Monday, October 12, 2015

'शाई'चे राजकीय रंग

शिवसेनेनं सुधींद्र कुलकर्णींवर शाई टाकून जोरदार सुरूवात केली. दणादण ब्रेकिंग न्यूज, त्यावरील प्रतिक्रिया, फोनो, लाईव्ह सुरू झाले. आता खुर्शीद कसुरींचं पुस्तक काही प्रकाशित होत नाही, असं वाटायला लागलं. धावती मुंबई थांबते की काय, असं वाटलं. मात्र दिवस जसजसा माथ्यावर येऊ लागला तसतशी परिस्थिती बदलत गेली. शिवसेना विरोध कायम असल्याचं सांगत होती. मात्र दिवस मावळताना खुर्शीद कसुरींचं पुस्तक प्रकाशित झालं. त्या कार्यक्रमात सुधींद्र कुलकर्णींनी, शिवसेनेला खडे बोलही सुनावले. मुंबई महाराष्ट्रीय आहे. तसंच मुंबई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असल्याचहीं सांगितलं. गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे भाजपनंही वचपा काढत, मुंबईत दणक्यात कार्यक्रम होऊ दिला. शिवसेनेनं कसुरींच्या कार्यक्रमाला केलेला विरोध ही आंतरराष्ट्रीय बातमी ठरली. मात्र त्याला स्थानिक राजकारणाचे पदर आहेत, हे त्यामागील सत्य आहे.
आता हे ही खरं आहे की, सीमेवर जवान शहीद होतात. पाकिस्तानातून दहशतवादी भारतात येतात. तेच दहशतवादी देशात बॉम्बस्फोट घडवतात. त्यात भारतीय नागरिक ठार होतात. दहशतवाद्यांना पाकिस्तानात आसरा मिळतो. काश्मीरमधल्या फुटिरतावाद्यांना पाकिस्तान प्रोत्साहन देतो. दर शुक्रवारी श्रीनगरमध्ये नमाजनंतर भारताचा झेंडा जाळला जातो. पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकावले जातात. जवानांवर दगडफेक केली जाते. हे सगळं खरं असलं तरीही पाकिस्तान सोबतचे संबंध सुधारणं गरजेचं आहे. दोन्ही देशांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे. पाकिस्तानचे नागरिक, कलाकार भारतात येणंही गरजेचं आहे.
आता शिवसेनेनंही थोडा विचार करावा. अर्थात शिवसेनेची पाकिस्तानच्या विरोधातली भूमिका काही नवी नाही. मात्र त्यात सातत्य दिसत नाही. कित्येक पाकिस्तानी कलाकार या मुंबईत येतात. चित्रपट, सिरीअल, लाफ्टर शोमध्ये सहभागी होतात. अदनान सामीला तर त्याचा देश पाकिस्तान आहे, हे सुद्धा आठवतं का ? अशी शंका येते. कित्येक पाकिस्तानी क्रिकेटर्स मुंबईत येत असतात. विरोध करायचाच असेल तर तो सगळ्यांनाच करा, नसता कोणालाच करू नका.

खमंग फोडणी - भारत आणि पाकिस्तानमध्ये एवढी कटुता असली तरी पाकिस्तानी नागरिकांचा ओढा भारताकडेच आहे. अगदी त्यांच्या दहशतवाद्यांचाही. आपले चित्रपट, सिरीअल त्यांना खुणावत असतात. दहशतवादात जगत असलेल्या पाकिस्तानला त्यामुळे लोकशाहीप्रधान भारत आवडत असावा. नाही तरी किती काही झालं तरी, शेवटी बाप हा बापच असतो. त्यामुळे कार्ट कितीही वाया गेलेलं असलं तरी शेवटी बापाकडेच येतं, हे पाकिस्तानकडे पाहून लक्षात येतं.

Sunday, October 4, 2015

निवडणुकीच्या 'प्रचाराचं खाद्य' (अचूक मारा - 3)

निवडणुकीच्या 'प्रचाराचं खाद्य'

