Wednesday, March 6, 2013

अलविदा, ई टीव्ही मराठी न्यूज !

अखेर मागील वर्षी ऐन दिवाळीत ई टीव्ही मराठीच्या बातम्या बंद झाल्या.  11 नोव्हेंबर 2012 या दिवशी सकाळी 7 ते 7-30 या वेळेत प्रसारित झालेलं महाराष्ट्र माझा हे शेवटचं बुलेटिन ठरलं. इलक्ट्रॉनिक मीडियाला रेडीमेड बुलेटिन प्रोड्युसर, अँकर, पॅनल प्रोड्युसर पुरवणारी (प्रयोग) शाळा बंद पडली. मात्र याची दखल हवी तशी घेतली गेली नाही. ई टीव्हीवर हा ब्लॉग लिहायलाही उशीरच झाला. त्यावरूनही लक्षात येतं की, हवी तशी दखल घेतली गेली नाही. आजच्या सगळ्याच 24 तास वाहिन्यांमध्ये जबाबदारीच्या पदांवर काम करणारे सगळेच सहकारी रामोजी फिल्म सिटीतल्या न्यूजरूममध्ये घडले. ई टीव्ही हा एक संस्कार होता. तिथं जे होतं, ते आता पहायलाही मिळणार नाही. तिथं काय होतं ? हे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न. 
ज्या ई टीव्हीचे प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रिंजर, ब्युरोला रिपोर्टर होते ते सर्व आता इतिहास झालं आहे. ई टीव्हीच्या रिपोर्टरचा काय रूबाब होता ? हे पत्रकारांना माहित आहे. कारण ब्युरोच्या ठिकाणी असणारं 2 MB सेंटर हे ई टीव्हीचं शक्तीस्थळ होतं. त्यामुळे गावागावातल्या बातम्या ई टीव्हीला लागायच्या. परिणामी शहरी आणि ग्रामीण भागात ई टीव्हीच्या बातम्यांचा प्रेक्षक वर्ग निर्माण झाला होता. मात्र आता हा इतिहास झाला आहे. 
ई टीव्ही बंद पडल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.  डिग्री मिळवून थेट चॅनेलमध्ये येणारी मंडळी तयार करण्याचं काम आता न्यूज चॅनेलमध्ये करावं लागत आहे. हा भार आधी ई टीव्हीने सांभाळला होता. तिथं स्क्रिप्ट परफेक्ट व्हायचं. व्हिज्युअलचंही ज्ञान दिलं जायचं.
आजकाल बातमीला मोठं 'मुल्य' प्राप्त झालं आहे. पेडन्यूज, कॉर्पोरेट रिक्वेस्ट, पीआर या माध्यमातून बातम्या दिल्या जात आहेत. बातमी दाखवण्याचे पैसे मिळत आहेत. हल्ली तर काही बातम्या न दाखवण्याचे आणि बातम्या दाबण्याचे वेगळे पैसे मिळतात म्हणे. बाईट, पॅकेज, सीडी, एव्ही अशा विविध माध्यमातून कमाई होत असताना ई टीव्हीनं न्यूज बंद केल्या हे आश्चर्यच नाही का ? आताही एक चॅनेल येत आहे. काही पाईपमध्ये आहेत. समोर निवडणुका आहेत. तरीही ई टीव्हीच्या बातम्या बंद झाल्याच. 

