Wednesday, March 30, 2011

पाकिस्तानचा पाडाव, आता लक्ष्य लंका दहन

वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार समजल्या जाणा-या टीम इंडियानं अपेक्षेप्रमाणं पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. टीम इंडियानं आता फायनलमध्ये प्रवेश केलाय. वीरेंद्र सेहवागचा धडाका पाहता टीम इंडिया 300 पेक्षा जास्त धावा करणार असं वाटत होतं. मात्र मधली फळी अपेक्षीत कामगिरी करू शकली नाही. त्यामुळं टीम इंडिया 260 धावा करू शकली. सहा जीवदान मिळूनही सचिन तेंडूलकरला सेंच्युरीची सेंच्युरी करण्यात अपयश आलं. आता मुंबईत होम ग्राऊंडवर सचिन शतक ठोकून वर्ल्ड कप जिंकून देईल अशी खात्री वाटतेय.
मीडल ऑर्डरला सातत्य राखता येत नाही, ही टीम इंडियाची नेहमीचीच डोकेदुखी झालेली आहे. त्यातच बॉलिंगची नसलेली धार, ही सुद्धा चिंतेची बाब म्हणावी लागेल.
टीम इंडियाच्या बॉलिंगला धार नसताना सेमी फायनलमध्ये मिळालेलं यश उल्लेखनीय आहे. आता फायनलमध्ये श्रीलंकेचं दहन झालंच पाहिजे. तब्बल 28 वर्षानंतर भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी प्राप्त झाली आहे. 'अभी नहीं तो कभी नहीं' या न्यायानं एक पाऊल पुढे टाकत टीम इंडियानं वर्ल्ड कप मिळवलाच पाहिजे.

Sunday, March 20, 2011

जाणता राजा !