एका वेळच्या जेवणाला माणसाला लागतं तरी किती ? अर्थात कोणी किती खावं ? काय खावं ? काय खाऊ नये ? याचा हिशेब करण्याचा या लिखाणाचा हेतू नाही. मात्र काही दिवसांपूर्वी पर्युषण पर्वात मांसाहार बंदीवरून चांगलंच वातावरण तापलं होतं. त्यावेळी भाजपचे नेते मांसाहार बंदीसाठी पेटून उठले होते. त्या आधी दुष्काळ दौ-यावर गेलेल्या शरद पवारांचा एक फोटोही तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. दुष्काळ दौ-यात सुका मेवा आणि शरद पवार दिसत होते. त्यावरूनही चांगलाच धुराळा उडाला होता. मात्र त्यावेळी हे सभ्यतेला धरून आहे का ? असा सवाल विचारला गेला नव्हता. अर्थात राजकीय नेत्यांनीही परिस्थितीचं भान राखलंच पाहिजे. कारण आता फक्त माध्यमं दाखवतील तीच बातमी राहिलेली नाही. सोशल मीडिया हा सर्वसामान्यांच्या हाती आलेला आहे. त्यामुळे नेतेच काय, तर सगळ्यांनीच सारासार विवेक बुद्धीप्रमाणे वागण्याची गरज आहे.

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातातली प्लेट आणि समोरच्या टेबलवर खच्चून ठेवलेले विविध खाद्यपदार्थांचा, हा फोटो चांगलाच गाजतोय. सोशल मीडियासाठी हा फोटो खाद्य ठरला नसता तरच नवल. हातात प्लेट धरून बसलेले सीएम, टेबलवरून काकडी उचलत असलेले रावसाहेब दानवे, भरपेट खाल्ल्यानंतर तोंड पुसणारे विनोद तावडे ही मंडळी फोटोत दिसत आहेत. तर टेबलवर मिठाई, सुका मेवा, फळं आणि सलाड मांडून ठेवलेलं आहे. या पदार्थांची संख्या जवळपास 20 हून अधिक आहे. या नेत्यांनी या खाद्याचा समाचार घेतला. तर सोशल मीडियावर या नेत्यांचा समाचार घेणं सुरू आहे. फेसबुक आणि व्हॉट्स अपवर हा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, हे मात्र नक्की सांगता येत नाही. पण कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्यामुळे टायमिंग साधण्यात वाकबगार असलेल्या शिवसेनेनं तर हा फोटो व्हायरल केला नसेल ? असा सवालही आता उपस्थित होत आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त शेतक-यांची विचारपूस करत आहेत आणि सीएमचा हा फोटो, असे एकत्रित फोटोही चांगलेच व्हायरल झालेत. वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारणारे भाजप नेते, आणि शेतक-यांची विचारपूस करणारे उद्धव ठाकरे, हे दोन्ही फोटो बरंच काही सांगून जातात. आता तर कुठे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संग्रामाला सुरूवात झालीय. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी सोशल मीडियावरही ही लढाई अजून जोरकसपणे लढली जाईल, यात शंका नाही.
11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. त्या आधी भाजपची मुंबई आणि परिसरात भीमरथ यात्रा निघणार आहे. भूमिपूजनाची माहिती या निमित्ताने दिली जाणार आहे. टायमिंग साधण्यात भाजपवालेही काही कमी नाहीत. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम मागच्या महिन्यात होणार होता. पण तेव्हा कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे तर भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला नसेल ? अशी शंका येते. आता निवडणुकीची घोषणाही झालेली आहे. 11 ऑक्टोबरला भूमिपूजनही होईल आणि मतांची पायाभरणीही होईल.

Monday, September 28, 2015

विविधतेत एकता (अचूक मारा - 2 )

'अचूक मारा' या साप्ताहिक सदराच्या पहिल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर जाण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार पंतप्रधान अमेरिकेच्या
दौ-यावर आहेत. अर्थात तिथे त्यांची जोरदार भाषणबाजीही सुरू आहे. मोदी रविवारी फेसबुकच्या मुख्यालयात गेले. त्यांनी सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. लहान असताना आई उपजीविकेसाठी भांडी घासायची, असं मोदींनी सांगितलं. पण ते जाऊ द्या. कारण मोदींची भाषणं आता भारतात नव्हे विदेशातच जास्त ऐकली जातात.