आता तुम्ही म्हणाल नवीन चॅनेल येत आहे, अनेक जण पटापट उड्या मारत आहेत. काही जण तर एक दिवस काम करून ऑफर लेटर दाखवून दुसरीकडे पगार वाढवून घेत आहेत. काल रात्री ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये एकत्र जेवायला असलेला सहकारी दुस-या दिवशी संध्याकाळी चहा घ्यायलाही बरोबर नसतो. एका दिवसात अशी पळापळ सुरू आहे.  म्हणजे सहकारी जेवत असतानाही त्यांच्या पोटातलं ओठावर येऊ देत नाहीत. अशी स्थिती आहे. 30%, 40% अशी हाईक मिळत आहे. या चॅनेलमधून त्या चॅनेलमध्ये पटापट उड्या मारणं सुरू आहे. राज्यात दुष्काळ पडला आहे. तर इलेक्ट्रॉनिक मीडियात ओला दुष्काळ पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऐवढी सगळी धमाल सुरू असताना हे काय, गु-हाळ हाती घेतलं असं कुणीही म्हणू शकेल. मात्र या गु-हाळाशिवाय पर्याय नाही, हे पुढे वाचत असताना तुमच्या लक्षात येईल. 

ई टीव्हीच्या हैदराबादमधील न्यूजरूममध्ये काम करत असताना खरं स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. हेडलाईन्स पासून तर बुलेटिन पर्यंतचे सर्व अधिकार हे बुलेटिन प्रोड्युसरचे असायचे. कुणाचा फोन आला म्हणून ही बातमी काढा, हेडलाईन बदला असे बाजारबसवे उद्योग तिथं व्हायचे नाही. ही बातमी मार्केटिंगकडून आली आहे, त्यामुळे आवर्जून घ्या असा आदेशही नसायचा. निवडणुकीच्या काळात रनडाऊनमध्ये पेडन्यूज ई टीव्हीमध्ये लावलेल्या नसायच्या.  त्यामुळे ह्या बातम्या घ्या  बरं का, हेडलाईन गेल्या नाही तरी चालतील, पगार वाढवून हवा आहे ना ? अशा भाषेत आर्जव आणि प्रेमळ दटावणीही केलेली नसायची. आनंदाची बाब म्हणजे ई टीव्हीमध्ये संपादक हे पदच नव्हतं. बहुतेक त्यामुळेच तिथल्या बातम्यांचा दर्जा चांगला होता आणि त्यांना टीआरपीही होता. संपादक नसल्यामुळेही अनावश्यक दबाव नव्हता. या नेत्याची बातमी घ्या, त्या नेत्याचा बाईट घ्या, ह्याचा फोनो घ्या, त्याला हेच प्रश्न विचारा, हा माझा मित्र, तो ही माझा मित्र, माझा प्रोमो करा असे वाक्य  तिथं कानावर पडत नव्हते. त्या काळातली टेक्नॉलॉजीही फास्ट नव्हती. नाही तर मोबाईलवर बोलतानाच ते वाजलेही असते.
ई टीव्हीत संपादकच नव्हता. त्यामुळे पाहुण्यांबरोबर शनिवारी गप्पांचा कार्यक्रम नसायचा. ज्या गावाला व्याख्यान त्या गावातला एखादा नामवंत शनिवारच्या  कार्यक्रमासाठी हेरायचा आणि ऑफिसच्या खर्चाने व्याख्यान आटोपून यायचं. असं 'जांभूळ अख्यान' ई टीव्हीमध्ये व्हायचं नाही.
ई टीव्हीमध्ये संपादक नव्हते. मात्र रोज डेस्कवर 3-15 ते 4-00 या वेळेत सर्व डेस्कची बैठक व्हायची. हवं तर तिला संपादकीय मंडळाची बैठक म्हटलं तरी चालेल. वरिष्ठ, बुलेटिन प्रोड्युसर, कॉपी एडिटर्स, पॅनल प्रोड्युसर्स सर्वच त्यात सहभागी व्हायचे. तिथे दोन गँगमधलं गँगवार नसायचं. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गोळीबार व्हायचा नाही. दिवसातून तीन-तीन वेळेस संपादकीय बैठक घ्यायची. दोन्ही गँगचे बारभाई त्यात बोलवायचे मग त्यांच्यासमोर फुशारकी, टिमक्या वाजवल्या  जायच्या नाही. खरंच ई टीव्हीतल्या त्या मीटिंगमध्ये कोणताच भेदभाव नसायचा. ई टीव्ही मध्ये संपादक गँग विरूद्ध इतर गँग असा प्रकार नव्हता. संपादकांवर तुम्ही पक्षपात करता असा आरोप होत नव्हता. किंवा संपादकही तुमची गँग एकी करून निर्णय घेते, असा आरोप करत नव्हते.