जगाच्या इतिहासात अनेक राजे - महाराजे, सुलतान होऊन गेले आहेत. अर्थात यामध्ये मोठ्या प्रमाणात वंश परंपरा किंवा दगाबाजी करून झालेलेही अनेक जण होते. मात्र या सर्व राजे - महाराजे, आणि सुलतानांची आज आठवण ठेवली जाते. कोणत्या राजाची जयंती उत्साहात साजरी केली जाते ? अनेक राजे, सुलतान हे इतिहासात गडप झाले आहेत. मात्र एक जाणता राजा असा आहे की, ज्याची अनेक वर्षांपासून उत्साहात जयंती साजरी केली जाते. आणि तो राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. कारण शिवाजी महाराज हे काही वंश परंपरेने राजे झाले नव्हते. इतिहास हा त्यांच्या शिवाय अधूरा आहे, कारण स्वत: शिवाजी महाराजांनीच इतिहास घडवलेला आहे.
मोघलशाही, आदिलशाहीमुळे खचून गेलेल्या इथल्या रयतेला लढायला शिकवलं ते शिवाजी महाराजांनी. चार शतकांपूर्वी आपल्या देशात ख-या अर्थानं जन्म झाला तो लोकशाहीचा. शिवाजी महाराजांचा शिवकाल हीच खरी लोकशाही. मावळ्यांच्या मदतीनं त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता तर हा देश इस्लामी राजवटीचा गुलाम बनला असता. सर्वांना डोक्यावर गोल टोप्या घालून मशिदीत नमाज अदा करावी लागली असती. मात्र शिवाजी महाराजांमुळं ही 'हरित क्रांती' टळली.
शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अफाट होती. स्वराज्य प्रबळ करण्यासाठी किल्ले आणि सागरी किल्ले महत्वाचे आहेत. हे त्यांनी हेरलं होतं. मात्र या सर्वांपेक्षा त्यांच्यातली जिद्द आणि गनिमी कावा आजही प्रेरणा देणारा आहे.
संपूर्ण शिवचरित्र हेच विविध पराक्रमांनी भारलेलं आहे. मात्र यात मैलाचा दगड ठरावा तो प्रतापगडच. कारण याच प्रतापगडाच्या पायथ्याशी जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास घडला. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी अफजल खान हजारो सैन्य, मोठं घोडदळ, अजस्त्र हत्ती, दारूगोळा घेऊन चालून आला होता. मात्र शिवाजी महाराजांनी युद्ध कलेचं मोठं उदाहरण इथं जगाला दाखवून दिलं. महाराजांनी मोठ्या चातूर्यानं खानाला निरोप पाठवून बोलणीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावलं. अफजल खानाला वाटलं की, शिवाजी महाराज घाबरले. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की, तो आता महाराजांनी जो भाग कायम पायदळी तुडवलेला आहे, तिथंच तो चालला होता. एवढंच नव्हे तर हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला शेवटी दहा जण घेऊन महाराजांबरोबर बोलणी करण्यासाठी यावं लागलं. शिवाजी महाराजही दहा जणांसह खानाच्या भेटीला गेले.
मात्र खानानं जो दगाफटका करायचा तो केलाच. त्यानं शिवाजी महाराजांवर वार केला. खानाची प्रवृत्ती महाराजांना माहित असावी, त्यामुळं त्यांनी आधीच घातलेल्या चिलखतामुळं ते बचावले. दुस-याच क्षणी महाराजांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. ही घटना म्हणजे महाराजांनी अफजल खानाचा वध केला, इतकीच मर्यादीत नाही. कारण त्या काळात देशात पसरत असलेल्या इस्लामी साम्राज्यालाच या वधामुळं धक्का बसला. मोघलांची सगळी शक्ती शिवाजी महाराजांच्या विरोधात खर्ची पडली. मोघल साम्राज्य भारतातच अडकून पडलं. शिवाजी महाराज नसते तर मोघल साम्राज्याचा श्रीलंका, म्यानमार आणि त्याच्या पुढेही विस्तार झाला असता. मात्र शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळं ही हिरवळ दूरवर पसरू शकली नाही.
वैरी मेला वैर संपले, या न्यायानं महाराजांनी अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधली. महाराजांनीच त्याची आतडी बाहेर काढली होती. कारण दहशतवाद हा असाच संपवायचा असतो. बिर्याणी खायला देऊन दहशतवाद संपत नसतो. मात्र एकदा अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याची कबर बांधण्याचा दिलदारपणा इतिहासात कुठे सापडणं शक्यच नाही. मात्र ही कबर म्हणजेही एक इशाराच होता. या हिंदवी स्वराज्यावर जर चालून आलात तर तुमचीही अशीच कबर खोदली जाईल, असा इशाराच महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी घालून दिला.
शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात मुस्लिमांनाही दुय्यम वागणूक नव्हती. सैन्यात आणि महाराजांच्या अंगरक्षकांमध्येही मुस्लिम होते. लढाईच्या वेळी महिला आणि त्यांच्या अब्रूचं रक्षण करण्याचा दंडकच घालून देण्यात आला होता. या मुळंच सर्व रयतेला हे आपलं राज्य वाटत होतं. हा राजा जनतेला जाणून घेणारा होता. जनतेलाही राजाचं प्रेम जाणवत होतं. त्यामुळंच हा राजा 'जाणता राजा' म्हटला
परकीयांशी दिलेला लढा, जिंकलेले किल्ले, आग्र्याहून सुटका, सुरतची लूट, राज्याभिषेक या सारख्या अनेक शौर्यांची प्रेरणा महाराजांपासून घेता येते. सागराचे महत्व आणि त्याच्या सुरक्षेचा वेध चार शतकांपूर्वीच महाराजांनी घेतला होता. त्यामुळंच त्यांनी अनेक जलदूर्ग बांधले. मात्र शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या नादान राज्यकर्त्यांना घेता आला नाही. आणि त्यामुळंच मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. राज्यकर्त्यांची शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची मानसिकता नाही. त्यांचा 'आदर्श'च मुळात 31 मजल्यांचा आहे. त्या कुलाब्यातल्या सोसायटीत चार फ्लॅट पदरात पाडणं हाच त्यांचा आदर्श.
व्हियतनाम मधल्या जनतेनंही अमेरिकेच्या साठ हजार सैनिकांची कबर खोदली होती. कारण तिथल्या जनतेनं शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आत्मसात केला होता. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या जोरावर त्यांनी बलाढ्य अमेरिकेला धूळ चारली. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यामुळंच विजय मिळाल्याचं तिथली जनता सांगते. असा हा जागतिक किर्तीचा राजा आपल्या देशात होऊन गेला. आणि आज आपल्यावरच दहशतवादी हल्ले होताहेत. कारण आपण दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत बसलो आहोत. दहशतवाद असा संपूष्टात येत नाही, हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आहे. होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा हर हर महादेव, जय भवानी - जय शिवाजी, मग बघा कुणाची माय व्याली आहे, इथं हल्ले करायला ?

Sunday, March 13, 2011

अशी नसते गं आई !

8 मे महिला दिन. ऑफिसमध्ये सकाळ पासून महिला दिना विषयीच्या बातम्या सुरू होत्या. वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी बजावणा-या महिलांच्या बातम्या प्रत्येक बुलेटिनमध्ये जात होत्या. आणि त्यातच एक ब्रेकिंग न्यूज आली. मालाड पूर्वेला सह्याद्री टॉवर्स इमारतीत राहणा-या निधी गुप्ता या महिलेनं दोन लहान मुलांसह आत्महत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही बातमी, आणि एकीकडे महिली दिनाच्या बातम्या देत असतानाच निधी गुप्ताच्या आत्महत्येचीही बातमी करावी लागली.

चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेल्या निधी गुप्तानं गौरव आणि महिका या दोन लहानग्यांसह आत्महत्या केली. मनाला सुन्न करणारी ही बातमी. आई पोटच्या मुलासाठी काय करत नाही ? आई तर एक पिढीच घडवते. मुलांची शाळा नव्हे तर विद्यापीठच आई असते. गौरव आणि महिकाच्या आईनं असं का केलं असेल ?
अशी नसते गं आई ! असंच तर ही मुलं तिला म्हणत नसतील ना ?
आपल्या देशातली एकत्र कुटुंब पद्धती ही जगात आपली ओळख होती. मात्र या नाते - संबंधांमध्ये आता त्सुनामी आली आहे, हेच या आत्महत्येतून स्पष्ट होत नाही का ? आपणही किती संवेदनाहीन झालो आहोत. मनाला चटका लावणारी ही बातमी, मात्र त्यावर रोखठोक चर्चा झालीच नाही. समाजातली मते - मतांतरे व्यक्त झालीच नाहीत. 11 मार्चला जपानमध्ये त्सुनामी आली. त्या त्सुनामीत नाते संबंधांच्या या त्सुनामीची बातमी वाहून गेली.
जग सोडून जाणारी निधी गुप्ता, मरणाच्या वाटेवर जाताना मुलांना का सोबत घेऊन गेली असेल ? मुलांना मृत्यूच्या दाढेत लोटताना तिचे हात का थरथरले नसतील ? मुलांकडं बघून जगण्याची नवी जिद्द निर्माण होते. मुलांच्या निरागस हास्यासमोर जगातली सर्व दु:ख विसरून जायला होतं. मग हे सर्व निधीला का जाणवलं नसेल ?
आता या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सासरच्या मंडळींच्या जाचामुळे निधीने हे पाऊन उचलल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. पुढिल तपासात सत्य बाहेर येईलही. मात्र निधीबरोबर
वावरणा-यांना, तिच्या नातेवाईकांना तिची घालमेल जाणवली नसेल का ? निधीच्या पतीला दारूचं व्यसन होतं. तसंच प्रॉपर्टीवरूनही वाद सुरू होता. या कौटुंबिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी वेळीच का पुढाकार घेतला नसेल ? जर त्यांच्या कुटुंबात संवाद असता, नाते - संबंधांमध्ये जिव्हाळा असता तर अशी घटना नक्कीच घडली नसती.
आपली कौटुंबिक आस्था कमी होत चालल्याचंच हे प्रतीक आहे. नातेसंबंधांमध्ये निर्माण होणारा तणाव, वाढती स्पर्धा, आणि घड्याळाच्या काट्यालाही मागे टाकून पुढे जाण्याची घाई यामुळं प्रत्येक व्यक्ती आत्मकेंद्री होत चालली आहे. या आत्मकेंद्री प्रवृत्तीमुळं समाजातला संवाद खुंटत चालला आहे. त्यामुळंच समाजात निकोप वातावरण निर्माण व्हायला हवं. घर हे फक्त भिंती असता कामा नये. घराघरातली घट्ट नातेसंबंधच अशा प्रकारच्या आत्महत्या रोखू शकतात. जिवनात कितीही तणाव असला तरी आत्महत्या हा काही मार्ग नव्हे.

