Friday, December 30, 2011

असे पाहुणे येती...

'पाहुणे' हा शब्दच मनात एक आनंद निर्माण करतो. पाहुणा हा येताना आनंदच घेऊन येत असतो. ( अर्थात इथं हा उल्लेख बोलावलेल्या पाहुण्यांबद्दल आहे. उगीच गैरसमज नको. ) आपल्याकडे पाहुणे येत असतात. तसंच आपणही कधी - कधी कुणाकडे पाहुणे म्हणून जातोचना. अर्थात आजकाल शहरांमध्ये वनबीएचकेच्या युगात पाहुणा येणार म्हटला तरी धडकी भरते.
मात्र आज इथं या ब्लॉगवर 'गेस्ट एडिटर' विषयी लिखाण करण्यात आलं आहे. वृत्तपत्रांमध्ये गेस्ट एडिटर ही संकल्पना चांगलीच रूजलेली आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियात आणि त्यातही मराठीमध्ये झी २४ तासनं गेस्ट एडिटरच्या माध्यमातून नेत्यांमधील संपादकीय गुण प्रेक्षकांसमोर आणण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नेत्यांचा दररोजच पत्रकारांबरोबर संबंध येत असतो. राजकीय नेत्यांच्या विविध भूमिकांवर वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून अनेकदा सडकून टीकाही होत असते. नेते मंडळेही 'माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला', हे वाक्य अनेकदा टोलवून देत असतात. त्यामुळे पत्रकार आणि राजकीय नेते यांचं नातं हे, 'तुझं माझं जमेना आणि....' या प्रकारातलं असतं.
मी नोकरी करत असलेल्या झी २४ तासनं गेस्ट एडिटर ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय केली आहे. आतापर्यंत झी २४ तासमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही दिग्गज मंडळी गेस्ट एडिटर म्हणून आले आहेत. नेते असलेली ही मंडळी उत्तम संपादकही आहेत, हे या निमीत्तानं जवळून पाहता आलं. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं कामकाज चालतं तरी कसं ? याची उत्सुकता नेत्यांच्या मनात असते. इनपुट, आऊटपूट, व्हीसॅट, स्टुडिओ, पीसीआर पाहताना त्यांच्या चेह-यावरील जिज्ञासेचे भाव बरंच काही सांगून जातात.

