Sunday, May 24, 2015

राजकारणातून करूया पर्यावरणाचे रक्षण !

दिवसेंदिवस तापमानात होत चाललेली वाढ जगासमोर मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. आपल्या देशाचा विचार केला तरी यंदाच्या उन्हाळ्यात अनेक शहरांमध्ये पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. वाढतं शहरीकरण आणि कमी होत जाणारं वन क्षेत्र यामुळे वातावरणातली उष्णता वाढत चालली आहे. शहरीकरण, औद्योगिकीकरण ही गरज आहे. मात्र ही गरज भागवताना पर्यावरणाचं होणारं नुकसान भरून काढावंच लागेल.
त्यासाठी देशात मोठ्या संख्येनं वृक्ष लावण्याची गरज आहे. सरकारच्या पातळीवर ही मोहिम हाती घेतली तरी त्याला काही मर्यादा आहेत. मात्र ही मोहिम सर्वच राजकीय पक्षांनी एखादी चळवळ म्हणून हाती घेतली तर, त्याचे नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील. भाजप हा जगातला सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष बनला आहे. देशात भाजपचे दहा कोटी सदस्य आहेत. भाजपने त्यांच्या त्या दहा कोटी सदस्यांना प्रत्येकी एक वृक्ष लावून, त्यांचं संवर्धन करण्याचा आदेश द्यायला हवा. त्यामुळे एका दिवसात दहा कोटी वृक्ष लावली जाऊ शकतात. काँग्रेसचेही प्रत्येक राज्यात आणि गावागावात कार्यकर्ते आहेत. काँग्रेसनंही त्यांच्या सक्रिय कार्यकर्त्यांना वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करण्याचा आदेश दिल्यास, देशभरात कोट्यवधी वृक्ष उभे राहू शकतात. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पुढील दोन महिन्यात या दोन राष्ट्रीय पक्षांनी देशभरात ही मोहिम हाती घेतली तरी त्याचा मोठा फायदा होणार आहे. भाजप आणि काँग्रेससह सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी वृक्षारोपणाची मोहिम राबवली तर देशात मोठी पर्यावरण क्रांती होईल यात शंकाच नाही.
अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष बलवान आहेत. तिथेही हा प्रयोग नक्कीच यशस्वीपणे करता येऊ शकतो. महाराष्ट्राचा विचार केल्यास शिवसेनेचं कार्यकर्त्यांचं जाळं शहर आणि गावांमध्ये आहे. या सैनिकांना त्यांच्या पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास पर्यावरणासाठीची लढाईही त्यांना लढता येऊ शकेल. आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष हे सर्वच राजकीय पक्ष यात पुढाकार घेऊ शकतात.
राजकारणात अशी स्पर्धा केली तर सामान्य नागरिकही सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचं स्वागतच करतील. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शहरी भागातल्या राजकीय कार्यकर्त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रयोग करावेत. ज्यामुळे भूगर्भातीला पाण्याची पातळी वाढू शकेल. ग्रामीण भागातही राजकीय कार्यकर्त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी अडवा पाणी जिरवा सारखे प्रयोग करून शेतकरी सुखी करता येऊ शकेल.

No comments:

Post a Comment