नरेंद्र मोदी अमेरिकेत असतानाच इकडे गणेश भक्तांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. वाजतगाजत, डीजेच्या कल्लोळात बेधुंद होत गणरायाला भावुक होऊन कसा निरोप देतात ? हे त्या भक्तांनाच माहित. गणेश विसर्जनाच्या आधी बकरी ईद होऊन गेली. त्यावेळी अनेक ठिकाणी नेहमी प्रमाणे रस्त्यावर नमाज अदा केली गेली. आपल्या देशात विविधतेत एकता आहे, असं जे म्हटलं जातं त्याची प्रचिती आली.
बघा तुमची गणेशोत्सवाची मिरवणूक रस्त्यावर तर आमची नमाजही रस्त्यावरच. तुम्ही सामान्यांना त्रास देता, आम्हीही देतो. दुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत नाही, आम्ही पण बुरसटलेले. तुम्ही 5 हजार वर्षांपूर्वीच्या प्रथा पाळता, आम्ही पण अरबस्थानातल्या जुनाट प्रथांचं अंधपणे पालन करतो. खरंच विविधतेत एकता म्हणतात ती यालाच. हे विश्व चालवणारी शक्ती खरंच अस्तित्वात असेल तर, यांना अक्कल देण्यासाठी पुन्हा अवतार घे. नको, नको अवतार नको. पुन्हा तुझे नवे भक्त निर्माण व्हायचे. त्यांचा नवा धर्म व्हायचा. इथं आधीच्याच धर्मांनी काय कमी उच्छाद मांडलाय, त्यात पुन्हा नवा धर्म हवाच कशाला. जाऊ द्या, चाललंय ते चालू द्या....एन्जॉय...बाकी काय म्हणता ?

Tuesday, September 22, 2015

काय, चाललंय काय ?

(मित्रांनो, मागील काही दिवसांपासून ब्लगॉवरील नियमीत लिखाणात खंड पडला आहे. मात्र आता दर सप्ताहाला ब्लॉगवरून नियमीतपणे  'अचूक मारा' केला जाणार आहे. त्यात आठवड्यातील (मला वाटलेल्या) महत्वाच्या घटनांवर घणाघात केला जाणार आहे. 'अचूक मारा' हे साप्ताहिक सदर फेसबुकवरही टाकलं जाईल. )

काय, चाललंय काय ? असाच प्रश्न आता सगळ्यांना पडलाय. देशात 'अच्छे दिन' येऊन आता कुठे सव्वा वर्ष झालंय. (सव्वा रुपया दक्षिणा काढा, अशी कोटी मी करणार नाही. कारण सव्वा रुपयासाठीचे 25 पैसे चलनातून बाद झाले आहेत.) पंतप्रधान यथा शक्ती विदेशात जाऊन देशाची गरिमा वाढवत आहेत. पंतप्रधान पुन्हा विदेशात जात आहेत. 23 सप्टेंबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर रवाना होत आहेत. आपल्या देशात कितीतरी म्हणजे, अब्जावधींची गुंतवणूक दुसरे देश करत आहेत. अर्थात अजून मूर्त स्वरूपात ही गुंतवणूक दिसलेली नाही. पण दिसेल, लगेच धीर सोडून चालणार नाही. काश्मीरमध्ये दर शुक्रवारी नमाजनंतर पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकत आहेत. लगेच सव्वा वर्षात फुटिरतावादी राष्ट्रीय विचारधारेत येतील, असं म्हणनं ही चुकीचंच म्हणावं लागेल. पण हीच गोष्ट दोन वर्षांपूर्वी घडली असती तर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर कोणत्या शब्दात टीका झाली असती ? याचा तुम्हीच विचार करा.
आता सामान्य माणसाच्या हातात फक्त विचार करण्याशिवाय राहिलंय तरी काय म्हणा. जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर, त्यांनी सर्वात आधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना हटवण्याची मागणी केली असती. राजनाथसिंहांच्या जागी रामदास कदम यांनाच केंद्रीय गृहमंत्री केलं असतं. नाही तरी रामदास कदम यांना राज्यातलं गृहमंत्री हवंच आहे. त्यांना थेट प्रमोशन मिळालं असतं. शिवसेनाप्रमुखांनीही रामदास कदमांना काश्मीरमधल्या राष्ट्रद्रोह्यांना यमसदनी पाठवण्याचा आदेश दिला असता. कदमांनीही सैन्याला आदेश देऊन, राष्ट्रद्रोह्यांच्या योग्य ठिकाणी गोळ्या घातल्या असत्या. असो.
तरी बरं झालं पाऊस पडला. नाही तर राज्य सरकार हे दुष्काळातच वाहून गेलं होतं. दुष्काळग्रस्त भागात दुष्काळाची दाहकता दिसत होती. पण सरकारचं अस्तित्व दिसत नव्हतं. मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्यानं सरकारच्या नाकर्तेपणावर पाणी पडलं.
पावसाचं प्रमाण कमी असलं तरी सनातन्यांचं पीकही राज्यात चांगलंच फोफावलंय. विचारांचा प्रतिवाद करण्याऐवजी आता थेट गोळ्या घालण्याचीच आधूनिक पद्धती सनातन्यांनी विकसीत केली आहे. एक मात्र भारी आहे, सनातन्यांना धर्म पुरातन हवा आहे. मात्र माणसं मारण्यासाठी हत्यारं आधुनिक वापरली जातात. पाहा हा विरोधाभास.