कोणत्या आडनावांना TRP असतो, याचीही काही ठोकताळी ई टीव्हीत ठरलेली नव्हती. कारण असे ठोकताळे ठरवण्यासाठी तिथं संपादक नव्हता. नाही तर कोणाचे फोनो घ्यायचे, कोणाला गेस्ट बोलवायचं हे ही तिथं आडनावं पाहून ठरलं असतं. ई टीव्हीमध्ये कोणत्याच अँकर आणि बुलेटिन प्रोड्युसरला बुलेटिनला TRP मिळाला नाही तर राजीनामा द्यावा लागेल, अशी धमकी देण्यात आली नव्हती. मग भलेही संपादकांचा TRP शुन्य असला तरी चालेल, पण तिथं ही वेळच येणार नव्हती.  कारण ई टीव्हीमध्ये संपादकच नव्हता.
सध्या तर गमतीनं एखाद्या चॅनेलमध्ये जायचं असेल तर कोणतं आडनाव असेल तर काम होईल असं अनेक जण छातीठोकपणे सांगत आहेत. गमतीचा भाग सोडला तरी हे प्रकरण आता गंभीर वळण घेत चाललं आहे. कारण व्याकरण, यांचे उच्चार खराब, यांची भाषा खराब असे शब्द वापरून नाउमेद करण्यासाठी एक'जात' पणे काही समुहाने पुढाकार तर घेतला नाही ना ? अशी शंकाही उपस्थित होतेय.
ई टीव्हीतले अँकरही ख-या अर्थानं हुशार होते.  सागर गोखले, मकरंद माळवे, माधुरी गुंटी यांची शब्द आणि उच्चारांवर हुकूमत होती. अँकर असूनही ते डेस्कवर व्हीओसाठी उपलब्ध असायचे. स्क्रिप्ट दिल्यावर पॅकेजही करायचे. अर्थात 12-14 वर्ष अँकर म्हणून काम केल्यानंतरही काही अँकर्सनी त्यांचा IQ वाढू दिला नव्हता. एखादं स्क्रिप्ट त्यांच्याकडे दिल्यावर तीन तास लागले तरी पॅकेज काही व्हायचं नाही. आणि शेवटी नाही म्हणजे नाहीच. आजही कोणत्या चॅनेलमध्ये एखादा अँकर क्रायसिस असताना, माणसं कमी असताना एका मिनीटात ब्रेकींग न्यूज फोनो सकट टाईप करून देत असेल तर त्या चॅनेलवर देवाची कृपा आहे, असंच म्हणावं लागेल.
ई टीव्हीतून कधीच कोणत्या कर्मचा-याला  काढलं गेलं नाही. किंवा गेलेल्या कर्मचा-याला चॅनेलनं पुन्हा बोलावलंही नाही. जगातल्या कामगार, श्रमिक यांच्या हक्कांसाठी कालचा सवाल, उद्याचा सवाल करणारे संपादक तिथे नव्हते. जगातल्या कामगारांची चिंता करायची आणि आपल्या चॅनेलमधल्या कर्मचा-यांची कपात होत असताना शांत बसायचे असा दुटप्पीपणा ई टीव्हीमध्ये नव्हता. कधी 70, कधी 90 कर्मचारी काढून त्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग ई टीव्हीत झाला नाही. आधी कर्मचा-यांना काढायचं आणि पुन्हा त्यांनाच बोलवायचं असा हा प्रकार कुठेही दिसू शकतो, पण ई टीव्हीत असं घडलं नव्हतं.
खरंच ई टीव्ही सारखं एखादं चॅनेल सध्या आहे का ? INFO-ENTERTAINMENT मध्ये ई टीव्ही सारखी कुणाचीच हुकूमत नव्हती. खरंच असं INFO-ENTERTAINMENT  एकही नाही. नाही म्हणायला साम आहे. मात्र ते नाही म्हणायलाच. कारण न्यूज चॅनेलमधून अनेक सहकारी तिथं जातात. पुन्हा तिथून परत येतात. आणि आराम करून आलो असं सांगतात.
हैदराबाद सारख्या परराज्यात असल्यामुळे सगळेच एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी असायचे. तिथं जीवघेणं राजकारण नसायचं. गँगही नव्हत्या त्यामुळे गँगवॉरही नसायचं. आणि संपादक नसल्यामुळे ते ही उघडपणे गँगचा उल्लेख करायचे नाही. गँगही संपादकावर तुम्ही भाजप-संघाच्या बातम्यांना फेव्हर करता असे आरोप व्हायचे नाही. म्हणजे  काही ई टीव्हीमध्ये सगळेच देवाचे अवतार होते अशातला भाग नाही. काही मान'करी' आणि जुळलेले 'सुर' असे गट होते. पण त्यांचं राजकारण खालपर्यंत झिरपत नव्हतं. अर्थात काही रिपोर्टर्सला क्वार्टरली रिपोर्टमध्ये तक्रारी करण्यासाठी उचकावलं जायचं. काही रिपोर्टर्स आणि स्ट्रिंजर तर ई टीव्हीचे कर्मचारी म्हणवण्यापेक्षा कुणाचे तरी मान'करी' म्हणून मिरवण्यात  धन्यता मानत होते. आम्ही सरांसाठी आगीत उडी मारू म्हणायचे. आणि हे उडी मारणारेच जेव्हा स्ट्रिन्जरचे रिपोर्टर झाले तेव्हा सरांवरच उड्या मारायला लागले, हा भाग वेगळा. काही रिपोर्टर्सनी तर बातम्यांची पावती बुकं ही छापली होती. पॅकेज, एव्हीबी, एव्हींचा वेगवेगळा रेटही होता. याला म्हणतात प्रामाणिक व्यवहार.काही स्ट्रिन्जर्स बातम्यांच्या  सीडी तयार करून नेत्यांनाही द्यायचे. तेवढाच पुरक व्यवसाय. पीआर करण्यासाठी या सीडीच्या बातम्या उपयोगी ठरायच्या.  अशा फिल्डवरील ब-याच व्यवहारांची दबक्या आवाजात चर्चा व्हायची. मात्र न्यूजरूममध्ये कोणताही व्यवहार नव्हता, तिथं होता तो जिव्हाळा. त्यामुळे इथं कोणताही गद्दाफी, दाऊद, छोटा शकिल, हसिना पारकर निर्माण झाले नाही. आपली गँग वाढावी यासाठी कुणाला ठरवून त्रास दिला गेला नाही. पीसीआरमधून आलेल्या बुलेटिन प्रोड्युसरला, काय काशी केली ? असा शब्द वरिष्ठांकडून वापरला जायचा नाही. आपल्या गँगमधला नसणारा पीसीआरमध्ये गेल्यावर कुणी केलं हे, काय हे, ह्यॅ, छ्या असे कुजकट शब्द वापरले जात नव्हते. अर्थात आपल्या गँगमधील कुणाकडून चूक झाल्यावर ती कशी झाकायची यासाठी गँग सरसावयची. आपल्या गँगच्या सदस्याने पर्दाफाशचा खुलासा केला तरी त्यावर बुरखा टाकण्याचा प्रयत्न केला जायचा. भारत विजयी होण्याआधीच विजयी झाल्याची ब्रेकींग चालवली तरी त्यावर चर्चा घडायची नाही. गावाकडचं राजकारण कोळून आलेली बेरकी मंडळी शार्प करून घेतली जात नव्हती. गावाकडून  आले तेव्हा झाप्या अवतारत असलेले,  तोंडावरील माशी उठत नसलेली मंडळी गँगच्या जोरावर हुकूमत  गाजवणार असा प्रकार ई टीव्हीमध्ये घडत नव्हता. अशा छळाला कंटाळून गँगमध्ये प्रवेश केल्यावर मात्र चांगली वागणूक दिली जायची. अर्थात असे प्रकार ई टीव्हीमध्ये नव्हते. अर्थात मी ही गावाक़डून आलोय. मात्र गावागावात फरक असतो, तो असा.