एखादी बातमी कशी प्रझेंट करावी याची जाणही नेत्यांना आहे. संपादकीय बैठकीत विविध बातम्यांवर चर्चा करताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पत्रकारितेतली माहिती अपडेट असल्याचं लक्षात आलं. उद्धव ठाकरेंनी संपादकीय बैठकीत शेती आणि शेतक-यांच्या आंदोलनाच्या बातम्यांना प्राधान्य दिलं होतं. तर शरद पवारांनी एका नेत्याच्या 'कारनाम्याची' बातमी जर VISUELS असतील तर हेडलाईन करा असं सांगत सगळ्यांचीच विकेट काढली. राज ठाकरेंनी घेतलेल्या मोहन भागवतांच्या भेटीचं विश्लेषणही त्यांनी खास त्यांच्या शैलीत केलं. कधी - कधी मित्र पक्षांना धक्का देण्यासाठी मीही मातोश्रीवर बाळासाहेबांकडे जात असतो, असं सांगत त्यांनी राजकारणाचा कानमंत्रही दिला.
वरील सर्व नेत्यांबरोबर ऑफिसमधल्या सर्व स्टाफला संवाद साधता आला. या नेत्यांनीही दिलखुलासपणे कोणताही पडदा न ठेवता सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिल्याचा अनुभव या निमीत्तानं सगळ्यांनाच आला. गेस्ट एडिटर येणार म्हटल्यावर सगळेच आपापले प्रश्न घेऊन तयार असतात. कौटुंबिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न गेस्ट एडिटरला विचारले जातात. राज ठाकरेंची बेधडक शैली, उद्धव ठाकरेंची लपवाछपवी न करता सत्यच सांगण्याची शैली पुन्हा एकदा सर्वांना पाहता आली.
शरद पवारांसारखा राज्य आणि देशातल्या राजकारणावर छाप असणारा नेता या निमीत्तानं जवळून पाहता आला. गेस्ट एडिटर म्हणून त्यांच्यात असलेले पत्रकारितेचे गुणही सगळ्यांना कळाले. कृषी, क्रीडा, राजकारण, सहकार या सारख्या विविध विषयांचा शरद पवारांचा मोठा अभ्यास आहे. परिणामी त्यांना विचारण्यासाठी प्रत्येकाकडे किमान तीन - चार प्रश्न होतेच. अर्थात सगळ्यांचे एवढे प्रश्न जर विचारले गेले असते तर गेस्ट एडिटरला मुक्कामच ठोकावा लागला असता. अर्थात जे प्रश्न विचारले गेले त्याची शरद पवारांनी सविस्तर उत्तरं दिली. त्यांचा शेतीवर असलेला अभ्यास मनाला भावला. शेतक-यांनी फक्त कापूस आणि ऊसाऐवजी इतर पिकांचाही विचार करावा असा पर्याय त्यांनी सुचवला. सहकार, कारखानदारी, राजकारण यातल्या सगळ्याच, काही खोचक प्रश्नांनाही गेस्ट एडिटर असलेल्या शरद पवारांनी उत्तरं दिली.
य़शवंतराव चव्हाण यांचा वाचनाचा व्यासंग किती दांडगा होता हे, या निमीत्तानं सगळ्यांना कळालं. जगात गाजणारं कोणतंही इंग्रजी पुस्तक हे यशवंतरावांनी वाचलेलं असायचं. तब्बल पंधरा हजार ग्रंथ यशवंतरावांच्या संग्रही होते. विदेशातल्या अनेक परराष्ट्रमंत्र्यांबरोबर त्यांची मैत्री होती. जगातल्या सर्वात्तम पुस्तकांवर यशवंतराव चव्हाणांची विदेशातल्या बड्या हस्तींबरोबर चर्चा व्हायची.
अशी दिलखुलास मुलाखत सुरू असताना शरद पवारांचे दिलदार मित्र बाळासाहेब ठाकरे यांचा विषय चर्चेत येणं सहाजिकच म्हणावं लागेल. बाळासाहेबांची मैत्री, शिवसेनेचा उदय, गल्लीतल्या सामान्य कार्यकर्त्यांना शिवसेनेनं दिलेली प्रतिष्ठा यावर शरद पवारांनी सांगितलेल्या आठवणी मनात घर करून राहणा-या आहेत. दोन मित्रांमधला हा जिव्हाळा पुढच्या पिढीत तितकासा उतरलेला नाही, ही 'जनरेशन गॅप'ही त्यांनी प्रांजळपणे कबूल केली. अर्थात पुढच्या पिढीत तितका जिव्हाळा नसला तरी त्यांच्यात मैत्री असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनाप्रमुखांच्या राजकीय विचारसरणीबद्दल मतभेद आहेत. मात्र त्यांचा दिलदारपणा, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी जपलेली मैत्री आताच्या राजकारणात दुर्मिळ असल्याचं सांगत पवारांनी सध्याचं राजकारण कसं गढूळ झालंय हे ही दाखवून दिलं. सुप्रिया सुळे पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक लढवत असताना शिवसेनेनं उमेदवार दिला नाही. मित्राची मुलगी राजकारणात येत आहे, म्हटल्यावर शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उमेदवार दिला नाही, ही आठवण शरद पवारांनी सांगितल्यावर या दोन्ही नेत्यांमधली मैत्री किती निरपेक्ष आहे, हेच पुन्हा सिद्ध झालं. राजकारणात वैयक्तीक प्रहार न करताही मैत्री जपता येते, हेच या दोन मित्रांकडे पाहून लक्षात येतं. अर्थात हे जर इतर नेत्यांच्या लक्षात आलं तर, राज्यातलं राजकारण स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment