजित कांबळे, स्वप्नील बापट आणि रूपेश कलंत्री हे ज्या ठिकाणी रहायचे त्याचं नाव हवेली होतं. बरं हे चौघेही वेगवेगळ्या प्रवृत्तीचे. बाबा आणि अभिजित बुद्धिवादी. तर स्वप्निल आणि रूपेश कलाप्रेमी. या हवेलीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. त्यातला भेळीचा किस्सा प्रसिध्द आहे. अशाच कार्यक्रमांच्या दरम्यान स्वप्नील त्याच्या कविता ऐकवायचा. एक कप चहा आणि पोहे, यासाठी मीही त्या कविता ऐकायचो. नाही म्हणायला कधीकधी चांगल्या कविताही करायचा म्हणा. नाईट शिफ्टला रुपेशनं आणलेली शाल, अकरा ते एक ठरलेली झोप त्यानंतर पुन्हा साडेपाच ते सातची झोप कधीच चुकली नाही.
नंतरच्या काळात स्नेहा आणि सुप्रिया डेस्कवर आल्या. त्यामुळे डेस्कच्या सांस्कृतिक वैभवात अजूनच भर पडली.
डेस्क मीटिंग हा प्रकार म्हणजे झालेल्या चुकांचा आढावा, प्लॅनिंगचा आखाडा असायचा. चिकून गुनिया की चिकन गुनिया, करात की कारत या सारख्या विषयांवर तिथं किस पाडला जायचा. मेघराज पाटील अशा मीटिंगमध्ये त्यांचा मुद्दा कधीच सोडायचे नाहीत. आपल्या मुद्दावर ठाम राहणं, ही त्यांची खासियत. अशाच मीटिंगमधल्या एक'संघ' गुणांवरून राजेंद्र हुंजे एके दिवशी 'राजामाणूस' होणार हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं.
डेस्कवर काही राजकारणीसुद्धा होते. राजकारणातून पत्रकारितेत आलेला अनिल पवार आणि पत्रकारितेतून राजकारणात जाण्यासाठी इच्छूक असलेला धनंजय शेळके. दोघेही 'राष्ट्रवादा'ने ओतप्रोत भरलेले होते.
दर आठवड्याला येणारा टॅमचा रिपोर्ट डेस्कवर सगळ्यांना पाहण्यासाठी खुला असायचा. त्यामुळं कोणतं बुलेटिन कसं रेटिंग मिळवतंय, कुठे काम करण्याची गरज आहे, हे पाहता यायचं. लक्षात घ्या ही सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या गोष्टी न्यूज चॅनेल्समध्ये आता होताहेत. यावरून ई टीव्ही काळाच्या किती पुढे होती, हे लक्षात येतं.
नाईट शिफ्टला मी, गिरीश रमेश आणि पॅनलला जर दीपक शितोळे, शिरीष जाधव असेल तर रात्रभर जोक्स, एकमेकांची खेचणे, सिगरेट याची बहार यायची. चहासाठी कुणाला तरी कटवावं लागायचं. अरे हो, पॅनलवरून आठवलं. आनंदी कुलकर्णीसमोर पॅनलवाले म्हटलं की, त्याचा शुद्ध सात्विक संताप व्हायचा. आणि मग तो म्हणायचा, हॅलो माझंही मास कॉम झालं आहे.
या सर्व गदारोळात तिथं साजरा होणार गणेशोत्सव मनाला आनंद देणारा ठरायचा. दहा दिवस आरती आणि नंतर आलमपनाहमध्ये पार्टी रंगायची. जोक्स, एकपात्री नाटक, फिश पॉण्ड्स आणि नंतर डान्स. असा कार्यक्रम असायचा. एकदा सर्वांना डान्सची प्रतीक्षा असताना मृदूला जोशी यांचं सतारवादन रंगलं होतं. मग सगळ्यांना टाळ्या वाजवाव्या लागल्या होत्या. कार्यक्रमांच्या वेळी माधुरी गुंटीचा उत्साहही मोठा असायचा. अशाच एका कार्यक्रमात 'अखिल भारतीय आंबट पक्ष' स्थापन झाला होता. आता त्याची शाखा आयबीएन लोकमत आणि पुण्यापर्यंत आहे. जिज्ञासूंनी जुन्या ई टीव्हीएन्सकडून त्यांची नावे घ्यावी. याच कार्यक्रमात सादर केलेली नक्कल तुफान हिट झाली होती. त्यानंतर आ आन्टे आमलापुरम, या गाण्यावर सगळा डेस्क थिरकला होता.
