'गेल्या घरी सुखी रहा' असा एखाद्या वधू पित्यानं टाहो फोडावा त्या स्वरात शरद पवारांनी त्यांचं मत व्यक्त केलं. रामदास आठवलेंना धर्मनिरपेक्षतेची आठवण करून देण्यात येत होती. हे कमी की काय ? म्हणून शरद पवारांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांमधील 1 ते 8 प्रतिज्ञा वाचून दाखवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाया खालील वाळू किती सरकू लागली आहे, हेच त्यांच्या या कृतीतून स्पष्ट झालं.
छगन भुजबळांनी त्यांच्या बाटग्या निष्ठा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी शरद पवारांना थेट फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून शरद पवारांनी सत्ता पणाला लावली, असंही भुजबळ म्हणाले. 1978 साली विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव एकमतानं संमत करण्यात आला होता. हा ठराव संमत झाल्यानंतर मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी दलित वस्त्यांवर काँग्रेस नेत्यांनी हल्ले केले होते. कित्येक दलितांच्या झोपड्या बेचिराख करून टाकण्यात आल्या होत्या. 1978 साली संमत झालेला ठराव प्रत्यक्षात येण्यासाठी 1994 साल उजाडावं लागलं. 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवलेला नामविस्ताराचा पर्याय सर्वांच्या पसंतीला पडला. नामविस्तारामुळं आणि शिवसेनेच्या भुमिकेमुळं 1978 सारखी परिस्थिती मराठवाड्यात उदभवली नाही. राज्यकर्ते म्हणून शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी नामांतर, नामविस्तार याचं श्रेय नक्कीच घ्यावं. पण हे श्रेय त्यांनी आधी नव्हे तर शेवटी घ्यायला हवं. कारण 1978 मध्ये झालेला ठराव प्रत्यक्षात साकारण्यासाठी तब्बल 16 वर्ष त्यांना लागली. या मधल्या काळात दलित संघटनांना मोठा संघर्ष करावा लागला. कित्येक मोर्चे, बंद घडवावे लागले. दलित कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्या झेलाव्या लागल्या. कित्येकांना तुरूंगवास घडला. याच आंदोलनातून रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे असे कित्येक नेते घडले.
दलित चळवळीचं केंद्रबिंदू ठरलेल्या संभाजीनगरात नामांतरासाठी कित्येक मोर्चे निघाले. रिपब्लिकन पार्टीच्या कोणत्याही गटाचा मोर्चा असला तरी नागरिक त्यात सहभागी होत होते. एक दिवसाच्या ओल्या बाळंतणीपासून तर नव्वद वर्षांच्या वृद्धापर्यंतची रस्त्यावर उतरलेली आंबेडकरी जनता संभाजीनगरनं पाहिलेली आहे. तब्बल 16 वर्ष दलित जनतेनं नामांतरासाठी लढा दिला. त्यामुळं शरद पवार आणि छगन भुजबळ नामांतराचं पहिलं श्रेय तुमचं नव्हे तर, या लढाऊ दलित जनतेचं आहे. जी एक दिवसाची ओली बाळांतिण माता रस्त्यावर उतरली तिचं ते श्रेय आहे. काँग्रेसवाल्यांनो, जर इतकंच श्रेय घ्यायची हौस होती तर मग 1978 मध्येच नामांतर का केलं नाही ?
आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला दलित मतदारांना आपल्याकडं आकृष्ट करण्यासाठी सनद जाहीर करण्याची वेळ आली आहे. मागील साठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि काँग्रेसमधून फुटून निघालेल्या नकली काँग्रेस अर्थात एनसीपी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनं ते अपयशी ठरल्याचंच मान्य केल्याचं स्पष्ट होतंय. मागील साठ वर्षात दलितांबरोबर बनवाबनवी केली, मात्र त्यांचा विकास घडवून आणण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला करता आलं नाही. दलितांची मतं घेऊन काँग्रेसी राज्यकर्ते कायम सत्तेत राहिले. पण दलित जनतेला सत्तेत मतांच्या प्रमाणात वाटा कधीच मिळाला नाही. दलितांच्या मतांची रसद
घेणा-यांना आता सनद आठवली आहे. मात्र ही सनद फक्त सत्ता आणि मतं मिळवण्यासाठीच आहे, हे ही तितकंच खरं आहे.
त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा हा सनदशीर मार्ग किती फसवा आहे, हे दलित जनतेच्या लक्षात आलं आहे. आगामी काळात शिवशक्ती आणि भीमशक्तीचाच पर्याय सशक्त करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जातीय राजकारण गाडून टाकण्याची संधी जनतेसमोर निर्माण झाली आहे.
गारु, राष्ट्रवादीने हा 'सनद'शीर मार्ग दलित मतांसाठी अवलंबला आहे अगदी 100 टक्के मान्य. पण शिवसेनाही दलित मतांसाठीच शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करत आहे हे मान्य करा ना ?
ReplyDelete