गावाचा विषय निघालाच आहे म्हणून थोडा विषय विभागवार नेतो. तुझा-माझा नावाच्या एका वाहिनीत तर एक गँग ही 'मराठवाडा गँग' या नावाने प्रसिद्ध झाली आहे. ती गँग करिअरला डसणारी गँग म्हणून प्रसिद्ध आहे.
ई टीव्हीमध्ये कधीच कुणाचं श्रेय हिरावून घेतलं जायचं नाही. जर एखाद्याने कन्सेप्ट दिली तर तो प्रोग्राम, सीरिज त्याच्याकडे दिली जायची. एखाद्याने दिलेली कन्सेप्ट मान्य झाल्या नंतर तो फक्त आपल्या गँगचा नाही, त्याचं प्रमोशन झालं आहे, म्हणून त्याला तो कार्यक्रम द्यायचा नाही. असं ई टीव्हीमध्ये घडत नव्हतं. आपल्या जवळचा किंवा जवळची आहे म्हणून कोणाला तरी 'जरा हट'वून आपलं प्यादं पुढं  करण्याची लांडीलबाडी केली जायची नाही.

मात्र ई टीव्हीमध्ये काही वस्ताद होते. 'वरिष्ठ तिथं घनिष्ठ' या न्यायाने वरिष्ठांच्या पुढेपुढे नाचणारे काही जण होते. वरिष्ठांच्या शेजारची खुर्ची मिळवण्यासाठी  काही जण तर धावतपळत यायचे. यात काही महिला सहकारीही होत्या. अर्थात त्या दोन किंवा एकच. काही सहकारी तर जवळ बसून असायचे.  त्यांच्या नजरेत सहका-यांची चूक आली तर सांगायचे नाही. मात्र ती  चूक ते सहकारी ऑन एअर दाखवायचे. अशा दिलदार वृत्तीची किंगमाणसं ई टीव्हीमध्ये होती.
अर्थात या  सर्व छोट्या खटपटीत ई टीव्हीतलं वातावरण कधी खराब झालं नाही. नवा आलेला प्रत्येक सहकारी इथं सामावला गेला. बातमी कशी लिहावी, पॅकेज कसं तयार करावं याचं सगळ्यांना शिक्षण दिलं गेलं. दीड मिनीटाचं पॅकेज तयार  करण्यात सगळेच ई टीव्हीयन्स निष्णात झाले. आजही दीड मिनीटाचं पॅकेज करण्यात माजी ई टीव्हीयन्सचा कुणी हात धरू शकणार नाही. बुलेटिनची आरओ कशी लावायची, बातम्या कोणत्या क्रमाने घ्यायच्या, व्याकरण हे सगळं तपासलं जायचं. बातम्यांच्या वेगवेगळ्या प्रकारात तज्ज्ञ असणा-या सहका-यांची नावं इथं देता येतील. साहित्य आणि व्याकरण दुर्गेश सोनार, पीटीआय + रॉयटर = गजानन कदम, वृत्तवेध म्हणजे विद्याभूषण आर्य आणि धनंजय कोष्टी ही नावं फिट होती. अभ्युदय रेळेकरही मार्गदर्शन करण्यात आघाडीवर असायचे. कोणत्याही मुद्यावर वाद कसा घालायचा ? हे मेघराज पाटील आणि माणिक मुंढे यांच्याकडून शिकायला मिळालं. निमा पाटीलचा कम्युनिस्ट असुनही अत्यंत दुराग्रही नसण्याची वृत्ती नव्या सहका-यांना मदतीची ठरायची. प्रवीण अंधारकर तर एडिटींगमधील तज्ज्ञ. फक्त ते  शिकवणार कधी ? एवढाच प्रश्न असायचा. शैलेश लांबे हे नॅशनल डेस्कवर असले तरी कोणतीही माहिती विचारल्या सांगण्यासाठी तत्पर असायचे. अशा या वातावरणात माझ्यासारखे अनेक ज्युनिअर इलेक्ट्रॉनिक जर्नलिझम शिकले. काही जण तर चांगलेच 'तयार'ही झाले. हे 'तयार'  प्रोडक्ट आता इतर चॅनेलमध्येही त्यांची चांगलीच 'छाप' पाडत आहेत.