डेस्कवर डाव्यांचाही एक गट होता. मात्र त्यांची गटबाजी नव्हती. मेघराज पाटील, निमा पाटील, माणिक मुंडे हे डाव्या विचारांचे. त्यांचं ऐकायलाही मजा यायची. निमा आणि हृषीकेशची राजकीय जुगलबंदीही चांगलीच रंगायची.
सुनील बोधनकर आणि जयंत गायकवाड सारखे अंग्री यंग मॅनही डेस्कवर त्यांचा आब राखून होते. प्रवीण ब्रम्हपूरकर तर हृषीकेशचा मानसपूत्रच होता, म्हणजे अजूनही आहे.
अँकर होण्यासाठी तिथं सातत्यानं प्रयत्न सुरू असायचे. अर्थात माझाही होता. पण तू मराठवाड्यातला असं म्हणून तूझा उच्चार योग्य नाही. परिणामी मला साधा व्हीओ सुद्धा करू दिला जायचा नाही. ( आताही सिस्टीममध्ये फार काही फरक पडला नाही. असो.) आता मराठवाड्यातलाच असला तरी मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपुरेच राज्य करतोय. बरंय त्याला अजून या उच्चारवाल्यांनी घरी पाठवलेलं नाही. अशा प्रकारे एकमेकांचे पत्ते पद्धतशीरपणे दूर करण्यात काही सहकारी निष्णात होते.
मार्केटिंगच्या व्हॉईस ओव्हरसाठी सगळ्यांच्या उड्या पडायच्या. कारण खणखणीत शंभर रूपये मिळायचे. अभय जिन्सीवालेपण त्याचा व्हीओ करायचा. मार्केटिंग डिपार्टमेंटमधून फोन आल्यावर तो उचलून गुपचूपपणे पावले व्हीओ करण्यासाठी चालायची.
काही अँकर्सचे ऑन एअर किस्से अजूनही ताजे आहेत. एका अँकरने नियमभंग हा शब्द वाचताना विनयभंग असा वाचला होता. तर दुसरीने आगीचा अँकर असा काही वाचला होता की, विचारायची सोय नाही. तर तिसरीने कहरच केला होता. अडवाणींनी प्रयाण केलं, असं वाचण्याऐवजी पलायन केलं, असं वाचून मोठाच हादरा दिला होता.
मात्र सागर गोखले आणि मकरंद माळवेची बातच और. दोघांचा अभ्यास आणि शैली उत्तम. मात्र नवीन आलेल्या कॉपी एडिटर्सबरोबर दोघेही वरिष्ठ असतानाही चांगलं मार्गदर्शन करायचे. प्रसिद्धी या दोघांच्या डोक्यात गेलेली नव्हती. मकरंद माळवे यानं आणलेला कप अजूनही डेस्कवर जतन केल्याचं सांगण्यात येतंय. चहा शेअर करण्यासाठी कॅन्टीनवाला एक्सट्रा कप द्यायचा नाही. त्यामुळे मकरंदच्या सुपीक पुणेकरानं घरून हा कप आणला. पाच रूपयाचा चहा आणि कॉफी दोघांना यामुळे शेअर करता यायचा
मे 2005 हा डेस्कवर विवाहाचा महिना ठरला होता. हृषीकेश देशपांडे, मी, अभिजीत कांबळे, अभय हे सगळे एकाच महिन्यात विवाहबद्ध झालो होतो. पुढच्याच महिन्यात राहुल वाघचंही लग्न झालं होतं.
साहित्य संमेलन म्हणजे दुर्गेश सोनार हे समीकरण ई टीव्हीत पक्क होतं. त्याच्याही कविता उत्तरोत्तर रंगत जायच्या. महाराष्ट्र माझा हे बुलेटिन काढण्यात त्याची हातोटी होती. RO लॉक हा शब्दही तिथंच ऐकायला मिळाला. आता 24 तासच्या दुनियेत ही संकल्पना म्हणजे काही औरच.
ई टीव्हीचा इनपुट विभाग सर्वाधिक कार्यक्षम आहे. कारण तिथं दर महिन्याला एक - दोन स्ट्रिंजर तर तीन - चार महिन्याला एका रिपोर्टरचा राजीनामा ठरलेला असतो. तिथला 'कामाचा' झपाटा संशोधनाचा विषय आहे. इथल्या सारखे रिपोर्टर कुठेच काढले जात नाहीत. बहुतेक एचआर डिपार्टमेंटला काम मिळावं, यासाठी हा उद्योग असावा.

