Monday, June 3, 2013

राजकारण्यांनी लावली ब्लॉगची वाट !

अलविदा, ई टीव्ही मराठी न्यूज !, या विषयावर लेख लिहिल्यानंतर पुढील लेख प्रकाशित व्हायला बराच विलंब झाला. या काळात अनेक मित्रांनी ब्लॉगवर लेख का प्रकाशित  केला नाही ? या विषयी विचारणा केली. अर्थात मी त्यांना माझ्या मोबाईलवरून कॉल करून पदरमोड केल्यावर त्यांनी ही विचारणा केली, हा भाग वेगळा. मी काही कोणत्याही प्रादेशिक  वृत्तवाहिनीचा संपादक नाही, की ज्यामुळे वाचक मला एसएमएस पाठवून विचारणा करतील. मी जे काही आता लिहिलं आहे, त्यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता. कारण मी पत्रकार आहे, एखाद्या प्रादेशिक वृत्तवाहिनीचा संपादक नाही.
पण जाऊ द्या आजचा आपला विषय वेगळा आहे. राजकारण्यांनी आपल्या देशाची वाट लावली आहे. अर्थात यात मोठा वाटा काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचा आहे. इतरही आहेतच, मात्र त्यांना काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची उंची नाही. ज्या काँग्रेसने देशाची वाट लावली, ज्या राजकारण्यांनी देशाची वाट लावली त्यांनीच माझ्याही ब्लॉगची वाट लावली. नाही, नाही मला ब्लॉग बंद करा अशी धमकी आलेली नाही. मात्र मी एखादा विषयावर लिहिण्यासाठी विचार करतो, तोच नवा विषय उपस्थित होतो. अर्थात तुम्हा वाचकांना याचा अनुभव आहेच की, हा ब्लॉग विचारपूर्ण आहे. असो.
संसदेतला गदारोळ, चीनची घुसखोरी, अश्वनीकुमार आणि सीबीआय, पवनकुमार बन्सल आणि भाचे कंपनीची भ्रष्टाचार एक्सप्रेस, महामहिम सतीश चिखलीकर आणि जगदिश वाघ, सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या अधिका-यांची देदिप्यमान कामगिरी, किरीट सोमय्यांनी भुजबळांवर केलेले आरोप, 'सु'संस्कारित अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांची केलेली चेष्टा,  स्पॉट फिक्सिंग, नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये घडवलेलं हत्याकांड अशी आपत्तींची मालिकाच सुरू झाली. यातल्या एका घोटाळ्यावर किंवा विषयावर विचार करे पर्यंत पुढील घोटाळा येत गेला.  मी विचार करत राहिलो. मात्र माझ्या विचारांची गती घोटाळ्यांच्या गतीपेक्षा मागे पडली. त्यातूनच 'राजकारण्यांनी लावली ब्लॉगची वाट !' हा नवा लेख तयार झाला. वाईटातूनही चांगलं घडतं ते असं.
मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर शर्यत हवी की उद्यान या विषयावरही सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. 31 मे 2013 या दिवशी रेसकोर्सला दिलेल्या लीजची मुदत संपली. (तरी बरं रेसकोर्स आहे म्हणून त्या लीजला अजून कुणी लीद म्हटलेलं नाही.) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे  थीम पार्कच्या संकल्पनेचे सादरीकरण केले. शिवसेना पक्षप्रमुख ही स्थिती मोठ्या कौशल्याने आणि संयमाने हाताळत आहेत. मात्र आगामी काळात मोठा राजकीय वाद निर्माण करण्याची नेपथ्यरचना तयार झाली आहे. कोणताही विषय चिघळेपर्यंत ताणायचा ही काँग्रेसची परंपरागत शैलीच आहे. त्यामुळे मोठा वाद झाला तर नवल वाटण्याचं कारण नाही.
आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान तयार होऊन त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं तर दिल्लीतले पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर थुंकतील की काय ? अशीही त्यांना भीती वाटत असावी. धनिकांना रेसकोर्सवर सट्टा लावता आला नाही तर आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून मिळणा-या थैल्या मिळणार नाहीत. आणि इलेक्शनच्या फंडिंगलाच घोडा लागायचा, अशी काँग्रेसजनांना भीती वाटत असावी.