Sunday, February 27, 2011

टग्यांचे वारसदार, बलात्कारी आमदार

राजकारणात राहून खरं बोलणं हा गुण फार कमी राजकारण्यांमध्ये आहे. कारण खरं बोलणा-यांना राजकारण करताच येत नाही. मात्र राजकारण करतानाही खरं बोलण्याची किमया अजित'दादा' पवार यांनी साधली आहे. मीडिया बॅन केला पाहिजे, पत्रकारांना दंडुके मारले पाहिजे अशी परखड भूमिका त्यांनी नांदेडमध्ये घेऊन पत्रकारांना पोलिसांच्या हातून 'प्रसाद' दिला होता. सहकार क्षेत्रातल्या त्यांच्या बगलबच्च्यांची भलावण करण्यासाठी तिथे टगेच लागतात, असं सांगताना 'मी ही एक टग्या' असल्याची कबूली दिली होती. तर शनीशिंगणापूरमध्ये हॉस्पिटलचे उदघाटन करण्याच्या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना 'गांडूळा'ची उपमा दिली होती. तर अशी ही टगेगिरी त्यांनी जाहीरपणे सांगितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. त्याच्याच जोरावर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. छगन भुजबळांना कोणतीही 'टाळी' न वाजवता, त्यांच्या पदावरून पायउतार करण्याची किमया त्यांनी साधली आहे. याला दुस-या भाषेत टगेगिरीही म्हणायला खुद्द अजित पवारांचीही हरकत असणार नाही. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मितीच सहकारातले टगे, सोसायट्यांचे टगे, वतनदार टगे, गावागावातले गुंड आणि टगे यांना पोसण्यासाठी झालेली आहे. या सर्व टग्यांचे पोशिंदे आणि नेते अजित पवार आहेत, असं म्हणनं धाडसाचं होणार नाही.
आता दुसरी गंमत बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीचे स्वागतच होईल, यात शंका नाही. मात्र पवार साहेब महिलांना आरक्षण देण्याबरोबरच तुमच्या पक्षाच्या आमदारांकडून संरक्षण मिळेल का ? या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करा.
कारण वीस वर्षाच्या तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही या वाघाला ( वाघ कसला बलात्कारी लांडगाच ) पक्षातून निलंबित केलं आहे. पण ऐवढी कारवाई पुरेशी आहे का ? या वाघाला पक्षातून बडतर्फ करून, आमदारकीचा राजीनामा का घेतला नाही ? त्याचे निलंबन रद्द करून तुरूंगातून सुटल्यावर त्याला केलेल्या 'कृत्या'बद्दल महाराष्ट्र भूषण किंवा टग्या भूषण असा एखादा पुरस्कार देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढा-यांचा ( टग्यांचा ) विचार आहे का ?
संभाजीनगर जिल्ह्यातले कन्नडेच मनसे आमदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी ताफ्यात घुसले होते. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर हर्षवर्धन जाधवांना मारहाण करण्यात आली. ती मारहाण इतकी क्रूर होती की, त्यांचा पार्श्वभाग काळा-निळा पडला होता. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा गुन्हा त्यांनी केला होता. मात्र ते विरोधी पक्षाचे आमदार होते. आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने तर आचारसंहिता सुरू असताना सरकारी विश्रामगृहात तरूणीवर बलात्कार केलाय. नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं हतबल तरूणीवर बलात्कार करण्याचे कृत्य त्यांनी केले. कायदा - सुव्यवस्थेचा आव आणणारे गृहमंत्री आर.आर.पाटील, हा वाघ अजून त्याच्या पायावर चालतोच कसा ? याचे उत्तर द्या. हर्षवर्धन जाधव सारखा याला का फोडत नाहीत ? या वाघाने केलेल्या कृत्याबद्दल त्याच्या पार्श्वभागाला हार लावून 12 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर सत्कार करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा विचार आहे का ?
वाळूमाफिया, दूधमाफिया, सहकारमाफिया,कारखानदारमाफिया,भेसळमाफिया,तेलमाफिया या सर्वांचे पोशिंदे असलेल्या या टग्यांच्या वारसदारांकडून राज्यात काहीही भ्रष्टाचारमुक्त राहिलेले नाही. आता तर त्यांनी इज्जतीवर हात घालायलाच सुरूवात केली आहे. 'टग्यांचा खरा वारसदार कोण ?' अशीच स्पर्धा राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात यापेक्षाही भयानक घटना घडू शकतील. देवा आता तूच वाचव रे बाबा. देवा तू तरी आहेस ना जागेवर ? का तूझीही या टग्यांनी भेसळ केली ?