दूर मुलखात असलेले आम्ही सहकारी तिथं एकमेकांना आधार होतो. आता जवळपास सगळेच मुंबईत आहोत. मात्र या शहराने आमच्यातली मैत्री, स्नेह, जिव्हाळा ओरबडून घेतला आहे. मित्र आता जणू स्पर्धक झाले आहेत. तीन - तीन महिने कुणाचा फोन नसतो. मी भला माझं काम भलं, ही या शहराची जीवनपद्धती सगळ्यांनीच आत्मसात केली आहे. या शहराच्या वेगानं आपल्यातल्या जिव्हाळ्याला कधीच मागं टाकलंय. पण जिव्हाळा कायम ठेवायचा असेल तर एकमेकांना साद द्या. कारण या आठवणी, हे मित्र कधीच मिळणार नाहीत.

Friday, August 19, 2011

अण्णांचे आंदोलन, काँग्रेसचा आत्मक्लेश

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळणा-या पाठिंब्यामुळे धास्तावलेल्या काँग्रेस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली. आणि त्यानंतर काँग्रेस सरकारचे सगळे निर्णयही चुकत गेले. अण्णा हजारेंना उपोषणाची परवानगी देण्यात आली नाही. जेपी पार्ककडे निघालेल्या अण्णांना अटक करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आंदोलनासाठी बिनशर्त अटींवर अडून बसलेल्या अण्णांनी तिहारमध्येच उपोषण सुरू ठेवलं. तर तिहारच्या बाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढत गेली. अखेर सरकारने अण्णांना रामलीला मैदानावर उपोषणाची परवानगी दिली. काँग्रेस सरकारमध्ये या मुद्यावर किती गोंधळ उडालेला आहे, आणि या सरकारने आत्मविश्वास गमावल्याचं या घटनाक्रमातून सिद्ध होतं.
अण्णा हजारेंवर बेछूट आरोप करण्याची काँग्रेसच्या चाणक्यांची नीती सपशेल फसली. मनीष तिवारींच्या बेताल वक्तव्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली. तर पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, अंबिका सोनी यांनीही त्यांच्या पातळीवर जितका गोंधळ उडवून देता येईल तितका उडवून दिला.
अण्णांच्या मागण्या मान्य होतील किंवा नाही, हा एक विषय आहे. मात्र इथं आपल्या चर्चा करायची आहे ती या मुद्यावर की, अण्णांना इतका पाठिंबा का मिळतोय ?
सामान्य नागरिकांचा विशेषत: तरूणांचा राजकीय पक्षांवरील विश्वास उडू लागला आहे का ? आणि जर याचं उत्तर होय असेल तर हा आपल्या लोकशाहीप्रधान देशाला धोकाच म्हणायला हवा. कारण आपल्या देशाचा जो काही विकास झाला आहे, तो याच पद्धतीतून झाला आहे. अर्थात देशाचं जे काही वाटोळं झालंय, तेही याच माध्यमातून झालंय हे ही नाकारता येणार नाही.
देशातल्या वाढत्या भ्रष्टाचारामुळं इथला तरूण व्यथित झालाय. सत्ताधारी भ्रष्टाचार संपवण्यासाठी नालायक आहेत. इतकंच नव्हे तर भ्रष्टाचा-यांना सरकारचा पाठिंबा आहे की काय ? असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी फक्त काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनाच तुरूंगात टाकण्यात आलं. मात्र या भ्रष्टाचारात सामील असलेले त्यांचे वरिष्ठ कधी गजाआड होणार ? हा सवाल सामान्य जनतेच्या आणि तरूणांच्या मनात आहे.
सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकीय नेत्यांची उघड होणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे देशातला तरूण निराश झाला होता. ही परिस्थिती त्याला बदलायची होती. मात्र विरोधी पक्ष या प्रश्नावर रस्त्यावर उतरत नव्हते. या प्रश्नावर लढण्याची ताकद आणि ऊर्मीसुध्दा विरोधी पक्षांनी गमावली की काय ? असा सवाल उपस्थित होत होता.
नालायक सत्ताधारी आणि निष्क्रीय विरोधक यांच्यातली ही स्पेस अण्णा हजारेंनी भरून काढली. एकाचवेळी सत्ताधा-यांवर आसूड ओढत असतानाच त्यांनी विरोधी पक्षांची भूमिकाही पार पाडली. इंडिया अगेनस्ट करप्शन या संघटनेचीही अण्णांना चांगलीच साथ मिळत आहे. मीडियानेही हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. अण्णांच्या आंदोलनाला मिळणा-या LIVE प्रसिद्धीमुळेही समाजात चांगलीच जनजागृती निर्माण होऊ लागली आहे. परिणामी अण्णांचे आंदोलन व्यापक होत चालले आहे. तर मधल्या मधे चुकीच्या निर्णयांमुळे काँग्रेसवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे.

