Friday, June 3, 2011

अजित पवार का बिथरले ?

शिखर बँकेला जमीनीवर आणण्याचा पराक्रम करणारा शरद पवारांचा पुतण्या अजित पवार याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गरळ ओकली. टू जी स्पेक्ट्रम, लवासा, पुण्यातील जमीन, शाहीद बलवा, कारखान्यांना पॅकेजेस देऊन ते खाणे, सहकार बँक बुडवणे अशी भ्रष्टाचाराची जंत्रीच पवार आणि कंपनीच्या मागे लागली आहे. त्यामुळे या सर्वांना फाटा देण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच अजित पवारांनी ही गरळ ओकल्याचं स्पष्ट होतंय.
तसंच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राज्याच्या पटलावर झालेला उदय, यामुळे ही दलित मतांना गृहित धरणा-या अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची टगेगिरीच बंद होणार आहे. त्यामुळं अजित पवार आणि कंपनी दिवसाढवळ्या बरळू लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या संस्था काढल्या ? असा त्यांचा सवाल होता. मात्र हा सवाल विचारण्याची वेळ त्यांच्यावर का आली ? कारण पवार आणि कंपनीनं काढल्या सगळ्या संस्था, त्यांच्या ताब्यात असलेली बँक आता डबघईला आली आहे. सर्व साखर कारखाने कोट्यवधींचे पॅकेज देऊनही तोट्यात चालले आहेत. मात्र मिळालेल्या पॅकेजच्या जोरावर राष्ट्रवादीचे जिल्ह्या जिल्ह्यातील सरंजामदार गब्बर होत चालले आहेत. जनतेला हा सर्व भ्रष्टाचार दिसू लागला आहे. जनता राष्ट्रवादीच्या विरोधात चिडली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते स्वत: शेण खाऊन दुस-याचं तोंड हुंगत आहेत.
सोनिया गांधींच्या परदेशीपणाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. मात्र स्थापना झाल्यापासून हा पक्ष सोनिया गांधींच्या पदराचा आश्रय घेऊन राज्यात सत्तेत आहे. म्हणजे सोनिया गांधींनी विरोधही करायचा, त्यांच्या पदराखाली राहून सत्तेची मर्दूमकी गाजवायची असा या राष्ट्रवादींचा 'पुरूषार्थ' आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना प्रत्येक जिल्ह्यातील कारखानदार, सरंजामदार अशी मंडळी हाताशी धरली. या मंडळींनी पोसण्यासाठी त्यांच्या कारखान्यांना पॅकेज दिली. त्यातून राष्ट्रवादी मंडळी गब्बर झाली. कारखाने तर त्यांनी खाल्लेच, सहकारी बँकही बुडवली. आता हिच मंडळी खाजगी साखर कारखाने काढत आहेत. म्हणजे जनतेचा पैसा लुटणारी आणि सरकारला ठेंगा दाखवणारी ही राष्ट्रवादीची नेते मंडळी किती निर्लज्ज आहे, हेच यातून दिसून येतं.
फक्त मराठ्यांचा पक्ष असा, नावलौकिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळांची केविलवाणी अवस्था झाली आहे. फक्त शरद पवारांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री व्हायचं म्हणून कोणतीही 'टाळी' न वाजवता भुजबळांना ते 'माळी' आहेत म्हणून हटवण्यात आलं. आणि हेच नेते जातीयवादाच्या विरोधात बोलतात तेव्हा जनतेची फुकटात करमणूक होते. भ्रष्टाचारात बरबटलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ही टगेदारी सहकार क्षेत्रात सुरू ठेवावी. शिवसेनाप्रमुखांवर चिखल उडवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

No comments:

Post a Comment