Tuesday, February 22, 2011

गोध्राकांड : पूर्वनियोजित कट हेच सत्य


27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्सप्रेसच्या एस-6 कोचमध्ये जिवंत जाळलेल्या 59 कारसेवकांच्या आत्म्यांना हायसं वाटलं असेल. कारण न्यायालयानं गोध्रा जळीतकांड हा पूर्वनियोजित कटच असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालामुळं काँग्रेससारख्या जातीयवादी पण धर्मनिरपेक्षतेचा आव आणणा-या पक्षांचा आणि सेक्युलर म्हणवाणा-या एका वर्गाचंही चांगलंच थोबाड फुटलं आहे. कारण ज्या दिवशी या कारसेवकांना धर्मांध मुस्लिमांनी जाळलं त्या नंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्षतावादी
म्हणवणा-यांच्या प्रतिक्रिया आठवल्या तरी अंगावर शहारे येतात. मतांसाठी हिंदूत्ववाद्यांनीच आग लावली असा संतापजनक आरोप करण्यात आला होता. लालू प्रसाद यादव सारख्या मुर्ख रेल्वेमंत्र्यानं नेमलेल्य कमीशननंही तसाच अहवाल दिला होता. ही अशी धर्मनिरपेक्ष अवलाद जर देशात निपजलेली असेल तर हिंदूंचं काय भलं होणार ? आता न्यायालयाच्या निकालाची एक प्रत त्या मूर्ख लालूच्या थोबाडावर फेकून मारायला हवी. कारसेवकांनी मुलींची छेड काढल्यामुळं काही मुस्लिमांबरोबर त्यांचं भांडण झालं आणि त्याच पर्यवसन त्यांना जाळण्यात झालं अशीही एक घाणेरडी थेअरी मांडण्यात आली होती.

मात्र हे हत्याकांड गोध्रा शहरातल्या ज्या रेल्वे स्थानकाजवळ घडलं ती वस्ती संपूर्णपणे मुस्लिमांची आहे. त्या भागाला मिनी पाकिस्तान असंही म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं रेल्वेचा अख्खा कोच जाळण्यात आला त्यावरून तो कट किती तरी दिवस आधीच शिजला होता, हे स्पष्ट होतं. मात्र धर्मनिरपेक्षतावाद्यांची जीभ हे हत्याकांड मुस्लिमांनी घडवलं हे म्हणायला कचरत होती. आता न्यायालयाच्या निकालानं त्यांची जीभच हासडली गेली आहे.