ताजा कलम - या ब्लॉगमध्ये संपादक नसला म्हणजे चॅनेलला TRP असतो असा निष्कर्ष कुठेही काढण्यात आलेला नाही. सदर लेखकाचा तसा दावाही नाही. जर तुमच्या मनात तसं असेल तर त्याला माझा ईलाज नाही. मात्र जे तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही. बाकी, 'बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणोनी कळवळा येत असे' या न्यायाने हे लिखाण झालं आहे. ई टीव्हीत नसलेल्या संपादकावरून व्यक्तींमध्ये असलेल्या प्रवृत्तींवर हे लिखाण केलेलं आहे. त्यामुळे कुणीही व्यक्तीगत इमोशनल व्हायची गरज नाही. ( सगळे इतके इमोशनल असते, तर हा ब्लॉगही लिहावा लागला नसता. असो. )  नाही तरी आपल्या ब्लॉगची कॅचलाईन TROUTH ONLY ही आहेच. सत्याच्या मार्गावरूनच हा ब्लॉग जात आहे. हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
प्रत्येक क्षेत्रातच चांगल्या-वाईट प्रवृत्ती ( व्यक्ती शब्द वापरलेला नाही, हे आपल्या लक्षात आलंच असेल. ) असतातच. त्याला मीडियाही अपवाद नाही. लाईटच्या झगमगाटात असलेलं हे क्षेत्रही त्यापासून दूर नाही. मेकअप थोडा खरवडला तरी याचा खरा चेहरा समोर येतो. मी पण थोडा मेकअप खरवडला आहे. थोडाच....

2 comments:

  1. हे आपले अनुभवाचे बोल वाचून एलेक्ट्रॉनिक माध्यमाबद्दल बरीच काही माहिती मिळाली. ईटीव्ही वरून आता मराठी ऐकू येणारे नाही या गोष्टीने मनाला खेद झाला. But life has to go on. आपला ब्लॉग वाचायला आवडतो.
    यशवंत कर्णिक.

    ReplyDelete
  2. ईटीव्हीनं अनेकांना आयुष्याची शिदोरी दिलीय...त्यात फक्त नोकरी करण्यापुरता किंवा पत्रकारीतेचे धडे मिळाले नाहीत..तर विविध भागातून, राज्यातून आलेल्या लोकांशी नातं जोडलं गोलं होतं..ऑफीसमध्ये येताना एकाच बसमध्ये यायचा किंवा जेवणासाठी एकच कँन्टीन असयाचं त्यामुळंही एकोपा वाढण्यात मदत झाली..जे सहकारी या भट्टीत तयार झाले त्यांना कोणत्याच गँगची गरज नाही...ईटीव्हीतून बाहेर पडलेला प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र गँग आहे..त्याला काय कुणाची भीती..बाकी ब्लॉग मस्तच झालाय...लय भारी..
    धनंजय कोष्टी...

    ReplyDelete