Monday, July 25, 2011

द ग्रेट काँग्रेस सर्कस !

मणिशंकर अय्यर. काँग्रेस संस्कृतीत मुरलेल्या नेत्यांपैकी एक. मात्र आता त्यांच्यामुळं काँग्रेस मुख्यालयाच्या इमारतीची ओळखच बदलली गेली आहे. आता काँग्रेसचं मुख्यालय जणू काही सर्कसचा तंबू दिसायला लागलं आहे. याचं कारणही तसंच आहे. 'काँग्रेसमध्ये कुणाला पद मिळवायचं असतं, तर कुणाला पदाला मुकावं लागतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये अशा प्रकारे सर्कस सुरू असते', असं विधान मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. बरं काँग्रेसच्या संस्कृतीचा आणि त्या पक्षाच्या इतिहासात पाहिल्यावर सर्कसमध्ये शोभावेत असे अनेक जोकर तिथं रूजले आणि चांगलेच फोफावलेसुद्धा. त्या जोकरांनी स्वत:चा विकास करून घेतला. मात्र त्यांच्या विदूषकी चाळ्यांमुळे देशाची स्थिती हास्यास्पद झाली.

काँग्रेसच्या सर्कशीचे रिंगमास्टर हे गांधी घराणं आहे. या रिंगमास्टरला खुश ठेवण्यासाठी सर्कशीतल्या प्राण्यांची आणि विदुषकांची कसरत सुरू असते. मग त्यातून कुणी 'इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा', असं विधान करण्यात धन्यता मानतात. एखादा छुटभैय्या नेता सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारावं यासाठी भर गर्दीत गाडीवर चढून डोक्याला पिस्तूल लावून फिरतो. सध्याचा लेटेस्ट विदुषक म्हणजे दिग्विजय सिंग. हा विदुषक सध्या बेफाम सुटला आहे. रिंगमास्टर सोनिया गांधी आणि ज्युनिअर रिंग मास्टर राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी त्यानी फक्त सुंता करून घेण्याचीच बाकी ठेवली आहे. आपल्या बेताल वक्तव्यांनी या विदुषकाने भारतीय राजकारणाचं जगात हसं करून ठेवलं आहे.

कलमाडींचा झाला गझनी

काँग्रेसच्या या सर्कसमधला आणखी एक कलाकार म्हणजे सुरेश कलमाडी. मात्र आता या कलमाडींना स्मृतीभंश झाला आहे. त्यांनी आतापर्यंत इतका भ्रष्टाचार करून ठेवला आहे की, त्यामुळे पैसे कुठेकुठे ठेवलेत हे लक्षात ठेवताना त्यांच्या बुद्धीवर ताण पडला. परिणामी या धक्क्यामुळं त्यांना स्मृतीभंश झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरेश कलमाडींचा भ्रष्टाचारच इतका व्यापक आणि चौफेर प्रमाणात होता की, त्याचा आकडा नेमका किती असावा यावरूनही अजून वाद आहे.


आता सुरेश कलमाडींना ते खासदार आहेत की नाही ? हे सुद्धा आठवत असेल का ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांना हा आजार चार वर्षांपासून असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. दोनच वर्षांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी त्यांना स्मृतीभंश कसा झाला नाही. तेव्हा तर त्यांनी आठवणीने खासदारकीचं तिकीट घेतलं. आणि आत्ताच स्मृतीभंश झाल्याची बातमी येते, त्यावरून हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही, हे स्पष्ट होतं. 'सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी'ची ही नवी चाल असणार, यात फार जास्त शंका उपस्थित करण्याचं कारणच नाही.


सर्कशीतला पाहुणा कलाकार


काँग्रेसच्या या तंबूत सध्या पाहुणा कलाकार असलेल्या ए. राजानेही सध्या काँग्रेसचा चांगलाच बाजा वाजवला आहे. टू जी स्पेक्ट्रममध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तिहार जेलमध्ये ए. राजा शिक्षा भोगत आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात सुनावणीत दिलेल्या जबानीत ए. राजाने काँग्रेसचा भ्रष्ट बुरखा टराटरा फाडला. पंतप्रधानांच्या उपस्थितीत स्पेक्ट्रमचं वितरण केल्याची जबानी राजाने दिली आणि काँग्रेसच्या तंबूत दाणादाण उडाली. ए. राजाच्या जबानीनंतर थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. ए. राजाच्या जबानीवरून काँग्रेसही बॅकफूटवरू गेली आहे. एका आरोपीच्या मागणीवरून राजीनाम्याची मागणी करणं योग्य नाही, अशी भूमिका आता काँग्रेसने घेतली आहे.

चला, हे आघाडी सरकार सामान्य नागरिकाला सुखी ठेऊ शकत नाही. त्याला सुरक्षी देऊ शकत नाही. दहशतवाद्यांना रोखू शकत नाही. पण काँग्रेसच्या सर्कशीतले हे जोकर सामान्य नागरिकांचं मनोरंजन करण्यासाठी सक्षम आहेत, हे मान्य करावंच लागेल.

1 comment:

  1. कॉँग्रेसचे हे जोकर अनेक वर्षांपासून सत्तेमध्ये आहेत.परिस्थितीनुसार आपला मुखवटा बदलण्याची कलाही यांना चांगलीच अवगत आहे. अशा प्रकारच्या जोकरमुळे या देशाचं नुकसान होतंय. त्यामुळे हा सर्कशीचा तंबू उखाडण्याची वेळ आलीय.

    ReplyDelete