गोध्राकांड ज्या दिवशी घडलं त्याच्या दुस-या दिवशी हिंसक प्रतिक्रिया उमटली. मात्र ही हिंसक प्रतिक्रिया मुस्लिमांच्या मोहल्ल्यात उमटली. अहमदाबादमध्ये मुस्लिमांनी दोन हिंदूंची हत्या केली. आणि मग त्या नंतर शांत असलेल्या हिंदूंनी रस्त्यावर उतरून 59 कारसेवकांच्या हत्येचा बदलाच घेतला. साबरमती एक्सप्रेसमध्ये जाळून मारण्यात आलेल्यांमध्ये 20 लहान मुलं होती. पंधरा महिला होत्या. मात्र धर्मांधांचे हात त्यांना जाळताना थरथरले नाहीत. या घटनेची प्रतिक्रिया मग रस्त्या - रस्त्यावर उमटली. अर्थात या ठिकाणी त्या प्रतिक्रियेचं समर्थन करण्याचा हेतू नाही. मात्र 'क्रिया' घडलीच नसती तर 'प्रतिक्रिया'ही उमटली नसती, हे ही लक्षात ठेवायलंच हवं. गोध्राकांडाला आता नऊ वर्ष होऊन गेली आहेत. मात्र या नऊ वर्षात गुजरातमध्ये कुठेही दंगल घडली नाही. कारण तिथं दंगलखोर जातीला चांगलाच धडा शिकवण्यात आला आहे. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा दराराच तिथं निर्माण झाला आहे. नाठाळाच्या माथी काठी हाणावीच लागते.
हिंदू हा मुळातच शांतताप्रिय आहे. या शांततेमुळंच हिंदू हे प्रतिक्रियावादी बनले आहेत. मोघल शासक बाबरनं राम मंदिर पाडून मशीद बांधली. याची प्रतिक्रिया ही बाबरी मशीद पाडण्यात झाली होती. मुस्लिमांनी 59 कारसेवकांना जाळलं, त्याची प्रतिक्रिया म्हणून दंगली पेटल्या. त्यामुळं या 'क्रियावादी' शक्तींना रोखण्याची गरज आहे. आणि क्रियाच झाली नाही तर प्रतिक्रियाही उमटणार नाहीत, हे ही तितकंच सत्य आहे.
या धर्मनिरपेक्षतावाद्यांनी कारसेवकांच्या जळीतकांडानंतर जशा थेअरी मांडल्या होत्या, तशीच थेअरी या ठिकाणी मांडू यात. समजा 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्सप्रेसमध्ये कारसेवकांना जाळण्याऐवजी हज यात्रेला जाणा-या मुस्लिमांना जाळण्यात आलं असतं तर ? काय प्रतिक्रिया उमटली असती. कारसेवकांच्या जळीतकांडाची प्रतिक्रिया फक्त गुजरातमध्येच उमटली होती. मात्र जर हज यात्रेकरूंना जाळलं असतं तर ? अहो देशभर तर सोडाच जगभरात प्रतिक्रिया उमटल्या असत्या. रस्त्या - रस्त्यावर धर्मांध मुस्लिम उतरले असते. त्यामुळं शांतताप्रिय हिंदूंना डिवचू नका, यातच सगळ्यांचं हित सामावलेलं आहे.
न्यायालयानं गोध्राकांड प्रकरणी 31 जणांना दोषी ठरवलं आहे. तर 64 जणांची पुराव्याअभावी सुटका केली आहे. आता या दोषींनी कठोर शिक्षा मिळायलाच हवी, तरच 59 कारसेवकांच्या आत्म्यांना मुक्ती मिळू शकेल.

Friday, February 18, 2011

आता सगळं - सगळं विसरा !