Monday, July 25, 2011

द ग्रेट काँग्रेस सर्कस !

मणिशंकर अय्यर. काँग्रेस संस्कृतीत मुरलेल्या नेत्यांपैकी एक. मात्र आता त्यांच्यामुळं काँग्रेस मुख्यालयाच्या इमारतीची ओळखच बदलली गेली आहे. आता काँग्रेसचं मुख्यालय जणू काही सर्कसचा तंबू दिसायला लागलं आहे. याचं कारणही तसंच आहे. 'काँग्रेसमध्ये कुणाला पद मिळवायचं असतं, तर कुणाला पदाला मुकावं लागतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये अशा प्रकारे सर्कस सुरू असते', असं विधान मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. बरं काँग्रेसच्या संस्कृतीचा आणि त्या पक्षाच्या इतिहासात पाहिल्यावर सर्कसमध्ये शोभावेत असे अनेक जोकर तिथं रूजले आणि चांगलेच फोफावलेसुद्धा. त्या जोकरांनी स्वत:चा विकास करून घेतला. मात्र त्यांच्या विदूषकी चाळ्यांमुळे देशाची स्थिती हास्यास्पद झाली.

काँग्रेसच्या सर्कशीचे रिंगमास्टर हे गांधी घराणं आहे. या रिंगमास्टरला खुश ठेवण्यासाठी सर्कशीतल्या प्राण्यांची आणि विदुषकांची कसरत सुरू असते. मग त्यातून कुणी 'इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा', असं विधान करण्यात धन्यता मानतात. एखादा छुटभैय्या नेता सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारावं यासाठी भर गर्दीत गाडीवर चढून डोक्याला पिस्तूल लावून फिरतो. सध्याचा लेटेस्ट विदुषक म्हणजे दिग्विजय सिंग. हा विदुषक सध्या बेफाम सुटला आहे. रिंगमास्टर सोनिया गांधी आणि ज्युनिअर रिंग मास्टर राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी त्यानी फक्त सुंता करून घेण्याचीच बाकी ठेवली आहे. आपल्या बेताल वक्तव्यांनी या विदुषकाने भारतीय राजकारणाचं जगात हसं करून ठेवलं आहे.

कलमाडींचा झाला गझनी

काँग्रेसच्या या सर्कसमधला आणखी एक कलाकार म्हणजे सुरेश कलमाडी. मात्र आता या कलमाडींना स्मृतीभंश झाला आहे. त्यांनी आतापर्यंत इतका भ्रष्टाचार करून ठेवला आहे की, त्यामुळे पैसे कुठेकुठे ठेवलेत हे लक्षात ठेवताना त्यांच्या बुद्धीवर ताण पडला. परिणामी या धक्क्यामुळं त्यांना स्मृतीभंश झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरेश कलमाडींचा भ्रष्टाचारच इतका व्यापक आणि चौफेर प्रमाणात होता की, त्याचा आकडा नेमका किती असावा यावरूनही अजून वाद आहे.