Wednesday, July 15, 2015

आमदारांची नाटक कंपनी ते भजनी मंडळ

महाराष्ट्राने रंगभूमीला अनेक गुणी कलाकार दिले आहेत. रंगभूमीवर त्यांनी अजरामर भूमिकाही केल्या आहेत. मात्र या सर्व कलाकार आणि नटांना तोडीसतोड असे नवे नट उदयाला आले आहेत. राज्यात सध्या पाऊस नाही. मात्र पावसाळी अधिवेशनात या नटांचा पाऊस पडत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून नेते कम नटांनी त्यांचे अभिनयाचे गुण उधळायला सुरूवात केली आहे. शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी विरोधी पक्षातील आमदार झपाटून कामाला (नाटकाला) लागले आहेत. पंधरा वर्ष सत्तेत असताना शेतक-यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा, त्याला स्वस्तात वीज मिळावी, बाजार समितीत होणारी पिळवणूक थांबवावी, व्यापा-यांकडून होणारी लूट थांबावावी या साठी तेव्हा ही मंडळी काय करत होती ? हा प्रश्नच आहे. अर्थात जे काम त्यांना जमलं नाही, ते काम नव्या सरकारनं करावं यासाठी विरोधकांनी आंदोलन करण्यातही काही चूक नाही. पण हे आंदोलन तरी कसं म्हणावं ? कारण त्यात आंदोलन कमी आणि नौटंकीच जास्त दिसत आहे.
गळ्यात घातलेल्या चिक्कीच्या माळा, आमदार कम कलाकारांचा हा उच्छाद पाहून, लोकशाहीच्या
पुजा-यांची नौटंकीच सुरू आहे, असंच म्हणावं लागेल. मात्र नेत्यांच्या अदाकारीलाही दाद द्यावीच लागेल. तोंडावर काळं फडकं बांधलेल्या शशिकांत शिंदेंना जितेंद्र आव्हाड चिक्की भरवत होते. ऐ चिकी बोलो चिकी, असा जोरदार डायलॉग आव्हाडांनी लगावला. त्यानंतर एका सहकलाकाराची चिक्की आव्हाडांनी हिसकावून घेतली. ती चिक्की त्यांनी अमिन पटेल यांना विकली. नंतर चिक्की आणि पैसेही हिसकावून घेतले. त्या नंतर त्यांनी जो फिल्मी डायलॉग मारला त्याला तोड नाही. 'हम फेके हुये पैसे नहीं उठाते', आईशप्पथ अमिताभ बच्चन मुंब्र्यात पाणी भरेल असा डायलॉग आव्हाडांनी फेकला.
नौटंकीबाजीनंतर विरोधक उतरले ते भजनावर. कर्जमाफीसाठी सर्व आमदार टाळ कुटत भजन करत होते. सत्ताविरह रसात न्हाऊन निघालेले आमदार भजन करत होते. या भजनी मंडळींनी सत्तेत असताना, शेतक-यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं असतं, तर शेतकरी यांना डोक्यावर घेऊन नाचले असते. मात्र असं झालं नाही. त्यामुळे विरोधी पक्षातल्या आमदारांनी नौटंकी आणि भजनं थांबवावीत. शेतक-यांना मदत मिळावी यासाठी सरकारला धारेवर धरावं. पिकमालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केले तर राज्यातली जनताही विरोधकांची वाहवाच करो

Sunday, May 24, 2015

राजकारणातून करूया पर्यावरणाचे रक्षण !