19 फेब्रुवारीपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. 2 एप्रिल रोजी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर फायनल मॅच होणार आहे. त्यामुळे या 43 दिवसांच्या अवधीत सगळेच प्रश्न मागे पडणार आहेत. प्रश्नच नव्हे तर सगळे घोटाळे, भ्रष्ट राजकारणी यांना आता संरक्षणच मिळणार आहे. कारण आता मीडियात चर्चा राहणार आहे ती फक्त वर्ल्ड कपचीच. आता खुद्द मीडियालाच आठवण राहणार नाही की, त्यांनी कोणकोणत्या प्रश्नांवर रान उठवलं होतं. मीडियामुळेच कॉमनवेल्थ घोटाळ्याचे आक्राळविक्राळ रूप जगासमोर आले होते. वाळुमाफिया, तेल माफिया यांच्यावर काही प्रमाणात अंकुश आला तो मीडियामुळेच.
मात्र आता, वर्ल्ड कपचे हे 43 दिवस म्हणजे या माफियांसाठी फॉलोऑनच म्हणायला हवा. कारण धर्माला अफूची गोळी म्हटलं जातं. आणि आपल्या देशात क्रिकेट हा धर्मच असल्यानं या अफूच्या गोळीचा तब्बल 43 दिवसांपर्यंत अंमल राहणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, घोटाळे, वाळुमाफिया, पेट्रोल माफिया, डिझेल माफिया, रॉकेल माफिया, दूध माफिया, शिक्षण माफिया, साखर माफिया, कांदा माफिया यांच्यावर कोणाचाही अंकुश राहणार नाही. या सर्व माफियांवर कायद्याने जरब बसवण्याची क्षमताच सरकारमध्ये राहिलेली नाही. मीडियामुळेच यांच्यावर थोडाफार अंकुश राहिलेला आहे. परिणामी मीडियाची जबाबदारी वाढलेली आहे. मीडियाने स्वत:वर या अफूच्या गोळीचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
कालच म्हणजेच 17 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयानं आदर्शप्रकरणी गहाळ झालेल्या फाईलचा तपास सीबीआयकडे सोपवला. कारण चोरच चोरीचा तपास लावणार नाहीत, हे न्यायालयाच्या लक्षात आलं आहे. कारण या राज्यात फाईलच नव्हे तर अख्खं सरकारच गहाळ झालेलं आहे. आता याचा तपास कोणाकडे द्यायचा ? राज्यात राज्यकर्ते नव्हे माफियांचे पोशिंदेच सरकार चालवत असल्याने माफियांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
सरकार काम करत नाही. मात्र गैरमार्गाने सगळी कामे होत आहेत. त्यामुळे राज्यात आणि देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. क्रिकेट वर्ल्ड कप हा मोठा इव्हेन्ट असला तरी मीडियानं या घोटाळ्यांवरून लक्ष विचलीत होऊ देता कामा नये. कारण राज्यात आणि देशात भ्रष्टाचारी नेते, अधिकारी हे देश विकण्यासाठी टपलेले आहेत. या बोक्यांना देश फक्त ओरबडून खायचा आहे. या बोक्यांची शिकार करायची असेल तर मीडियाला सजग रहावंच लागेल.

Friday, January 28, 2011

महाराष्ट्र नव्हे माफियाराष्ट्र !