आता सुरेश कलमाडींना ते खासदार आहेत की नाही ? हे सुद्धा आठवत असेल का ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांना हा आजार चार वर्षांपासून असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. दोनच वर्षांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी त्यांना स्मृतीभंश कसा झाला नाही. तेव्हा तर त्यांनी आठवणीने खासदारकीचं तिकीट घेतलं. आणि आत्ताच स्मृतीभंश झाल्याची बातमी येते, त्यावरून हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही, हे स्पष्ट होतं. 'सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी'ची ही नवी चाल असणार, यात फार जास्त शंका उपस्थित करण्याचं कारणच नाही.


सर्कशीतला पाहुणा कलाकार


काँग्रेसच्या या तंबूत सध्या पाहुणा कलाकार असलेल्या ए. राजानेही सध्या काँग्रेसचा चांगलाच बाजा वाजवला आहे. टू जी स्पेक्ट्रममध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तिहार जेलमध्ये ए. राजा शिक्षा भोगत आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात सुनावणीत दिलेल्या जबानीत ए. राजाने काँग्रेसचा भ्रष्ट बुरखा टराटरा फाडला. पंतप्रधानांच्या उपस्थितीत स्पेक्ट्रमचं वितरण केल्याची जबानी राजाने दिली आणि काँग्रेसच्या तंबूत दाणादाण उडाली. ए. राजाच्या जबानीनंतर थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. ए. राजाच्या जबानीवरून काँग्रेसही बॅकफूटवरू गेली आहे. एका आरोपीच्या मागणीवरून राजीनाम्याची मागणी करणं योग्य नाही, अशी भूमिका आता काँग्रेसने घेतली आहे.

चला, हे आघाडी सरकार सामान्य नागरिकाला सुखी ठेऊ शकत नाही. त्याला सुरक्षी देऊ शकत नाही. दहशतवाद्यांना रोखू शकत नाही. पण काँग्रेसच्या सर्कशीतले हे जोकर सामान्य नागरिकांचं मनोरंजन करण्यासाठी सक्षम आहेत, हे मान्य करावंच लागेल.

Friday, July 15, 2011

अजून किती सहन करायचं ?

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे खरोखरच धन्यवाद मानायलाच हवे. कारण 31 महिन्यांनंतर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. 13 जुलै रोजी कसाबच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून दहशतवाद्यांनी डाव साधला, आणि कसाबला तीन बॉम्बची सलामी दिली. कसाबच्या वाढदिवसाच्या या जश्नमध्ये 18 मुंबईकरांना जीव गमवावा लागला, तर शंभरपेक्षा जास्त जणांना जखमी व्हावं लागलं. मात्र यात वाईट कशाला वाटून घ्यायचं ? देशाची धर्मनिरपेक्षता जपायची असेल तर असे क्रुरकर्मा अजमल कसाब, अफजल गुरू यांना जपायलाच हवं. आज तर गुरूपोर्णिमा आहे. केंद्र सरकारनं आजच्या मुहूर्तावर अफजल गुरूचं एखादं पोस्टाचं तिकीट का प्रकाशित केलं नाही ? हा माझ्यासारख्या धर्मनिरपेक्ष देशातल्या सामान्य नागरिकाला प्रश्न पडला आहे.
आताच थोड्या वेळापूर्वी ऑफिसमध्ये माझा एक सहकारी अमर काणे यानं एक मत व्यक्त केलं. ते मत म्हणजे सामान्यांच्या मनात किती संताप खदखदतोय याचंच एक प्रातिनिधीक चित्र आहे. मुंबईतल्या एखाद्या चौकाला कसाबचं नाव द्यायला हवं, असं माझ्या मित्रानं सांगितलं. नाही तरी अजून कसाबला फासावर लटकवलेलं नाही. त्यामुळं या काँग्रेसच्या जावयाचे लाड करायलाच लागतील. खाली दिसणा-या या छायाचित्रातल्या सामान्य नागरिकांना अश्रू ढाळावेच लागतील.