मात्र याच रेसकोर्सवरील जागेत थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्यांनी मांडला असता तर ? मग काय काँग्रेसच्या  गणंगांनी त्याला महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, फिरोज गांधी, संजय गांधी यांच्यापैकी कोणत्याही गांधीचं नाव देण्यासाठी (भ्रष्टाचाराने फुगलेल्या) छातीचा कोट केला असता. सगळे काँग्रेसवाले फेर लावून नाचले असते. मात्र धनिकांच्या रेसकोर्सच्या जागी सामान्यांसाठी उद्यान होत आहे म्हटल्यावर 'आम आदमी'चा कळवळा असलेल्या काँग्रेसच्या पोटात कळा सुरू झाल्या. (या कळा शब्दश: घ्यायच्या नाहीत.) आणि प्रस्तावित उद्यानाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ऐकल्यावर तर काँग्रेस वाल्यांचे भ्रष्टाचाराचं खाऊन टराटरा फुगलेले चेहरे हवा गेलेल्या फुग्यासारखे झाले होते. मुंबईतल्या सी लिंकला राजीव गांधीचं नाव देणारे हे काँग्रेसी गणंग. बोरिवलीतल्या नॅशनल पार्कला संजय गांधींचं नाव देणारे हे काँग्रेसी. कित्येक सरकारी योजनांना गांधी-नेहरूंची नावं देणारे हे काँग्रेसवाले. युतीच्या काळात लोकराज्यचं नाव शिवराज्य करण्यात आलं. मात्र  नंतर सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारनं पुन्हा लोकराज्य हे नाव दिलं. औरंगाबादचं संभाजीनगर नाव करतानाही काँग्रेसवाल्यांनी तोबा-तोबा केलं. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही मांजरं शिवसेनाप्रमुखांचं नाव देतानाही आडवी येणारच होती, यात आता कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही.  राष्ट्रवादी काँग्रेसचे 'सु'संस्कारित नेते अजित पवारांनी आडव्या जाणा-या मांजरांचं नेतृत्व स्वत:कडे घेतल्याचं चित्र आहे.  रेसकोर्स प्रकरणी मुख्यमंत्रीच निर्णय घेतील अशी कधी नव्हे ती मुख्यमंत्र्यांना आदर देणारी भाषा दादा वापरू लागले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनीही सर्व पक्षांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे. काँग्रेसच्या परंपरेला न अनुसरता मुख्यमंत्री काही तरी वेगळं करतील अशी अपेक्षा आहे. मात्र मुख्यमंत्री साहेब निर्णय घ्या, पण जरा लवकर.
 कारण आता खूप झालं आहे. शिवतीर्थावरही शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला विरोध झाला होता. सतराशे साठ नियम, कायदे सांगण्यात आले. मात्र आता शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. संयमाचा अंत झाला तर भावनांच्या यज्ञकुंडात अनेकांच्या समिधा पडतील. शिवसेनाप्रमुख हे आमचं दैवत आहेत. जगातल्या हिंदूंचं नेतृत्व त्यांनी केलंय. पिचलेल्या हिंदूंना त्यांनी हिंमत दिलीय. मुंबईतला मराठी माणसाला त्यांनी आवाज दिलाय. ज्यांनी आम्हाला लढायला शिकवलं. त्यांच्या  नावासाठी पुन्हा लढायला लावू नका.

1 comment:

  1. रेसकोर्सचं काय करायचं यासाठी राजकीय पक्षांचा गाढवपणा सुरु आहे..नको उद्यानं नको घोड्यांची रेस..होऊन जाऊद्या रेसकोर्सवर म्हाडाचा स्वस्त घरांचा (महाग नव्हे )मोठा प्रोजेक्ट...घो़डे गाढवांपेक्षा माणसांचा विचार व्हावा..आणि हो गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा नाही ना..सापडली ना 225 एकरची जागा..बाबा आत्ता बोला...देता जागा का निवडणुकीत लावू द्या काँग्रसेला घोडा...धनंजय कोष्टी..

    ReplyDelete