Friday, February 18, 2011

आता सगळं - सगळं विसरा !

19 फेब्रुवारीपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. 2 एप्रिल रोजी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर फायनल मॅच होणार आहे. त्यामुळे या 43 दिवसांच्या अवधीत सगळेच प्रश्न मागे पडणार आहेत. प्रश्नच नव्हे तर सगळे घोटाळे, भ्रष्ट राजकारणी यांना आता संरक्षणच मिळणार आहे. कारण आता मीडियात चर्चा राहणार आहे ती फक्त वर्ल्ड कपचीच. आता खुद्द मीडियालाच आठवण राहणार नाही की, त्यांनी कोणकोणत्या प्रश्नांवर रान उठवलं होतं. मीडियामुळेच कॉमनवेल्थ घोटाळ्याचे आक्राळविक्राळ रूप जगासमोर आले होते. वाळुमाफिया, तेल माफिया यांच्यावर काही प्रमाणात अंकुश आला तो मीडियामुळेच.
मात्र आता, वर्ल्ड कपचे हे 43 दिवस म्हणजे या माफियांसाठी फॉलोऑनच म्हणायला हवा. कारण धर्माला अफूची गोळी म्हटलं जातं. आणि आपल्या देशात क्रिकेट हा धर्मच असल्यानं या अफूच्या गोळीचा तब्बल 43 दिवसांपर्यंत अंमल राहणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, घोटाळे, वाळुमाफिया, पेट्रोल माफिया, डिझेल माफिया, रॉकेल माफिया, दूध माफिया, शिक्षण माफिया, साखर माफिया, कांदा माफिया यांच्यावर कोणाचाही अंकुश राहणार नाही. या सर्व माफियांवर कायद्याने जरब बसवण्याची क्षमताच सरकारमध्ये राहिलेली नाही. मीडियामुळेच यांच्यावर थोडाफार अंकुश राहिलेला आहे. परिणामी मीडियाची जबाबदारी वाढलेली आहे. मीडियाने स्वत:वर या अफूच्या गोळीचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
कालच म्हणजेच 17 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयानं आदर्शप्रकरणी गहाळ झालेल्या फाईलचा तपास सीबीआयकडे सोपवला. कारण चोरच चोरीचा तपास लावणार नाहीत, हे न्यायालयाच्या लक्षात आलं आहे. कारण या राज्यात फाईलच नव्हे तर अख्खं सरकारच गहाळ झालेलं आहे. आता याचा तपास कोणाकडे द्यायचा ? राज्यात राज्यकर्ते नव्हे माफियांचे पोशिंदेच सरकार चालवत असल्याने माफियांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
सरकार काम करत नाही. मात्र गैरमार्गाने सगळी कामे होत आहेत. त्यामुळे राज्यात आणि देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. क्रिकेट वर्ल्ड कप हा मोठा इव्हेन्ट असला तरी मीडियानं या घोटाळ्यांवरून लक्ष विचलीत होऊ देता कामा नये. कारण राज्यात आणि देशात भ्रष्टाचारी नेते, अधिकारी हे देश विकण्यासाठी टपलेले आहेत. या बोक्यांना देश फक्त ओरबडून खायचा आहे. या बोक्यांची शिकार करायची असेल तर मीडियाला सजग रहावंच लागेल.

2 comments:

  1. खर आहे, क्रीकेटमुळे महागाईचे चटकेही जाणवणार नाहीत.या सगळ्या अफूच्या धुंदीत शरद पवारही हरवले आहेत. लोकशाहीचे चारही स्तंभ सध्या जब्बब्दारी विसरून याच अफूची गोळी चाघालातायेत हे विशेष....good one keep it up dear

    ReplyDelete
  2. धन्यवाद योगी. क्रिकेटची ही अफूची गोळी मीडियाने किती चघळायची याचा विचार करावाच लागेल. कारण आपल्या देशासमोर अनेक प्रश्न आहेत. आता त्यातच 'देशातील समस्यांवर पॅनलिस्ट फक्त चर्चा करतात आणि संध्याकाळी ग्लास रिते करतात' असं विधान विलासराव देशमुखांनी केले आहे. पुढिल ब्लॉगमध्ये मीडियावर अशी विधाने करण्याची हिंमत राजकारण्यांमध्ये का होते ? याचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला जाईल

    ReplyDelete