मात्रं हे अजून किती दिवस सहन करायचं ? कोणी पेरले मुंबईत तीन बॉम्ब ? किती जणांच्या स्लीपर सेलनं केलं हे कृत्य ? 'दहशतवादाला धर्म नसतो' हे वाक्य किती दिवस ऐकायचं. जर दहशतवादाला धर्म नसतो तर मग भेंडी बाजारात का होत नाहीत बॉम्बस्फोट ? ज्या धर्मांध मुस्लिमांना जगावर इस्लामचं राज्य आणायचं आहे, ते सांगून सवरून धर्मासाठीच हिंसाचार घडवत आहेत. आणि आपले काँग्रेसी राज्यकर्ते कशाला आणि कशाच्या आधारे म्हणतात की दहशतवादाला धर्म नसतो. मतांसाठी लाचार झालेल्यांना धर्म नसतो. तसाच या काँग्रेसवाल्यांना कोणताही धर्म नाहीच.
या शहरावर अंडरवर्ल्डचं राज्य आहे. दहशतवादीही त्यांना सामील झाले आहेत. अंडरवर्ल्ड म्हणजे मुस्लिम गुन्हेगारांचच या शहरावर राज्य आहे. दहशतवादी संघटनांचे स्लिपर सेल इथल्या मोहल्ल्यांमध्ये आहेत. दहशतवाद्यांना साथ देणारी सापांची हिरवळ या शहरातच नव्हे तर देशभरात आहे, हे सांगण्यासाठी कुणाच्याही साक्षीची गरज नाही. मात्र ही हिरवळ ठेचून काढण्याची हिंमत देशातल्या आणि राज्यातल्या राज्यकर्त्यांमध्ये आहे का ?


यांच्या मतांच्या राजकारणासाठी सामान्यांनी किती दिवस मरायचं ? सामान्यांनी काय फक्त मरणातच जीवन अनुभवायचं ? देशात सुरक्षा नावाची कोणतीच चीज अस्तित्वात नाही. गुन्हेगारांना पकडायचं म्हटलं तर पोलिसांचे हात जातात ते मोहल्ल्यात. आणि तिथं कुणाच्या दाढीला स्पर्श झाला म्हणजे यांचा 'इस्लाम खतरे में' यायचा आणि काँग्रेसची सत्ताही खतरे में. त्यामुळं काँग्रेस आणि धर्मांध मुस्लिमांचं असं साटंलोटं जमून आलं आहे. देशावर असलेलं इस्लामी दहशतवादाचं संकट दिवसेंदिवस गडद हिरवं होत चाललं आहे. भ्रष्टाचारानं बरबटलेलं आणि मुस्लिमांचं फक्त मतांसाठीच अनुनय करणा-यांचं सरकार सत्तेत असे पर्यंत हे सहन करावंच लागेल.

Sunday, June 12, 2011

दलित मतांसाठी राष्ट्रवादीचा 'सनद'शीर मार्ग

शिवशक्ती - भीमशक्तीचा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगलाच धसका घेतल्याचं आता स्पष्ट होतंय. 9 जूनरोजी चैतन्यमय वातावरणात शिवशक्ती - भीमशक्तीचा महामोर्चा आझाद मैदानात पार पडला. दुस-याच दिवशी सोमय्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसनं सामाजिक परिवर्तन हक्क परिषद आयोजित केली होती. शिवशक्ती - भीमशक्तीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस कशी धास्तावली, आहे हेच यातून दिसून येत होतं.
'गेल्या घरी सुखी रहा' असा एखाद्या वधू पित्यानं टाहो फोडावा त्या स्वरात शरद पवारांनी त्यांचं मत व्यक्त केलं. रामदास आठवलेंना धर्मनिरपेक्षतेची आठवण करून देण्यात येत होती. हे कमी की काय ? म्हणून शरद पवारांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांमधील 1 ते 8 प्रतिज्ञा वाचून दाखवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाया खालील वाळू किती सरकू लागली आहे, हेच त्यांच्या या कृतीतून स्पष्ट झालं.