या राज्यात चाललंय तरी काय ? सनदी अधिका-यांना दिवसा ढवळ्या डिझेल टाकून जाळलं जात आहे. पोलीस विरोधी पक्षाच्या आमदारांचा पार्श्वभाग बडवून बडवून लाल - निळा करत आहेत. मंत्रालयात भ्रष्टाचार करणा-या आरोग्य विभागातल्या कर्मचा-याच्या कानाखाली आमदार आवाज काढत आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटलांच्या जिल्ह्यात तलाठ्याच्या अंगावर वाळू माफिया ट्रॅक्टर घालत आहेत. आरटीआय कार्यकर्ते तर भ्रष्टाचा-यांच्या हिट लिस्टवर आले आहेत. पोलीस, अधिकारी, माफिया, नेते, मंत्री हे सगळेच भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. या सगळ्यांची एक संघटित साखळीच राज्याला पोखरून काढत आहे.
आता न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहेत त्या धाड टाकण्याच्या. खरंच कुणाचाही विश्वास बसत नसेल पण सरकार कामाला लागलं आहे. शुक्रवारी दोनशे ठिकाणी धाड टाकून 180 जणांना अटकही करण्यात आली. आणि विरोधी पक्ष आरोप करतात की, मंत्रालयात एका मंत्र्याला म्हणे 25 कोटी रूपये दिले. 25 कोटी रूपये वर्गणी गोळा करून देण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय.
याला म्हणतात 'आदर्श भ्रष्टाचार'. लाच घ्यायची पण कुणावरही त्याचा लोड यायला नको. म्हणून सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून 25 कोटी रूपये उभे केले, आणि मंत्रालयात पोहोचते केले. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की, इकडे-तिकडे फुटकळ छापे मारून सटरफटर लोकांना अटक करण्यापेक्षा मंत्रालयावरच छापा मारून या भ्रष्ट कारभाराच्या माफियांनाच का अटक करत नाहीत ?
आता जनतेनेच पुढाकार घ्यायला हवा. गावागावातल्या गुंडांना घाबरून राहण्यापेक्षा त्यांना हप्ता देण्यापेक्षा, पेट्रोल - डिझेलमधली भेसळ सहन करण्यापेक्षा एक वेगळा मार्ग काढता येऊ शकतो. भेसळ, भ्रष्टाचार याचा थेट पैसा हा मंत्री आणि मंत्रालयात पोचतो. मंत्री आणि सामान्य नागरिकांमध्ये कशाला हवेत (बडवे) गुंड. मंत्री म्हणजे आजचे देवच नाही का ? त्यामुळे कंसात गुंडांसाठी बडवे हा शब्द वापरला. थेट मंत्र्यांनाच का पैसे देऊ नये. त्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर प्रत्येक नागरिकाने दर महिन्याला पन्नास रूपये हप्ता द्यावा. त्यासाठी वेगळं 'खातं' निर्माण करावं. प्रत्येक गाव, तालूका आणि जिल्हा पातळीवर प्रत्येक नागरिकाकडून पन्नास रूपये हप्ता सक्तीने गोळा करावा. पैसा थेट मंत्र्यांना मिळेल. त्यामुळे त्यांना गुंडांची गरज भासणार नाही. परिणामी राज्यातली गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार संपायला मदत होईल.
राज्यात वाढलेली गुन्हेगारी, अवैध बांधकामे, नाक्या नाक्यावरील हप्तेखोरी, लवासा सारख्या नियम
मोडणा-या कंपनीची राष्ट्रवादीने घेतलेली ( सुपारी ) वकिली, आदर्शमध्ये उघड झालेली राजकारण्यांची नावे, खाजगी शिक्षण संस्थांनी सर्वसामान्यांची चालवलेली लूट, लाच दिल्याशिवाय होत नसलेली कामे, हे सर्व पाहता इथे कायद्याचे राज्य आहे, असं कुणीही म्हणू शकत नाही.
गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी डान्स बार बंदी संदर्भात अशी घोषणा केली होती की, ज्या पोलीस उपायुक्तांच्या हद्दीत डान्स बार सुरू राहतील त्या पोलीस उपायुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. पण आज मुंबईत काय चित्र आहे ? डान्स बार सुरूच आहेत. कुणावरही निलंबन झाले नाही. आता पर्यंत किती पोलीस अधिका-यांचे निलंबन झाले ? याची आकडेवारी कधीच जाहीर झाली नाही. मात्र मधल्या मधे हप्ते वाढवून घेतले गेले. आजही मुंबई आणि परिसरात डान्स बारची छमछम पोलिसांच्याच आशिर्वादानं सुरू आहे. याची गृहमंत्र्यांना माहिती नसेल का ?
हे धाड आणि छापा मारण्याचे नाटक काही दिवस सुरू राहील. त्यानंतर पुन्हा ऐ रे माझ्या मागल्या. जो पर्यंत दुसरा सोनवणे जाळला जात नाही, तो पर्यंत धाडी टाकल्या जाणार नाहीत. कारण या राज्यातल्या मंत्र्यांची किंवा सरकारची भ्रष्टाचार संपवण्याची मानसिकताच नाही. कारण या मंत्र्यांची मानसिकता ही माफियाची झालेली आहे. त्यांना सामान्य नागरिकांविषयी कोणतीही चाड राहिलेली नाही. मिळेल तसा पैसा त्यांना ओरबडून काढायचा आहे.