दिवसेंदिवस तापमानात होत चाललेली वाढ जगासमोर मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. आपल्या देशाचा विचार केला तरी यंदाच्या उन्हाळ्यात अनेक शहरांमध्ये पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. वाढतं शहरीकरण आणि कमी होत जाणारं वन क्षेत्र यामुळे वातावरणातली उष्णता वाढत चालली आहे. शहरीकरण, औद्योगिकीकरण ही गरज आहे. मात्र ही गरज भागवताना पर्यावरणाचं होणारं नुकसान भरून काढावंच लागेल.
त्यासाठी देशात मोठ्या संख्येनं वृक्ष लावण्याची गरज आहे. सरकारच्या पातळीवर ही मोहिम हाती घेतली तरी त्याला काही मर्यादा आहेत. मात्र ही मोहिम सर्वच राजकीय पक्षांनी एखादी चळवळ म्हणून हाती घेतली तर, त्याचे नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील. भाजप हा जगातला सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष बनला आहे. देशात भाजपचे दहा कोटी सदस्य आहेत. भाजपने त्यांच्या त्या दहा कोटी सदस्यांना प्रत्येकी एक वृक्ष लावून, त्यांचं संवर्धन करण्याचा आदेश द्यायला हवा. त्यामुळे एका दिवसात दहा कोटी वृक्ष लावली जाऊ शकतात. काँग्रेसचेही प्रत्येक राज्यात आणि गावागावात कार्यकर्ते आहेत. काँग्रेसनंही त्यांच्या सक्रिय कार्यकर्त्यांना वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करण्याचा आदेश दिल्यास, देशभरात कोट्यवधी वृक्ष उभे राहू शकतात. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पुढील दोन महिन्यात या दोन राष्ट्रीय पक्षांनी देशभरात ही मोहिम हाती घेतली तरी त्याचा मोठा फायदा होणार आहे. भाजप आणि काँग्रेससह सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी वृक्षारोपणाची मोहिम राबवली तर देशात मोठी पर्यावरण क्रांती होईल यात शंकाच नाही.
अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष बलवान आहेत. तिथेही हा प्रयोग नक्कीच यशस्वीपणे करता येऊ शकतो. महाराष्ट्राचा विचार केल्यास शिवसेनेचं कार्यकर्त्यांचं जाळं शहर आणि गावांमध्ये आहे. या सैनिकांना त्यांच्या पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास पर्यावरणासाठीची लढाईही त्यांना लढता येऊ शकेल. आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष हे सर्वच राजकीय पक्ष यात पुढाकार घेऊ शकतात.
राजकारणात अशी स्पर्धा केली तर सामान्य नागरिकही सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचं स्वागतच करतील. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शहरी भागातल्या राजकीय कार्यकर्त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रयोग करावेत. ज्यामुळे भूगर्भातीला पाण्याची पातळी वाढू शकेल. ग्रामीण भागातही राजकीय कार्यकर्त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी अडवा पाणी जिरवा सारखे प्रयोग करून शेतकरी सुखी करता येऊ शकेल.

Monday, April 13, 2015

महामानवाला अभिवादन !

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी केलेल्या कार्यापासून जगानं प्रेरणा घेतली. शतकानुशतnके अन्याय सहन करणा-या दलितांना त्यांनी खरं स्वातंत्र्य दिलं. देशातल्या परिवर्तनाच्या चक्राला ख-या अर्थानं गती दिली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच.
सामाजिक विषमता, विषमताजनक सामाजिक व्यवस्था आणि अन्यायाविरूद्ध अविरत संघर्ष यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या तमाम दलितांची शतकानुशतकाच्या जोखडातून मुक्तता केली. देशातल्या सर्व नागरिकांना समान दर्जा मिळाला. समता हाच राज्यघटनेचा आत्मा आहे. आणि यामुळेच जगात भारताची राज्यघटना श्रेष्ठ मानली जाते.
घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळेच आपला देश एकसंघ राहण्यास मदत झाली. वेगवेगळे धर्म, जाती, संस्कृती, परंपरा या सर्वांना राज्यघटनेच्या चौकटीत स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा खरा अर्थ देशवासियांना कळाला तो राज्यघटनेमुळेच.
स्वतंत्र भारताला राज्यघटना मिळाली. मात्र इथल्या समाजात जातियवादी मनोवृत्ती कायमच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्याची चांगलीच माहिती होती. धर्मांतर करण्याच्या आधीपासूनच त्यांनी हिंदू धर्मातल्या जातियवादावर टीका करून मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला.
'दलित वर्गाच्या हाती राजकीय सत्ता गेली की, चातुर्वर्ण्यजन्य विषमता धुळीस मिळालीच असे समजावे. आजवर ती टिकली आहे याचे कारण राज्यसत्तेचा तिच्यावर कधीच मारा झाला नाही हे होय', या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्यातून त्यांनी सांगितलेल्या राज्यकर्ती जमात व्हा, हा संदेश किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं.
दलितांना नवी ओळख हवी असेल तर त्यासाठी हिंदू धर्माचा त्याग केल्याशिवाय पर्याय नाही, याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाणिव होती. त्यामुळे धर्मांतराची  घोषणा केल्यानंतर त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला. या अभ्यासातून बौद्ध धम्मासारखा समानतेचा अंगीकार करणारा दुसरा कोणताही धर्म नाही याची त्यांना जाणिव झाली. आणि अखेर १४ ऑक्टोबर १९५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ही घटना देशाच्याच नव्हे तर जगाच्याही इतिहासात नोंद करणारी ठरली. या महामानवाला अभिवादन.