छगन भुजबळांनी त्यांच्या बाटग्या निष्ठा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी शरद पवारांना थेट फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून शरद पवारांनी सत्ता पणाला लावली, असंही भुजबळ म्हणाले. 1978 साली विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव एकमतानं संमत करण्यात आला होता. हा ठराव संमत झाल्यानंतर मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी दलित वस्त्यांवर काँग्रेस नेत्यांनी हल्ले केले होते. कित्येक दलितांच्या झोपड्या बेचिराख करून टाकण्यात आल्या होत्या. 1978 साली संमत झालेला ठराव प्रत्यक्षात येण्यासाठी 1994 साल उजाडावं लागलं. 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवलेला नामविस्ताराचा पर्याय सर्वांच्या पसंतीला पडला. नामविस्तारामुळं आणि शिवसेनेच्या भुमिकेमुळं 1978 सारखी परिस्थिती मराठवाड्यात उदभवली नाही. राज्यकर्ते म्हणून शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी नामांतर, नामविस्तार याचं श्रेय नक्कीच घ्यावं. पण हे श्रेय त्यांनी आधी नव्हे तर शेवटी घ्यायला हवं. कारण 1978 मध्ये झालेला ठराव प्रत्यक्षात साकारण्यासाठी तब्बल 16 वर्ष त्यांना लागली. या मधल्या काळात दलित संघटनांना मोठा संघर्ष करावा लागला. कित्येक मोर्चे, बंद घडवावे लागले. दलित कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्या झेलाव्या लागल्या. कित्येकांना तुरूंगवास घडला. याच आंदोलनातून रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे असे कित्येक नेते घडले.

दलित चळवळीचं केंद्रबिंदू ठरलेल्या संभाजीनगरात नामांतरासाठी कित्येक मोर्चे निघाले. रिपब्लिकन पार्टीच्या कोणत्याही गटाचा मोर्चा असला तरी नागरिक त्यात सहभागी होत होते. एक दिवसाच्या ओल्या बाळंतणीपासून तर नव्वद वर्षांच्या वृद्धापर्यंतची रस्त्यावर उतरलेली आंबेडकरी जनता संभाजीनगरनं पाहिलेली आहे. तब्बल 16 वर्ष दलित जनतेनं नामांतरासाठी लढा दिला. त्यामुळं शरद पवार आणि छगन भुजबळ नामांतराचं पहिलं श्रेय तुमचं नव्हे तर, या लढाऊ दलित जनतेचं आहे. जी एक दिवसाची ओली बाळांतिण माता रस्त्यावर उतरली तिचं ते श्रेय आहे. काँग्रेसवाल्यांनो, जर इतकंच श्रेय घ्यायची हौस होती तर मग 1978 मध्येच नामांतर का केलं नाही ?

आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला दलित मतदारांना आपल्याकडं आकृष्ट करण्यासाठी सनद जाहीर करण्याची वेळ आली आहे. मागील साठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि काँग्रेसमधून फुटून निघालेल्या नकली काँग्रेस अर्थात एनसीपी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनं ते अपयशी ठरल्याचंच मान्य केल्याचं स्पष्ट होतंय. मागील साठ वर्षात दलितांबरोबर बनवाबनवी केली, मात्र त्यांचा विकास घडवून आणण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला करता आलं नाही. दलितांची मतं घेऊन काँग्रेसी राज्यकर्ते कायम सत्तेत राहिले. पण दलित जनतेला सत्तेत मतांच्या प्रमाणात वाटा कधीच मिळाला नाही. दलितांच्या मतांची रसद

घेणा-यांना आता सनद आठवली आहे. मात्र ही सनद फक्त सत्ता आणि मतं मिळवण्यासाठीच आहे, हे ही तितकंच खरं आहे.

त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा हा सनदशीर मार्ग किती फसवा आहे, हे दलित जनतेच्या लक्षात आलं आहे. आगामी काळात शिवशक्ती आणि भीमशक्तीचाच पर्याय सशक्त करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जातीय राजकारण गाडून टाकण्याची संधी जनतेसमोर निर्माण झाली आहे.